तू तर चाफेकळी - भाग 15

Love story

तू तर चाफेकळी - भाग 15 

अबिर अंजुला काही सांगत असतानाच त्याला कोणाचीतरी चाहुल लागली. तसा तो बाहेर आला पण तिथे कोणीच नव्हतं. त्याने तिला बाहेर बोलावलं. घडलेला प्रकार त्याने आधीच अंजुला सांगितला होता. त्याने ती चांगलीच गोंधळली होती. त्याने त्यासाठीच एक उपाय शोधुन काढला होता तो त्याने तिला एका कागदावर लिहुन दिला आणि तो कागद फाडुन फेकुन द्यायला सांगितलं. दोघेही मग आपापल्या कामाला लागले. थोड्या वेळाने बाकी स्टाफ पण यायला लागला. 

" अंजु..... काल आली का नाहीस...?? बरं नव्हतं का...?? " राकेशने विचारलं.

" नाही रे. असाच कंटाळा आलेला. थोडा रिलीफ मिळाला. आता बरं वाटतंय.... " ती हसुन म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन त्यालाही बरं वाटलं.

" काय ग अंजु.... एकटी एकटी खा काय पाणीपुरी..... " सीमाने मागुन येऊन तिच्या पाठीत धपाटा मारला. 

" आई ग..... सीमा अग बारकूडे. बारीक असलीस तरी हात लागतात तुझे..... आ... !! " अंजु

" लागूदेत... आम्हाला टाकुन खातेस ना. नवीन नवीन मैत्रणींसोबत.... " मितू आत येत म्हणाली. 

" कोण नवीन मैत्रीण....?? तुमच्याशिवाय कोणी आहे का मला....?? " अंजु 

" मग काल तुझ्यासोबत ड्रेसमध्ये कोण होतं.....?? " सीमा 

" आई....... !! " अंजु 

" आई.....????  " दोघी जवळजवळ ओरडल्याच.  " तुझी आई..?? ती कधीपासून ड्रेस घालायला लागली.... " सीमाने विचारलं. 

" काल पासूनच. मी नि दादाने लावला तिला घालायला. कसली भारी दिसत होती.... " अंजु

" हो ना. आम्ही तर ओळखलंच नाही. आमच्याकडे तर खूप स्ट्रिक्ट आहे सगळं. मॉडर्न ड्रेस मला घालायला देत नाहीत. आईला काय देणार...?? " सीमा उदास झाली. 

" असू दे ग. होईल बदलेल हळूहळू सगळं. एकदम होत नाही. आपणच पुढे व्हायचं नि मदत करायची यासाठी....काय मितू बरोबर ना....?? " अबिरकडे बघणाऱ्या मीतूला अंजु म्हणाली तशी ती जागी झाली. 

" अं.... हो हो... मी काय म्हणते आपण सगळेच जाऊयाना संध्याकाळी पाणीपुरी खायला.. कशी वाटते आयडिया... " मितू 

" चालेल ना.. मी तर किती दिवसात खाल्ली नाहीये. पण तू पार्टी देणार असशील तर जाऊया... " यश आत येत म्हणाला.

" त्यात काय.. चला आज माझ्याकडून पाणीपुरीची पार्टी. " ती मग अबिरजवळ गेली.  " अबिर तू येशील ना पाणीपुरी खायला.... ? "  तिने विचारलं

" हो येईन. पण आत्ता जरा मला काम आहे... " अबिरने पुन्हा कामात डोकं खुपसल. मितू देखील आपल्या डेस्कवर येऊन बसली.

" ए मितू पण कायते लवकर आवर हा संध्याकाळी. नाहीतर मला उशीर झाला घरी तर ओरडतील.. तुला माहितेय ना...? " सीमा 

" तुझं नेहमीचंच आहे सीमा. घरी फोन करून सांग आधीच माझ्यासोबत आहेस म्हणुन. उशीर झाला तर मी सोडायला येईन तुला... डोन्ट वरी डिअर... " सगळे मग आपापल्या कामाला लागले. 

..................................

अंजु आणि अबिर जीव ओतुन प्रेझेन्टेशन साठी काम करत होते. आता फक्त दोनच दिवस उरले होते. दोघांनी मिळुन नवीन कन्सेप्ट त्यात ऍड केल्या होत्या. ज्या मेहता कंपनीसोबतच्या डीलमध्ये फायदेशीर ठरल्या असत्या. पण तरीही प्रेझेंटेशन आणि दुसऱ्या प्रोजेक्टच टेंडर पूर्ण होईपर्यंत त्यांच्या डोक्यावर एक टांगती तलवार होतीच. याबाबत मॅनेजर सरांशी बोलावं असं त्यांना वाटत होतं. पण सध्या कोणावरच विश्वास ठेवावासा त्यांना वाटत नव्हता. संध्याकाळ झाली तसे सगळे बाहेर पडले. ऑफिसजवळच असणाऱ्या पाणीपुरीवाल्याकडे सगळी गॅंग गेली होती. मितूने सगळ्यांना प्लेट दिल्या. भैय्या एकेक करून सगळ्याना पाणीपुरी देऊ लागला. सगळे मस्त खात होते. पण अबिरला काही ते जमेना. एक पाणीपुरी त्याने कशीतरी तोंडात टाकली तोच त्याला जोरात ठसका लागला.  

" अरे हळू.... तिखट लागलं का....? धर पाणी पी.... " अंजुने पर्समधून पाण्याची बॉटल काढली आणि त्याला दिली. तिचा हात आपसूकच त्याच्या पाठीवर फिरायला लागला. तसं त्याला बरं वाटलं. 

" थँक्स....... " त्याने बॉटल तिच्याकडे. अजूनही त्याला थोडा ठसका लागत होता. 

" काय रे... कधी खाल्ली नाहीस का पाणीपुरी....?? " यश 

" तिखट लागलं का रे. कमी सांगू का.....?? " मितू 

" सावकाश खा....." राकेश 

" हो. खातो मी. पण आज खूप दिवसांनी खाल्ली ना.. त्यामुळे ठसका लागला... आता ठीक आहे. तुम्ही खा तोपर्यंत...." अबिर 

बाकीचे पैजा लावुन पाणीपुरी संपवत होते. अबिर एकटाच खुर्चीवर बाजूला बसला होता. त्यांना सगळ्यांना खाताना बघुन त्याला मजा वाटत होती. अस कधी त्याच्या वाट्याला आलंच नव्हतं. अंजुच्या ते लक्षात आलं की तो एकटाच बसलाय. तिने दोन प्लेट मध्ये शेवपुरी तयार करून घेतली आणि ती त्याच्याजवळ आली. 

" घ्या सर.... आता सावकाश खा...... " अंजुने एक प्लेट पुढे केली. त्यावर तो फक्त हसला आणि ती प्लेट घेऊन हळुहळु खाऊ लागला.  ती ही तिथेच त्याच्या बाजूला बसून खात होती.. एव्हाना बाकीच्यांनी जवळजवळ वीसेक पाणीपुरी रिचवल्या होत्या. सीमाचं तर एक प्लेट मध्ये पोट भरलं. 

" जीवाला खात जा जरा बारके...... "  यश 

" खाते मी....." सीमा 

" हो.. ते दिसतच आहे न..... " राकेश 

सीमा मग त्याला मारायला धावली. यश पण मध्ये मध्ये तिला चिडवत होता. तिघांची नुसती पळापळ चालू होती. अंजुने प्लेट मध्ये आणुन दिल्याने अबिर आरामात बसून खात होता. शेवटची पुरी खाताना मात्र ती तुटली आणि त्याच्या शर्टवर पाणी सांडलं. 

" अरे काय....? लक्ष कुठाय तुझं.....??? " अंजुने बाटलीतलं थोडं पाणी घेतलं आणि त्याच्या शर्टाला लावू लागली. मितूचं तिच्याकडे लक्ष गेलं तशी ती रागाने अंजूकडे पाहू लागली. ' ही जरा जास्तच पुढे पुढे करतेय का अबिरच्या...? ' तिला उगीचच वाटून गेलं. पण अबिर तर  नुसताच तिच्याकडे बघत होता. काय बोलावं त्याला काही कळेचना. 

" थँक्स........ " त्याने रुमालाने पाणी टिपलं आणि प्लेट ठेवायला तो उठला. 

" किती झाले......??? " अबिरने पाकीट काढता काढता विचारलं. 

" अरे पण पार्टी माझ्याकडून आहे... मी देणार पैसे...." मितू 

" तू नंतर दे कधीतरी.. ही माझ्या जॉइनिंगची पार्टी असं समजा.... " त्याने मग तिचं काही न ऐकता भैय्याला पैसे दिले. 

"  अरे पण......??? " मितुला त्याने पुढे बोलुच दिलं नाही. 

" चलो... आम्ही निघतो. " राकेश  , यश निघुन गेले. उशीर झाला होता म्हणुन मितू सीमाला सोडायला तिच्या घरी गेली. अंजु आणि अबिर पण निघाले. 

" थँक्स.... मगाशी जोरात ठसका लागला मला. सवय नाही मला इतकं तिखट खायची.... " अबिर 

" थँक्स कशाला... तुझ्या तोंडावरून दिसतच तूझ्याच्याने काय तिखट झेपणार नाही... " अंजु हसली.

" ए तू मला चिडवू नको हा उगीच.....  " अबिर रागावला.

" मगाशी दुसऱ्या कोणाकडे पाणी नसणार माहीत होतं मला. म्हणुन दिलं... कळलं ना. थँक्स नको... " ती आपल्याच अटीट्युड मध्ये निघुन गेली. अबिर दोन क्षण पाहतच राहिला. फ्रेंडशिप झाली असली तरी लवंगी मिरचीचा ठसका तसाच होता...!! अबिर पण तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत निघुन गेला. 

........................... 

अबिर घरी आला. आज त्याला खूप छान वाटत होतं. एकतर आज प्रेझेंटेशन बऱ्यापैकी पूर्ण झालं होतं नि दुसरं म्हणजे अंजु आणि त्याच्या मधील गैरसमज मिटले होते. काम करणाऱ्या मावशी जेवण करून निघुन गेल्या होत्या. तो फ्रेश होऊन आला तोच त्याचा फोन वाजला. 

" बोला मॅडम.... खूप दिवसांनी आठवण झाली आमची... " अबिर 

" तुला होत नाही ना म्हणुन मला येते.... तू तरी करतोस का फोन...? राग कोणाचा नि शिक्षा कोणाला.... " ती म्हणाली.

" असं काहीही नाही. तुला पण चांगलं माहितेय मी इथे का आलोय ते. उगीच का तुम्ही इशू करता या गोष्टींचा.....तेच मला कळत नाही. तिने सांगितलं का तुला फोन करायला....?? " अबिरने जरा रागावून विचारलं. 

" नाही हा. मला कोणी सांगितलं नाही. माझा मीच फोन केलाय. कसा आहेस तू...?? कसं चाललंय ऑफिस....?? "  ती 

" छान चाललंय. नवीन मित्र मैत्रिणी मिळालेत. खूप मस्त वाटतय. इतक्या दिवसात अनुभवता आले नसतील असे क्षण अनुभवतोय.... " अबिर हसला.

" बाप रे.... अरे किती फिल्मी बोलायला लागलायस...!! प्रेमात वगरे पडलास की काय कोणाच्या....?? " तिने विचारलं. 

" छे.. काहीही काय..मी किती फोक्स्ड आहे तुला चांगलं माहितेय. नि माझ्या गोष्टी साध्य होईपर्यंत मी सगळ्यांशी प्रेमानेच वागतो. पण नंतर काय ते u know better... "  तो मोठ्याने हसला. 

" म्हणुन तर भीती वाटते मला तुझी कधीकधी. तुला हवं ते मिळवण्यासाठी तू वाट्टेल त्या थराला जाशील.... तुझी जिद्द असली तरी त्यात हट्टीपणा पण आहेच..." ती 

" हमम.... फक्त थोडे दिवस. एकदा का माझं काम झालं की मी पुन्हा मुंबईत येईन. इथे राहायचंय कोणाला...?? त्या फालतू स्टाफ सोबत अगदी प्रेमाने , आपुलकीने बोलावं लागत मला उगीचच.... इतका राग येतो ना कधी कधी.... " अबिर 

" चिल डिअर. स्वतःवर कंट्रोल ठेव जरा. नि तुझं काम लवकर पूर्ण करून ये. मी वाट बघतेय तुझी... मिस यु सो मच.... " ती म्हणाली 

" मिस यु टू डिअर..... " त्याने फोन कट केला. मावशींनी तयार केलेलं सलाड त्यानं खाल्लं आणि तोदेखील झोपी गेला.

........................................

अंजु घरी आली तेव्हाच तिचा फुललेला चेहरा बघुन सगळ्यांना वाटलं की मॅडम आज खुश आहेत. 

" काय अंजलीबाई.... काय आज स्पेशल... " बाबांनी जेवताना विचारलंच.

" बाबा आम्ही आज खूप दिवसांनी सगळे एकत्र बाहेर गेलेलो. खूप मजा आली.. " अंजु उत्साहात सांगत होती. 

" हो का. छान . मग भूक आहे ना.. नाहीतर हे उरलेलं उद्या मला खावं लागेल... " बाबा हसून म्हणाले. 

" अहो काहीतरीच काय...? मी काय शिळं खायला देते का तुम्हाला... ? " आई आतून येत म्हणाली.

" अग गंमत केली मी. तसं पण तुझ्या हातचं मी काहीही खाऊ शकतो... " बाबा म्हणाले त्यावर आई लाजली. 

" बास झालं आता..... " आई बोलत असतानाच तिचं लक्ष अमेयकडे गेलं. तो मोबाईल मध्ये डोकं खुपसुन बसला होता. मीरा सोबत त्याच चॅटिंग चालू होतं. आईने सगळ्यांना शांत राहायला सांगितलं आणि हळूच ती अमेयच्या मागे जाऊ लागली. ते अंजुने पाहिलं आणि जोरात अमेयला पाय मारला. तो कळवळला. त्यात त्याचा हाताचा धक्का लागुन मोबाईल खाली पडला. 

" अंजु........ " तो ओरडलाच. तोच अंजुने त्याचा खाली पडलेला मोबाईल देत आई तुझ्याकडेच येत होती ते हळू आवाजात सांगितलं.  आई येऊन अमेयच्या बाजूला उभी राहिली.

" काय चाललंय तुझं....?? " आईने त्याच्याकडे रोखून बघत विचारलं. तसा तो भांबावला.

" कुठे काय... काही नाही.... " अमेय 

" किती वेळा सांगितलंय जेवताना मोबाईल घ्यायचा नाही म्हणुन... टीव्ही, मोबाईल दोन्ही बंद. लक्ष कसं असेल मग जेवणात...?? जेवण कुठे चाललंय बघा जरा.. " आई म्हणाली म्हणून त्याने पाहिलं तर भातात जास्त आमटी पडून ती पूर्ण ताटभर पसरली होती. त्यात गोड शिरा पण न्हाऊन निघाला होता. 

" सॉरी... ते ऑफीसच काम होतं सो बघत होतो.. " त्याने वेळ मारून नेली.

" आण इकडे तो मोबाईल. बंदच करून ठेवते. ऑफिसवाल्यांना पण उद्योग नाहीत का..? घरी तरी सुखाने जेवू द्या म्हण.... " रागवतच आई जेवायला बसली. 

अंजुने मग विषय बदलला. तिने पार्टीत काय काय मजा केली ते बाबांना सांगायला सांगितलं. मग काय बाबा सुरूच झाले. त्यांनी खूप धमाल केली सगळ्यांसोबत. त्यांचे किस्से ऐकून सगळे पोट धरून हसत होते. 

......................................

दुसऱ्या दिवशी अंजु ऑफिसला गेली तेव्हा सगळेच तिच्या टेबलजवळ जमा झाले होते. तिला काहीच कळेना. सर्वांना बाजूला करत ती आपल्या डेस्कजवळ गेली तेव्हा तिचा पीसी चालू असलेला तिला दिसला. आय टी डिपार्टमेंटचा एक माणुस तिच्या पीसीवर काहीतरी करत होता. मॅनेजर सर देखील आले होते. तिने अबिरकडे पाहिलं पण तो तर उदास बसला होता.

" काय झालंय सर....?? माझ्या पीसीवर काय करतायत  हे...?? " अंजुने विचारलं.

" मिस अंजली , तुम्ही तयार केलेलं प्रेझेंटेशन आणि टेंडरची फाईल दोन्ही गायब आहेत. " मॅनेजर सर म्हणाले आणि शॉक लागावा तशी अंजु मटकन खुर्चीवर बसली. 

क्रमशः.... 

आधीच्या भागात मी तुम्हा सगळ्यांवर रुसले होते असं म्हणायला हरकत नाही. पण तुम्ही दिलेल्या कमेंट्स वाचुन इतकी खुश झाले की काही विचारू नका. जशी आई आपल्या रागावलेल्या बाळाचा रुसवा काढते तसा तुम्ही सगळ्यांनी माझा गेलेला मूड परत आणलात. तुम्हा सगळ्या वाचकांना खूप खूप थॅंक्यु..!! असंच प्रेम कायम देत राहा. थॅंक्यु. पुढील भाग 13 जुलैला रात्री पोस्ट करेन. 

© ® सायली विवेक 

🎭 Series Post

View all