Feb 24, 2024
प्रेम

तू तर चाफेकळी - भाग 1

Read Later
तू तर चाफेकळी - भाग 1

तू तर चाफेकळी  भाग - 1 


" अंजु...... ए अंजु..... अगं उठायचं नाही का...? किती वाजले बघ. " आईची हाक ऐकून अंजु ताडकन उठून बसली. 

बाजूच्या घड्याळात बघितलं तर साडेआठ वाजलेले. ती जवळजवळ पळतच बाथरूम मध्ये गेली. आज त्यांच्या ऑफिसला नवीन जनरल मॅनेजर येणार होते म्हणून सरांनी सगळ्यांना लवकर बोलवलं होतं. तिने पटापट आपलं आवरलं आणि रूम मधून खाली आली. 

" अंजु पोहे केलेत. खाऊन जा..." आई किचन मधूनच म्हणाली. 

" आई नको. खरंच खूप उशीर झालाय. मी पळते. नाहीतर आज माझं काही खरं नाही. " 

" अंजु जरा हळू.... एवढं काही होत नाही.. नीट जा.. " सोफ्यावर बसून पेपर वाचणाऱ्या बाबांनी तिला सांगितलं.

" अं.... हो हो... जाते बाय " 

ओट्यावरचा डबा तिने पटकन पर्समध्ये ठेवला आणि बाहेर पळाली. 

" पायाला चाकंच लावून घे आता... म्हणजे पळायचा त्रास होणार नाही... " आई आतुन वैतागत म्हणाली. त्यावर बाबा हसले. 

" मी काय म्हणतो , आपण अंजुसाठी छान टू व्हीलर घेतली तर... तिचा बसने येण्याजाण्याचा त्रास तरी वाचेल..." बाबा किचन मध्ये येत म्हणाले. 


" काही नको. जाऊदे ती बसने. गाडी घेतली की पुन्हा ती येईपर्यंत माझ्या जीवाला घोर नको...." आई 

" अच्छा , मग एरवी नसतो का..? " ते मिश्किलपणे हसत म्हणाले.


" तुम्ही मला शब्दात पकडू नका हा... एकतर हा अमेय जातो तो येईपर्यंत माझ्यात जीवात जीव नसतो त्यात अजून अंजुची भर नको... " आई म्हणाली आणि बाबांनी तेव्हढ्यापुरता विषय सोडून दिला. 
...............................

अंजली ही माधवी आणि प्रभाकर देशपांडे यांची लेक. प्रभाकर हे एका खाजगी कंपनीतून रिटायर्ड झालेले होते आणि माधवीताई घरी असायच्या. त्यांचा मुलगा अमेय अंजली पेक्षा चार वर्षांनी मोठा तो देखील एका कंपनीत जॉबला होता. अंजूचं मागच्या वर्षी MBA पूर्ण झालं. कॅम्पस इंटरव्ह्यू मधून तिचं ND या मल्टिनॅशनल कँपनीमध्ये सिलेक्शन झालं आणि तिचा जॉब सुरू झाला. सुरवातीला कॉलेज लाईफमुळे तिला ऑफिस वर्कचा कंटाळा यायचा. पण नंतर मात्र ती ऑफिसमध्ये मिसळून गेली. आज त्यांच्या ऑफिसमध्ये नवीन जनरल मॅनेजर येणार होते. त्यामुळे त्यांच्या सिनिअर सरांनी ऑफिस स्टाफला लवकर बोलावलं होतं. काल अंजुची मैत्रीण मीरा घरी राहायला आली होती त्यामुळे नाईट आऊट , मूवी , पिझ्झा पार्टी....या सगळ्यामुळे तिला सकाळी उठायला उशीर झाला. ती बसस्टॉपवर पोहोचली पण तिच्या समोरूनच बस निघुन गेली. बसला शिव्या घालत तिने ऑटोला हात केला आणि ऑफिसला आली. घड्याळाचे काटे जसे पुढे सरकू लागले तसतशी तिची अस्वस्थता वाढू लागली. ती धावत पळत ऑफिसच्या पायऱ्या चढली. रिसेप्शनला येत तिने पटकन मस्टर वर साइन करून ती पुढे निघाली. पण घाईत असल्याने तिचं लक्षच नव्हतं. ती समोरून येणाऱ्या व्यक्तीला धडकली. त्याच्या हातातून फाईल्स खाली पडल्या. ती उचलून देतच होती की तो देखील खाली वाकला आणि त्यांच्या डोक्याची टक्कर झाली. डोकं चोळतच दोघे उठले. 

