तू तर चाफेकळी - भाग 10
अबिर बाहेर आला तोपर्यंत अंजु निघुन गेली होती. कुलकर्णी सरांना आणि रामू काकांना बघुन त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पण त्याने तसं दाखवलं नाही. उगीचच कोणावर तरी संशय घेणं बरोबर नाही. कदाचित ते त्यांचं काम करत असतील. स्वतःचीच समजूत घालत तो घरी पोहोचला.
.................................
दिवसभर भटकून मीरा नि अमेय नरिमन पॉइंटला आले. हळूहळू सूर्य घरी जायच्या तयारीत होता. फेसळता समुद्र सूर्याला आपल्या कवेत घेण्यासाठी जणू आसुसला होता. समुद्राचं बदलणारं रूप आणि मधुनच येणाऱ्या वाऱ्याचा झोत अंगावर शहारा आणत होता. दोघेही हातात हात घेऊन शांत बसले होते. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. खरंतर ती शांतताच सर्व काही सांगुन जात होती. आपलं माणुस भेटल्याचा आनंद कितीतरी वेळा त्या समुद्राने पाहिला होता...!! अनेक सुख दुःख त्याने ऐकली होती. न बोलताही मनातलं सगळं त्या ठिकाणी गेल्यावर जाणवत होतं. अमेयने तिला हळुच जवळ ओढलं तसं तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटले. आपलं कोणीतरी जवळ असल्याची भावनाच निराळी होती..!! ना त्यात स्पर्शाची ओढ होती ना कोणत्या अपेक्षांचं ओझं... फक्त होती ती प्रेमाची ऊब... !!! आपल्या माणसाच्या केवळ सोबत असण्याच्या जाणिवेने मिळणारी.... !!!!
थोडा वेळ तिथे बसुन दोघेही घरी परतले. अमेयची 8 ची गाडी होती. तिने त्याच्यासाठी खाण्याचे पदार्थ त्याच्या बॅगेत ठेवले.
" आता परत कधी येशील.....?? " मीराचा स्वर कातर झाला.
" वेळ मिळाला की नक्की येईन हा पिल्लू.... " त्याने तिचा चेहरा ओंजळीत धरला आणि हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले.
" हा. आणि पोहचल्यावर मेसेज कर. मी जागी असेन.... " ती त्याला बिलगली.
" हो डिअर नक्की....नि रडू नको आता. लग्नात थोडंस रडायला शिल्लक ठेव... नाहीतर तोपर्यंत पाण्याची टाकी संपायची.... " तो बोलला त्यावर ती खुदकन हसली.
" गप रे तू...... " तिने त्याला एक फटका मारला.
" हळू ना.... लागतंय.... बारके.... " अमेयने बॅग घेतली आणि तो जायला निघाला.
" चल निघतो मी. काळजी घे. काहीही वाटलं तरी फोन कर ok. तुझी मैत्रीण येणारे ना उद्या नक्की...?? नाहीतर मी आज राहतो इकडेच. मला काहीच प्रॉब्लेम नाही.... " त्याने खांदे उडवले.
" अजिबात नाही.. ती येईल उद्या सकाळी. नि मला सवय आहे. मी एकटी राहू शकते. तू जा बघु..... " तिने त्याला ढकललं.
" बघ बघ.... आत्ता पासूनच होणाऱ्या नवऱ्याला हकलतेय.... " त्याने पटकन तिला जवळ घेतलं. " सगळं वसुल करणारे हा मी.. लक्षात ठेव.... " तो तिच्या कानात कुजबुजला त्यावर ती लाजली.
" नको ना अशी लाजू.. माझा मग पाय नाही निघणार. " त्याने तिला बाजूला केलं.
" हमम...... नीट जा... " तिने त्याला हसुन बाय केलं.
