Aug 18, 2022
प्रेम

तू मुंबई मी पुणे भाग एक

Read Later
तू मुंबई मी पुणे भाग एक

तू मुंबई-मी पुणे!
भाग-1

सकाळी धावपळ करून तिने लोकल पकडलीच.
तशी ती चर्चगेट फास्ट असल्यामुळे दादर ला थांबणार होतीच.
तीचे सतत लक्ष हातातल्या घड्याळाकडे चाललं होतं.
शेवटी दादरच्या 5 नंबरच्या वेस्टर्न साईड ला गाडीने बरोबर 6.40 ला लोकल थांबल्यावर ही उतरली आणि पळत पळत सेन्ट्रल लाईनच्या प्लॅटफॉर्म 4 ला येऊन थांबली, आणि तेवढ्यात announcement झालीच की गाडी पुढच्या 5 मिनिटांमध्ये मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म वर येत होती.
बोगी च्या नंबर इंडिकेटर प्रमाणे तिने स्वतःच्या बोगीच लोकेशन पाहिलं, D4 मध्ये जाऊन तिला बसायचं होत. खास विंडो सीट निवडली होती कारण खिडकीतून बाहेर बघताना ती तिच्या विचारांना आणि ज्या कामासाठी ती निघाली त्या कामाला वेळ देणार होती. एक मोठा हॉर्न देऊन गाडीचे इंजिन तिला येताना दिसलं, बरोबर वेळेप्रमाणे गाडी प्लॅटफॉर्म मध्ये शिरत होती. गाडी रिझर्व असल्याने डब्याला गर्दी नव्हती, ती आतमध्ये शिरली आणि तिच्या विंडो सीट वरती जाऊन बसली. तिच्या शेजारी कोणी नव्हतं, एक सीट बाजूला ठेऊन एक बाई पेपर वाचत बसली होती. हिने कानाला हेडफोन लावला आणि गाणं ऐकायला सुरवात केली निदान असे भासवले तरी. एक पुस्तक उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. इंग्लिश नोवेल होते. आपल्याच विचारात बसलेल्या तिला कळेना की आज ती चालली आहे ते योग्य की अयोग्य पण तरी तिला वाटलं की हे योग्य. आईला तिने काही सांगितलं नव्हते  फक्त पुण्याला जाऊन येते इतकेच सांगितले होते आणि रात्री परत येईन हे तिचे उत्तर होते. 
दादरला गाडीत बसल्यावर हेच विचार सुरू झाले की खरंच आपण नक्की काय करतोय. गाडी जोरजोरात धावत होती आणि त्याही पेक्षा तिच्या मनातील विचार पळत होते.
कल्याण, कर्जत, लोणावळा पार करता करता गाडी बरोबर 10 ला पुण्यात पोहचली. स्टेशन ला उतरल्यावर्ती ती सरळ बाहेर आली आणि तिने उबेर केली. वानवडी चा पत्ता होता. बरोबर त्या पत्त्याला जाऊन थांबली. तिथे जाऊन तिने फोन  केला,  समोर फोन उचलला गेला,
" हॅलो सारंग?"
समोरून आवाज आला"हो".
"मी मृणालिनी बोलते आहे. मी आलेय या पत्त्यावर! इथून पुढे कसे येऊ?"
"थांब, मी न्यायला येतो" तो म्हणाला.
तिने फोन कट केला आणि वाट पाहत बसली.
वानवडीच्या त्या जागेवर बराच ट्रॅफिक सूरु झाला होता, तिला कळेना की या वेळी आपण इथे नक्की काय करतोय पण तरीही  तिने ठरवलं की आपण आज आलोय तर सगळं करूनच जाऊयात जे करायचे ते.
एक मिनिटे मध्ये तिला आवाज आला" मृणालिनी" तिने बघितलं तर एकदम प्रसन्न चेहऱ्याने आकर्षक व्यक्तिमत्वाचा सारंग समोर उभा होता. त्याच्या डोळ्यावरचा रीमलेस चष्मा त्याला खुपच छान दिसत   होता.
तेवढ्याच हसत तो तिला हाय म्हणाला.
