Feb 24, 2024
प्रेम

तू तर चाफेकळी - भाग 8

Read Later
तू तर चाफेकळी - भाग 8

तू तर चाफेकळी - भाग 8 


आपल्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे असं अंजुला वाटायला लागलं. तिने मग रुममधुन फाईल घेतली. दार नीट लॉक केलं आणि पळतच ती खाली आली. तिला घाम फुटला होता.


" काय गं.... परत पाल बघितलीस का....??" त्याने हसून विचारलं.


" नाही. अबिर मला वाटतं कोणीतरी लक्ष ठेवून आहे आपल्यावर...." ती इकडे तिकडे बघायला लागली.


" का....?? तू पाहिलंस का कोणाला वरती....?? " अबिर 


" नाही. पण तिथे कोणीतरी होतं. मला चाहुल लागत होती. मागे वळून पाहिलं तर कोणी नव्हतं... " 


" बरं.. आपण लक्ष ठेवू. सध्या आपण हे कोणालाच सांगू शकत नाही. कारण आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये.. मला वाटतं आपण निघायला हवं..खूप उशीर पण झालाय.. "  त्यावर तिने फक्त मान डोलावली. पटापट आटपून दोघेही दहा मिनिटात बाहेर पडले. 

..................................

अंजु घरी आली तीच एवढुस तोंड करत. पाय चांगलेच दुखायला लागले होते. आल्या आल्या तिने पर्स टेबलवर ढकलली आणि ती सोफ्यावरच कलंडली.


" अंजु.... काय ग बरं वाटत नाही का....?? " आई तिच्यासाठी पाणी घेऊन आली.


" नाही. बरं आहे. पण खूप दमायला झालंय.. " ती उठून बसली


" अग चेहरा किती उतरलाय तुझा....बघु ताप आहे का ते...?? " आईने कपाळाला हात लावून चेक केलं. 


" सकाळी आज जायला उशीर झाला. सर ओरडले. त्यात त्या खडूसने काम लावलं खुप..... " अंजु


" कोण खडूस......?? कोणाच्या नावाने खडे फोडतायत मॅडम..... " बाबा दरवाज्यातून आत येत होते.


" कोणाच्या नाही.. आई आज माझ्यासाठी वरण भात करशील का..? गरम गरम...." तिने आईच्या गळ्यात हात टाकले. 


" हो करूया. आज दादा नाही तर लाड पूरवुन घे आई कडून..... " बाबा हळूच म्हणाले आणि तिच्यासाठी आणलेला सोनपापडीचा बॉक्स तिच्याकडे दिला. मग काय मॅडम खुश.


" आई.... दादाचा काही फोन आला होता का...? कितीला पोहोचला...?? " अंजु 


" अग तो साडेनऊला पोहचला. 10 वाजता त्याला लगेच कॉन्फरन्सला जायचं होतं. त्यामुळे जास्त बोलता नाही आलं त्याला....." बाबा 


" बरं... मी फ्रेश होऊन येते नि मग फोन करूया आपण त्याला..." अंजु आपल्या रूममध्ये गेली. 


" इतके भांडत असतात दोघ.... पण लांब असले की काळजी करत राहतील एकमेकांची...." आई हसत किचनकडे जायला वळली. 


" हो , तुला आठवतंय का... मागे अंजु लहान असताना तिचं चॉकलेट एका मुलाने मुद्दाम पाडलं होतं. तेव्हा अमेयने जाऊन चांगले दोन धपाटे घातले होते त्याला... तेव्हा त्याला बघुन मलाच भीती वाटली होती.... " बाबा


" हो ना... पण आता खुप शांत झालाय. तसा अंजुला पण काय कमी राग येत नाही. जमदग्नी आहेत दोघे पण.. यांची भांडणं सोडवता सोडवता आपल्या नाकीनऊ आणायचे नि थोड्या वेळाने जसं काय झालंच नाही असे गळ्यात गळे घालुन फिरायचे..... " आईला हसू येत होतं.


" असो.... मला पण वरण भात चालेल.. पण त्यावर साजुक तूप आणि आमच्यासाठी सोलबटाट्याची भाजी कराल का....??"  बाबा


" हो.... करते हो.....तुमच्या आवडीचं पण करते हा मी... फक्त मुलांच्याच नाही.... " आई 


" पण मी काही म्हटलंच नाही.... तुझ्याच मनात आलं बा ते.... " बाबा आणलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवायला लागले.


" हो का....."  त्यावर दोघेही खळखळून हसले. 

........................................

रात्री जेवणं आटपल्यावर अंजुने अमेयला फोन लावला. 

