तू तर चाफेकळी - भाग 14
अबिर घरी आला तो रागातच. आल्या आल्या त्याने आपली बॅग बेडवर आपटली. त्याला नेमका कशाचा राग आला होता तेच त्याला कळत नव्हतं. थोडा वेळ तो तसाच शांत बसुन राहिला. जसजशी प्रेझेंटेशनची डेट जवळ यायला लागली तसतशी त्याची अस्वस्थता वाढत होती. लवकरात लवकर काहीतरी करायला हवं होतं. पण त्यासाठी त्याला अंजुची साथ हवी होती. पाणीपुरी खात असतानाच अंजुने अबिरला पाहिलं होतं. त्याच्या चेहऱ्यावरील राग तिला वेगळाच दिसत होता. घाबरून तिने नजरच फिरवली. मस्तपैकी पोटभर पाणीपुरी , रगडा पॅटिस खाऊन तिघेही घरी परतले.
" आ हहह...... पोट जाम झालंय यार...... कसली पाणीपुरी होती भारी...... " अंजु आल्या आल्या सोफ्यावर कलंडली.
" हो. फुल पॅक झालोय. आई मला काय रात्री जेवायला नकोय हा....." अमेय पण समोरच्या खुर्चीवर येऊन बसला.
" हो. माझंही पोट भरलंय रे. बघू थोडा वेळ जाऊदे मग काय करायचं ते ठरवू...." आई
" हो तेच. आत्ता हा नाही म्हणतोय जेवायला. पण 11 वाजले की बोक्याला भूक लागेल मग जाईल डबे रापायला..... " अंजु उठुन बसली.
" ए गप ग कुस्के.. जशी काय तू काही खातच नाहीस... आई तुला माहितेय मागे आपल्याकडे रात्री एकदा उंदीर आला म्हणुन सगळे डबे पडले होते... तो हा घरचाच उंदीर होता..... " अंजुने उठुन त्याच्या तोंडावर हात धरला.
" अंजु.... खरंच.....? " आई
" नाही आई. तू याचं काय ऐकतेस.. काहीही पकवतो तो. तू जा ड्रेस चेंज कर. मी आलेच...." अंजुने अजुन पण त्यांचं तोंड दाबुन ठेवलं होतं. अमेयने जोर लावुन तिचा हात खाली घेतला.
आई आत जातच होती की तेवढ्यात अमेयचा फोन वाजला. मगाशी पाणीपुरी खाताना त्याने तो आईजवळ दिला होता पर्समध्ये ठेवायला. आई थांबली. तिने पर्समधून त्याचा मोबाईल काढला. त्याला देत असतानाच तिने त्याच्यावरचं मिराचं नाव वाचलं आणि तिने फोन उचलला. अमेयने नि अंजु तिच्याकडे नुसते बघतच राहिले. कोणाचा फोन असेल ते कळेना. दोघेही अस्वस्थ. आई हॅलो म्हणायच्या आत पलीकडून आवाज आला.
" किती वेळ फोन उचलायला. कधीची फोन करतेय तुला... फोन उचलता येत नाही का..... " मीरा बडबडत होती.
" मीरा अग मी अंजुची आई बोलतेय...... " आई म्हणाली आणि मीराचा शब्द घशातच अडकला.
मीराचं नाव ऐकून अमेय नि अंजुने चमकून एकमेकांकडे पाहिलं. आता काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी असं दोघांना वाटलं.
" त..... त... तुम्ही....?? काकू ते.... ते अंजुचा फोन लागत नव्हता म्हणून मी अमेयच्या फोनवर केला फोन...." मीराने थाप मारली.
"अग हो. आम्ही आज सगळे बाहेर गेलो होतो. अंजूचं आज लक्षच नव्हतं फोनकडे.... " आई तिच्याशी बोलत असतानाच ती अमेय नि अंजुच्या चेहऱ्यावरचे हावभाव नोटीस करत होती. दोघेही हबकून तिच्याकडेच बघत होते.
" हा बरं. आहे का अंजु तिथे....?? " मीरा
" हो देते ना. " आईने अंजुकडे फोन दिला आणि ती रूममध्ये गेली. ती गेली याची खात्री करून अमेयने अंजुच्या हातातून आपला मोबाईल काढुन घेतला आणि बाहेर पळाला. अंजुने त्याला जाताना बघितलं आणि हसली. मग तीही आपल्या खोलीत निघुन गेली.
" अग माझे आई मारलं असतस आज मला..... " अमेय मीरावर वैतागला.
" सॉरी सॉरी.. मला काय माहीत आता काकू फोन उचलतील ते.... " मीरा
" काही बोलली नाहीस ना मी समजून.....?? " अमेयची चेहऱ्यावर काळजी दिसायला लागली.