तिच्या नकळत ती पण" हाय" म्हणाली.
" चलायचं?" तो म्हणाला.
ती म्हणाली "हो".
त्याची कार होती, तो ड्रायव्हर सीट ला बसला त्याच्या बाजूला ती येऊन बसली तो म्हणाला" नक्की आपण बाहेरच भेटायचं?बाहेरच बोलायचंय?"
तिने ठामपणे "हो" म्हणाली.
गाडी निघाली आणि वानवडी च्या ट्रॅफिक मधून पार करत कॅम्प च्या दिशेने निघाली.
कॅम्प ला आल्यावर्ती त्याने एक छानसे रेस्टॉरंट च्या पार्किंग लॉट ला गाडी त्याने लावली.
आत रेस्टॉरंटमध्ये तिथे कुठेच गर्दी नव्हती.
एका टेबलावर ते दोघे जाऊन बसले.
जसा तो बसला तसे तिने त्याच्याकडे बघायला सुरवात केली तसे  तो ड्राईव्ह करत असताना सुद्धा ती त्याचे निरीक्षण करताच होती. पण समोर बसल्यावर्ती लक्षात आलं की हा खरोखरच हँडसम आहे.बोलण्यात शालीन आहे वागण्यात सभ्यता आहे आणि  अतिशय शांतपणे आपल्याशी बोलतोय.
"काय घेणार?" त्याने विचारले.
"पहिल्यांदा मला 2 कप  कडकडून गरम कॉफी हवी!"
त्याने कॉफी ची ऑर्डर केली सोबत सँडविच, टोस्ट बटर आणि समोसा ऑर्डर केले आणि डिस्टर्ब करू नये असे वेटर ला संगीतले.
वेटर ऑर्डर देऊन निघून गेल्यावर त्यांनी विषयाला हात नाही घातला. तो शांत बसून होता आणि ती शांतपणे चमच्याशी खेळत होती, त्याने दुसरा चमचा तिच्यापुढे सरकवला तशी ती खुदकन हसली.
ती म्हणाली " सारंग मला माहित आहे की काय बोलायचे पण सुरवात कुठून करू कळत नाहीय."
" तुला हवी तशी तुझ्या पद्धतीने सुरवात कर तो म्हणाला."
" नाही मला कळत आहे मला निर्णय तर घ्यायचा आहे पण मला आई आणि बाबाला न सांगता आणि तुझ्या घरी सुद्धा न कळू देता   तुला भेटायचं होत. मला काही तुझ्याशी बोलायचे आहे आणि  काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत."
"म्हणून तर मी आज सुट्टी घेऊन थांबलोय. तू सांग तुला काय बोलायचं आहे. जे तुला काय विचारायचं ते सांगायला मी तयार आहे."
"तूला मी का आवडले?" तिने पहिला प्रश्न खाडकन विचारला.
तो एक क्षण तिच्याकडे बघतच राहिला. त्याला काहीच उत्तर देता आले नाही आणि तो हसला आणि म्हणाला "प्रत्येक गोष्ट फार वेगळ्या पद्धतीने सांगायची सवय आहे माझी पण या प्रश्नाला माझीच विकेट उडाली."
" तू मला का आवडली कारण तुझं शिक्षण छान, तुझा परिवार छान, तुझं दिसणं छान आणि याहीपेक्षा मला वाटलं तुझा स्वभाव खूप छान असेल.
2 वेळा आपण फोनवर बोललो, एक वेळ विडिओ कॉल वर पण मला असं अस वाटलं की तुला प्रत्यक्ष भेटल्यावर अनुभव वेगळा असेल आणि तो तसाच ठरला."
"सारंग तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलंस की मी तुला का आवडले? हे तुझे बोलणे माझया प्रश्नाला अनुत्तरित ठेवण्यासारखे झाले."
तिच्या या बोलण्यावर तो परत शांत राहिला........

क्रमशः
©अमित मेढेकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Amitt Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!