" हॅलो दादया..... काय करतोयस... जेवलास का तू.... ?? " 


" हो. जेवलो मी. आत्ताच आलोय रूमवर.....तुलाच फोन करणार होतो पण त्याआधी तुझाच आला... " 


" चल चल थापा मारू नको....."  ती बोलत होती तेव्हा आई पलीकडून फोन दे फोन दे करत होती... 


" धर आईशी बोल.... तुमचं बोलून झालं की मला द्या हा बोलायला ठेवू नको फोन.... " अंजु 


" हो... हॅलो हा जेवलास का रे बाळा.... नि आवाज का असा येतोय...." आईने विचारलं 

" हम्म किती ते लहान आईचं बाळ.... " अंजु बाबांच्या कानात कुजबुजली आणि दोघेही हसले. आईने खुणेनेच काय म्हणुन विचारलं त्यावर दोघांनीही नकारार्थी मान हलवली. 


" हो आई जेवलो... दमायला झालंय अग खुप.... पूर्ण दिवस कामात गेला.... " अमेय 


" हा.....झोप मग शांत... उद्या निघालास की फोन कर..."  आईने मग फोन अंजूकडे दिला. 


" आई तुम्ही झोपा. मी दादाशी बोलुन मग झोपेन...." ती तिच्या रूममध्ये पळाली.


" हॅलो दादया..... उद्याचा काय प्लॅन मग.....?? " तिने उत्सुकतेने विचारलं.


" बघु... अजुन काही ठरलं नाही.... संध्याकाळी जाईन मीराला भेटायला...अंजु मी खुप दमलोय.... प्लिज झोपू का....?? "  अमेय 


" हो झोप.... एक मिनिट हा....  " तिने पाहिलं तर मीराचा फोन येत होता..... " हॅलो दादा अरे मीराचा फोन येतोय मला काय सांगू तिला....." अंजुने विचारलं. 


" अंजु.... मी मुंबईला आहे हे तिला माहीत नाही. मी फक्त कॉन्फरन्स साठी आलोय एवढंच माहितेय तिला.. प्लिज तिला काही सांगू नकोस.... " अमेय


" ok बॉस.... नाही सांगत.....चल झोप तू.... टाटा... " असं म्हणुन तिने फोन कट केला.  आणि लगेच मीराला फोन लावला. 

............................

" हॅलो...  अंजु अग कोणाशी बोलत होतीस एवढा वेळ.... कधीचा फोन लावतेय मी... " पलीकडून मीरा विचारत होती. 


" अग मावशीचा फोन आला होता... खूप दिवसांनी.  ती बोलत होती आईशी त्यात वेळ गेला...." तिने थाप मारली.


" okk..... घरी काय म्हणतायत सगळी...?? " मीरा उगीचच बोलायचं म्हणुन बोलत होती. खरंतर तिला अमेयबद्दल विचारायचं होतं म्हणून तिने फोन केला होता. कारण दिवसभरात त्याने तिला एकही फोन केला नव्हता. 


" सगळी मजेत आहेत.... तू कशी आहेस...?? " 

" मी पण मस्त.... अजून काय म्हणतेस....?? " 


"नवीन काही नाही. दादा गेलाय कॉन्फरन्स साठी सो घर अगदी शांत शांत वाटतंय....." अंजु


" हो का....?? कुठे गेलाय ग.......? " मीरा 


" अग तो बंगलोरला गेलाय आज पहाटेच.... उद्या किंवा परवा येईल.... " अंजु गालातल्या गालात हसत होती.


" हा.... हा... बरं... बाकी काका काकू कसे आहेत...?? मी विचारलं म्हणून सांग... "  मीरा 


" हो. बरे आहेत दोघेही.... " 

" चल मी झोपते..मग मेसेज करेन तुला...." मीरा

" हो चालेल . गुड नाईट......" 

" गुड नाईट..." 


'छुपेरुस्तुम....... दादाची माहिती विचारायला फोन केलास काय मुद्दाम.... पण बोलेल तर शपथ....' स्वतःशीच बडबडत अंजु बेडवर आडवी झाली. तोच तिचा मोबाईल वाजला. कोणाचा तरी मेसेज आला होता. तिने पाहिलं तर अबिरचा मेसेज...!! ती उठुनच बसली. 

' सॉरी.... माझ्यामुळे आज तुला खूप त्रास झाला असेल ना...पाय फार दुखत आहेत का...? काळजी घे. गुड नाईट... ' 


तिने दोनदा - तीनदा तो मेसेज वाचला आणि तिचे ओठ आपसूकच रुंदावले. तिने त्याला काहीच रिप्लाय दिला नाही. तो मेसेज बघतच ती झोपली. 


