Mar 02, 2024
प्रेम

तू तर चाफेकळी - भाग 3

Read Later
तू तर चाफेकळी - भाग 3

तू तर चाफेकळी - भाग 3 

अबिर अंजलीने सांगितलेल्या एरियामध्ये येतो. पण त्याला मेहता कंपनीच ऑफिस कुठेच दिसत नव्हतं. त्याने एका बाजूने जाणाऱ्या माणसाला पत्ता विचारला. पत्ता बरोबर होता. त्या माणसाने मग अबिरला पुढच्या एका बिल्डिंगकडे बोट दाखवत तिथे जायला सांगितलं. अबिरने जाऊन पाहिलं पण तिथे वेगळ्याच कंपनीच ऑफिस होतं. या सगळ्या उद्योगात जवळपास तास दीड तास गेला होता तरीही ऑफिस सापडलं नाही. त्याने मग ऑफिसला फोन केला पण ऑफिस सुटल्यामुळे कोणीही फोन उचलला नाही. तो चरफडतच पुन्हा एकदा समोरच्या दुकानात जातो. 

" दादा..... " 

" काय हवंय....?? " समोरचा माणुस जवळजवळ त्याच्यावर खेकसुन विचारतो. 

" ते मेहता कंपनीच ऑफिस कुठे आहे....? " 

" डोळे आहेत ना कपाळात मग वाचता येत नाही का...?? ती काय मागची बिल्डींग.... " त्याने बोट केलेल्या दिशेकडे अबिरने पाहिलं तर खरच तिथे मेहता कंपनीच नाव झळकत होतं. 

" कुठून जायचं सांगता का .....? " अबिरने परत विचारलं 

वैतागतच त्या दुकानदाराने त्याला वाट दाखवली. 

तो ऑफिसला पोहचला पण त्याला ऑफिसमध्ये कोणीच दिसत नव्हतं. कारण आज ऑफिस हाफ डे असल्याने लवकर सुटलं होतं. तो वैतागतच आपल्या घरी जायला निघाला. हे सगळं अंजुने मुद्दाम केलं होतं हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं. मनोमन अंजुला शिव्या घालत तो घरी पोहोचला. 

.......................
दुसऱ्या दिवशी संडे असल्याने ऑफिसला सुट्टी होती. तो जरा उशिरानेच उठला. मस्त आळस देत बाल्कनीतून दिसणारं शहर बघत राहिला. काम करणाऱ्या मावशींनी त्याला मस्त कॉफी दिली. तो उठेपर्यंत त्यांची कामं झाली होती. तो फ्रेश होऊन आल्यावर त्या निघून गेल्या. अबिर मात्र अंजुच्याच विचारात गढला होता. ' या अबिर देसाईला त्रास द्यायची हिंमत कशी झाली तिची...?'  त्याने तिथल्याच एका टेबलवर जोरात पंच केलं. त्याचा राग अजूनही निवळला नव्हता. त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं. कॉफी संपवुन तो तयारीला लागला.

........................... 
संडे असल्याने अंजु मॅडमचं अजून काही उजाडलं नव्हतं. आई हाका मारून थकली होती. मग मीरा तिला उठवायला गेली. तोच अमेयने मागून येत तिला आपल्या खोलीत ओढलं. अंजु आणि अमेयची रूम बाजूबाजूलाच होती. त्यामुळे ते पटकन कोणाच्या लक्षातच आलं नाही. 

" अमेय.... तू......?? " ती जरा दचकली. 

" मग दुसरं कोण असणार....? " त्याने तिच्याकडे बघत डोळा मारला. 

" अरे सोड... बघेल कोणीतरी. काका काकू घरातच आहेत. " ती त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने मिठी अधिकच घट्ट केली. 


" अं हं..... अजिबात नाही. आज जाणार तू. परत कधी भेटू माहीत नाही. प्लिज नको ना जाऊ... " तो लहान मुलांसारखं म्हणाला नि तिला हसू आलं. ती त्याच्या मिठीतुन बाजूला झाली आणि त्याचा चेहरा ओंजळीत धरला. 


" आत्ता गेले तर मग पुन्हा लवकर येता येईल ना... माझ्या अमूडी साठी.... " तो हसला. त्याने तिच्या गळ्यात हात टाकले.


" हमम... काय करणार आता. गरीब बापडा मी. कसंतरी  जगू  आता तुमच्या आठवणींवर... " तो तोंड पाडत म्हणाला.

" बास झाली नौटंकी... जाऊ दे आता मला. अंजु आता उठली नाही ना तर काकू मारतील तिला. झोपाळु आहे नुसती.. तुझ्यावर गेलेय ना अगदी....!!!" ती त्याच्यापासून लांब जात हसत होती.


" हो का... थांब तुला बघतोच. " तो तिच्यामागे धावला पण त्या आधीच ती बाहेर पळाली आणि अंजुच्या खोलीत आली. तोपर्यंत अंजु उठून बसली होती. 

" काय गं...? अशी वाघ मागे लागल्यासारखी का पळत आलीस...?? " अंजुने काहीच न कळून विचारलं.


" आ.....?? काही नाही.... ते ... तुलाच उठवायला आले होते. काकू ओरडतायत चल लवकर खाली.. " तिला ती जवळजवळ ओढतच खाली घेऊन गेली. 


आईने मस्त इडली सांबार केला होता. सगळ्यांनीच मग त्यावर ताव मारला. मीरा दुपारी निघणार होती त्यामुळे अंजुला वाईट वाटत होतं. पण मीराची रजा संपली होती त्यामुळे तिला आता जास्त वेळ थांबता येणं शक्य नव्हतं. दुपारी जेवण वगरे आटपल्यावर मीरा निघाली. अमेय तिला सोडायला गेला. दुपारचं जेवून अंजु नुकतीच बेडवर आडवी झाली आणि तिचा फोन वाजला. अन्नोन नंबर होता. तिने वैतागतच फोन घेतला. 


" मिस अंजली.. अबिर देसाई हिअर...." अबिरचं नाव ऐकून अंजुच्या पोटात गोळा आला. कारण फोनवर त्याचा आवाज काही निराळाच होता. 


" हा बोल...... तुला नंबर कोणी दिला माझा...?? मी तर दिला नव्हता..." तिने विचारलं


" ते महत्वाचं नाही. आत्ताच्या आत्ता ऑफिसला ये...." तो म्हणाला.


" पण आज संडे आहे. आज कुठे ऑफिस सुरू आहे....?? "  ती म्हणाली. 


" ते सरांना सांग. मला त्यांनी तुला फोन करून कळवायला सांगितलं. कालच्या मेहता कंपनीच्या कामाबद्दल बोलायचं आहे. ताबडतोब ऑफिसला ये...." इतकं बोलून त्याने फोन कट केला. 


त्याच्या आवाजावरून तरी तो चिडल्याचं स्पष्ट कळत होतं. तिने मग पटापट सगळं आवरलं आणि आई बाबांना सांगून ती बाहेर पडली. ती ऑफिसला येईपर्यंत संध्याकाळ झाली. रोज गजबजणारं ऑफिस आज तिला स्मशान शांततेपेक्षा भयानक वाटू लागलं कारण आतमध्ये नक्कीच खवळलेला वाघ बसला असणार याची तिला खात्री होती. ती दबकतच पायऱ्या चढुन वर गेली. त्यांच्या डेस्कजवळ ती आली पण तिथे कोणीच नव्हतं. ती अबिरला हाका मारत होती पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता. ती मग वरच्या फ्लोअर वरती गेली. तिथेही तो नव्हता. तिने त्याला कॉल केला पण लागला नाही. एव्हाना बाहेर चांगलंच अंधारून यायला लागलं होतं. तिला आता भीती वाटू लागली. ती खाली आली पण तोच तिला एक पाल जाताना दिसली आणि ती जोरात ओरडली. पालीला घाबरून ती वाट दिसेल तिकडे धावत गेली. ग्राउंड फ्लोअर वरती कंपनीचं प्रोडक्शन डिपार्टमेंट होतं. तिने एकवार सगळीकडे नजर टाकली आणि ती जरा शांत झाली. आज पहिल्यांदाच ती तिकडे आली. हळूहळू पुढे जात ती सगळीकडे बघत होती. चिटपाखरूही दिसत नव्हतं. ती वरती जायला वळणार तोच तिला कोणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज आला.ती हळूहळू चालत त्या दिशेने गेली. कोणीतरी माणसं तिथल्या केबिन मध्ये बोलत होती पण आज मशनरीजचा आवाज नसल्याने त्यांचं बोलणं बाहेरही स्पष्ट ऐकू येत होतं. 


" हे तुमचे पैसे....... काम झालं की अजून मिळतील..." एक व्यक्ती म्हणाली. 

" हो ... थँक्स. तुमचं काम झालंच म्हणून समजा. पण आता एक अडचण आहे. सरांनी मेहता कंपनीचे प्रोजेक्ट मिळावेत म्हणून नवीन आलेल्या माणसांना कामाला लावलंय..... त्यांनी जर खरंच चांगलं प्रेझेंटेशन दिल तर डील आमच्या कंपनीला मिळेल..." दुसरी व्यक्ती म्हणाली.


"  तेच तर तुम्हाला थांबवायचे आहे. काहीही झालं तरी मेहताच प्रोजेक्ट आम्हालाच मिळायला हवं. तुम्ही ते प्रेझेंटेशन तयार झालं की त्याची वाट लावा किंवा ते कंपनीकडे पोहचू देऊ नका...." पहिली व्यक्ती.


" अहो पण ते कसं शक्य आहे...?? " दुसरी व्यक्ती


" त्याच कामाचे तर पैसे मोजतोय आपण.. नि काम नाही झालं तर तुमच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल...." तो त्या व्यक्तीची कॉलर नीट करत म्हणाला. 

बाहेरून अंजली हे सगळं ऐकत उभी होती. तिला थोडी भीती वाटली. त्या दोन्ही माणसांचे चेहरे तिला दिसले नव्हते. तरीही आपल्या ऑफिस मधलंच कोणीतरी आहे याचा तिने अंदाज लावला. ती जायला वळली तर तिच्या हातात असणारा मोबाईल भीतीने खाली पडला. त्याच्या आवाजाने आतली माणसं सावध झाली. 

" कोण आहे.....?? " त्यातल्या एका व्यक्तीने बाहेर येत विचारलं. 

" जर आपल्याला कोणी पाहिलं ना तर आपण मेलोच.. " असं म्हणून दोघेही बाहेरून आलेल्या आवाजाचा शोध घेऊ लागले. 

कसाबसा आपला मोबाइल उचलून ती धावतच वरच्या फ्लोअर वरती आली. डेस्कवर ठेवलेली पर्स उचलली आणि ती ऑफिसमधून बाहेर पडली. ती इतकी घाबरली होती की  तिने मागे वळूनही पाहिलं नाही. थोडं पुढे गेल्यावर तिला समोरून अबिर येताना दिसला. त्याला बघुन ती धावतच त्याच्याजवळ आली. 

" अबिर.........."  हाक मारतच तीने त्याला घट्ट मिठी मारली. 


क्रमशः....... 

कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा कोणीही कॉपी पेस्ट करू नये. कथा आवडल्यास नावसहित शेअर करावी ही विनंती. 
© ® सायली विवेक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//