तू तर चाफेकळी - भाग 9

Love story

तू तर चाफेकळी - भाग 9 

मीरा धावत पळत वरती आली ती ओरडलीच. पाठमोरा उभा असलेला तो वळला.

" तू....?? " ती आनंदाने बेहोष झाली.

" तू...... तू कसा काय आलास....?? "   तिने अमेयला मिठीच मारली. चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. नुसतं त्याला बघुनच तिचं पोट भरलं.

" आलो तुझ्यासाठी धावत धावत.... कोणीतरी रागावल होतं ना !! काय करणार..... गरीब माणसं आम्ही... आलो लगेच रुसवा काढायला...  " अमेय हसला

" गप नौटंकी....  कधी आलास बंगलोर वरून..."  ती बाजूला झाली

" तुला कोणी सांगितलं मी बंगलोरला गेलोय म्हणुन...?? " त्याला काहीच कल्पना नव्हती.

" काल अंजु म्हणाली की तुझी कॉन्फरन्स आहे सो तू बंगलोरला गेलायस.... " तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य लपत नव्हतं. त्यावर तो फक्त हसला.

" मी कॉन्फरन्स साठीच गेलो होतो. पण बंगलोरला नाही. इथे मुंबईत. कालच संपली ती.. आज तुझ्यासाठी मुद्दाम रजा टाकुन राहिलोय.... " त्याने तिच्या गळ्यात हात टाकले.

" खरंच....!!!!  पण मला का नाही सांगितलं..? खोटं बोललास ना माझ्याशी.... " तिने हलकेच त्याच्या छातीवर पंच केलं.

" हो का.. सांगितलं असतं तर तुला इतकं छान सप्राइज देता आलं असतं का वेडू... " त्याने तिच्या डोक्यात टपली मारली.

" हो. खरंच की... तू आलास तेच माझ्यासाठी खूप आहे.. am sooo happy...!!! " ती परत त्याला बिलगली. दोन क्षण असेच गेले आणि तिची ट्यूब पेटली.

" अरे , पण मग अंजुने मला खोटं का सांगितलं....याचा अर्थ....... " 

" अंजुला सगळं कळलंय....... " त्याने तिचं वाक्य पूर्ण केलं.

" काय..........???? अरे पण कसं....? कधी ...?? "  मीरा 

" मॅडम ज्या दिवशी तुम्ही खूप रागावला होतात ना... त्याच दिवशी तिने मला तुझ्यासोबत बोलताना ऐकलं.... नशीब माझं घरी सांगितलं नाही... " अमेय 

" अरे... मला फाडुन खाईल ती... तिला सांगितलं नाही म्हणुन..... " मीराच्या चेहऱ्यावर आता काळजी दिसायला लागली.

"मला पण असंच वाटलं होतं. पण मग तिने सांभाळून घेतलं. खूप खुश आहे ती आपल्यासाठी.... " अमेय 

" हमम..... तरी ती मला सोडणार नाही... " मीरा

" मी ही नाही...... " त्याने तिच्याकडे बघत डोळा मारला. 

" गप रे.... " ती लाजली. तो तिच्या जवळ सरकला.

" माझ्यावर चिडण्याची शिक्षा मिळणारच आहे तुला तसं ही... " तो पुटपुटला.

" काय......??? " ती दचकली. आणि थोडी बाजुला सरकली.

" ते मी नंतर सांगेन.... सध्या मला झोप आलेय. काल रात्री उशिरा आलो मी हॉटेलला.. आणि आज तुला सरप्राईज द्यायचं सो लवकर उठलो. प्लिज मी झोपू थोडा वेळ...? तुझं आवरलं की उठव मला.... " खरंच त्याचे डोळे मिटत आले होते.

" हो... तू जाऊन पड आतल्या रूममध्ये. दोन तासांनी उठवते तुला.. तोपर्यंत आपल्यासाठी मस्त नाश्ता करते..."  मीरा

" हो चालेल.... " तो आतल्या खोलीत जाऊन झोपला.

मीराने देखील मग आवरायला घेतलं. ऑफिसमध्ये फोन करून आजची सुट्टी टाकली आणि ती कामाला लागली. पोह्यांची तयारी करून ठेवली आणि ती स्वतःच आवरायला गेली. थोड्या वेळाने तिने अमेयला उठवलं. दोन तास त्याची चांगली झोप झाली होती. त्यामुळे त्याला फ्रेश वाटतं होतं. तिने मग मस्त मऊ लुसलुशीत पोहे केले आणि त्यावर खोबरं पसरवल. गरम गरम त्याला खायला दिले. 

"कधी आणलस हे सगळं.... ?? " त्याने एक घास खाता खाता विचारलं.

" अरे , पोहे मिरच्या सगळं होतं घरातच. खोबरं फक्त आणलं काल. कसे झालेत पोहे ?? " ती उत्सुकतेने विचारलं

" मस्त झालेत एकदम.. " त्याने पोहे संपवले आणि तो आवरायला गेला. 

...................................

दोघेही आज मुंबई भटकायला बाहेर पडले. 

" बोला       मॅडम कुठे जायचंय ? आपका बंदा हाजीर हैं आप की सेवा मैं.... " तो थोडंस कमरेत झुकुन म्हणाला 

" हो का... मग आपण मुव्हीला जाऊया आधी... मग त्यानंतर जे सुचेल ते ठरवू..... चल.. "  मीरा 

"  चालेल. थांब मी तिकीट्स काढतो.... " अमेयने मग ऑनलाइन तिकीट्स बुक केले आणि ते थेटरला जायला निघाले. 

" 12 चा शो आहे. अजुन खूप वेळ आहे. काय करूया तोपर्यंत...? " अमेयने टॅक्सी मध्ये बसता बसता विचारलं. 

" इथे जवळच एक सेल लागलाय जाऊया का तिकडे...??  तुझ्यासाठी छान शर्टस घेऊया. आणि अंजुला मस्त टॉप.." तिची बडबड सुरू झाली आणि तो तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत एकटक तिच्याकडे बघत होता. 

" हॅलो.... कुठे हरवलास....?? " मीराने तिच्यासमोर चुटकी वाजवली. 

" तुझ्यातच..... " त्याने तिला हलकेच आपल्या जवळ ओढलं. तिच्या चेहऱ्यावर उडणारे केस त्याने कानामागे सरकवले तशी ती शहारली. 

थोड्याच वेळात दोघे सेलच्या ठिकाणी पोहोचले. मीराने त्याच्यासाठी दोन चार शर्टस घेतले. तिच्यासाठी आणि अंजुसाठी सेम टॉप घेतले.  दोघे मग तिथुन थेटरला गेले. आवडीचा मुव्ही बघितला. त्यानंतर लंच... मग मनसोक्त फिरणं...  स्ट्रीट फूड खाणं.... तिने भरभक्कम कार्यक्रम आखला होता आणि अमेय तर तिच्या सोबत असण्याच्या जाणिवेनेच खूप खुष होता.....!!!

....................................

अंजु आज ऑफिसला आली तीच खुशीत. काल अबिरने केलेल्या मेसेजचा परिणाम होता तो...!! तिच्या चेहऱ्यावर फ्रेशनेस आणि गोड हसू दिसत होतं. 

" काय अंजु... आज काय स्पेशल ? खुश दिसतेयस....." राकेशने विचारलंच

" नाही रे काही. सहजच. " तिने विषय टाळला. 

तोपर्यंत बाकीचा स्टाफ देखील आला. सीमा , यश , मितू सगळे आपापल्या कामाला लागले. पण आज अबिरचा पत्ता नव्हता. नेहमी सगळ्यांच्या आधी येणाऱ्या अबिरचं दर्शनच झालं नव्हतं कोणाला. 

" अरे , आज अबिर येणार नाहीये का...? " मीतूने राकेशला विचारलं.

" मला नाही माहीत. काही बोलला नाही. का गं तुझं मन लागत नाहीये का कामात....? " राकेश

" हो ना...!!! म्हणजे रोज त्याला बघितलं की कसं फ्रेध वाटतं..... " ती आपल्याच विचारात हरवली. 

" हो का...नि आम्ही काय चेहऱ्याला डांबर लावुन फिरतो काय ग... म्हणे त्याला बघितल्यावर फ्रेश वाटतं.... " राकेश 

" तसं नाही रे... पण तो वेगळा आहे सगळ्यांपेक्षा.... " ती स्वतःशीच हसली.

" मितू.... अग बरी आहेस ना...??  त्याला येऊन महिनाच झालाय फक्त.... नि तुला बरा कळला तो लगेच... वेगळा आहे ते.... " मगापासून त्यांची बडबड ऐकणाऱ्या यशने शेरा मारलाच. 

" हो मग काय....? कसला भारी आहे तो. कामात तर अप टू डेट...... शिका जरा त्याच्याकडून.... " त्यांना टोमणे मारत ती आपल्या जाग्यावर जाऊन बसली. 

" कळलं हा माते.. " यशने तिच्यासमोर हात जोडले. " आता अबिरजी महाराजांचा जप करून झाला असेल तर कामाला लागुया का...?? " यश 

" हो बालका...... "तिने हात उंचावुन त्याला आशीर्वाद दिला आणि सगळेच हसले. 

अंजु आपलं काम करता करता त्यांचं बोलणं ऐकत होती. ' पण खरंच अजुन कसा आला नाही अबिर....?? '  ती मनात विचार करायला आणि समोरून अबिर यायला एकच गाठ पडली.  त्याला बघुन तिला हायस वाटलं. 

.........................................

आल्या आल्या अबिर अंजुच्या डेस्कजवळ आला.

" मिस अंजली , काल आपण जे डिटेल्स काढले होते ते तुम्ही सगळे आज पीसीला फीड करून ठेवा. कारण यातले बहुतेक कागद जुने झालेत नि फाटू शकतात. मग आपल्याला फायनल प्रेझेंटेशन करताना अडचण येणार नाही.... प्लिज तुम्ही कराल का तेवढं... "  ती त्याच्याकडेच बघत होती.

" हॅलो...जली..... " त्याने चुटकी वाजवली तशी ती भानावर आली.  " लक्ष कुठाय..? हे सगळं न्यू फोल्डरला फील करा.... " त्याने फाईल्स तिच्या डेस्कवर ठेवल्या.

" अ....?  हो करते मी.... " ती म्हणाली.  तो मग आपल्या डेस्कवर जाऊन काम करू लागला. 

खरतर अंजुला वाटत होतं की त्याला विचारावं का उशीर झाला.. पण तिने ते टाळलं. 

" अबिर... का रे उशीर झाला तुला आज....?? " राकेशने विचारलं. तसे अंजुने कान टवकारले.

" काम होतं जरा... त्यामुळे उशीर झाला बघ..... " त्याने हसून सांगितलं.

" हा. आम्हाला वाटलं तुला बरं वगरे नाही की काय.....? काय काय माणसं वाटेकडे डोळे लावुन बसलेली असतात तुझ्या.... " शेवटचं वाक्य तो हळू आवाजात पण मीतूला ऐकू जाईल अशा पद्धतीने म्हणाला. तसं तिने त्याला डोळ्यांनीच झापल.

" नाही. मी ठीक आहे.... " राकेशशी बोलून तो कामाला लागला. 

काल अंजुने त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला नव्हता, त्याचा त्याला राग आला होता. आता उगीचच तिच्या वाटेला जायचं नाही असं त्याने मनोमन ठरवलं. तो कामापुरतच तिच्याशी बोलत होता. पण अंजुला मात्र त्याच्या अशा वागण्याचं आश्चर्य वाटतं होतं. काल तर सॉरी सॉरी करत होता. आज धड बोलत पण नाहीये. जाऊ दे आपल्याला काय करायचंय... ' त्याचा विचार झटकुन ती कामाला लागली. 

....................................... 

अबिर कामात गढला होता. त्याला कसंही करून मेहता कंपनीच प्रोजेक्ट मिळवायचं होतं. इतक्यात त्याचा फोन वाजला. निषादचा होता. 

" हॅलो..... बोल रे..... " अबिर 

" काय अबिर साहेब... काय म्हणताय....?? कसं चाललंय काम ...?? " निषादने चौकशी केली.

" छान चाललंय..... तू बोल. कसा काय फोन केलास...?? " 

" अरे तेच सांगायला फोन केलाय पुढच्या महिन्यात कंपनीची टेंडर ओपन होतायत.. तर त्यासाठी बेस्ट प्रेझेन्टेशन तयार करा. कारण बाकीच्या कंपन्या देखील असणार आहेत...  "  निषादने माहिती दिली.

" हो चालेल. या वेळेस काही झालं तरी हे प्रोजेक्ट आम्हालाच मिळणार.. मला फक्त डेट्स कळवून ठेव... " अबिर 

" हो. अजुन डेट्स फिक्स नाहीयेत. पण फ्रेंड म्हणुन मी तुला आधी कळवलं. डेट्स फिक्स झाल्या की तुम्हाला कंपनीकडुन ऑफिशियल मेल येईल.... "  निषाद 

" ok.... बाकी काय....?? " अबिर 

" Nothing special .. तू बोल. काय म्हणतेय तुझी लवंगी मिरची....?? " तो हसला.

" काय म्हणणार.... ठसका अजुनही कायम आहे.... " अबिर हसला नि त्याच वेळी अंजुने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. तसा तो गडबडला.

" बरं चल मला डेट्स सांग नक्की. मी तयारी करतो.... " अबिर 

" हो , माझ्या मते 5 किंवा 6 तारखेच्या दरम्यान असतील प्रेझेंटेशन. तरी पण सगळं कन्फर्म झालं की मी कळवतो. बाय... " निषादने फोन कट केला. 

अबिरने अंजुला प्रेझेंटेशनच्या डेट्स सांगितल्या. आता त्यांच्या हातात केवळ पंधरा एक दिवस होते. त्याचा पुरेपुर उपयोग करून त्यांना बेस्ट द्यायचं होतं. दोघेही कामाला लागले. संध्याकाळी देखील सगळे निघुन गेल्यावर त्या दोघांचं काम सुरू होतं. तासाभराने दोघेही बाहेर पडले. ते बाहेरच्या गेट पर्यंत आले तोच अबिरला काहीतरी आठवलं.

" अरे.... मी माझा डबा विसरलो.. तुम्ही पुढे व्हा. मी जाऊन घेऊन येतो..... " तो पुन्हा आत ऑफिसमध्ये आला. 

तर त्याच्या डेस्कजवळ कुलकर्णी सर दिसले. थोडं पुढे गेल्यावर रामू काका आवरताना दिसले. 

" सर तुम्ही इथे...? गेला नाहीत अजुन....?? " त्याने आपल्या डेस्कवरचा डबा घेता घेता विचारलं.

" अरे , मी सगळ्यात शेवटी जातो. सगळं नीट क्लोज केलं आहे की नाही.. पीसी , सगळे लॉकर वगरे ते सगळं बघावं लागतं....  " ते म्हणाले.

" okkk...... चला मी निघतो. " अबिर हसुन तिथुन बाहेर पडला.  पण तरीही त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. 

क्रमशः..... 

© ® सायली विवेक 

🎭 Series Post

View all