पण इकडे अबिरला मात्र झोप येत नव्हती. तिला शिक्षा द्यायला आपण तिला फेऱ्या मारायला लावल्या खऱ्या पण ऑफिस मधून निघताना तिची हालत बघुन त्याला वाईट वाटलं. त्यामुळे ऑफिसवरून आल्यावर पण त्याला तिचाच चेहरा आठवत होता. कितीही काही झालं तरी आपण असा कोणा मुलीला त्रास देणं बरोबर नाही. असं त्याला राहुन राहुन वाटायला लागलं. शेवटी त्याने तिला मेसेज केला आणि तिच्या रिप्लायची वाट बघत राहिला. पण ती तर केव्हाच झोपली होती. अबिर मात्र तिचा तो कोमेजलेला चेहरा आठवत बेडवर आडवा झाला. कधी त्याला झोप लागली त्याचं त्यालाच कळलं नाही.... 

.....................................

दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा ज्या फ्लॅटवर राहायची त्याची बेल वाजली. सकाळचे सहा वाजले असतील. 

' एवढ्या सकाळी सकाळी कोण आलंय कडमडायला....' बडबडतच ती पेंगुळलेल्या डोळ्यांनी उठली. 

 तिने दार उघडलं तर बाहेर कोणीच नव्हतं. फक्त समोरच्या मॅटवर एक गुलाबाचं फुल होतं. ती दरवाजा लावायला आत जाणार तेव्हा तिला ते दिसलं. तिने आजूबाजूला पाहिलं. पण कोणीच नव्हतं. ती आत आली आणि तिने दार लावुन घेतलं आणि ती पुन्हा येऊन झोपली. थोडा वेळ असाच गेला आणि पुन्हा बेल वाजली. चरफडतच ती उठली. पुन्हा तिला कार्पेटवरती एक गुलाबाचं फुल नि त्यासोबत एक चिट्ठी मिळाली. एव्हाना तिची झोप चांगलीच उडाली होती. तिने चिट्ठी वाचली तर त्यावर मस्त ' good morning ' लिहल होतं आणि त्याखाली रेडवाल छोटंसं हार्ट काढलं होतं. तिने दार लावलं आणि ती आत आली. मग तिने ब्रश केलं. चहा करून घेतला आणि गॅलरीत येऊन चहा पिऊ लागली. तोच पुन्हा बेल वाजली. 

' कोण उद्योग करतंय हे सकाळ सकाळ... ' ती वैतागली.  कारण  हे असं सरप्राईज द्यायला अमेय येणार नव्हता हे तिला माहीत नव्हतं. त्यामुळे उगीचच कोणीतरी आपल्या मागे लागलंय की काय...? अशी एक भीती तिच्या मनात आली. शिवाय तिची रुममेट दोन दिवस गावी गेली होती त्यामुळे मीरा एकटीच फ्लॅटवर होती. तिने घाबरतच दार उघडलं तर तिला तिथे अजुन एक गुलाबाचं फुल आणि छोटी कॅडबरी दिसली. ती तशीच पुढे गेली तर जिन्याच्या प्रत्येक पायरीवर तिला एकेक छोटी कॅडबरी मिळाली. त्या सगळ्या घेऊन ती खाली आली पण तिथे तर कोणीच नव्हतं. ती वॉचमनच्या केबिनपाशी गेली. 


" काका... आत्ता इथे कोण येऊन गेलं का....?? " 

" नाही.. अजुनपर्यंत तर कोणीच आलं नाही. मी इथेच तर आहे. " ते म्हणाले.

" कोण आत आलं नाही तर हे सगळं ठेवलं कोणी....?? " तिच्या मनात धाकधूक व्हायला लागली. ती पळतच वरती आली. आपल्या फ्लॅटच दार तिने उघडलं आणि ती जवळजवळ ओरडलीच.....


क्रमशः......


नवीन भाग पोस्ट केल्यानंतर मी इराच्या फेसबुक पेजला जो आधीचा भाग असतो त्या खाली कमेंट करून सांगत असते. तर ती कमेंट किंवा त्याचं नोटिफिकेशन तुम्हा वाचकांना मिळतं की नाही ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. शक्यतो तुम्हाला भाग फेसबुकवर दिसतो त्याच्या आदल्या दिवशी रात्री भाग पोस्ट झालेला असतो. पेजवरती search हा ऑप्शन नसल्याने तुम्हाला खूप शोधावं लागत असेल मान्य आहे. अशा वेळी सरळ तुम्ही साईट वरती जाऊन कथेचे नाव टाकावं आणि कथा वाचावी. ही विनंती. 

कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा कोणीही कॉपी पेस्ट करू नये ही विनंती. 

© ® सायली विवेक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//