Oct 26, 2020
प्रेम

तू मुंबई मी पुणे भाग सहा

Read Later
तू मुंबई मी पुणे भाग सहा

तू मुंबई मी पुणे :- (भाग 6)

गाडीत पूर्ण वेळ मृणालिनी त्याच्याच विचारात होती आणि आजचा दिवस आठवत होती. कोणते स्टेशन आले, कोणते गेले हे तिच्या गावीही नव्हते ती फक्त आजच्या दिवसाची पूर्ण नवलाई साठवून ठेवत होती.
शेवटी बाजूचे बरेच लोक उठले तेव्हा तिने पाहिले तर माटुंगा स्टेशन चालले होते. 
ती पण पटकन उठली. दादरला उतरून तिने वेस्टर्न ला जाऊन  'बोरिवली स्लो' लोकल मध्ये बसली. 
परत तिचे विचार सुरूच होते.
घरी पोचायला जवळ जवळ 10 वाजले.
दादर ला उतरल्यावर तिने आईला कळवलं होते की मी येतेच आहे म्हणून. 
आईने दार उघडल्यावर विचारले" कसा गेला दिवस?"
तिच्या चेहऱ्यावरची एक्स्प्रेशन इतकी मस्त होती ती म्हणाली" खूप छान! अमेझिंग! बाकी उद्या बोलते" अस म्हणून ती तिच्या रूम मध्ये फ्रेश व्हायला गेली....
 आईने बाहेरून विचारले की जेवणार आहेस का?
तिला ऐकू पण नाही गेले. 
तिच्या डोक्यात सुरू होते की, त्याला परत मेसेज करावा का?
 तो झोपला असेल का?....
आपण आततायीपणा करतोय हे तिला कळत होते. 
 त्याला आपण सांगितले आहे की उद्या फोन करतो तर उद्या पर्यंत वाट पाहिली पाहिजे ना!
गुड नाईट चा मेसेज करणे योग्य आहे की नाही? हेच प्रश्न तिच्या मनात येत होते......
शेवटी तिने फोन घेतला आणि सारंग चे whats app पाहिले.  त्यात त्याचे लास्ट सिन 3 मिनिटे आधी येत होते.
चला म्हणजे जागा तर आहे, बोलायचं का? 
परत तिचे मन तिला म्हणाले,  आपण का हे करतोय? थोडा पेशन्स का नाही ठेऊ शकत आहे? 
जाऊदे... दिल की सुनो असे म्हणून तिने मेसेज लिहायला घेतला आणि  लिहिलेले प erase करून टाकले.
 आपण उद्यापर्यंत थांबावे आणि मोबाईल बाजूला ठेवला. 
आईने बाहेरून विचारले "जेवायचं का काही?
 तर हिने "नाही , गुड नाईट " असे आतूनच सांगितले. 
आज कसे पोट भरलं हेच कळत नव्हतं.
 2 मिंनटाने पुन्हा मोबाईल हातात घेतला, यावेळी तो ऑनलाइन दिसला.
"काय करू, करू का मेसेज का नको?"
पुन्हा तिने टाइप करायला घेतले " HI Sarang"  पण सेंड नाही केला.
 तिला कळेना काय चाललंय .....मनात किती हुरहूर होती.
शेवटी तिने ठरवले की नेट बंद करावे न मग टाइप करावे.

तिने नेट बंद केले आणि टाईप करायला सुरवात केली " Hi सारंग! It was wonderful day with you!
आजच्या दिवसातील प्रत्येक मोमेंट मला आठवत आहे आणि माझ्यासाठी तो मेमोरबल असेल. thank you so much for your courteous behaviour. Many Thanks!

तिने नेट बंद केल्याने मेसेज गेला नाही तिने मोबाईल बाजूला ठेऊन  डोक्यावरून पांघरूण घेतले.
आता तिला स्वस्थ झोप लागली. 
पहाटे 5.30 ला तिला जाग आली तेव्हा तिला कळले की सारंग चा मेसेज तिला येऊन गेलाय.
नेट बंद केलं तरी त्याला मेसेज कसा गेला आणि त्याचा कसा आला हे तिला कळेना.
नंतर मग तिची ट्यूब पेटली,  घरचा wifi सुरू झाले होते.  तिचे वायफाय नोटिफिकेशन ऑन च होते. रात्री बाबांनी उशिरा सवयीप्रमाणे वायफाय लावले असणार आणि त्यामुळे तिचा मेसेज गेला  होता.
त्याचा मेसेज आला होता, "hey thanks, खूप छान वाटलं मला. तुझ्या बरोबर माझाही वेळ कसा गेला कळले नाही.
 thanks to you!" आणि खाली एक smiley होता.

त्याचा मेसेज पाहून ती जाम खुश झाली तिची झोप कुठल्या कुठे उडाली. 
आता कुठे झोप येणार? त्याला फोन कधी करावा या विचारात ती होती. सकाळी इतक्या लवकर तर फोन करता येणार नव्हता मग तिने ठरवले "आपण संध्याकाळी निवांत फोन करू तसाही आता त्याचे ऑफिस असेल.  ऑफिस मधून येताना फोन करावा."

 तिच मन त्याच्याकडे झुकत होत हे तिला कळत होते.  तिला लक्षात येत होतं की तो आपल्याला काहीच आणि काहीच करायला सांगत नाहीये आणि तरीही आपण त्याच्याकडे ओढले जातोय.
 आपल्या मनामध्ये पुण्याला जायचे नाही मुंबईत राहायचं हे विचार जे आहेत ते कधीपर्यंत चालणार आहेत? आणि यांच्याही पलीकडे जाऊन तिने विचार केला की तिला तीचे आयुष्य सेटल करायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 
 म्हणजेच काहीतरी निर्णय तिला घ्यायचाच आहे. 

सकाळी ब्रेकफास्ट टेबलावर आई आणि बाबाने विचारलं" कशी झाली पुण्याची ट्रिप?" 
"मस्त! पुणे बदलल आहे खूप."
" हो का ! आम्हाला माहितीच नव्हतं आम्ही कुठे जातो."
"  बाबा तुम्हीपण न! तुमची पुण्याची फेरी महिन्यातून दोन ते तीन वेळा असते."
बाबा जोरजोरात हसत म्हणाले,  "अग गम्मत ग तेवढीच. मग बाकी सगळं छान ना?"
ती म्हणाली "एकदम फर्स्ट क्लास मजेत."
बाबा गेल्यावर आईनं तिला विचारले " का ग काय झाले काल विशेष?"
" काही नाही झालं ग!  सांगेन तुला निवांत पणे जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा तुला सांगेन."
" म्हणजे आता काही विचारू नको असं अर्थ न त्याचा."
"बरोबर! आता काही विचारायचं नाही." असे हसत म्हणत ती तिच्या रूम मध्ये गेली.
तिने पल्लवी ला फोन केला,
"Hi pallu"
"ओ ले माझी शोना, सकाळी सकाळी माझी आठवण तुला?'
"पल्लू, ऐक ना!"
"बोल ना"
"तू जीजू च्या प्रेमात पडलीस तेव्हा तुला काय वाटायचे ग?"
"म्हणजे"
"अगं म्हणजे कसे वाटायचे?"
"छान वाटायचे"
"बस, छान फक्त का अजून?"
"तू काय विचारतेस मृणा, मला नाही कळत आहे"
"पल्लू तुझे लव्ह मॅरेज ना, तुला प्रेमात पडल्यावर  कसे वाटायचे हे मला हवंय"
"जसे तुला आत्ता वाटतंय ना तसे अगदी"
"म्हणजे"
"नाव काय त्याचे?"
"सारंग"
"हा हा हा हा......"
"अगं म्हणजे असे काही नाही...मी आपली जस्ट विचारत आहे..."
"बच्चू, तुझी चोरी पकडली गेली आहे. तुझी बेस्ट फ्रेंड आहे मी. मला कळते की तुझ्या मनात काय चालू आहे ते"
"हे बघ पल्लू, असे काही नाही आहे...मी फक्त जाणून घेत होते कीं काय वाटते आपल्याला नक्की?"
"खूप काही वाटते...सारखे भेटावसे वाटते, सारखे बोलावसे वाटते...त्याच्या आजूबाजूला असावे वाटते...आणि पण खूप वाटत असते"
"थँक्स पल्लू...मी नंतर बोलते" असे म्हणून तिने फोन ठेवला सुद्धा.
दिवस तिच्या दृष्टीने अगदी हळू हळू चालला होता...
शेवटी न राहून तिने दुपारी 4 वाजता सारंग ला फोन केला.
"हाय" तिकडून आवाज आला.
"हाय सारंग" एकदम उत्तेजित होऊन ती बोलली.
"मी तुला 6.30 फोन केला तर चालेल का, माझी एक प्रेझेन्टेशन मिटिंग आहे आत्ता"
"ओहह येस....मी वाट पाहीन" ती म्हणाली.
"थँक्स" म्हणून त्याने फोन ठेवला
ओहह गॉश! मी वाट पाहीन असे म्हणायची काय गरज होती तुला, किती उतावळेपणा... ती स्वतःलाच ओरडायला लागली. मग स्वतःवर हसून 6.30 ची वाट पाहत बसली. 
बरोबर 6.30 वाजता फोन हातात घेऊन ती फोन कडे पाहत बसली. ...
पावणे सात झाले तरी त्याचा फोन आला नाही.
एकदम अपसेट होत ती स्वतःवर वैतागली... त्याला नाही पडली आपली तर आपण का एवढी वाट पाहतोय त्याची...जाऊदे त्याला! असा विचार करत असताना फोन वाजला, तिने बघितले तर हरिश तिचा मित्र त्याचा फोन होता. 
तिने फोन उचलला आणि एकदम संथ आवाजात म्हणाली, हां हरीश काही काम होते ?"
"अगं या रविवारी म्युझिक बँड ग्रुप येतोय  BKC ला...येणार का?"
"बघू... नक्की नाही"
"पण तुला यात तर इंटरेस्ट खूप आहे ना...?"
"बघू...सांगते तुला" असे ती म्हणत असताना तिला फोन वेटिंग आला
तिने स्क्रिनवर बघितले तर 'सारंग'
धाडकन हरीश चा फोन कट करून तिने सारंग चा फोन उचलला.
"हॅलो..." अधीर पणाने ती म्हणाली
"Hi.. बिझी आहेस का?" सारंग चा शांत आवाज तिला ऐकू आला.
"नाही रे...सारखे फोन फोन...आज दिवसभर तर वैताग आलाय या फोन ने. एक मिनिटं पण वेळ नाही मिळाला मला..दिवसभर काम करत बसले होते...कुठेच दुसरीकडे लक्ष नाही गेले...." ती धाडकन बोलून गेली.
तो छानसं हसला...
ती पण इकडून हसली.."का हसलास तू? तुला काय वाटले मी खोटे सांगतेय का"
"नाही ग..तू का खोटे सांगशील..मला तुझ्या सांगण्याच्या पद्धतीचे हसू आले...
तिने जीभ चावली.. क्षणभर वाटले तिला की सांगावे याला की दिवसभर मी काहीच केले नाही फक्त तुझ्या फोनची वाट पाहिली, पण तिने आवरले.
"तुझा कसा गेला दिवस? आणि रविवारी येणार आहेस का?"
"दिवस खूप बिझी गेला..आणि तेच सांगायचे होते की जापनीज डेलीगेशन येणार आहे शनिवार आणि रविवार त्यामुळे रविवारी नाही जमणार ग"
"ओहहह...मला वाटले आपली भेट होईल म्हणून...."
"हम्मम्म्मम"
"मग आता?..."
"आता काय... काही नाही!"
"कधी भेटणार तू....?
"जमेल तेव्हा...!"
"सारंग तुला भेटावसे नाही वाटत का मला? तुला माहितीये का आज दिवसभर मी तुझ्या फोनची वाट पाहिली..माझे दुसरे कशातच लक्ष नाही लागले..माझा वेळ आज अजिबात गेला नाही प्रत्येक क्षणाला तुझ्याशी कधी बोलेल याची हुरहुर लागली होती...आणि तू म्हणतोस की रविवारी तुला जमत नाही..." खूप वैतागून ती बोलली.
"पण तू तर आत्ताच बोलली ना की तुला अजिबात वेळ मिळाला नाही...."
" ते मी मजेत बोलले...मला दाखवायचे नव्हते की मी तुझ्या फोनची वाट पाहत होते" ती कळवळून बोलली.
तो हसायला लागला...
"तू हसतोय सारंग...?" तिने चिडून विचारले
तो अजून जोरात हसायला लागला
"ठीक आहे मी फोन ठेवतेय" ती त्रासून म्हणाली
" अगं थांब थांब...! तुला काय वाटले की मजा फक्त तू करू शकतेस?"
"म्हणजे.."
"C4-27"
"हे काय..."
" रविवारच्या 'डेक्कन क्वीन' चा माझा रिझर्र्वेशन नंबर..."
"म्हणजे...म्हणजे..."
"म्हणजे मी येतोय या रविवारी...खास तुला भेटायला"
"आणि ते जापनीज डेलीगेशन..?"
"ती माझी मज्जा..."
"किती दुष्ट आहेस तू सारंग..."
"अजून..."
"पापी...निर्दयी.."
"अजून"
"अजून काही नाही...लवकर ये मी वाट पाहतेय" ती हसत म्हणाली.
"At your service madam"
ती खळखळून हसली.
"तू मला दादर ला न्यायला येशील ना, तुझी गाडी घेऊन?"
"म्हणजे काय... नक्की!"
"मग भेटुयात रविवारी, बाय"
 तिने सुद्धा "बाय" म्हणून फोन ठेवला.
फोन ठेवल्यावर तिने जोरजोरात बेडवर उडया मारल्या आणि मोठमोठ्याने 'येस येस' असे ओरडली.
त्या जोरजोरात उड्या मारत असताना बेड बरोबर मध्यभागी तुटला आणि तिची उडी तुटलेल्या बेड वर बसली.
आई त्या आवाजाने धावतपळत हिच्या रुम मध्ये आली तर बेड तुटलेला आणि ही बरोबर बेडच्या मध्यभागी पडलेली....आणि जोरात हसत होती.
"अगं अगं काय झालं ...?"
"हर्षवायू"
"म्हणजे?"
"म्हणजे की नवीन बेड येईस्तोवर मी तुझ्या बरोबर तुझ्या रूम मध्ये तुझ्या बेड वर झोपणार आहेत आणि बाबा सोफ्यावर"
आईने कपाळाला हात लावलेला पाहून तिचे हसणे अजून 7 पटीने वाढले...रविवारचा हर्षवायू सगळ्या रूम मध्ये पसरला होता!

क्रमशः
©®अमित मेढेकर

Circle Image

Amit Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!