तू तर चाफेकळी - भाग 5

Love story

तू तर चाफेकळी - भाग 5 

( " मिस अंजली.... मी कोणतीच गोष्ट उधार ठेवत नाही. जे काही असेल ते व्याजासकट परत करतो मी.. सो माझ्याशी पंगा नाही घेतलास तरच बरं होईल. अबिर देसाई म्हणतात मला... " इतकंच बोलून आपल्याच ऍटिट्यूडमध्ये तो निघून गेला. ती दोन क्षण त्याच्याकडे बघतच राहिली. इतक्या सहजासहजी दोघेही हार मानण्यातले नव्हते. ) 

अबिरच्या मागोमाग अंजु देखील आपल्या डेस्कवर आली. मनातल्या मनात तिने त्याला बऱ्याच शिव्या घातल्या आणि ती कामाला लागली. अबिरवर मात्र या सगळ्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नव्हता. तो पुन्हा आपल्या कामात गढुन गेला. पण तरीही काल अंजलीला दिसलेली व्यक्ती कोण असेल हे त्याच्या डोक्यातून जात नव्हते. काहीही झालं तरी मेहता कंपनीसाठी बेस्ट प्रेझेंटेशन बनवायचं त्यानं ठरवलं. काम करता करता त्याने एक नजर हळूच अंजूवर टाकली पण आता ती इतकी कामात होती की आजूबाजूला तिचं काहीच लक्ष नव्हतं. तो स्वतःशीच हसला. पाच मिनिटांपूर्वी त्याच्याशी भांडणारी हीच मुलगी असं कोणाला सांगुन खरं वाटलं नसतं. त्याच्या विचारात असतानाच रामू काकांनी त्याला हाक मारली. 

" अबिर सायेब..... मोठे सर तुम्हाला बोलावतायत... " ते म्हणाले आणि मग अंजुच्या डेस्कपाशी जाऊन तिलाही बोलवल्याच रामू काकांनी सांगितलं. 

दोघेही आपल्या डेस्कवरून उठले तेव्हा क्षणभरच त्यांची नजरानजर झाली. अंजुने अबिरकडे एक रागीट कटाक्ष टाकला आणि ती पुढे गेली. तिला असं रागात जाताना बघितल्यावर तो स्वतःशीच हसला नि तोही तिच्या मागोमाग केबिनमध्ये गेला. 

" या.... " मॅनेजर सर म्हणाले. दोघेही त्यांच्यासमोर उभे राहिले. 

" मिस अंजली मी तुम्हाला आपल्या सगळ्या जुन्या व्हेंटर्सची लिस्ट काढायला सांगितली होती ती केली का तयार... ?? " सर 

" हो सर... मी तुम्हाला मग मेल करते. त्यामध्ये व्हेंटर्सची नावं त्यांचे आतापर्यंत आपल्यासोबत किती किती डील झाली आहेत आणि त्याची कॉस्ट हे सगळं मी त्यात इन्कलुड केलं आहे.. " अंजली 

" गुड वर्क.. मेहता कंपनीचं काय झालं...? त्यांच्या प्रोजेक्ट मॅनेजर सोबत तुम्ही बोललात का...?? " 

" सर actually  मी त्यांच्याशी बोलायला गेलो....... " अबिर बोलत असताना अंजुने त्याचं वाक्य मधेच तोडलं..  " सर आम्ही ट्राय केलं पण त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही.... "  ती म्हणाली. तिच्या अशा बोलण्याचं अबिरला फार आश्चर्य वाटलं.. पण उगीच सरांसमोर अबिर तीने त्याची कशी मस्करी केली हे सांगू नये म्हणून तिने शिताफीने त्याला काही बोलूच दिलं नाही...

" ok. No problem .  मी त्यांच्या मॅनेजर सोबत बोलून तुम्ही त्यांच्याशी मिटिंग करायला येणार आहात हे मी कळवतो. उद्या दुपारी तुम्ही दोघांनी तिकडे जायचं आहे. तोपर्यंत एक छोटं प्रेझेंटेशन त्यांच्यासाठी तयार करा.. " 

" ok सर.... " दोघेही त्यांचा निरोप घेऊन केबिनमधून बाहेर पडले. 

" तू मला बोलू का दिल नाहीस सरांसमोर....?? " अबिरने तिला टोकलच. 

" मिस्टर अबिर देसाई.... तुम्ही आत्ता आला आहात ऑफिसमध्ये पण मी तुमच्या आधीपासून इथे काम करतेय सो मी तुमची सिनिअर आहे. तेव्हा सरांना काय सांगायचं ते मी सांगीन.... " ती ऍटीट्यूड दाखवत म्हणाली. 

" ओहह हो.... नॉट बॅड...आता मला ऍटीट्यूड दाखवणार ही....." तो स्वतःशीच पुटपुटला. 

" काही म्हणालास का....?? " तिने विचारलं. त्यावर त्याने मानेनेच नकार दिला. 

" एक साधं प्रेझेंटेशन तयार करूया. जेणेकरून आत्तापर्यंतच आपलं काम आणि आपली कामाची पद्धत त्यांच्या लक्षात येईल. " अंजली

अबिरच्या डेस्कजवळ बसून दोघांनी प्रेझेंटेशन करायला सुरुवात केली. ती खरोखरच एक उत्तम प्रोजेक्ट डेव्हलपर होती. तिची काम करण्याची पद्धत आणि काम करताना तिची असणारी एकाग्रता अबिर न्याहाळत होता. कारण या गोष्टी मुलींमध्ये क्वचितच बघायला मिळतात. प्रेझेंटेशन करताना तिने त्याचेही मुद्दे विचारात घेतले. प्रत्येक पॉईंट सोप्या पण समोरच्याला भुरळ पाडेल अशा पध्दतीने त्यांनी नोट करून तो स्पष्ट केला. 

.......................................

अंजुला घरी यायला थोडा उशीर झाला. त्यामुळे आई काळजीत होती. 

" अंजु किती उशीर... फोन करता येत नाही का...?? कितीदा सांगितलंय उशीर होणार असेल तर कळवत तरी जा.... " आल्या आल्या आईने तिच्यावर तोफ डागली. 

" आई.. प्लिज ... कामाच्या गडबडीत राहिलं फोन करायचं. नि आता मला रोजच उशीर होईल बहुतेक.. कारण आता काम वाढलं आहे. त्यामुळे काळजी करत राहू नको. उशीर झाला तर मी दादाला फोन करून बोलवेन..." ती सोफ्यावर बसत म्हणाली. 

" दादा ना....?? त्याचाच पत्ता आहे का बघ. अजून आला नाही.. " आई चांगलीच वैतागली होती. तेवढ्यात दारात अमेय हजर. 

" हा बघ आलाच अमेय..... " बाबा म्हणाले.  " काय रे किती उशीर.... कळत नाही का आई वाट बघतेय ते... " त्याला ओरडत असतानाच बाबांनी त्याला हळूच डोळा मारला. त्यावरून एकूण वातावरण तापलेलं आहे हे त्याच्या लक्षात आलं. 

" आई.... हे बघ अग मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणायला गेलो होतो. लाईन होती सो उशीर झाला... " त्याने आईस्क्रीमचा बॉक्स तिच्यासमोर सरकवला.  

" छान......आता काय बोलणार...." आई जरा शांत झाली

" तुझ्या आवडीचं मँगो आईस्क्रीम आहे.. " तो आईला जवळ घेत म्हणाला. तसे अंजु नि बाबा तिच्या शांत झालेल्या चेहऱ्याकडे बघतच राहिले.

" बाबा.... आता आपल्याला कोण विचारणार आहे.. आवडीचं आईस्क्रीम मिळालं म्हणजे आईसाहेब खुश... दादा कुठून मिळतात रे तुला अशा आयडिया.. ओरडा न खाण्याच्या..... " तिच्या बोलण्यावर अमेयने डोळे वटारले. 

" गप गं माकडे... जाऊन आवर.. नि झकास चहा कर बघू.. जाम दमलोय मी.... " तो तिच्या डोक्यात टपली मारत तिच्या शेजारी बसला आणि मोबाईल समोरच्या टेबलवर ठेवला

" थांबा मी करते चहा.... " आई किचनकडे वळली.

" आई तू कशाला...? ही करेल की... तसं पण काही कामं करत नाही ही .....उठ चल... " तो म्हणाला. 

" आई बघ ग हा मला कसा बोलतोय..... " शेवटी तिने त्याला मारलंच. 

त्यांची ही गंम्मत आई बाबा दोघेही बघून हसत होते. इतक्यात टेबलवर ठेवलेला त्याचा मोबाईल वाजला. मीराचा फोन होता. त्याने पटकन फोन उचलला आणि तो बाहेर पळाला. पण त्याच्या मोबाईल स्क्रीनवरच नाव अंजुने पुसटसं पाहिलं होतं नि त्याचं असं बाहेर जाणं तिच्यासाठी अनपेक्षित होतं. ' भैय्या कुछ तो गडबड है ' मनाशीच म्हणत ती आपल्या रूममध्ये गेली. 

......................................

दुसऱ्या दिवशी सकाळी अंजु जरा लवकरच उठली. थालीपीठ करण्यासाठी तिने सगळी तयारी केली तोपर्यंत आई उठून किचनमध्ये आली. आज मॅडम लवकर उठलेल्या बघुन तिला जरा आश्चर्यच वाटलं. 

" काय गं अंजु.... बरी आहेस ना...?? कुठे उगवला आज सूर्य...? " आईने विचारलं

" काय गं आई....!!! एरवी मी कामं करत नाही म्हणून ओरडत असता. आज करतेय तर बोलून दाखवता.... " ती फुरगटली. आईला हसू आलं. 

" हो का... करा करा.. फक्त आम्हाला ते खाता येऊदे... " आई हसत म्हणाली. 

आई मग तिचं आवरायला गेली आणि अंजुही आपल्या कामाला लागली. सगळ्यांसाठी तिने थालीपीठं करून ठेवली. दोन चार आपल्या डब्यात भरली आणि ती स्वतःशीच हसली. तिच्या मनात काहीतरी शिजत होतं. 

.................................

ऑफिसला गेल्यावर अंजलीने सगळे पेपर आणि प्रेझेंटेशन पीडी नीट आपल्या पर्समध्ये ठेवला. शिवाय अबिर आणि तिच्या दोघांच्याही मेल वरती अबिरने प्रेझेंटेशन पाठवून ठेवलं. दोघेही मग मेहतांच्या ऑफिसला गेले. थोड्याच वेळात त्या दोघांना मॅनेजर साहेबांकडे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या ऑफिस स्टाफपैकी एकजण त्यांच्याकडे आला. अंजु आणि अबिर ऑफिस न्याहाळण्यात गुंतले होते.

" हॅलो मिस्टर देसाई......."  आवाज आला तसं त्यांचं लक्ष समोर उभ्या असणाऱ्या एम्प्लॉयीकडे गेलं आणि अबिर उठून उभाच राहिला. 

" निषाद.....!!! तू.... What a pleasant surprise....!!!!  "  अबिरने त्याला मिठीच मारली. 

" अरे... अबिर यार.... किती दिवसांनी भेटतोयस... कसा आहेस.... " त्यानेही अबिरच्या पाठीवर थोपटत विचारलं. दोघेही मग बाजूला झाले. 

" तू.... तू इथे कसा......?? " अबिरने विचारलं

" अरे मी इथेच आहे जॉबला.... प्रोजेक्ट डिपार्टमेंटला... ND कंपनीकडून कोणीतरी येणार आहे हे कळलं आहे. पण तू स्वतःच येशील हे नव्हतं माहिती... " तो हसत म्हणाला. 

इतका वेळ अंजु शांत उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होती.

" तुम्ही ओळखता का एकमेकांना....?? "  तिने विचारलं. 

" म्हणजे काय.... दि ग्रेट अबिर....देसा....." त्याच बोलणं पूर्ण व्हायच्या आतच अबिरने त्याला हळूच जवळ ओढलं आणि त्याच्या कानात पुटपुटला... , कोणी अजून मला ओळखत नाही मी कोण ते.. मी फक्त एम्प्लॉयी आहे ok.." आणि तो बाजूला झाला. 

" हो. हा निषाद जोशी.. आम्ही एकाच कॉलेजला होतो. " अबिरने सांगितलं.  

" Whatever...... कामाला लागायचं का....?? " ती जरा तोंड वेंगाडत म्हणाली. 

" हो लगेच.....!!!! " निषाद म्हणाला आणि त्याने तिला हातानेच पुढे चलण्याची खुण केली. ते दोघेही तिच्या मागोमाग चालू लागले. ती जरा पुढे गेली असं बघुन निषादने अबिरला मागे खेचलं आणि म्हणाला, 

" मामला तिखट दिसतोय......" आणि तो हसला. 

" खूपच तिखट..... !!!!!! " अबिर त्याच्या हातावर टाळी देत म्हणाला.

क्रमशः..... 

सॉरी सॉरी.....जरा तब्येत बरी नव्हती त्यामुळे भाग लिहायला उशीर झाला. आशा आहे की तुम्हाला हा भाग नक्कीच आवडेल. तुमच्या प्रतिक्रियांची खूप आतुरतेने वाट पाहत आहे. पुढील भाग उद्या पोस्ट होईल. नवीन वाचकांना आधीचे भाग वाचायचे असतील तर कोणताही भाग संपल्यानंतर त्याच्या शेवटी जो भाग दिसतो तो क्लिक केल्यावर त्यामध्ये आधीचे सगळे भाग दिसतील. 

© ® सायली विवेक 

🎭 Series Post

View all