तू तर चाफेकळी - भाग 17

Love Story

तू तर चाफेकळी - भाग 17



मेहता कंपनीची प्रशस्त इमारत सर्वांचच लक्ष वेधुन घेत होती. वेगवेगळ्या कंपनीजचे रिप्रेझेन्टेटिव्ह येत होते. रिसेप्शनिस्ट सगळ्यांच रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि आलेल्या सगळ्यांना वेटिंग रूममध्ये बसायला लावलं. प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दिसत असला तरी थोडीफार धाकधूक मनात होतीच. अबिर पण वेळेत आला. पण त्याच लक्ष सारखं इन्ट्रान्स कडे होतं. थोड्या थोड्या वेळाने तो घड्याळ चेक करत होता. काही वेळाने निषादने येऊन सगळ्यांना आपली ओळख करून दिली. तो मग त्यांना घेऊन कॉन्फरस हॉल मध्ये गेला. त्या सगळ्यांच्या पाठोपाठ एक व्यक्ती त्यात सामील झाली आणि बाकीच्यांचा नकळत कॉन्फरस हॉल पर्यंत पोहोचली. कॉन्फरस हॉल चांगलाच मोठा होता. सर्वांना बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था. समोर ppt साठी व्हाइट स्क्रीन लावलेली. एका बाजूला बोलण्यासाठी जागा.. सगळी अरेंजमेंट केलेली होती. निषादने सगळ्यांना बसायला सांगितलं आणि तो बाकीची व्यवस्था बघण्यासाठी गेला. एकेक करून कंपनीचे अधिकारी आपापल्या जागी येऊन बसले. कॉन्फरसला सुरवात झाली. मेहता कंपनीच्या मॅनेजरनी सर्वांचं स्वागत केलं. त्यानंतर कंपनीचे MD मेहता सरांनी थोडं औपचारिक बोलुन कॉन्फरसला सुरवात केली. पण अबिरच मात्र त्याकडे लक्ष नव्हतं. अंजुचा अजुनही पत्ता नव्हता. जर ती आली नाही तर त्याला ते प्रेझेंटेशन हँडल करावं लागणार होतं आणि तेच त्याला नको होतं. मग एकेक करून आलेले रिप्रेझेन्टेटीव्ह आपल्या प्रोजेक्ट विषयी माहिती देऊ लागले. त्यासंबंधी त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. काही जणांनी उत्तमरीत्या प्रश्नांची उत्तरे दिली तर काहींना काही बोलताच आले नाही. यावेळी नव्याने इस्टेब्लिश झालेल्या कंपनीजना देखील संधी देण्यात आली होती. सगळ्यांनीच जीवतोड मेहनत घेतली होती. त्यामुळे प्रोजेक्ट कोणाला मिळणार यासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली होती. दोन चार प्रेझेन्टेशन्स पार पडले आणि लंच ब्रेक झाला. बाकीचे प्रेझेंटेशन त्यानंतर होणार होती. सगळे बाहेर गेले तशी ती व्यक्तीही उठली आणि बाहेर आली. अबिरची नजर मात्र अंजुला शोधत होती. जसजसं त्यांचा नंबर जवळ येत होता तसतशी त्याची धाकधुक वाढत होती.


" अबिर काय झालंय...?? एवढा डिस्टर्ब का आहेस....?? " निषादने जेवता जेवता त्याला विचारलंच.


" अरे यार टेन्शन आलंय. ती मिस अंजली. तिचा अजून पत्ता नाहीये. इलेव्हन तावरला आली नाही तर मोठं प्रोजेक्ट हातचं जाईल. " अबिर डोक्याला हात लावुन बसला होता.
तेवढ्यात निषादला अंजु एका टेबलवर हार्ड कॉपीज वाचत असलेली दिसली. तो अबिरला सांगणार तोच अंजूचं त्याच्याकडे लक्ष गेलं तिने त्याला खुणेनेच गप्प राहायला सांगितलं. निषादने फक्त मान डोलावली.


" डोन्ट वरी अरे येईल ती. आणि तुमचं प्रेझेंटेशन आजच होईल असं नाही. कदाचित उद्या देखील होईल आणि ती नाही आली तर तू आहेसच ना तू दे प्रेझेंटेशन... " निषाद हसला.


" निषाद... मी नाही हे करू शकत. तुला चांगलं माहीत आहे... माझ्या आयडी वरून मला हे प्रोजेक्ट नकोय... " अबिर अजूनही टेन्शनमध्ये होता. त्याहीपेक्षा त्याला अंजुचा भयंकर राग येत होता.



" शांत हो अबिर... चल आपण आत जाऊया. थोड्या वेळात पुढचं सेशन सुरू होईल... " निषाद त्याला घेऊन कॉन्फरस हॉल मध्ये आला.