" नाही. फक्त ओरडले जराशी कधीची फोन करतेय असं.... पण मी सांगितलं अंजुचा फोन लागला नाही म्हणून तुझ्या फोनवर फोन केला.... " मीरा
" नशीब माझं.. नाहीतर आज काही खरं नव्हतं माझं.... "
अमेय
" हमम म्हणुनच वाचवलं मी तुम्हाला " मीरा
" गोंधळ पण तूच घातला होतास..... " अमेय
" सॉरी म्हटलं ना आता. किती रागावशील...?? अमुडीला राग आला का माज्या.... अले ले ले.... बाळ रागावलं... " मीरा लाडात म्हणाली
" एवढंयाशा सॉरीने काय होणारे माझं.....?? मला मोठी पेनलटी लागते. U know. " तो गालात हसला. त्याच्या बोलण्यावर ती मात्र लाजुन गोरिमोरी झाली.
" सध्या तरी सॉरीवरचं भागवाव लागेल. " मीरा
" हो तेच करतोय. तू समोर असतीस तर मग कळलं असत माझा राग किती आहे ते. आणि तेव्हा सॉरी नि बरंच काही....... लागलं असतं.... " तो हसला.
" गप रे. मला सांग ना काय मजा केलीत मग आज तुम्ही...." मीराने उत्सकुतेने विचारलं.
अमेय मग तिला दिवसभराच्या गमतीजमती सांगण्यात गढुन गेला. आईने तोपर्यंत मस्तपैकी मुगाची गरम गरम खिचडी , तळलेले पापड , लोणचं , कांदा सगळं तयार ठेवलं होतं. बाबांचा फोन येऊन गेला त्यामुळे ते रात्री राऊत काकांकडेच राहणार होते. मग तिघांनीही जेवुन घेतलं आणि ते आपापल्या खोलीत गेले. बेडवर पडल्या पडल्या अंजु आजच्या दिवसभरातल्या गोष्टींचाच विचार करत होती. आईचा आनंदाने ओसंडुन वाहणारा चेहरा काही केल्या तिच्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. कितीतरी दिवसांनी आई बाहेर पडली होती. वेगळे कपडे घातले होते. नवीन पदार्थ खाल्ले. किती छान वाटत होतं तिला...!! आपण प्रत्येक वेळी आईला गृहीत धरतो. आपल्याला कंटाळा आला तर आपण झोपुन राहतो , नाहीतर मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जातो , सुट्टी टाकतो. पण आईला कधीच सुट्टी नसते....!!! नोकरी करणाऱ्या काही काही स्त्रिया कामवाल्या बाईच्या जीवावर निर्धास्त असतात. पण तिलाही कधीतरी कंटाळा येत असेल कामाचा हा आपण विचारच करत नाही. कायम गृहिणी असणाऱ्या आईला तर बाहेर पडायलाच मिळत नाही. डोकेदुखी असो , पोटदुखी असो आपण रजा टाकुन आराम करतो. पण तिचं असं आजारपण असलं तरी ते आपल्याला कधीच जाणवत नाही. ती आपलं काम करतच असते. पण म्हणुन आपण ते कधी पाहायलाच शिकायचं नाही असं नाही. इथुन पुढे महिन्यातून एकदा दोनदा तरी आईला अशी हक्काची सुट्टी द्यायची हे ठरवूनच अंजु झोपेच्या अधीन झाली.
.....................................
दुसऱ्या दिवशी अंजु सकाळी लवकर उठली. सगळ्यांसाठी छान आलं घालुन चहा केला आणि ती आंघोळीला गेली. तोपर्यंत आई उठली होती. केस वरती बांधुन आई आत आली तर गॅसवर दूध तापवलेलं. दुसऱ्या भांड्यात चहा केलेला. आपसूकच तिचे ओठ रुंदावले. तिने बाजूला पाहिलं तर चहाचा कप रेडी होता आणि त्याखाली एक चिट्ठी देखील होती.
Good morning my dear. With your cute smile. Have a nice day
त्याच्याखाली छान स्माईल काढलं होतं. आईने चहाचा घोट घेतला आणि तिला खूप बरं वाटलं. सकाळचा पहिला आयता चहा...!!! आहाहा.... सुख...!!!! चहा संपवून ती कामाला लागली. अंजु आवरून निघतच होती की आईने डोळ्यांनीच तिला थॅंक्यु म्हटलं. अंजु हसली आणि डबा घेऊन ऑफिसला गेली.
आज मॅडम खूपच लवकर आल्या होत्या. रामुकाका नुकतेच येऊन साफसफाई करत होते. नेहमी उशिरा येणाऱ्या अंजुला आज लवकर आलेलं बघुन रामू काकांना आश्चर्य वाटलं.
" अंजली ताई....?? तुम्ही आज एवढ्या लवकर....?? "
" हो. लवकर आवरलं म्हणुन आले लवकर. " ती आपल्या टेबलाजवळ आली.
" हो. पण अजुन कोण आलं नाही.... " रामू काका आपलं काम करता करता म्हणाले.
" असू दे. मी बसते काम करत. तुमचं झालं की मला एक चहा आणाल का तुमच्या हातचा स्पेशल... " ती हसून म्हणाली.
" हो . एकदम कडक आणतो बघा... " रामू काका आपलं तिथलं काम आटपत बाजूला गेले.
थोड्या वेळाने अबिर आला. नेहमीप्रमाणे लवकर. आल्या आल्याच त्याला अंजु दिसली तसं त्याला बरं वाटलं. तो किंचित हसला. कालचा त्याचा अँग्री मॅन आज अंजुला बघुनच गायब झाला होता. तो आपल्या डेस्कवर जाऊन बसला. अंजूचं लक्षच नव्हतं. ती आपल्याच कामात रमली होती. त्याला तिच्याशी बोलायचं होतं. पण कुठून सुरवात करावी त्याला कळेना. त्याच्या बोटांची चाळवाचाळव सुरू होती. तिचं आपल्याकडे लक्ष जावं म्हणून त्याने हातातलं पेन खाली टाकलं. आवाज आला म्हणुन अंजुने वर पाहिलं तर समोरच्या टेबलवरून अबिर तिच्याकडेच बघत होता. \" हा कधी आला, नि असा का बघतोय माझ्याकडे...\" ती स्वतःशीच बडबडत होती. खरंतर तिला देखील त्याला सॉरी म्हणायचं होतं. तिने आजूबाजूला पाहिलं तर अजून कोणीच आलं नव्हतं. ते दोघेच होते. तिने एक फाईल उचलली नि त्याच्या टेबलजवळ गेली.
" सॉरी............ " दोघेही एकदमच म्हणाले. तसा अबिर उठुन उभा राहिला.
" खरंच सॉरी...... " पुन्हा एकत्रच
" मला तुझ्याशी बोलायचं होतं....... " दोघेही एकदमच म्हणाले आणि हसायला लागले.
" थांब . आधी तू बोल.... " अबिर म्हणाला
" बरं झालं तू थांब म्हणालास नाहीतर पुन्हा एकत्रच बोलत राहिलो असतो.... " ती हसली. " मला तुला सॉरी म्हणायचं होतं खरंतर. मी उगीचच तुझी मस्करी करत राहिले... "
" मी पण सॉरी. मी पण तुला खूप दुखावलं आहे. खरंतर मला पटकन राग येतो. पण जातो देखील लगेच हा. काही काही वेळेला नाही फक्त. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं आपल्या प्रेझेंटेशन बद्दल... " अबिर
" तू मुंबईहून आलास त्याच दिवशी मी तुला सॉरी म्हणणार होते माझ्या वागण्याबद्दल. पण तू किती रुडली बोललास माझ्याशी तेव्हा..... " अंजु
" सॉरी..... मी मुद्दाम नाही ग केलं. दुसऱ्याचा राग तुझ्यावर निघाला... असो फ्रेंड्स.....?? " त्याने हात पुढे केला.
" क्यू नहीं...... " तिनेही त्याच्या हातात हात मिळवला.
" तुला बोलायचं होतं ना काहीतरी....? बोल.. " अंजु
" इथे नको. कॅफेटेरियात जाऊया. भिंतीला देखील कान असतात..... " ते दोघेही कॅफेटेरियात गेले आणि मधल्या दारामागून एक सावली पुढे हळूहळू पुढे आली...
क्रमशः....
सांगितल्याप्रमाणे भाग 9 जुलैला रात्री पोस्ट करत आहे. मागचा भाग उशिरा पोस्ट केला तरी तो मोठा होता शिवाय एक वेगळा विषय त्यातून मांडायचा प्रयत्न केला. मी तुमच्या प्रतिक्रीयांची खूप आतुरतेने वाट पाहत होते. पण हार्डली 50 सुद्धा कमेंट्स आल्या नाहीत हे बघुन खूप वाईट वाटलं. नेहमीचे वाचक आहेत ते अगदी आठवणीने कमेंट करत असतात. मला माहित आहे. पण लवकर लिखाणाच्या अपेक्षा करणारे वाचक भरभरून प्रतिसाद देत नाहीत याचं वाईट वाटत. पुढील भाग पोस्ट करायचा उत्साह जातो. तुम्ही जशी भागांची प्रतीक्षा करता तशीच आम्ही तुमच्या प्रतिसादाची करत असतो. असो. भाग सिरीजमध्ये दिसत नाहीत कारण मी ते अँप वरून पोस्ट करत आहे. रेंज प्रॉब्लेम असल्याने साईटला पोस्टिंग करायला वेळ जातो. त्यामुळे 1/2 दिवसात भाग एडिट करेन. मग ते सिरीजला दिसतील.
© ® सायली विवेक
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा