तू तर चाफेकळी - भाग 11

Love story

तू तर चाफेकळी - भाग 11 

सरांच्या केबिनमधून अंजु बाहेर आली. पण ती आपल्याच विचारात होती. ती तिच्या डेस्कजवळ आली. राकेशने पाहिलं तर अंजूचं लक्षच नव्हतं. 

" अंजु.... काय ग काय झालं...?? " राकेशने विचारलं तरी अंजु आपल्याच तंद्रीत होती. 

" अंजली...... " त्याने जरा मोठ्याने हाक मारली तेव्हा तिने राकेशकडे बघितलं. 

" काय ग..  काय झालं...?? सर काही बोलले का.... ? " तो उठुन तिच्या डेस्कजवळ आला.

त्यावर तिने नकारार्थी मान हलवली.

" काही नाही... कामाचंच.... " ती म्हणाली आणि आपल्या समोरच्या फाईल चाळायला लागली.

राकेशने आजूबाजूला पाहिलं तर मितू आणि सीमा कॅफेटेरियात गेल्या होत्या. यश देखील कामात होता.  त्याने अंजुच्याच डेस्कवरची फाईल उचलली आणि तो बघू लागला. 

" अंजु... एक विचारायचं होतं...." तो थोड्या हळू आवाजात म्हणाला.

" हो विचार ना....? " ती काम करता करता म्हणाली.

" उद्या कॉफी प्यायला येशील माझ्यासोबत....?? " राकेशने विचारलं.

" हो येईन ना.... " ती आपल्याच तंद्रीत होती.

" ok.. मग उद्या ऑफिस सुटल्यावर जाऊया आपण चालेल ना... तसं पण हाफ डे आहे उद्या.... " तो खुश झाला.

" चल मी जातो. तू कर तुझं काम....." पण अंजूचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं.

अंजु कॉफीसाठी यायला तयार झाली त्यामुळे राकेश खुश होता.  अंजु जेव्हा या ऑफिसला जॉईन झाली होती तेव्हाच खरतरं त्याला ती आवडली होती. पण नुसतंच आवडणं असेल असं वाटुन त्याने दुर्लक्ष केलं होतं. पण तिचा तो रागीट स्वभाव , तरीही सगळ्यांशी मिळुन मिसळून राहणं त्याला आवडू लागलं होतं. त्याच्याही नकळत तो अंजुच्या प्रेमात पडला होता. नेहमी त्यांच्या आजूबाजूला कोण ना कोणतरी असायचं त्यामुळे त्याला तिच्याशी बोलता यायचं नाही. पण आज त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने तिला कॉफीसाठी विचारलं. पण अंजुला या सगळ्याचा पत्ताच नव्हता. त्याहीपेक्षा तीने त्याच्यासोबत कॉफी प्यायला जायचं कबुल केलंय हे देखील तिच्या लक्षात नव्हतं. 

...............................

अंजु घरी आली. पण डोक्यातून अबिर काही केल्या जात नव्हता. ' मेहता कंपनीच्या फ्रॉड बद्दल समजणं... आपण ऑफिस मधुन बाहेर पडताना अचानक अबिरचं समोर येणं... त्या दिवशी फाईल आणायला गेल्यावर आपल्या मागे कोणीतरी असणं ' या सगळ्याचा अबिरशी तर संबंध नसेल.....??? कारण ज्या ज्या वेळी या गोष्टी घडल्या त्या त्या वेळी अबिर तिथेच होता. फारतर थोडा वेळेचा फरक असेल. तिच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं.  तिला झोप लागेना. ती उठुन गच्चीत गेली. तर तिथे आधीच कोणीतरी होतं. 

" हॅलो... काय मग मॅडम , आवडलं ना सरप्राईज....?? " अमेय मीराशी फोनवर बोलत होता.

" हो खुपच..... आणि सरप्राईज देणारा सुद्धा !!! " ती लाजतच म्हणाली.

" हो का. पण मला हे सांगितलं नाही तेव्हा कोणी. एवढ्या जवळ होतो पण साधं लव्ह यु पण म्हणालं नाही मला कोण.... " अमेय 

" तुला कोणी सांगितलं पण माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणुन.... ?? " मीरा आपलं हसू आवरत म्हणाली.

" मग...? नाहीये का...?? मी उगीचच एवढा सरप्राईजचा प्लॅन केला सकाळी सकाळी उठुन... प्रेम नाहीये ते बरंच झालं. तसं पण अंजुच्या बऱ्याच मैत्रिणी माझ्या मागे लागल्या आहेत.... " अमेय 

ते बोलत असतानाच अंजु वरती आली. तिचा उतरलेला चेहरा पाहुन अमेयने नजरेनेच काय झालं म्हणुन विचारलं. त्यावर तिने नकारार्थी मान हलवली.

" हो का.. पण अंजु मला बोलली नाही कधी....?? " मीरा 

" सांगेल ती मग तुला. काय एक सो एक मुली आहेत तिच्या ऑफिसला. जरा घाईच केली मी तुला प्रपोज करायची.... " आता अमेयला हसु यायला लागलं

" असं वाटतंय ना तुला. जा मग. त्याच मुलींना बघत बस.... नि बोलू नको माझ्याशी..... " तिने फोन आपटला.

त्यांचं बोलणं ऐकुन अंजुच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर उमटली.

" कशाला पिडतोस रे तिला......?? " अंजु 

" मग काय करू. ही सारखी मला चिडवत असते ते चालतं. मी जरा बोललो की नाकावर फुगा येतो. मुली खूपच चिडकू असतात ना अंजु..... " तो अगदी सहज म्हणाला

" हो ना खूपच....... " तिला वाटलं तो आपल्यालाच म्हणाला.

" तू..... तू मला म्हणतोयस...??? " ती त्याला मारायला पळाली. तिला येताना बघुन तो देखील धावायला लागला.

" अग नाही. मी जनरल म्हटलं.... " तरी त्याला अंजुचा फटका बसलाच.

" अग म्हशे हात लागतात तुझे..... मारकुटी म्हैस कुठली...  आ..... आ.. " फटका बसलेल्या जागी तो हात चोळत होता.

" मी मारकुटी म्हैस काय...?? नि तू कोण रे माकडा....?? " दोघांची नुसती पळापळ चालू होती.  शेवटी धावुन दोघेही दमले नि गच्चीच्या कठड्याजवळ येऊन उभे राहिले.

" बास आता. दमलो मी. तुझ्या मैत्रणीने रागाने फोन ठेवलाय. तिचा राग काढायला हवा आता.... तुझ्यासारखीच आहे ती पण.... " शेवटचं वाक्य तो हळू आवाजात पुटपुटला.

" हमम.... चालू दे चालू दे तुमचं. लव्ह बर्डस..... " हसतच अंजु खाली जायला निघाली. 

" हो राणी... सॉरी ना.. तुला नाहीतर कोणाला चिडवणार मी.... " अमेयने मीराला फोन केला.

" झाली याची नौटंकी सुरू..... " कपाळावर हात मारत अंजु खाली आली आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपली. 

...................................

दुसऱ्या दिवशी अबिर ऑफिसला आला खरा पण तो गप्प गप्पच होता. अंजुने आल्या आल्या त्याच्याकडे पाहिलं तर तो शांतपणे आपलं काम करत होता. आपल्या डेस्कवर पर्स ठेवुन अंजु त्याच्या टेबलजवळ गेली. 

" प्रेझेंटेशनच्या डेट्स फिक्स झाल्यायत. तुला मी मेल पाठवते तू चेक कर.... " ती म्हणाली. पण त्याने डोकं वर करून तिच्याकडे साधं पाहिलं देखील नाही.

" हो. निषादचा काल फोन आला होता मला. " अबिर 

तो अगदी जेवढ्यास तेवढं बोलत होता. त्यामुळे काल तो आला नाही हे विचारू की नको तिला कळेना. ती दोन मिनिटं तशीच उभी होती. ओढणीशी चाळा करत. पण शेवटी न राहवुन तिने विचारलंच. 

" असा अचानक का मुंबईला गेलेलास...??  Anything serious.....??   "   

" It's none of your business. Miss Anjali  "  तो काम करता करताच पण काहीसं कठोरपणे म्हणाला.

" हो. मला माहितेय. तरीही मला वाटलं आपण एका टीममध्ये काम करतो तर तू मला सांगायला तरी हवं होतंस... " अंजली

" काय सांगायचं मी तुला....?? मी कुठे जातो , का जातो याचे रिपोर्ट द्यायचे का आता तुला मी....?? " अबिर चिडला

" तसं नाही. पण काही गोष्टी डिस्कस करायच्या होत्या. प्रेझेंटेशन संदर्भात.... " ती बोलत होती पण हळूहळू तिच्या डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं होतं.

" एक दिवसाने काय होणारे....?? मी काय पळुन जात नव्हतो कुठे... आज करूया पुढचं प्रेझेंटेशन. " त्याने सांगितलं.

अंजुच्या डोळ्यात पाणी आलं होतं ते तिने अलगद पुसलं आणि ती कामाला लागली. दोघेही अगदी मोजकच बोलत होते. मेहता ग्रुपच्या मॅनेजर सरांनी ज्या ज्या सजेशन दिल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी त्यात वापरल्या. नवीन डिझाइन आणि नवीन फँक्शन लोड केले. बऱ्यापैकी प्रेझेंटेशन त्यांनी तयार केलं. ऑफिसची वेळ देखील आता संपत आली होती त्यामुळे मग अंजु उठली. आज शनिवार असल्याने हाफ डे होता. अंजु आपलं आवरतच होती की तेवढ्यात राकेश तिच्या डेस्कजवळ आला.

" चल निघायचं....?? " त्याने उत्सुकतेने विचारलं.

" कुठे....?? "  ती डबा पर्समध्ये ठेवता ठेवता म्हणाली.

" असं काय करतेस... आपण आज कॉफीला जाणार होतो ना...? " त्याचा चेहरा पडला.

" कधी....?? माझ्या काहीच लक्षात नाही. " अंजु

" तू काल काम करत होतीस तेव्हाच नाही का तुला कॉफी प्यायला जाऊया का म्हटलं. चल ना... " राकेश

" सॉरी राकेश. पण आज माझा खरंच मुड नाहीये. आपण नंतर कधीतरी जाऊया का...? " ती खरंच कंटाळली होती.

" ok ... no problem. " तो बाहेर निघाला.

अबिरचं डेस्क त्यांच्यासमोरच होतं. त्यामुळे त्यांचं बोलणं त्याच्या कानावर पडत होत. पण त्याने लक्ष दिलं नाही. अंजुने एकवार अबिरकडे पाहिलं पण तो आपल्याच कामात होता. तिने राकेशला हाक मारून थांबवलं.

" राकेश थांब. आपण जाऊयात..... " ती म्हणाली तसा तो खुश झाला. 

तीही त्याच्या मागोमाग बाहेर पडली. बहुतेक सगळा स्टाफ घरी गेला होता. फक्त एकटा अबिर काम करत होता. तिला काहीतरी आठवलं म्हणुन ती राकेशला पुढे व्हायला सांगुन पुन्हा ऑफिसला आली. तोच तिला अबिरच्या बोलण्याचा आवाज आला. अबिर कॅफेटेरियात बसुन कोणाशीतरी फोन वर बोलत होता. 

" हे बघ... तू मला कितीही काही सांगितलंस तरी आता मी तिकडे येणार नाही. जोपर्यंत माझं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत नाहीच नाही.... "  एवढं बोलुन अबिरने फोन कट केला.

क्रमशः.....

सध्या पत्रलेखन स्पर्धा सुरू आहे. तर त्यासाठी मी ' हवास मज तू.... ' या नावाने पत्रलेखन केले आहे. जरूर वाचा आणि त्याखाली कमेंट करून मला नक्की कळवा. आजचा भाग थोडा उशिरा पोस्ट केला त्याबद्दल सॉरी. हात खूप दुखत होता त्यामुळे दोन दिवस टायपिंग करता आलं नाही. पण शक्यतो एक दिवस आड भाग पोस्ट करायचा प्रयत्न असेल.  Thank you my dear all readers.

© ® सायली विवेक 

🎭 Series Post

View all