Feb 29, 2024
प्रेम

तू तर चाफेकळी - भाग 6

Read Later
तू तर चाफेकळी - भाग 6

 

 

 

तू तर चाफेकळी - भाग 6

अबिर , निषाद आणि अंजली तिघेही कॉन्फरन्स हॉल मध्ये पोहोचले. निषादने तिघांसाठी कॉफी ऑर्डर केली आणि ते कामाला लागले. सुरवातीला अंजुने आधीच्या प्रोजेक्ट संबंधी सगळी माहिती निषादला दिली. प्रोडक्शन कसं होतं नि गुणवत्ता कशी राखली जाते याचीही माहिती तिने सोबतच दिली. तिच्या बोलण्यावर तर निषाद फिदा झाला होता. आणि अबिर.... तो तर काय अंजुच्या प्रत्येक हालचाली टिपत होता. काम करताना ती किती इनवोल्व होते हे त्याने स्वतः पाहिलं होतं.

" आधीच्या सगळ्या प्रोजेक्ट्स तुम्ही अगदी छान हँडल केल्या आहेत... " निषाद म्हणाला.


" मग आता तुमचे प्रोजेक्ट्स का मिळत नाहीत आमच्या कंपनीला....?? " अंजुने सरळच प्रश्न केला.


" सॉरी. ते मी नाही सांगू शकत. कारण मी हल्लीच जॉईन झालोय इकडे.... आपण बाकीच डिस्कशन आमच्या मॅनेजर सरांसमोर करूया... " निषाद म्हणाला. नि त्याने मग जाऊन मॅनेजर सरांना बोलवून आणलं.


अबिर नि अंजलीने जे रफ प्रेझेंटेशन तयार केलं होतं ते त्यांनी मग मॅनेजर सरांना दाखवलं. अबिरने मग त्यांना मुद्देसूद सगळं प्रेझेंटेशन सांगायला सुरुवात केली. एक एक पॉईंट त्याने स्वतःच्या काही ऍडिशन सहित स्पष्ट केला. त्यामुळे मॅनेजर सर खूपच इम्प्रेस झाले.

" तुमचं हे प्रेझेंटेशन मला आवडलंय.. पण त्यात बरेचसे चेंजेस करावे लागतील... " मॅनेजर सर म्हणाले.


" सर आम्ही हे रफ तयार केलं होतं. ऍक्चुली सर आम्हाला तुमच्या सजेशनची गरज आहे. तुम्ही तुमच्या काही डिमांड असतील तर सांगा...म्हणजे प्रोडक्टच्या बाबतीत किंवा काही कंपनीच्या कामाबद्दल असेल तर सांगा. " अंजली म्हणाली.


" ok..... " मग सरांनी त्यांच्या काही सजेशन आणि सूचना त्यांना दिल्या.


" सर आम्ही यावरून तुमच्यासाठी एक उत्तम प्रेझेन्टेशन तयार करू आणि लवकरच आपल्याला भेटू....." अबिर म्हणाला.


" Yess sure....... बाकीच्या गोष्टी तुम्ही निषादशी बोलून घ्या.. excuse me.... " म्हणत सर निघून गेले.


" तुम्ही खूप छान स्टडी केला आहे तुमच्या कामाचा.. ग्रेट वर्क.....!! " निषादने अंजली समोर शेकहँडसाठी हात पुढे केला. तिने हात मिळवत त्याला हसून ग्रीट केलं.


" thank you so much Mr. Nishad . तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आम्ही तुमच्या कंपनीसाठी उत्तम प्रेझेंटेशन तयार करू...चला निघायचं का...?? " अंजली म्हणाली." थँक्स काय.. माझं कामच आहे ते. आणि त्यानिमित्ताने माझा मित्र भेटला मला. तुम्हाला काहीही मदत लागली तरी कळवा. मेबी पुढच्या महिन्यात एखादं टेंडर ओपन होण्याची शक्यता आहे. मी कळवेनच तुम्हाला. त्यानुसार तुम्ही प्रेझेंटेशन तयार करा..." निषाद


" ok.. निषाद चल आम्ही निघतो. परत भेटू.... " अबिर म्हणाला


" अरे... थांबा चाललात कुठे लगेच.. लंच ब्रेक आहे. आपण सोबतच लंच घेऊया. आणि तसं पण तुमचं लंच कंपनीकडून आहे. सो प्लिज.... " निषादच्या पाठोपाठ ते दोघेही बाहेर आले.

....................................
निषाद त्यांना केफेटेरिया मध्ये घेऊन गेला. तिथे छोटी मोठी टेबल्स मांडली होती. त्यातल्या एका टेबलवर त्याने त्यांना बसायला सांगितलं आणि प्युनला जेवण आणायला सांगितलं.


" मी डबा आणलाय पण ..... " अंजलीने सांगितलं.


" असुदे त्यात काय होतंय.. आज एक दिवस बाहेर जेवलीस तर ओरडणार आहेत का घरी ?? " अबिरने हसून विचारलं.


" काय मग..... काय चाललंय....?? " निषाद आपल्या जागेवर बसत म्हणाला.


" काही नाही. हिने डबा आणलाय. म्हटलं आज खा जरा बाहेरच... " अबिर


" थालीपीठ आणलंय मी......." तिने पर्समधून डबा काढून त्याच्यासमोर ठेवला.


" ओहह.... My favourite...!!! ए निषाद तुझं ते लंच राहू दे. तू नि अंजली खा ते मी आज थालीपीठच खाणार.... " अबिर म्हणाला. " चालेल ना पण....?? " त्याने हातात डबा घेत तिला विचारलं. ती मानेनेच हो म्हणाली.


तो पर्यंत निषादने मागवलेलं जेवण देखील आलं. रोटी नि भाजी होती. निषादने मग त्याला नि अंजलीला वाढलं. अबिर तर डबा उघडून तो थालिपीठाचा सुगंध मनात साठवत होता. त्याने घाईने एक तुकडा मोडून तोंडात टाकला. दोनच मिनिटं गेली......


" हा.... हा.... हाय हाय......हाय ... तिखट.... तिखट... !!!! " त्याला जाम तिखट लागलं होतं. निषादने दिलेला पाण्याचा ग्लास त्याने एका घोटात संपवला.


" बाप रे.... अग खूप तिखट झालंय हे...... " तो अजूनही हाय हुई करतच होता.


" हो का..... मला नाही माहीत. मी खाऊन नव्हतं बघितलं सकाळी..... " ती केविलवाण्या चेहरा करत म्हणाली.


" अग काय तू..... दुसऱ्याला देताना जरा चांगलं द्यावं.... " अबिर म्हणालाच शेवटी.


" मी नव्हतं सांगितलं माझ्या डब्यांतल खायला तूच घेतलास अधाशीपणे..... " अंजली पण चिडली.


" अरे का भांडताय.... अबिर ते राहू दे तू रोटी भाजी खा.... " निषादने मग दुसरी प्लेट मागवली आणि त्यात अबिरला रोटी भाजी वाढली. अंजलीकडे रागाने बघत त्याने एकेक घास खायला सुरवात केली.


( आज सकाळी आपल्या अंजली मॅडम काही उगीच लवकर उठल्या नव्हत्या. अबिरला थालीपीठ आवडल होतं त्यामुळे त्याचं नाव काढल्यावर अबिर त्यावर तुटून पडणार याची अंजुला खात्री होती. त्यामुळे मॅडमनी भरपूर तिखट घालून 2 थालीपीठ केली आणि ती डब्याच्या वरती ठेवली..आणि त्याखाली स्वतःसाठी असलेली थालीपीठ ठेवली.... त्यामुळे आपल्या अंजु मॅडमना यातलं काही माहीत नाही हा गैरसमज करू नका.....अबिरला हाय हुई करताना मॅडम गालातल्या गालात भारी हसत होत्या आणि ते अबिरच्या नजरेतून सुटलं नव्हतं....)


......................................

मिटींग संपल्यावर दोघेही मग आपापल्या घरी आले. नेहमीपेक्षा ती लवकरच आली होती. ती दाराजवळ आली बेल वाजवणार तोच तिला कोणाचा तरी आवाज आला. हळूच दबकत दबकत ती आवाजाच्या दिशेने जाऊ लागली.
तर तिचा अमेय दादा फोनवर कोणाशी तरी बोलत होता.


" प्लिज तू समजून घे ना राणी..... मला खरंच उद्यापासून वेळ नाही मिळणार ग बोलायला. दोन दिवस मला कॉन्फरन्स साठी जायचं आहे... " तो बोलत होता." हम्म... तुझं नेहमीचंच आहे हे... तू बोलूच नकोस माझ्याशी. माझ्यासाठी कधीच वेळ नसतो तुझ्याकडे. ऑफिस ऑफिस करत बस.... बाय... " पलीकडून मीराने फोन कट केला होता.फोन ठेऊन अमेय मागे वळला तर भिंतीला टेकून अंजली उभी असलेली त्याला दिसली. तो जरासा गोंधळला.. पण लगेचच त्याने स्वतःला सावरलं आणि तो अंजुजवळ आला.


" अंजु..... आज तू लवकर कशी.....?? " त्याने विचारायचं म्हणून विचारलं.


" हेच मी तुला विचारणार होते.... तू कसा काय आज लवकर उगवलास.....?? " ती रोखून त्याच्याकडे बघत होती.


" माझी कॉन्फरन्स आहे दोन दिवस.. उद्या लवकर निघायचं आहे. तयारीसाठी म्हणून लवकर पाठवलंय. " तो म्हणाला


" तू एकटाच जाणार आहेस की तुझ्या राणीसाहेब पण येणार आहेत....?? " अंजुने विचारलं. त्यावर अमेय दचकला.


" मी..... ते..... मी एकटाच जाणार आहे... कोण राणी कुठची राणी....??? " तो गोंधळला.


" आता नावही मीच सांगू की तू संगतोयस.....? " तिने जरा त्याला धमकावल


" अंजु.... तू समजतेस तसं काही नाही.. म्हणजे आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत...." अमेय


" हो माझी फ्रेंड म्हणजे तुझी पण फ्रेंडच असणार ना... मी पण विसरलेच.....असो. चल जाऊ घरी... " ती त्याचा हात धरून ओढत नेऊ लागली. चालता चालता त्याच्या लक्षात आलं अंजु काय बोलली ते... म्हणजे अंजुला संशय आलाय हे त्याच्या लक्षात आलं.


" अंजु एक मिनिट....... पण तुझ्या मैत्रिणीचा विषयच कुठे आला मधेच....." तिला थांबवत त्याने विचारलं


" मग कोण दुसरी आहे का....??? "


" नाही तसं नाही.. दुसरी कोण असती तर तिने मला फाडून खाल्लं असतं.....!!! " तो पटकन बोलून गेला आणि त्याने जीभ चावली." थांब आता सांगतेच मीराला....... " ती पर्समधून फोन काढू लागली.


" अंजु गप हा... तू असं काही करणार नाहीयेस.....प्लिज प्लिज....." तो एवढासा चेहरा करत म्हणाला.


" हो का.... मीराला नाही पण मी आईला सांगणारे हे नक्की.......माझ्यापासून लपवुन ठेवता काय......" ती खुश होत म्हणाली." नाही हा अंजु... घरी इतक्यात तरी काही सांगायचं नाहीये. प्लिज प्लिज. ... या रक्षाबंधनला तुला छान ड्रेस घेऊ आपण..... " अमेय तिला समजावत म्हणाला" लाच....?? लाच देतोस तू मला.. आता तर मी सांगणारच... त्या मीराला पण बघते मग.... " असं म्हणून अंजु पळाली. पण थांबून पुन्हा मागे आली.


" ड्रेस मी तुझ्याकडुन वसूल करेनच......" जोरात हसत ती आत पळाली. मागोमाग अमेय देखील गेला.

 

.....................

 

त्या दोघांना असं एकत्र आलेलं बघून आई बाबांना आश्चर्य वाटलं.


" तुम्ही दोघे एकत्र कसे.... ते पण आज लवकर...?? " आई त्यांच्यासाठी पाणी आणता आणता म्हणाली.


" माझी मिटिंग होती ती संपली म्हणून मी आले लवकर .. याचं माहीत नाही... " त्याला वेडावत ती पाणी प्याली.


" माझी कॉन्फरन्स आहे मुंबईला दोन दिवस. उद्या सकाळी लवकर जायचंय. तयारीसाठी म्हणून लवकर आलो...."
अमेय


" अरे मग बॅग भरायला हवी तुझी... ड्रेस वगरे आहेत का इस्त्री केलेले.... नाहीतर पहिल्या पासून तयारी सगळी...." आईने विचारलं.


" हो आई. आहेत कपाटात.... तू बॅग भर. तोपर्यंत मी काय वस्तू आणाव्या लागतील का ते बघतो नि जाऊन घेऊन येतो... " तो उठत म्हणाला


" हम्म.... न्यायचं असेल कोणासाठी तरी काहीतरी स्पेशल....." अंजली पुटपुटली पण सगळ्यांनीच ते ऐकलं.


" म्हणजे.....??? " आई आळीपाळीने एकदा अमेय कडे नि एकदा अंजूकडे बघत होती.


" अग तू हिचं काय ऐकतेस आई.....थालीपिठात मुद्दाम जास्त तिखट घालून लोकांना देते ही..... " अमेय हसत म्हणाला... आता शॉक लागायची पाळी अंजुची होती.


सकाळी अंजूचे प्रताप चालू होते ते अमेयने ऑफिसला निघता निघता पाहिले होते. पण तो काहीच बोलला नव्हता. पण तो असं अचानक आई बाबांसमोर बोलल्याने अंजुला काय बोलावं तेच सुचेना." होय अंजु..... असं केलंस तू....?? तरीच म्हटलं आज मॅडमची सकाळ लवकर कशी झाली...." आईने रागाने विचारलं." आई ..... मी काही नाही केलं.......मी ते..... " असं म्हणून अंजुने आपल्या खोलीकडे धूम ठोकली आणि अमेय आई बाबा सगळे तिच्या पळणाऱ्या आकृतीकडे बघत हसत होते..

................................

इकडे अबिरच्या डोक्यातून मात्र अंजुचा विचार जात नव्हता. अंजुच्या निरागस चेहऱ्याकडे बघून ही पोरगी इतकी बिलंदर असेल असं कोणालाही वाटलं नसत. पण त्याला तिखट लागल्यावर हसणारा अंजुचा चेहरा त्याला काही केल्या विसरता येत नव्हता.


क्रमशः.....

 

 

नमस्कार वाचकहो ,


तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचून खूप खूप बरं वाटलं. काही वाचक बंध रेशमाचे या कथेचे भाग पोस्ट करा असं सांगत आहेत. तर त्यांना मी सांगू इच्छिते की कथेचे भाग लिहण सुरू आहे. कथेचे भाग यासाठी पोस्ट केले नाहीत की मध्ये जर वेळ गेला तर भागांची लिंक तुटत जाते. त्यामुळे कथा लिहून पूर्ण झाली की तूम्हाला रोज एक भाग वाचनासाठी पोस्ट केला जाईल. तुम्हाला सलग कथांचे भाग वाचता यावेत या साठी आत्ता भाग पोस्ट केले नाहीत. त्यासाठी सॉरी. कथेचे भाग मोठे असावेत , सलग असावेत या साठी बराच वेळ जातो. शिवाय प्रसंगानुरूप वाक्यरचना करावी लागते. त्यामुळे कथा लिहिली आणि लगेच पाठवली असं होतं नाही. योग्य मांडणी होईपर्यंत सगळ्याच लेखकांना वेळ लागतो.. तुम्ही म्हणाल ही फार कारणं देते. पण आत्ता जरी वेळ गेला तरी तुम्हाला छानच वाचायला मिळेल अशी खात्री बाळगा. हे बंध रेशमाचे पर्व 2 चे पुढील भाग पुढच्या महिन्यापासून नियमित पोस्ट होतील... तोपर्यंत तू तर चाफेकळी या कथेचा आनंद लुटा.
Thank you

© ® सायली विवेक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//