" हो... दार नीट लावुन घे. गाडीत बसल्यावर मेसेज करतो तुला.... " मागे वळुन न बघता तो धाड धाड जिना उतरून खाली गेला. खालच्या मजल्यावर आल्यावर डोळ्यात आलेला थेंब त्याने हलकेच टिपला आणि तो स्टॉपच्या दिशेने निघाला. मागे वळुन त्याने पाहिलं तर मीरा गॅलरीतून त्याला हात हलवुन बाय करत होती. त्यानेही हात उंचावला आणि तो निघुन गेला.
.................................
अंजु आज जागीच होती. तिचा दादा येणार होता ना...!! आई बाबांना झोपायला पाठवुन ती ऑफीसच काम करत बसली. पण राहुन राहून तिच्या डोळ्यासमोर अबिरचा चेहरा येत होता. आज दिवसभरात कामा व्यतिरिक्त तो काहीच बोलला नव्हता. ना त्याने तिची मस्करी केली होती ना तिची काही खोडी काढली होती. त्याचा उतरलेला चेहरा तिच्या नजरेतून सुटला नव्हता. तो आपल्याला एवढं सॉरी म्हणाला नि आपण साधा मेसेज पण केला नाही त्याला. तिला उगीच रुखरुख लागुन राहिली. शेवटी तिने त्याला मेसेज करायचं ठरवलं. पण करू की नको ते कळेना. त्यापेक्षा उद्या ऑफिसला जाऊनच त्याला सॉरी म्हणू असं तिने ठरवलं. कारण त्यांच्या ज्या काही कुरघोडी चालू होत्या त्यात अंजुची देखील चूक होतीच की...!! विचार करता करताच तिचे डोळे मिटले. ती तशीच सोफ्यावर पडून होती. साडेबाराच्या सुमारास दाराची बेल वाजली तशी ती दचकुन जागी झाली. मांडीवरचा लॅपटॉप बाजूला ठेवला आणि ती दार उघडायला गेली. अमेय आला होता.
" अग जाडे बाजूला तरी सरक.. आत कसा येऊ...?? " अमेय जरा ओरडला. आधीच अंजु झोपेत.. त्यात दादा आल्याने तशीच त्याला बघत ती दारात उभी होती. त्यामुळे अमेय जरा तिला चिडवायला म्हणाला आणि मॅडम चांगल्याच जाग्या झाल्या.
" मी जाडी काय... माकडा... ये तू घरात ये. बघते तुला...... " तिने मग त्याच्या हातातली एक बॅग घेतली आणि आत आली. मागोमाग तो देखील आला.
" आता कसं घरी आल्यासारखं वाटतंय...." हुश्शह करत तो सोफ्यावर बसला. अंजुने त्याला पाणी आणुन दिलं.
" आई , बाबा कुठायत .....?? " त्याने दबक्या आवाजातं विचारलं. तिने हातानेच ते झोपल्याची खुण केली.
" ok...... " त्याने तिथेच सोफ्यावर मान टेकवली नि डोळे मिटले.
प्रवासामुळे तो थकला होता. अंजुने वाटीतून थोडंस तेल आणलं आणि त्याच्या डोक्यावर घातलं. तिच्या हाताच्या स्पर्शाने त्याने डोळे उघडले.
" इथे बस खाली. डोक्याला मालिश करून देते...." तिने ऑर्डर सोडली. तो गपचूप तसाच खाली सरकला. अंजु त्याच्या मागुन येऊन सोफ्यावर बसली आणि त्याच्या केसात हात फिरवू लागली.
" आहाहा ..... अंजु किती बरं वाटतंय म्हणून सांगू...!!! तुझे हात इतके मुलायम असतील असं वाटलं नव्हतं.... " तो डोळे मिटुनच बदबडत होता.
" हो का... आता देतेय ना डोकं चेपून. मग बस शांत...." तिने त्याचं डोकं घासल आणि पुन्हा हातानी मसाज करू लागली. आता त्याचे डोळे चांगलेच मिटायला लागले.
" अंजु.... बास आता. इथेच झोपेन मी नाहीतर.... " अमेय
" इथे नको. वरती खोलीत जाऊन झोप. ए पण मला सांग भेटलास काय माझ्या वहिनीला....?? काय काय मजा केलीत...?? " तिने उत्सुकतेने विचारलं.
" काही नाही. भेटलो तिला. दिवसभर फिरलो... आता जाऊ...?? झोप आलेय जाम..... " त्याने जांभई दिली.
" दिवसभर.......??? पण आज तर तुझी कॉन्फरन्स होती ना....??? " ततिने डोळे मोठे केले.
" नाही. कालच संपली ती. मी आज सुट्टी टाकली होती तिच्यासाठी...... " तो झोपेतच बडबडत होता.
" अरे छुपेरुस्तुम....!!! कॉन्फरन्सच्या नावाखाली मीराला भेटायला जातोस होय. थांब आता सांगतेच आई बाबांना.... " तिने हाक मारायला तोंड उघडल तोच त्याने पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला.
" अंजु.... प्लिज मला खूप झोप आलेय. जर तू काही पचकलीस तर मीराने तुझ्यासाठी गिफ्ट पाठवलंय ते मी देणारच नाही तुला..... " त्याने त्याचं प्रभावी अस्त्र वापरलं. ती जरा शांत झाल्यासारखी वाटली तेव्हा त्याने तिच्या तोंडावरचा हात काढला.
" खरंच.... काय पाठवलंय मीराने. दाखव ना मला.... " खुश होऊन ती त्याच्या बॅग्स धुंडाळायला लागली.
" अजिबात नाही. आत्ता काही दाखवणार नाही. उद्या सकाळी मिळेल काय ते..... " त्याने बॅग्स उचलल्या नि तो आपल्या खोलीत गेला.
" काय रे......... "
अंजु खट्टू झाली. तीही मग आपल्या रूममध्ये जाऊन झोपली.
.........................
सकाळी दादाने ऑफिसला जायच्या आधी अंजुला मीराने दिलेला टॉप दिला. ती भारीच खुश झाली. दोघेही चहा नाश्ता खाऊन ऑफिसला बाहेर पडले. अंजुने जाता जाता मीराला फोन केला.
" हॅलो..... गेलीस काय ग ऑफिसला..... ?? " अंजु
" नाही. ऑन द वे आहे.. बोल तू....." पलीकडून मीरा म्हणाली.
" टॉप मिळाला बरं का वहिनीसाहेब....." अंजु फुल चिडवायच्या मूड मध्ये होती.
" ए काय ग..... " ती लाजली. " तुझ्यासाठी मी तुझी मीराच आहे... "
" हो का. तरी लोकं सांगत नाहीत आम्हाला काही... तू भेट गं बघ कशी फटकवते तुला म्हशे..... " अंजु जरा रागावली.
" सॉरी ना.. नको ना चिडू. सगळं इतकं अचानक झालं की तुला सांगताच आलं नाही.... नि तुला आवडलं नाहीतर म्हणुन भीती वाटत होती सांगायला.
" हो. नाहीच आवडलेलं मला हे तुमचं वागणं. घरी सांगणार आहे मी आता. दादाचं लग्न उरकून टाका लवकरात लवकर.... " ती जरा ठामपणे म्हणाली.
" काय.....??? अंजु... प्लिज असं काही करू नकोस. आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर..... " मीराचा आवाज रडवेला झाला होता आणि इकडे अंजुला हसायला येत होतं.
" अग वेडाबाई.... दादाचं लग्न तुझ्याशीच लावायला सांगणार असं म्हणत होते मी..... " अंजु मोठ्याने हसली.
" अंजु कुस्के.... मारशील मला एक दिवस....... " मीरा
" हो च. तू भेट फक्त. चांगली मार खाणारेस.. बरं ते जाऊदे काल काय काय केलं सांग तरी..... " अंजली
" भेटलो... दिवसभर भटकलो.. मुव्ही बघितली. खूप बरं वाटलं तो भेटल्यावर..... " ती लाजत लाजत सांगत होती.
" बास एवढच......?? आणखी काही नाही.....?? " अंजु
अंजुच्या बोलण्यातला रोख मीराच्या लक्षात आला.
" बाकी काही नाही हा अंजु... तुला वाटतं तसं काही नाही..... " मीरा
" पण दादाने तर मला सगळं सांगितलं. कशी तू जाऊन त्याला मिठी मारलीस.... नि मग...... " अंजु पुढे काही बोलणार तोच पलीकडून मीरा बोलली.
" अंजु माझं ऑफिस आलं. मी फोन ठेवते हा... बाय बाय... " मीराने फोन कट केला. तशी अंजु स्वतःशीच हसली.
अंजु देखील ऑफिसला पोहोचली होती. रिक्षावाल्याला पैसे देऊन ती आत आली. हळूहळू एकेक जण येत होता. तिने सगळ्यांना गुड मॉर्निंग विश केलं. पण तिचं लक्ष नव्हतं. तिची भिरभिरती नजर आज अबिरला शोधत होती. आत्तापर्यंत त्याला दिलेल्या त्रासाबद्दल तिला सॉरी म्हणायचं होतं. पण अबिर कुठेच दिसेना. ती आपल्या जागेवर जाऊन बसली. बराच वेळ झाला तरी अबिर अजुन आलाच नव्हता. तिची अस्वस्थता वाढायला लागली. काल सारखं कदाचित तो उशिरा येईल असं वाटून तिने कामाला सुरुवात केली. पण लंच ब्रेक होऊन गेला तरी आज अबिर ऑफिसला आलाच नाही. थोड्या वेळाने रामू काकांनी तिला मॅनेजर सरांनी बोलावलंय असा निरोप दिला. ती सरांच्या केबिनमध्ये गेली.
" मिस अंजली... आत्ताच मला मेहता कंपनीकडून मेल आलाय. 2, 3 आणि 4 असे तीन दिवस वर्कशॉप असेल. पहिल्या दिवशी कॉन्फरन्स होईल आणि त्यानंतर सगळ्या कंपन्यांचे प्रेझेंटेशन होतील.... " मॅनेजर सर बोलले
" ok सर.. सर आम्ही खूप मन लावुन प्रेझेंटेशन करतोय. हे प्रोजेक्ट आपल्याच कंपनीला मिळेल सर.... " ती कॉन्फिडन्टली म्हणाली.
" गुड.... असच काम करत राहा. मि. अबिर खूप माहीर आहेत प्रेझेंटेशन करण्यामध्ये. त्यामुळे त्यांच्याकडून जेवढं शिकता येईल तेवढं शिकुन घ्या.... " सर
" हो सर.... पण आज मि. अबिर आले नाहीयेत... " अंजली.
" हो. मला माहितेय. ते त्यांच्या काही कामासाठी मुंबईला गेले आहेत. म्हणुन तर मी तुम्हाला बोलवलं. मी तुम्हाला हा मेल पाठवुन ठेवतो. तो नीट वाचा. आणि मि अबिरना ते आल्यावर सगळं नीट समजावुन सांगा.. " सर पीसी वर काम करता करता म्हणाले.
" ok सर...... " ती मग सरांची परमिशन घेऊन बाहेर आली.
' अबिर असा अचानक का गेला असेल मुंबईला...?? ' तिच्या डोक्यात त्याचेच विचार घोळत होते.
क्रमशः....
पुढील भाग 29 किंवा 30 जूनला पोस्ट करण्यात येईल. नेक्स पार्ट कधी.... नेक्स्ट पार्ट प्लिज.... या कमेंट्स सोडून मला इतर कमेंट्स वाचायला नक्की आवडतील. कथेतील तुम्हाला आवडणारी किंवा न आवडणारी एखादी गोष्ट असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. Thank you
© ® सायली विवेक.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा