तू मुंबई मी पुणे:- (भाग 3)
कॅम्प मधून निघालेली गाडी हळू हळू हडपसर च्या रस्त्याने जायला लागली. इथे मगरपट्याला तिची एक मैत्रीण राहत असल्याने मागे एकदा ती आली होती. पण बदलत्या पुण्याकडे अचंभित होऊन तीचे बाहेर बघणं सुरू होतं. शेवटी हडपसर ही मागे गेले आणि तिने सारंगकडे पाहिलं. तो शांत होता, गाडी पुढे जात असताना ती पुण्यात झालेली प्रगती बघत होती. मांजरी गेलं आणि लोणीच्या रोडवरती गाडी लागली तेव्हा तिने विचारले " अजून बराच लांब आहे का?"
तो म्हणाला" नाही बस 10 मिनिटे."
लोणी गावात त्याने राईट टर्न घेतला आणि गावातून गाडी पुढे जायला लागली. गावही मागे पडले आणि तिला आजूबाजूला डोंगर दिसायला लागले,त्या डोंगरांच्या मधून जाताना ती स्वतःला हरखून बसली. पुण्याच्या जवळ इतकं काही छान आहे हा विचार तिला मनाला भावून गेला. झाडांनी आच्छादित डोंगर आणि बाजूला पसरलेली हिरवीगार शेतं पाहून तिचे मन प्रसन्न होत होते.
थोडासा वळणावळणाचा रस्ता पार करत ती गाडी एके ठिकाणी येऊन पोहचली. तिने बोर्ड पहिला, त्यावरती लिहिलं होतं " रामदरा".
तिला पाहताक्षणी ती जागा खूप छान वाटली, उजव्या बाजूला सुंदर तलाव होता त्या तलावामध्ये काही बदके पोहत होती. तिथेच एक मंदिर होत आणि त्या मंदिराच्या मागे छानशी जागा होती. तिथे पार्किंग मध्ये त्यांनी गाडी लावली तो म्हणाला " आपण गाडीमध्येही बोलू शकतो, मंदिराच्या पायरीवर पण बसू शकतो , तू पाण्यात पाय टाकून ही बसू शकतेस. किंवा तुला हवं असेल तर या टेकडीच्या मागे चढून जाऊन सुद्धा तू बोलू शकतेस. सगळं तुझ्या मर्जीने तुला काय हवंय तसे आपण करूयात!"
तिला पूर्ण शांततेत वाटले की आपण इथेच थांबावं, ती गाडीतून उतरली आणि मंदिराच्या त्या बाजूला गेली ज्या ठिकाणी तलावाचे पाणी होते पण मंदिर समोर होते. या ठिकाणी थोडी जागा होती तिथे पाय सोडून बसली, जीन्स थोडी वरती केली आणि पाण्यात पाय बुडवले. इतकं शांत पाणी त्यात फिरणारी ती बदके आणि त्यांची ती पोहण्याची एकसंगता छान वाटत होती.
बराच वेळ ती शांत बसली. नंतर एकदम लक्षात आलं की अरे, सारंग कुठेय, तो तिच्याच मागे तिची सगळी हावभाव अनुभवत होता. जस तिचे लक्ष गेलं तसं तो फक्त हसला. तिला एकदम लाजल्यासारखं झालं " किती वेळ मी अशी बसलीय रे?" तिने विचारले.
तो म्हणाला" 27 मिनिटे फक्त!"
" ओहहह! आय ऍम सो सॉरी सारंग! मी खूप दिवसाने हे अनुभवतेय आणि मला खूप शांत वाटतंय."
" अगं म्हणून तर मी तुला डिस्टर्ब नाही केलं! तुझी संध्याकाळी ट्रेन आहे पण आपल्याकडे वेळ आहे म्हणून मी तुला बसू दिल."
" सारंग मला तुला सांगायचं की लहानपणापासून मी खूप फ्रीडम अनुभवली आहे. मला माझी स्वतंत्रता खूप प्रिय आहे आणि लग्न म्हणजे मला एक बंधन वाटते......
तुला माहितीय माझ्यावर काही हिंदी सिनेमाचा काही पगडा वगैरे नाहीय. पण मला कायम वाटत की ज्याच्याशी माझं लग्न व्हावं त्याने मला ओळखावं. खर सांगायचं तर मला अरेंज मॅरेज मध्ये अजिबात रस नाही.
तो काहीच बोलला नाही......
मला तुला जे काही सांगायचं आहे तो माझा भूतकाळ आहे.
मी तिकडे कॉलेज मध्ये शिकत असताना माझे खूप आणि खूप प्रमाणामध्ये मित्र होते.
माझ्या फ्री स्वभावामुळे सगळेच माझ्या क्लोज होते पण माझा जो एक मित्र होता ना.....होताच म्हणेन कारण तो आता नाहीये तर त्यांच्यामध्ये मी गुंतले होते. आमची मानसिक गुंतवणूक होती आमची म्हणण्यापेक्षा माझीच म्हणली पाहिजे कारण ह्या गुंतवणुकीमध्ये मी स्वतःला पूर्ण हरवून बसले होते.
जवळजवळ अडीच वर्षे तो माझ्या प्रचंड जवळ होता आणि त्यानंतर पुढच्या उच्च शिक्षणासाठी तो गेला आणि गेला तो कायमचाच.......
नुसते सांगून गेला होता की आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू पण तसे काही तो राहिला नाही. त्याच्या प्रायोरिटी वेगळ्या होत्या ना!....
आणि एक गंमत सांगू तो पुण्याचा होता."
सारंग हसून म्हणाला" अच्छा म्हणून तुला पुण्याच्या बाबतीत काही म्हणायचं नाही आहे किंवा इथे यायचं नाहीये."
"नाही असं काही नाही रे, पण एक असा अनुभव आल्याने असे वाटलं की आपण पुन्हा पुण्यात येतोय की काय. "
" तो पुण्याहून मुंबईला शिकायला आला त्यावेळी तुझी पुण्याला यायची तयारी होती पण आता तुला माझ्याबरोबर पुढे जाताना पुणे नको वाटतंय. कदाचित उपाय क्षणाला तू फक्त आणि फक्त पुण्याला यायचं नाही या विचाराने माझ्याबाबतीत काही निर्णय घेऊ शकत नाहीय."
त्याचे हे वाक्य ऐकून ती नि:शब्द झाली.
"पुढे काय झालं?" तो म्हणाला.
" पुढे काही नाही झालं, ते अडीच वर्षे जे मी गुंतले त्यातून बाहेर पडायला मला दीड वर्ष लागलं. खूप त्रास करून घेतला. नको नको ते विचार केले...... पण मी बाहेर पडले.
खरं सांगायचं तर मला त्यावेळेस एक सत्य कळल"
"काय?"
"हेच की माझे जे आयुष्य आहे ते सक्षमपणे घालवायचे. चिंता मुक्त, विना त्रासाचे आणि म्हणून मी मानसिक गुंतवणूक करायला घाबरते.
"तुला वाटते का मृणालिनी, लग्न केल्यावर तुझी मानसिक गुंतवणूक तुला त्रास देईल?"
"का नाही देणार? देईलच... जिथे मन गुंतले तिथे त्रास होईलच"
" लग्न या नात्याचा बेस खंबीर असतो आणि आपल्या वागण्याने आपण अजून भक्कम बनवायचा असतो"
"सारंग, तुझा लग्नपद्धती वर विश्वास आहे?"
"पूर्णपणे"
ती उदास हसली....
"इथे जेवण मिळेल?"
"आं?...आं .....हो...आपलं नाही.....! तिच्या अचानक प्रश्नाने गोंधळून जात तो म्हणाला.
"मला भूक लागली आहे"
"हो चल ना जाऊयात...."
"सारंग ही जागा सोडावशी नाही वाटत..इथेच काही मिळेल का?"
तो हसला....बघतो म्हणत पार्किंग मध्ये गेला.
तिथे एक बाई भेळ आणि चहा विकत होती.
"ताई...इथे जेवणाची सोय होईल का हो?"
"इथे तर नाय बा... भेळ आणि चहा देऊ का"
"तुम्ही कुठे राहता.. म्हणजे तुमचे घर जवळ असेल तर आम्हाला तिथून काही मिळेल का?"
"म्या फुरसुंगी गावात राहते दादा, तुम्हाला माझा डबा देऊ का? त्यात आहे जेवण"
"पण तुम्ही काय खाणार?"
"माझी काळजी नको. म्या बघते माझे....देऊ का"
"पैसे घेणार असेल तर द्या"
"घरच्या डब्याचे कोणी पैसे घेते का दादा?"
"मग राहुद्यात..."
"अच्छा बरं, 11 रुपये द्या..."
"11?"
"व्हय"
सारंगने 11 रुपये काढून दिले आणि तिचा डबा घेतला. चार पुड्याचा डबा जड होता. बरोबर दुकानातून वर्तमान पत्र घेतले आणि त्या बाईला धन्यवाद म्हणून तो मृणालिनी पाशी आला.
"झाली सोय?"
"येस!" जग जिंकल्याच्या आविर्भावात तो म्हणाला.
तिने पेपर पसरला आणि त्यात डबा ठेवला.
डब्यात भाकरी, ठेचा, झुणका, वांगे भरीत, तिखट कांदा भात आणि तुरीच्या शेंगा होत्या.
"wow" हे सगळे पाहून ती म्हणाली.
दोघेही एकाच डब्यातून चवीने जेवायला लागले...
खाता खाता तिने विचारले, "तुला मुंबईला शिफ्ट व्हायला आवडेल का सारंग?"
तिच्या प्रश्नाने त्याला एकदम जोराचा ठसका लागला!
क्रमशः:-
©®अमित मेढेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा