Oct 26, 2020
प्रेम

तू मुंबई मी पुणे भाग दोन

Read Later
तू मुंबई मी पुणे भाग दोन

तू मुंबई मी पुणे:- भाग 2

त्याला शांत बसलेलं पाहून तिने पुन्हा  विचारले "सांग ना! तुला मी का आवडले?"
तो हसला " डायरेक्ट प्रश्न आहे तुझा!
सांगतो..मला असं वाटलं की, मला ज्या स्वरूपामध्ये माझी बायको असली पाहिजे ती तुला पाहिल्यावर तुझ्यामध्ये भावली."
" तुला वाटत नाही का की तू हे मुलामा दिलेले शब्द वापरतो आहेस, या शब्दांना काही अर्थ नाही."
" का अर्थ नाही? प्रत्येकाची एक इमेज असते की आपली बायको अशी असावी, आपला नवरा असा असावा त्याप्रमाणे मी जो विचार केला तशी तू आहेस."
" तुला माझ्याबद्दल काय माहिती रे?"
" माहिती तर काही नाही. हां पण माहिती करून घ्यायला ही आवडेल आणि जसे कळेल तसे डिस्कस करायला ही आवडेल."
" तुला माहिती आहे मी मुंबई च्या पूर्ण  स्वतंत्र वातावरणात वाढलेली मुलगी आहे.मला वाटत नाही की मी पुण्यासारख्या ठिकाणी राहू शकेल."
" पुण्यासारखं ठिकाण म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? पुणे काय वाटते तुला?. "
" मला असं वाटत पुणे खूप संथ आहे म्हणजे मी त्या  'मुंबई पुणे मुंबई'  पिक्चरमधे पण पाहिले आहे की पुण्याबद्दल!
माझे फ्रेंड्स, नातेवाईक इथे राहतात. मी येते पण एक दिवसासाठी. आणि परत जाते. कायमस्वरूपी पुण्यात राहण्याचा मी विचारच करू शकत नाही."
" का तर तुला मुंबई च्या लोकल ची सवय आहे म्हणून?"
" फक्त लोकलच नाही तिथल्या फास्ट आयुष्याची!तिथल्या स्वतंत्र वातावरणाची, तिथल्या सगळ्या गोष्टींची. पुण्यात हे मिळेल की नाही मला माहित नाही."
" म्हणजे तुला काय हवंय? तुला फ्रीडम हवय, स्वतंत्रता हवीय, इंडिपेंडनसी हवीय? काय हवंय?"
" सगळंच! बहुतेक मला सगळंच हवंय."
" सगळंच हवंय म्हणजे?"
" मला माहिती नाही पण मला फ्रीडम हवा आहे कायमचा."
" तुला ते मिळणार नाही असं वाटतंय का?"
" कदाचित!"
" का तर तू आरेंज मॅरेज करते आहेस म्हणून?"
"हो असेलही हे कदाचित!"
" मग तू लव मॅरेज केलं असते आणि  मुलगा पुण्याचा असला असता तर तुला चालला असता का?."
 त्याने एकक्षण तिच्याकडे बघितलं आणि तिने काहीच उत्तर दिलं नाही आणि नजर फिरवली.
"मृणालिनी एक विचारू?"
" काय?"
" मला असं वाटत की तुझ्याकडे बराच काही सांगायला आहे तुझ्या भूतकाळाबद्दल, तुझी ईच्छा असेल तर मला ते ऐकायला आवडेल."
"अच्छा म्हणजे तुला भूतकाळ जाणून घ्यायचा आहे आणि त्यावरून तू काही ठरवणार आहेस का?"
"हे बघ हा ऑप्शन मी तुला स्वतःहून विचारतो आहे.तुझ्याकडे आहे काही सांगण्यासारखं तर तू जरूर सांग"
ती काहीच बोलली नाही. 
"मी तुला असे म्हणतच नाही आहे की त्यावरून मला काही इम्प्रेसशन्स बनवायचे आहेत. मला ते ऐकायला आवडेल कारण तुलाही ते सांगायला आवडेल."
"हो मला सांगायला नक्कीच आवडेल, मला असं वाटत की मला जर होकार कळवायचा असेल तर भूतकाळाबद्दल बोलायला नक्की आवडेल."
" तू सांग ना तुला सांगायला काहीच हरकत नाही आहे."
" पण मला अजून तुझ्यावरती विश्वास नाही आला सारंग की मी तुला सगळ्या गोष्टी सांगाव्यात."
"मृणालिनी आजच्या जगात आपण एकमेकांना भेटतो तरी आहोत. पूर्वीच्या  काळात अरेंज मॅरेज मध्ये चेहराही न पाहता लोक एकमेकांशी लग्न करायचे."
" तो काळ वेगळा होता सारंग, त्या वेळी गोष्टी वेगळ्या होत्या."
"स्वतंत्रता म्हणजे स्वतंत्र विचार ही
कॉन्सेप्ट आहे. म्हणून मला ही कन्सेप्ट फार पटते."
" ठीक आहे, तू तुझ्या पद्धतीने बोल जे तुला सांगायचे आहे ते. तू आज परत जाणार आहेस मुंबईला?"
" हो माझं मुंबईचे संध्याकाळचे रिजर्वेशन आहे."
"बरं, म्हणजे आपल्याकडे बोलण्याकरता वेळ आहे.
जसा ब्रेकफास्ट करतोय, तसा लंच आणि हाय टी पण करू शकतो आणि नंतर तुला मी स्टेशन वर सोडू शकेन."
तिने मान डोलावली. 
"सारंग, तुला अशी जागा माहिती आहे की जिथे जाऊन आपल्याला मस्त हवा खाता येईल."
" हो माहिती आहे.  तुझा ब्रेकफास्ट झालाय का नक्की?  कारण तू समोसा खाल्लाच नाहीस!"
" नाही मला कॉफी हवी होती ती मी घेतली आणि टोस्ट बटर पण घेतले."
तो म्हणाला" ओके, मग जायचं? तुला गाडीतून जाताना बोलायला आवडेल?"
"हो आवडेल!"
"ठीक आहे, आपण जाऊ या चल."
सारंग ने हॉटेल च बिल पे केलं आणि तो बाहेर आला आणि गाडीचे सेंट्रल लॉक ओपन करत गाडीत बसला.
ती अजूनही तिच्या विचारात होती. 
सारंग म्हणाला "मला एक अशी जागा माहिती आहे की जिथे जाऊन आपल्याला खूप शांत पणे बोलता येईल."
"चल, घेऊन चल तिथे".
ज्या पद्ध्तीने त्याने इतक्या ट्रॅफिक मध्ये गाडी वळवली त्यावरून तिला लक्षात आले की त्याला गाडी चालवायची खूप सवय आहे. त्याच्या नकळत ती परत त्याचे निरीक्षण करत होती, तो तिला खूप शांत वाटला.खूप आणि खूप डिसेंट होता तो, त्याच्याकडे कुठलीच अशी गोष्ट नव्हती की त्याला ज्यावरून नकार द्यावा.
मग तिला कळेना की तिचे मन तिला का खातेय, तिला काय त्रास होतोय?  
नक्की काय घडतंय, तिच्या मनामध्ये काय  चालले आहे?
 कारण त्या गोष्टींमुळे ती स्वतःच वैतागली होती. तिचा भूतकाळ तिला सोडत नव्हता आणि भविष्यात जाऊन देत नव्हता.
तिला कळेना की तिला मुंबई सोडायचे  नव्हते की पुण्यात यायचं नव्हते याचे उत्तर तिच्याकडेच नव्हते.

क्रमशः

©®अमित मेढेकर

Circle Image

Amit Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!