अर्ध्या तासात पुढच सेशन चालू झालं. एक प्रेझेंटेशन पार पडलं आणि ND कंपनीच नाव घेतलं गेलं. अबिरला तर काही सुचतच नव्हतं. कोणीतरी पुढे जायला पाहिजे यासाठी तो उठणार तोच अंजु पुढे झाली आणि सर्वांच्या समोर जाऊन उभी राहिली. अबिर तर तिच्याकडे पाहतच राहिला. लाईट ब्लु कलरचा शर्ट...थ्री फोर्थ साईझ ब्लॅक स्कर्ट... केसांचा पोनीटेल... चेहऱ्यावर हलका मेकअप आणि एक कॉन्फिडन्ट लूक.... तिने सर्वांवर एक नजर फिरवली आणि आपल्या प्रेझेन्टेशनला सुरवात केली.


एकेक पॉईंट ती व्यवस्थित क्लिअर करत होती. बाकीच्या प्रेझेंटेशन पेक्षा त्यांनी खूप नवीन नवीन संकल्पना त्यामध्ये मेन्शन केल्या होत्या. अबिर तर भान हरपून तिचं बोलणं ऐकत होता. She is brilliant त्याच्या मनाने पावती दिली. तिचं बोलून झाल्यावर तिला काही प्रश्न विचारण्यात आले. त्याचीही तिने कॉन्फिडन्टली उत्तरे दिली. सर्वांचे डाउट क्लिअर करून ती आपल्या जागेवर बसली. अबिरकडे तर तिने पाहिलं देखील नाही. त्याला जरा रागच आला. एवढं जीव ओतुन सगळं केलं पण त्याचं काहीच नाही कोणाला. त्यानेही मग लक्ष दिलं नाही. आजच सेशन संपलं तेव्हा जवळजवळ संध्याकाळ झाली होती. हळूहळू सगळे निघुन जात होते. अंजु देखील उठली. अबिर तर आधीच बाहेर आला होता. निषादशी बोलत होता पण एक नजर मात्र अंजूवर होती. ती बाहेर आली तशी निषादने तिला हाक मारली.


" हाय...... छान झालं प्रेझेंटेशन..... " त्याने तिच्याकडे बघत हात पुढे केला.


" ओहह... थँक्स.... " तिनेही हसतच हात मिळवला. तिने अबिरकडे पाहिलं पण त्याने मान दुसरीकडे फिरवली.


" बहुतेक हे प्रोजेक्ट तुम्हालाच मिळेल मला खात्री आहे... " निषाद


" हो.. बघू आता. काय होतंय ते. We did our best. चल मी निघते खूप उशीर झालाय..... " ती हातातली पर्स चेक करत म्हणाली.


" मी सोडतो तुम्हाला...... " अबिर तिच्याकडे न बघता म्हणाला.


" काही गरज नाही. मी जाईन..... " अंजु म्हणाली.


" मी विचारलं नाही. सांगतोय. बाहेर मी वाट बघतोय. " आणि तो तरातरा बाहेर निघुन गेला.


" असा काय हा....?? " अंजु मनातच पुटपुटत त्याच्या मागोमाग गेली.

अबिरने तिच्यासमोर आणून गाडी उभी केली. तीही मग त्याच्या बाजूच्या सीटवर येऊन बसली. त्याने तिच्याकडे न बघता गाडी स्टार्ट केली.


" thank you....... " अंजु म्हणाली.


" कशाला....?? " अजूनही तो रागातच होता.


" काल तू नसतास तर कंपनीच नुकसान झालं असतंच शिवाय माझा पण जॉब गेला असता....thank you so much.... खरंच..... " ती मनापासून म्हणाली.


" खूपच लवकर सुचलं हे म्हणायला..... " त्याने रागातच गाडीचा गेअर बदलला.


त्यानंतर अंजु काहीच बोलली नाही. डोळे मिटून तिने सीटला डोकं टेकवल तसं तिच्या डोळ्यांसमोर काल घडलेल्या गोष्टी तरळू लागल्या.

...................................

ऑफिसमध्ये सगळेच टेन्शनमध्ये होते. प्रोजेक्ट डिटेल्स मिळाले नाहीत तर खूप मोठं नुकसान होणार होतं आणि इतक्या कमी वेळात दुसरं प्रेझेंटेशन तयार करणं सोपं नव्हतं. अबिरने ऑफिसला आल्या आल्या सगळ्यांना एकत्र केलं आणि त्यांना काही सूचना दिल्या. या सगळ्यात मनात नसताना त्याने अंजुला देखील सामावुन घेतलं होतं. थोड्याच वेळात मॅनेजर सर आले.


" अरे अबिर.... काय झालं प्रोजेक्टचं कोणी केलं काही कळलं का...?? " राकेशने विचारलं.


" नाही ना अजून... आता उद्याच्या कॉन्फरसला जाता येणार नाही. सगळी मेहनत फुकट गेली.... " तो रागातच होता.


" अरे पण मला कळत नाही. असं झालंच कसं... आपले तर सगळे सीसीटीव्ही चालू असतात. त्या चोराला हे लक्षातच नाही वाटतं....." यश


" सगळं चेक करून झालंय. पण त्या फुटेजमध्ये काहीच मिळालं नाही.... " अबिर म्हणाला. इतक्यात त्याला कॅफेटेरियातुन कुलकर्णी सर बाहेर येताना दिसले. त्याने हाक मारून त्यांना बोलावलं.


" सर तुम्ही ऑफिस सुटल्यावर सगळ्यात शेवटी जाता ना...?? मग तुम्हाला कोणी दिसलं का अनोळखी वगरे आपल्या इथे.....? " अबिरने विचारलं.


" नाही रे.. मला तसं कोणीच दिसलं नाही. तसं असतं तर मी कालच बोललो असतो की सरांना.... " एवढं बोलून कुलकर्णी सर आपल्या केबिनकडे जायला निघाले. तोच अंजूचं बोलणं त्यांच्या कानावर पडलं आणि ते थांबले.


" अरे पण मी काय म्हणते... आपल्या पीसी मधून ज्याने ते डॉक्युमेंट कॉपी करून घेतले असतील त्यांच्या पीसीला देखील ते असतीलच की....?? आपण सगळ्यांचे पीसी चेक करूया का....?? " अंजु म्हणाली.


" पण कोणी ठेवलं असेल का ते...?? कधीच डिलीट केलं असेल त्यांनी ते..... " सीमा


" पण काही वेळा उत्साहाच्या भरात माणूस चूक करतोच..... एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.... " यश म्हणाला.


सगळे बोलत असतानाच एक व्यक्ती तिथून सटकली आणि आपल्या पीसीपाशी आली. ते सेव्ह केलेलं प्रेझेंटेशन कुठे आहे ते शोधू लागली. पण पीसीमध्ये काहीच नव्हतं.


" अरे यात तर काहीच नाहीये. " ती व्यक्ती स्वतःशीच म्हणाली. \" अरे हो... कसं असेल मी तर सगळं प्रेझेंटेशन आणि डॉक्युमेंट पेनड्राइव्हला स्कॅन करून घेतले होते...मी पण ना... \" ती व्यक्ती स्वतःशीच हसली आणि बाहेर जायला वळली. तोच समोर मॅनेजर सर आणि बाकी स्टाफ त्यांच्या स्वागतासाठी उभा होता.


" अहो त्यात काही नाहीच आहे तर मिळणार कुठून मि. कुलकर्णी.....??? " मॅनेजर सर हसून म्हणाले.


" सॉरी सर..... मी.......मी .. ते..... " कुलकर्णी सर आपली बाजू मांडायचा प्रयत्न करत होते. पण मॅनेजर सरांनी त्यांना हातानेच थांबायला सांगितलं.


" You are fired Mr. Kulkarni....... " एवढं बोलून मॅनेजर सर निघुन गेले.



तेवढ्यात गाडीने करकचून ब्रेक मारला आणि अंजुला जाग आली. तिने पाहिलं तर तिचं घर आलं होतं. तिने एकवार अबिरकडे बघितलं पण तो मोबाईल मध्ये डोकं खुपसुन बसला होता. अंजुला त्याला सॉरी म्हणायचं होतं. पण कोणत्या तोंडाने म्हणणार होती ती...?? तिनेच तर त्याच्यावर नको नको ते आरोप केले होते. ती काहीच न बोलता गाडीतून खाली उतरली आणि तिने दार लावुन घेतले. ती गेल्यावर अबिरने त्या दिशेला पाहिलं , तो गाडी स्टार्ट करणार तोच त्याला बाजूच्या सीटवर एक इनवोल्वप ठेवलेलं दिसलं.


क्रमशः......


भाग पोस्ट करायला खूप खूप उशीर झालाय मला माहितेय. पण खरं सांगायचं तर मला लिहायलाच सुचत नव्हतं. घटना माझ्या डोक्यात तयार होत्या तरी त्या शब्दात मांडताना वेळ जात होता. त्यामुळे मनासारखं लिखाण होईपर्यंत थोडा वेळ लागतो.त्याहीपेक्षा पाऊस प्रचंड पडतोय. त्यामुळे रेंज प्रॉब्लेम आहे. 5/7 वेळा भाग पोस्ट करायचा प्रयत्न करतो तेव्हा तो एकदा पोस्ट होतोय. नेटवर्क खूप जातंय. त्यामुळे उशीर झाला तर समजून घ्या.


वाचक मित्रांनो , आपल्या अवतीभवती अनेक प्रकारचे फ्रॉड घडत असतात. केवळ मोठ्या कंपनीमध्ये किंवा उद्योगांमध्येच असं घडत अस नाही. तर आपल्या आजूबाजूला देखील या गोष्टी होत असतात. त्यामुळे प्रत्येकानेच सतर्क राहायला हवे. सध्या पावसाचे वातावरण आहे त्यामुळे तुम्हाला कामावरून यायला उशीर होणार असेल तर घरी एक फोन करून नक्की कळवत जा. तसंच तुम्ही कामासाठी , मिटिंगसाठी वेगळ्या ठिकाणी जात असाल तर त्याचे लोकेशन आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवून ठेवा. ( विशेषतः महिलांनी ) फ्रॉड हे केवळ पैशाचेच असतात असं नाही. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्या.

पुढचा भाग उद्या नक्की पोस्ट करेन. आणि तुम्ही कोणती छान छान पुस्तकं वाचली असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

© ® सायली विवेक.

🎭 Series Post

View all