तू मुंबई मी पुणे:-(भाग 5)
ती धावत पळत प्लॅटफॉर्म वरती गेली,प्लॅटफॉर्म वर जाऊन तिला गाडीचा इंडिकेटर बघून लक्षात आलं की गाडी आज अर्धा तास उशिरा जाणार आहे 5.55 ची गाडी 6.25 ला निघणार होती.
ते पाहुन तिला लक्षात की अरे अजून थोडा वेळ सारंग शी बोलत आला असते तर!
मग तिलाच तिच्याच विचारांचं नवल वाटलं.
असे कसे की सकाळी काहीतरी ठरवून आलेली मी, आज जाताना त्याच्या सहवासानंतर एकदम या विचारापर्यंत पोचते की अजून थोडा वेळ मिळाला तर त्याच्याशी आपल्याला बोलणं हवं होतं! त्याचा सहवास हवा होता,असे का?
मग तिला आठवलं की आज सकाळी किती सहजतेने त्याने तिला ब्रेकफास्ट ला नेलं, तिकडून तिच्या म्हणण्यानुसार एका शांत ठिकाणी नेलं नंतर मग कॉफी च्या रेस्टॉरंट ला.
ज्या ज्या ठिकाणी तिची ईच्छा होती तिथे तो तिला घेऊन गेला. स्वतःबद्दल बोलण्यापेक्षा तीचे बोलणं त्याने ऐकलं.
तिच्या मनात जे आहे ते काढायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याला जे जे विचारले त्याचीही त्याने अत्यंत शांतपणे उत्तरं दिली. मग डिसेंट म्हणजे अजून काय असते?
तो किती सभ्यतेने प्रत्येक क्षणाला वागला, कारमध्ये असताना चुकून आणि चुकूनही त्याचा हात पण नाही लागला.
तिथे गेल्यावरही 27 मिनिटे तो आपले डोळे उघडण्याची वाट पाहत होता खरंच तो काहीतरी वेगळा आहे हे तिला जाणवले होते.
आणि एकदम त्याच वेळी तिच्या नावाने मागून कोणीतरी हाक मारली आणि तिने वळून बघितले तर सारंग स्वतः होता .
"सारंग तू! तुला माहीत आहे मी तुझ्याबद्दलच विचार करत होते."
तो हसला.
"अग गंमत अशी झाली की बघ तुझा गॉगल राहिला होता. मी तिथेच गाडी लावली आणि धावतपळत आलो"
"थँक्स " ती म्हणाली आणि मनाशीच हसली जणू त्या विसरलेल्या गॉगल ला तिला थँक्स म्हणायचे होते.
"सारंग, खरं सांगू माझ्या मनामध्ये हाच विचार होता की अजून थोडा वेळ मिळाला असता आपल्याला बोलण्याकरिता तर बरं झालं असते."
"चला म्हणजे काहीतरी तर जुळतंय."
"पण तुला माझ्या गाडीचा बोगी नंबर कसा माहिती रे?"
"रामकृष्ण मधून निघताना तूच मोबाईल वर मोठ्याने मेसेज वाचलेला ना, D3-72"
ती छान हसली....
"अजून एक कॉफी चालेल सारंग?"
"नेकीं और पुछ पुछ?" त्याने हसत विचारले.
ते दोघे शेजारच्या कॉफी स्टॉल ला आले.
"पण सारंग आजचा दिवस खूप आणि खूप छान गेला. खूप दिवसानंतर त्या मुंबईच्या धकाधकीतून बाहेर पडता आले, छान ठिकाणी जात आलं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मला खूप आणि खूप मोकळे वाटलं."
"म्हणजे तू मान्य करतेय की मुंबई धकाधकीची आहे!"
"हो मी कधी नाही म्हंटलं, मुंबई धकाधकीची आहेच आहे. पण याचा अर्थ असा नाही की मला पुण्याला यायचं आहे."
"तो तुझा नंतरचा भाग! तुला मुंबईत राहायचे की पुण्यात यायचा हा तुझा नंतरचा प्रश्न."
"सारंग आपलं मुंबई पुणे काही संपणार नाही."
"आणि संपू ही नये कारण दोन्ही एवढ्या छान सिटी आहेत जवळजवळ आहेत त्यामुळे तू मुंबईची असू देत नि मी पुण्याचा आपण दोघेही मुंबई पुण्यावरून बोलत जाऊ."
ती परत हसली" मग आता काय?"
" आता काय! तुझा 3 साडेतीन तास प्रवास चालेल मी अर्ध्या तासात घरी जाईल आणि वाचत बसेल छानसे."
"तू मुंबईला येशील भेटायला?"
"येऊ का?"
"आलास तर छान!"
"कधी येऊ?"
"तुला कधी वेळ असतो?"
"फक्त रविवारी."
"मग तू आज फक्त माझ्यासाठी सुटी घेतलीस?"
"हे तर तुला पण माहीत आहे. "
"Thats so nice of you सारंग! एखाद्या रविवारी ये मुंबईला"
"तू मला उद्या फोन करणार आहेस."
"हो मी करणार तर नक्की आहे तो मी करेन च.
"ठीक आहे उद्याच्या फोन ला ठरवू दे की कधी भेटायचं."
"पण पुढच्या वेळी जर भेटायचं असेल तर मी पुण्याला नाही येणार तू मुंबईला येत आहेस."
"ओके, ठरलं!"
"तुझ्या मुंबाईमध्ये तू मला कुठेकुठं नेणार ते तुझ्याकडे राहीले बरं का."
"हो अगदी नक्की!" "तुला जिथे जायला आवडेल ते मला सांग मी नक्की तिथे घेऊन जाईल."
"ए तू कार चालवतेस?"
"हो म्हणजे काय?मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये सुद्धा चालवते छान पैकी."
"Wow, मस्त! म्हणजे टॅक्सी ने नाही जावं लागणार तू कार घेऊन येऊ शकतेस."
"किंवा असंही करू शकतोस ना सारंग तू की तुझी कार चालवत येऊ शकतोस मुंबईला."
"अच्छा हा पण ऑप्शन आहे का? मला माहितीच नव्हतं."
"सारंग तुझ्या शांत स्वभावामागे ना एक खूप नटखट मुलगा लपला आहे बरं का!"
"आणि तुझ्या या विचारवंत चेहऱ्याच्या मागे एक अल्लड मुलगी."
"आपण दोघेही असेच भांडतच राहणार आहोत का?"
"आपण भांडत नाही आहोत, चर्चा करत आहोत."
"येस आपण चर्चा करतोय. तुला माहितीये आज मी कोणालाच फोन नाही केलाय सारंग आणि मला कोणाचाही आला सुदधा नाही."
"मी तरी कोणाला फोन केला ग?"
तेवढ्यात गाडीची अनाउन्समेंट झाली.
"कॉफी तर संपव, गाडी येते आहे"
तिने नुसते हम्मम म्हणाले.
कॉफी चा आस्वाद घेत ती त्याच निरीक्षण करत होती आणि तो गाडी येताना दिसते का हे बघण्यात गर्क होता.
अचानक त्याने तिच्याकडे पाहिले तर ती आपल्याचकडे बघतेय हे त्याच्या लक्षात आलं आणि तो हलकेच हसला आणि ती एकदम लाजली आणि तिने खाली पाहिलं.
"कॉफी छान आहे, हां" काहितरी बोलायचे म्हणून ती बोलून गेली.
"तुला पुण्याच्या कॉफी आवडायला लागल्यात बहुतेक"
"कंपनी चांगली असेल तर कॉफी छान लागते"
"थँक्स फॉर कॉम्प्लिमेंटस! म्हणजे गाडीतली कॉफी आवडली तर शेजारची कंपनी चांगली म्हणायची, हो ना!"
त्याने हसत हसत विचारल्यावर ती पण जोरजोरात हसायला लागली आणि मग हळूच म्हणाली, "काही खास कंपनी असल्यावरच"
"चला, म्हणजे माझी गणना आता खास लोकांमध्ये होतीये तर"
ती काहीच न बोलता फक्त लाजली....
धाडधाड आवाज करत गाडी प्लॅटफॉर्मवर आली.
सगळे लोक चढल्यावर अगदी सावकाश ही चढली. पण दारात उभी राहिली.
"काय झाले? आत जाऊन बस ना!"
"जाईन, गाडी सुरू होईल तेव्हा जाईन"
दोघेही शांतच होते....
एकदम ती म्हणाली, "तू 'आयुष्यावर बोलू काही' हा प्रोग्रॅम पाहिला आहेस सारंग?"
मान डोलवत तो नाही म्हणाला.
ती हिरमसून जस्ट 'ओके' म्हणाली.
"गाडी सुटली, रुमाल हलले,
क्षणात डोळे टचकन ओले........" तो हळूच म्हणाला.
"सारंग तू तू तू ना ........ती त्याच्या हातावर खोटे खोटे मारत त्याला म्हणाली.
तो हसत होता आणि ती पण त्याच्या हसण्यात सामील झाली.
आणि खरंच गाडी सुटली...
तिचे हसणे थांबून ती त्याला ओरडून जोरात म्हणाली, "या रविवारी तुला यायचंय सारंग मुंबईला"
"उद्या फोन" तो एवढेच म्हणाला.
"नक्की"
त्याचा हात हलला आणि तिचा ही नकळत.
गाडी पूर्ण प्लॅटफॉर्म सोडेस्तोवर ती दारात उभी होती आणि तो तिथेच त्या जागेवर.
तो वळला आणि त्याच्या मोबाईलवर मेसेज पिंग झाला.
त्याने जस्ट बघितले तर तिचा मेसेज होता...."थँक्स"
त्याने त्यावर smile चा ईमोजी पाठवला.
मनात रविवारच्या जाण्याचे नक्की करत होता तेवढ्यात मागून एक हात त्याच्या खांद्यावर आला.
त्याने वळून बघितले तर TC.
"प्लॅटफॉर्म तिकीट आहे का?"
त्याने नाही म्हणून मान डोलावली.
"चला दंड भरा"
काही न बोलता त्याने खिशातून पैसे काढून पावती घेतली आणि आठवण म्हणून त्या पावतीच्या मागे लिहिले "आमच्या पाहिल्या भेटीला अर्पण"
आवडीने पावती पाकिटात ठेवली.
स्टेशनबाहेर येऊन पाहिले तर एक पोलीस गाडीपाशी फेऱ्या मारत होता.
ह्याने गुपचूप जाऊन त्याला विचारले, " साहेब कितीची पावती करावी लागेल?"
पोलिसाला पैसे देऊन ती पावती घेऊन त्याच्या मागे त्याने लिहिले, "गॉगल साठी सप्रेम भेट" आणि तीसुद्धा पाकिटात ठेऊन दिली.
गाडीत बसल्यावर तो स्वतःशीच म्हणाला, "खरंच आजचा दिवस छान गेला"
आणि मस्तपैकी हसत हसत घराकडे निघाला.
क्रमशः
©®अमित मेढेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा