तू मुंबई मी पुणे भाग सात

Sarang decides to go to Mumbai to meet Mrunalini and thinks to give her time to speak . Let's find out what happens next

तू मुंबई मी पुणे (भाग 7):-

"साहेब आज रविवारी तुम्ही? एरवी तर रविवारी कधी येत नाही?"
"अहो, आज पर्सनल कामाकरता चाललोय ना म्हणून."
"तरीच म्हणले नेहमी साहेब  विकडेज मध्ये येतात आज रविवारी चक्कचक्क."
"काय म्हणता तुम्ही कसे आहेत?"
"मी मजेत! आमचं काय सकाळी डेक्कन क्वीन संध्याकाळी डेक्कन क्वीन, सगळं आयुष्य आमचं रेल्वेच्या ट्रॅक वरती."
"खरंय खरंय, ती पण मजा वेगळी! तोही आनंद वेगळा. तुम्ही आहेत म्हणून आम्हाला परत परत डेक्कन क्वीनला यावेस वाटत."
"तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट चेअर कार मध्ये घेणार की येताय पॅन्ट्री ला?"
"येतो ना! पॅन्ट्री ला, 10-15 मिनिटांनी येतो. लोणावळा सुटला की पूर्ण घाटामध्ये आपण पॅन्ट्रीत बसू , तोपर्यंत तुम्ही पण तुमच्या ईतर ऑर्डर घेऊन ठेवा."
"नक्की साहेब!"
चेअर कारच्या चा अटेंडन्ट शी बोलून सारंग लोणावळ्याची वाट पाहत बसला. बरोबर 8.10 ला लोणावळा सोडलं गाडीने आणि हा  पॅन्ट्री कार मध्ये गेला. पॅन्ट्री ही त्याची सगळ्यात आवडती जागा.  गरम गरम ऑम्लेट,चीजटोस्ट, कटलेट,साबुदाणा वडा, बटाटावडा अश्या अनेक गोष्टी त्याला मिळायच्या.
सारंग पहिल्यापासून तसा फुडी, पण त्याला काहीकाही गोष्टी ठराविक ठिकाणच्या आवडायच्या. त्यात त्याचा आवडता कट्टा म्हणजे डेक्कन क्वीन.
ऑफिस च्या कामाने अनेक वेळा मुंबई ला जायचे काम पडत असे पण  हा पठ्या कधीही कार ने जात नसे.
सकाळी डेक्कन क्वीन संध्याकाळी डेक्कन क्वीन.
ऑफिस चेअर कार चे तिकिट काढून दयायचे आणि हा मस्त 3 तासात मुंबई ला पोहचायचा.
आज पण तीच स्थिती होती पण आज ऑफिस च्या नाही तर स्वतःच्या कामाने निघाला होता.
काय बोलायचे काय नाही हे त्याने मनाशी काहीच ठरवले नव्हते, तिचा रिस्पॉन्स पाहून उत्तरे द्यायची इतकेच त्याच्या मनात होते. खंडाळ्याच्या घाटात मस्त हवा होती बाजूला हिरवेगार डोंगर कुठेतरी खळाळणारे पाणी आणि त्यातून आवाज करत निघालेली ही दक्खनची राणी.
त्याने चीझ ऑम्लेट चा तुकडा तोंडात टाकला तेवढ्यात त्याचा नेहमीच अटेंडन्ट म्हणाला "साहेब परत याच गाडीला आहेत का रात्री?"
"येतानाचे रिजरवेशन नाही काढलाय पण जागा मिळेल का संध्याकाळी?"
"अहो साहेब बिनधास्त या! आज रविवार आहे तुम्ही 5 ला जरी आलात डायरेक्ट CST ला तरी तुमच्यासाठी पण जागा ठेवतो.
आणि आपली पॅन्ट्री तर आहेच आहे.
तुम्हाला जर वाटलं की तुमचे काम होतंय तर तुम्ही या मी बघतो."
"थँक्स दादा! "
दख्खनच्या राणी जोरजोरात मुंबईच्या दिशेने धावत होती.
आज कधी नव्हे ते त्याला ते ' खिचे मुझे तेरी और तेरी और' हे गाणं आठवत होत.
का हे माहीत नाही पण त्याच्याही मनामध्ये एक ओढ निर्माण झाली होती. कदाचित आज आपण असे मुंबईला पहिल्यांदाच कामाव्यतिरिक्त भेटायला जातोय आणि म्हणून भेटण्याची ओढ जबरदस्त होती.
10.10 ला दक्खनची राणी प्लॅटफॉर्म नंबर 6 ला आली. हा दादर ला उतरला आणि समोर स्वागत करायला मृणालिनी होती. मस्त गोगो गॉगल घातलेला छान T शर्ट आणि जीन्स असे तीच रूप होत. हलकासा मेकअप होता आणि चेहऱ्यावर प्रचंड उत्साह आणि पोसिटिव्ह smile होती.
तो जसा उतरला तसे ती म्हणाली " Hi  and welcome to आमची Mumbai!"
"Thank You madam!"
"मग कसा झाला प्रवास?"
"सुपरफास्ट! जबरदस्त!"
ती हसली, " चल गाडी तिकडे लावली आहे तिकडेच जाऊयात."
"तू तुझे प्लॅटफॉर्म तिकीट काढलंय का ग?"
"हो, त्याशिवाय मी प्लॅटफॉर्मवर कशी येईन! का रे?"
"नाही ग जस्ट विचारले... नाहीतर दंड होतो ना म्हणून"  तो हसत म्हणाला.
"कळते मला ते"
"मलाच नव्हते कळले" तो हलकेच पुटपुटला.
"आं... काय म्हणालास?"
"तू कधी आलीस?"
"मी बरोबर 9.45 ला पोहचले."
"ओह छान! बोरिवली पासून दादर ला पोचायला किती वेळ लागला सकाळी?"
"अरे आज ट्रॅफिक नाही लागला सकाळी. बरोबर 45 मिनिटात आले. "
"अरे वा छान! मग आजचा दिवस तुमचा मॅडम. तुम्ही निर्णय घ्या आणि आम्ही तुम्ही नेणार तिथे जाणार!  कुठे नेणार आहात मॅडम?"
"अरे चलीये तो जनाब! आप आये हमारे मुंबई मे।
बरं तू काही खाल्लं आहेस की खाणार आहेस?"
"आतातरी काही खायला नकोय. जाऊ यात जिकडे जायचे आहे तिकडे. "
"तू संध्याकाळचे काही रिजर्वेशन केलले आहेस?"
"नाही अजून नाही केलं, पण बघू यात कसे होत ते."
"नाही ना केलास न,बघू आपण ते."
तिने सेन्टर लॉक ने गाडीच दार ओपन केले आणि ती आत बसली.
"अरे वाह, पार्किंग मध्ये पार्क केली का गाडी"
"सारंग, अरे गाडी स्टेशन पार्किंग मध्येच करावी लागणार. अजून कुठे करायची"
"गंमत ग, काही काही जण कुठेही वर करतात म्हणून विचारले" आणि हसत हसत बाहेर पाहायला लागला.
त्याला घेऊन मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये शिरली. तिचाही गाडी वरचा हात पाहून तो खुश होता,
तिने गाडी टिळक ब्रिज वरून वेस्टर्न साईड ला गाडी नेली आणि पुढे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे च्या दिशेने निघाली."
"घरी वगैरे नेत नाही आहेस ना मला?"
"नाही रे, हा रोड फक्त बोरीवलीलाच जातो का? इथे बऱ्याच गोष्टी आहेत. "
"हो हो तर."
बांद्रा, अंधेरी, कांदिवली करत गाडी संजय गांधी नॅशनल पार्क ला आली.
तिने गाडीचे आणि त्या दोघांचे तिकीट काढले.
गाडी आत नेत असताना सारंग ती ग्रीनरी पाहत होता.
एक रोड पार्क ला तर एक कान्हेरी गुफा ला जात होता.
ती त्याला कान्हेरी side ने घेऊन गेली.
केव्हज च्या बाजूने तिने गाडी वळवून तुलसी लेक च्या दिशेने गाडी नेली.
लेकच्या थोडेसे आधी एक पायवाट जात होती तिथे तिने बिनधास्त गाडी आत टाकली आणि शेवटच्या पॉईंट पर्यंत गाडी नेऊन पार्क केली.
"आलो आपण"
"काय भारी स्पॉट आहे ग"
"अरे आमच्या कॉलेजचा ग्रुप कायम इथे यायचा"
"छानच"
तिने आतून एक चटई काढली तिथे खाली मोकळी जागा पाहून अंथरली.
आतून एक डबा, पाण्याची दोन बॉटल्स आणि एक थर्मास काढला.
खाली चटई वर पेपर अंथरून त्यावर हे सगळे ठेवले.
सारंग सगळे शांतपणे बघत उभा होता.
"बस ना सारंग"
"सॉलिड तयारी केली आहे तू" तो बसत म्हणाला.
ती फक्त हसली.
"आज खास मी बनवले आहे तुझ्यासाठी"
"जबरदस्त.  मी लकीचं म्हणायचं म्हणजे स्वतःला"
"आता इकडे यायचे म्हणजे एवढी तयारी लागणारच"
"येस ऑफकोर्स"
"कसे गेले तुझे हे 3-4 दिवस"
"अगं, तीन चार दिवस कामाचा लोड जास्त होता, त्यामुळे नेहमी चे रुटीन"
"अजून..."
"अजून काय?"
"माझी आठवण आली....?"
"नाही...आठवण का यावी?"
"कारण मला आली...मला त्या दिवसाची आठवण खूप वेळा आली. त्या दिवशीचे आपले बोलणे, ती जागा आणि आपण घालवलेला वेळ सगळे आठवले"
"का?"
"का म्हणजे....माझा तो अनुभव खूप वेगळा होता"
"हम्मम"
"तुला आज मुंबईला येताना काही एक्ससाईटमेंट होती का रे?"
येस..."
"आता मी विचारू ....का होती?"
"अं...मी असे पहिल्यांदा भेटतोय..आणि आतून छान वाटतंय"
"Exactly...माझे हेच फिलिंग होते सारंग"
"काय असते ग नक्की फिलिंग..?"
"काहीतरी वेगळे वाटत असते ना...हे असते फिलिंग"
"मुंबईहून पुण्याला यायचे नाही हे पण फिलिंग च असते ना..."
"..............."
"एक पुण्याचा मुलगा सोडून गेला म्हणून पुण्यातील मुलांना पसंद नाही करायचे हे असते का फिलिंग?"
"..........."
"काही बाबतीत पूर्व ग्रह असणे हे असते का फिलिंग....?"
"सारंग....!"
"सॉरी मृणालिनी.... पण माझ्या कन्सेप्ट खूप क्लियर आहेत आणि म्हणून मला काय करायचे हे माहिती आहे"
"मला पण माहिती आहे सारंग की मला काय करायचे आहे....."
"असेलही, पण मला अजून नाही कळले किंवा तू माझ्यापर्यंत नाही पोहचवले."
"म्हणूनच आज तुला खास बोलावून घेतलंय सारंग.."
"हा विचार करूनच वेळेचे बंधन नको म्हणून मी जातानाचे बुकिंग नाही केले"
...…....
थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही....
"मला तुझ्याशी खूप बोलावेसे वाटतंय सारंग!
"माझे कान तुझे बोलणे ऐकण्यासाठीच आहे..."
.......
"सारंग, मी पुण्याला येताना खूप फर्म होते की मला पुण्यात यायचे नाही. घरच्यांना वाटावे अशी एक फॉर्मलिटी म्हणून तुला भेटायला आले. पण मी आले आणि तुझ्या वागण्याने, बोलण्याने तुझ्या शांत स्वभावाने एकदम भारावून गेले.
मी मुलांचे स्वभाव पाहिलेत सारंग, पण तू वेगळा भासलास आणि खरं सांगते तुझ्या या वेगळेपणाचे मला आकर्षण वाटले.
......तो शांतपणे ऐकत होता.
"मी मुंबईला आले आणि मनाने पुण्यातच राहीले. राहून राहून मला तो दिवस आठवतो आणि तू सुद्धा!"
तो गोड हसला....
"तू बोल ना काहीतरी सारंग.."
"बोलतो ना...त्या दिवशी तू मला विचारलेस की मला तुझ्यात काय आवडले?'' आज मी विचारतो, तुला माझ्यात काही आवडले का?"
"खूप काही"
"मग त्याच खूप काहीने मला सांग, "तू पुण्यात यायला तयार आहेस का?"
"चला काय आहे तुमच्याकडे मोबाईल-चेन-पाकीट-पर्स-पैसे पटकन बाहेर काढा..." एकदम आलेल्या आवाजाने ते दोघेही दचकले.
सारंग ने पाहिले तर 2 टपोरी माणसे हातात सुरा घेऊन त्यांच्याजवळ उभी होती.
मृणालिनी जोरात ओरडली...सारंग!
त्याने शांतपणे तिच्याकडे पाहिले, हातानेच ईशारा केला.
"ऐ हिरो चल पैसे काढ... का हाणू तुला"
"हाण"
"अं....?"
"हाण ना"
"असे का, थांब दाखवतो"....असे म्हणत त्यातला एक गुंड त्याच्या अंगावर धावून आला.
सारंग ने त्याचा हात पकडून जोरात पिरगळला आणि त्याच्या पोटात एक लाथ घातली.
दुसऱ्या माणसाला एक कमरेत लाथ आणि पाठीवर रट्टे हाणले.
दोघेही तसेच पळून गेले.
ते पळून गेल्यावर सारंग ने रुमाल काढला आणि चेहरा स्वच्छ पुसला.
मृणालिनी अजून शॉक मध्येच होती.
तो तिच्याकडे पाहून म्हणाला, "तुमचा कॉलेजचा कट्टा भारीच आहे की...एकदम हटके" आणि हसायला लागला.
"ओहहह.... असे कधीच नव्हते झाले इथे...मी खूप वर्षांनी आले पण असे काही घडेल असे वाटले नाही ..."
"इट्स ओके ग...पुणे काय मुंबई काय! एकटे मुलगा मुलगी पाहून लोक करतातच"
"चल आपण जाऊयात...."
"आणि एवढी तयारी केलेली आहेस त्याचे काय...?"
"ते गाडीत खाऊयात....चल"
ती घाबरली आहे हे लक्षात घेऊन तो काहीच बोलला नाही.
त्याने सामान उचलून आत ठेवले आणि गाडी स्वतः चालवायला घेतली.
तिथून ते निघाले आणि मेन हायवे ला आले तरी ती शांतच होती.
"मॅडम...कुठे घेऊ गाडी?"
"आं....कुठेही...आपले....ओबेरॉय मॉलला घे गोरेगाव ला"
त्याने GPS ऑन करून लोकेशन टाकले आणि त्याप्रमाणे गाडी चालवायला लागला....!

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all