" सॉरी..... सॉरी सर... ते.... ते माझं लक्ष नव्हतं. आज बस मिस झाली सो उशीर........ "ती आपली बडबडतच होती. 

त्याला काही कळेचना ' अशी काय बोलतेय ही... '

ती त्याला पुन्हा सॉरी म्हणाली आणि आपल्या डेस्ककडे जायला लागली. तोच समोरून कुलकर्णी सर आले. 

" अंजु... अग किती उशीर..तरी नशीब अजून सर आले नाहीत. " ते म्हणाले तसं तिने चमकून त्या व्यक्तीकडे पाहिलं. 

 

डार्क ब्लु कलरचा शर्ट, व्हाइट पॅन्ट... ट्रिम केलेली दाढी... गव्हाळ रंग... आणि चेहऱ्याला सूट होतील असे भिरभिरणारे पण खोल ब्राऊनिश डोळे...

" हा अबिर देसाई. कालपासून आपल्या कँपनीत जॉईन झाला आहे. तू काल नव्हतीस त्यामुळे तुझी ओळख करून द्यायची राहिली. तो आपल्या मुंबईच्या मेन ब्रांचला काम करायचा. पण सध्या आपली ही ब्रँच सांभाळण्यासाठी त्याला इकडे ट्रान्सफर केलंय... तो मॅनेजर सरांच्या हाताखाली काम करणार आहे आजपासून.... " कुलकर्णी सरांनी माहिती दिली. 

" हाय...... " त्याने हात पुढे केला. पण ती तशीच त्याला बघत उभी होती. 


एवढा वेळ त्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. सरांनी ओळख करून दिली तेव्हा त्याने तिला नीट पाहिलं. लाईट पिंक कलरचा थोडासा वर्कवला पंजाबी ड्रेस...वन साईड ओढणी घेतलेली... लांबसडक केस... थोडेसे क्लिप लावून पुढे घेतलेले...रेखीव चेहरा...बोलके डोळे आणि या सगळ्या तिच्या सौंदर्यात भर घालणारं तिचं ते तरतरीत नाक...!!! अगदी चाफेकळी सारखं...!!!  तो दोन क्षण बघतच राहिला. 

" आणि ही... अंजली देशपांडे. आपल्याकडे प्रोजेक्ट असिस्टंट म्हणुन काम करते... " 


" I see.. nice to meet u miss Anjali...." त्याने हसून म्हटलं पण ती कसनुस हसली नि आपल्या डेस्कवर येऊन बसली. 


" अशी काय ही... कोणालाच भाव देत नाही वाटतं.... " तो हसून आपल्या कामाला गेला. 

.......................................

अंजु आपल्या कामाला लागली. ' मूर्ख अंजु... कोणालाही काय सर समजतेस. आ.. पण डोकं चांगलंच आपटलं त्या बैलाचं..' स्वतःशीच बडबडत ती हातातली काम करत होती. डेस्कजवळ आल्यावर तिला सगळ्यांचीच कुजबूज ऐकू येऊ लागली. सगळे नवीन आलेल्या अबिर बद्दलच बोलत होते. 

" अरे , यार..... कसला हँडसम आहे ग हा....." मितू म्हणाली 


" हम्म .... भारीच आहे. पण बोलेल तरी का आपल्याशी...?? " सीमा 


" अग बोलायचं काय घेऊन बसलीस. महिन्याभरात पटवते बघ त्याला... " समोरून येणाऱ्या अबीरकडे बघत मितू म्हणाली. तसं अंजूचं त्याच्याकडे लक्ष गेलं.


" इतका काही छान नाहीये.. बरा आहे तसा. जाऊदे आपल्याला काय करायचंय असं म्हणून ती कामाला लागली. 

.....................


थोड्याच वेळात मॅनेजर सर आले. कुलकर्णी सर तिथले सिनिअर असल्याने त्यांनी सगळ्या ऑफिस स्टाफची मॅनेजर सरांसोबत ओळख करून दिली. 

" सध्या आपली ही ब्रँच लॉसमध्ये आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी नीट होईपर्यंत आपल्याला खूप जोमाने काम करायचं आहे. काही वेळेला तुम्हाला ओव्हरटाईम करून सुद्धा दिलेलं काम पूर्ण करावं लागेल. कोणत्याही कामात प्रॉब्लेम्स असतील तर आपण ते बसून बोलून सॉल्व्ह करू. पण ही ब्रँच आपण सगळ्यांनी मिळून प्रॉफिट मध्ये आणायची आहे. सो ऑल द बेस्ट एवरीवन अँड गो बँक तो युअर वर्क... " एवढं बोलून मॅनेजर साहेब केबिनमध्ये निघून गेले. 

......................

लंच ब्रेकला सगळे एकत्र आले. प्रशांत , मिताली , सीमा , नेहा , राकेश , यश , अंजु आणि कुलकर्णी सर देखील. 

" अरे.... तो अबिर नाही आला जेवायला. त्याने डबा आणला नाहीये का...?? " राकेशने विचारलं. 


" काही माहीत नाही. कालच जॉईन झालाय ना तो. कदाचित आपल्या बरोबर बसायला त्याला कसंतरी वाटत असेल... " सीमा म्हणाली. 


" अरे मग आपण त्याला कम्फर्टेबल केलं पाहिजे आपल्यासोबत... काय अंजु...?? " यश तिच्याकडे बघत म्हणाला. 


" अं.... हो.. बोलवा त्याला. आज सकाळीच माझ्या डोक्यावर आपटलं त्याचं डोकं . शिंग फुटलेयत का ते बघूया त्याला.... " तिच्या बोलण्यावर सगळेच हसले. 

राकेश आणि यश जाऊन जबरदस्ती अबिरला घेऊन आले. तो नको नकोच म्हणत होता. तरी त्यांनी त्याला खुर्चीवर आणून बसवलं. 

" अरे यार मी कँटीन मधून काहीतरी मागवलं असतं. तुम्हाला कशाला त्रास... " तो म्हणाला. 


" त्रास काय त्यात. आपण टीम आहोत ना अबिर आता.... तू ही प्लेट घे मी वाढते तुला.... " मितू त्याच्याजवळ जात म्हणाली

तिने त्याच्यासमोर प्लेट ठेवली आणि आपल्या डब्यातली भाजी त्याला वाढली. आणि तिथेच उभी राहिली. 

 

 "तुला माहितेय अबि... आज ना मी केलेय भाजी. टेस्ट कर ना.... !!! " मिताली. 

 

" अरे देवा... म्हणजे आधीच पोटदुखी वरच्या गोळ्या शोधल्या पाहिजेत... " राकेश पुटपुटला

 

" काय..... काय म्हणालास तू राकेश....?? " मितू त्याला मारायला पळाली. तसं राकेश देखील पळाला. थोडावेळ त्यांची चेष्टा मस्करी झाल्यावर सगळ्यांनीच आपल्या डब्यांतल थोडं थोडं अबिरच्या पानात वाढलं. त्याचं ताट पूर्ण भरलं होतं. सगळ्यांनी मग जेवायला सुरवात केली. अबिर आज पहिल्यांदाच असं दुसऱ्यांच्या हातच खात होता. प्रत्येक चव निराळी होती. पण तरीही ती त्याला आवडली. सगळ्यात जास्त त्याला आवडलं ते म्हणजे भाजणीचं थालीपीठ. 

 

 

" अरे .... हे काय आहे. हे असं जाड जाड रोटी सारखं आहे ते.. " त्याने एक तुकडा दाखवत विचारलं. 

 

 

" थालीपीठ म्हणतात त्याला...  रोटी काय रोटी....  " अंजु जरासं चिडून म्हणाली. 

 

" तुला थालीपीठ माहीत नाही....??? " यशने आश्चर्याने विचारलं. त्याने नकारार्थी मान हलवली. तसे सगळे त्याच्याकडे भूत बघितल्यासारखे बघायला लागले. कारण भाजणीचं थालीपीठ माहीत नसलेला प्राणी ते पहिल्यांदाच बघत होते. 

 

 

" मी कधीच खाल्लं नाही आजपर्यंत... पण छान आहे हे. अजून मिळेल का...?? " अबिर 

 

" अरे अंजुच्या आईने केलंय ते... तिच्या डब्यातलं आहे आज.. " राकेश म्हणाला. 

 

 

" मिळेल का अजुन.....?? " त्याने विचारलं

 

" हम्म ..... घे..... " तिने जरा रागानेच त्याच्याकडे डबा दिला. त्याला ते इतकं आवडलं होत की डबा हातात घेऊनच तो खाऊ लागला. 

 

सीमाने मग आपल्या डब्यातली पोळी अंजुला दिली. खरंतर थालीपीठ तिला खूप आवडायचं. म्हणून आज आईने मुद्दाम केली होती पण वाटून झाल्यावर थोडं शिल्लक होतं ते देखील अबिरने घेतलं त्यामुळे तिला धड त्याची चव पण बघता आली नाही. तिला मनोमन त्याचा फार राग येत होता. मग हसत खेळत सगळ्यांच जेवण झालं आणि पुन्हा सगळे कामाला लागले. ऑफिस सुटायची वेळ झाली तसं अंजुने आपल्या डेस्क वरचा सगळा पसारा आवरला. मगाशी डबा अबिर कडेच राहिला होता म्हणुन मग डबा मागायला त्याच्या इथे गेली पण तो कामात होता. 

 

" ओ मिस्टर....खाऊन झालं ना मग डबा देता येत नाही का परत...... " तिने हात पुढे केला. 

 

 

" ओहह सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही. हा घे तुझा डबा नि for your kind information miss Anjali... माझं नाव अबिर आहे. ओ मिस्टर ओ मिस्टर काय लावलंय..." तो मिश्कील हसला. 

 

 

" काही का असेना... मला काय करायचंय..." असं म्हणून ती त्याच्या टेबलवरचा डबा उचलण्यासाठी किंचित वाकली आणि त्याच वेळी अबिर खुर्चीतून उठायला एकच गाठ पडली की पुन्हा त्यांचं डोकं एकमेकांवर आदळलं. 

 

" अगं ए.... तू काय डोकं फोडणार आहेस का माझं आज.... ?? " तो काहीसा चिडून म्हणाला. 

 

" मी पण तुला हेच म्हणू शकते... बघून जाता येत नाही का...? तिचा पण आवाज जरासा चढला. 

 

 

" केवढ्याने आपटलं तुझं डोकं... कांदे बटाटे भरलेत वाटतं...." तो हसला. 

 

 

" ए यु...... परत असं काही बोललास तर बघ. तुझ्याच डोक्यात असतील कुस्के कांदे नि बटाटे कळलं.... " ती तिथून रागाने आपल्या डेस्क जवळ आली. पर्स उचलली आणि ती ऑफिस मधून बाहेर पडली. 

 

तिला अबिरचा खूप राग येत होता. हा मला असं कसं बोलू शकतो. त्याच विचारात ती घरी आली. मीराला बघून जरा तिचं डोकं शांत झालं. 

 

" अंजु.... चल ना आपण बाहेर जाऊ आज जेवायला..." मीरा म्हणाली. 

 

" नको ग. आज मी खूप थकलेय. आपण उद्या जाऊ. " ती म्हणाली. 

 

आईने तिला नि मीराला चहा दिला. तोपर्यंत अमेय पण ऑफिसवरून आला. अंजुचा चेहरा उतरला होता. 

 

" काय ग अंजु.... कसा गेला दिवस...?? " तो बोलत असतानाच त्याच अर्ध लक्ष मीराकडे पण होतं....

 

 

" काही नाही रे दाद्या.... आमच्या ऑफिसमध्ये नवीन मुलगा जॉईन झालाय काल... डोकंच फिरवलं त्याने माझं.. आज एकतर आधीच उशीर झाला ऑफिसला जायला त्यात याने पिडल... " असं म्हणून तिने दिवसभरात काय काय झालं ते सगळं त्याला सांगितलं. 

 

 

" हमम..... म्हणुन आज मॅडमचा मूड खराब आहे होय.. चल मग आपण तिघे बाहेर जाऊया जेवायला.." अमेय म्हणाला.

 

 

" अरे , मी पण तेच म्हणत होते.. पण नाही ऐकत ती... " मीरा

 

" मी काय म्हणते दादया तू नि मीरा जा ना.. तसं पण ती आल्यापासून तिला कुठे नेता नाही आलं. जाशील का प्लिज तिला घेऊन.... " अंजु म्हणाली त्यावर आईने ही दुजोरा दिला. 

 

आधी त्यानेही आढेवेढे घेतले पण मग तोही तयार झाला. दोघेही बाहेर डिनरसाठी गेले. अंजुच्या डोक्यातून मात्र अबिरचा विषय जात नव्हता. मनाशी काहीतरी ठरवून मॅडम एकदाच्या झोपल्या...

 

 

क्रमशः..... 

 

 

ही कथा नव्याने लिहीत आहे. आशा आहे या कथेला देखील तुम्ही तितकाच छान प्रतिसाद द्याल. हे बंध रेशमाचे या कथेच्या दुसऱ्या पर्वाचे भाग देखील लवकरच पोस्ट होतील. सर्व वाचकांना मी खूप खूप मिस केलं. तुम्ही केलं का मला आणि आपल्या कथांना मिस....?? प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहत आहे. 

 

© ® सायली विवेक 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//