तू मुंबई मी पुणे:- (भाग अंतिम)
"इथून उजवीकडे..... हां आता डॉन बॉस्को वरून लेफ्ट..
आता S V रोड वरून पुढे...
बरोबर...
आता पुढच्या गल्लीत उजवीकडे हां आता 1 मिनिटं दाखवत आहे लोकेशन....चालवत राहा....ते बघा रमेश राव खाली उभेच आहेत....."
"या या या.... अगदी 11 म्हणजे डॉट 11 ला पोचलात...कमाल आहे"
"अहो, कमाल आमची नाही ...या सारंग ची...सकाळी 6 वाजताच तयार झालाय...आमचे 7 ला निघायचे ठरले होते पण हा मात्र आम्हा सगळ्यांना तोपर्यंत थांबू देत असशील तर....
शेवटी पावणे सात ला निघालो" दिलीप राव हसत हसत म्हणाले..
"जावई बापूं... सासर पहायची घाई का मुलीला भेटायची..."
"दोन्हीची..."सारंग हसत म्हणाला.
"आत मृणालिनी वाट पाहतेय.."
"चला ना..."
"अहो थांबा...दारावर स्वागत करायला तुमच्या मेहुण्या थांबल्या आहेत.."
"पण मृणाल तर एकुलती एक आहे ना...."
"मेहुण्या म्हणजे तिच्या सगळ्या मैत्रिणी हो...या ग सगळ्या जणी"
"बघू बघू...आमचे जीजू बघू जरा..." सरिता पुढे येत बोलली.
"Wow किती handsom आहे..." पल्लवी खिदळत म्हणाली.
"सो cute.." ज्योती उद्गारली.
"Lovely" नेहा मोठ्याने बोलली.
"अरे मुलींनो त्याला ओवाळताय ना दारात का असेच जायचे आत.." रमेश रावांनी विचारले.
"असे कसे आत सोडू आम्ही ओवळल्या शिवाय...?"
"आणि ओवाळणी घेतल्याशिवाय..."
सगळे जण हसायला लागले....
"सारंग, पाकिटाला खड्डा रे तुझ्या..."
"खड्डा कसला...हक्क च नाही का त्यांचा.."
"याला म्हणतात आमचे दिलदार जीजू..." सरीताच्या या बोलण्यावर त्या सगळ्या खळखळून हसल्या.
आत जायला पूर्ण गुलाबाच्या पायघड्या टाकल्या होत्या...त्या सगळ्यांचे अत्तर शिंपडून स्वागत केले...
मृणालिनीचे घर म्हणजे 4BHK आणि 2 टेरेस असा भव्य फ्लॅट होता..त्यामुळे आतला मेन हॉल फुलांच्या डेकोरेशन ने मस्त सजवला होता...सगळ्या पाहुण्यांच्या बसण्याची उत्तम तयारी केली होती...
सारंग ची नजर मृणालिनी ला शोधत होती...
"जीजू, आता तिला कायमच पहायचे आहे...थोडा वेळ आमच्याबरोबर पण घालवा..." नेहा सारंगला उद्देशून म्हणाली..
सगळे पुन्हा एकदा हसले..
"अहो सारंग राव, तुमच्या मेहुण्या काही तुम्हाला सोडणार नाहीत . तुम्ही या इकडे मृणालिनी ला भेटवतो तुम्हाला..." रमेश रावांनी त्याला आत यायला सांगितले.
सारंग त्यांच्या बरोबर आतमध्ये गेला आणी त्यांनी खुणावले ल्या रूम च्या दिशेने गेला.
दार हलकेच ढकलून त्याने आत डोकावले तर डार्क नेव्ही ब्लु कलरचा शालू आणि छानसा मेकअप करून तिथे मृणालिनी तयार होती. ती आपल्याच नादात पाठमोरी बसली होती आणि स्वतःच्या हातावरील रंगलेल्या मेहेंदी कडे बघण्यात गर्क होती.
तिचे ते सात्विक आणि लोभस रूप बघून तो स्तब्ध झाला आणि दुसऱ्याच क्षणी नकळत त्याचे हात तिच्या मानेभोवती मागून गुंफले गेले आणि हलकेच त्याने ओठांचा अलगद स्पर्श तिच्या गालावर केला तसे दचकून ती मागे वळली आणि त्याच्याकडे पाहून ती लाजली आणि प्रसन्न हसली.
उत्स्फूर्तपणे आणि उत्कटतेने तिने पटकन त्याला मिठी मारली.
मिठीतच असताना त्याच्याकडे पाहून ती म्हणाली,
" मिळाला का वेळ साहेब तुम्हाला माझ्यासाठी...?"
"झाले का तुझे सुरू...?"
"अहो..एवढे 76 तास वाट पाहायला लावतात बाबा लोकांना...साहेब तर म्हणायलाच पाहिजे..." ती खट्याळपणे म्हणाली.
"हे घे..." त्याने हातातून एक बॉक्स काढून तिच्या हातात दिला..
"हे काय..?"
"बघ तरी.."
तिने बॉक्स चे पॅकिंग सोडले तर तिला आतमध्ये tommy hilfiger चे कपल वॉच दिसले.. त्यातले रिव्हर्स स्टॉप वॉच सुरू होते आणि दोघांच्याही घडाळ्यात आत्ता बरोबर 0 मिनिटे आणि 0 सेकंद दिसत होते...
"आता कळले की मी का म्हणालो होतो की तुझे ही स्टॉप वॉच सुरू आहे म्हणून.."
"स्प्लेडिंड...!" ती एवढेच म्हणू शकली.
"आवडले..?"
"खूप..हे बघ आता घातले सुद्धा...हे वॉच कायम माझ्याजवळ असेल..तू पण घाल ना तुझे घड्याळ सारंग...नाहीतर थांब मीच घालते तुझ्या हातावर...!
दोघांनी घड्याळ घातली तेवढ्यात मागून तिच्या मैत्रिणी चिवचिवाट करत आल्या...
"काय चालू आहे दोघांचे गुपचूप...आम्ही आहोत म्हणले कबाब में हड्डी."
"ऐ..दोघे एकटेच भेटत आहेत...बघ विचार त्यांच्या डोक्यात तरी काय आहे.." जोरजोराने हसत ओरडत त्या म्हणाल्या...
"उफफ.. पल्लू..मी त्याच्यासाठी आणलेला सलवार कुडता द्यायला त्याला बोलावले आहे आणि तुम्ही सुद्धा ना..."
"ओ ओ ओ....... असे का ! आम्हाला काहीतरी वेगळेच वाटले" पल्लवी तिला चिडवत म्हणाली.
"काही वेगळे नाही..आणि चला आता मी पण येतेय तुमच्या बरोबर...त्याला कपडे बदलू देत..."
"तू नाही थांबणार का मृणाल...आमच्या जिजूं बरोबर..?" ज्योती ने परत तिला छेडलेच.
"नाही...चला आता" डोळे वटारत ती म्हणाली"
...........
बाहेरच्या हॉल मध्ये भरपूर आवाज आणि गप्पा सुरु होत्या.
पाहुण्यांना चहा कॉफी रोज सरबत, खास ड्रायफ्रूट चिवडा, काजू कतली आणि सँडवीचेस ठेवले होते...
सारंगच्या आईने मृणालच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाली, "फार गोड मुलगी मिळाली हो आमच्या सारंग ला.."
ती फक्त हसली..
"मग, लग्न मुंबईत का पुण्यात..." रमेश रावांनी विचारले..
"लग्न माझ्या मुंबईत बर का बाबा.."
तिच्या बोलण्यावर सगळे हसले...
तेवढ्यात आतून सारंग मोतीया कलर चा कुडता आणि पांढरी चुडीदार घालून बाहेर आला....
त्याला मृणालिनी डोळे विस्फारून पाहत होती.
"अगं मृणे, तुझाच आहे तो..असे फाडफाडुन बघू नकोस.." सरीताच्या या बोलण्यावर सगळेच हसले...मृणालिनी मात्र लाजून लाल झाली.
"अंगठी घालायचा प्रोग्रॅम इथेच करूयात आपण नंतर हॉल बर जाऊयात.." मृणालिनी च्या आईने सांगितले.
पेढ्याचा पुडा, हार आणि अंगठी आणल्या गेल्या.
एक प्रोफेशनल फोटोग्राफर सारंग पुण्याहून बरोबर घेऊन आला होता..
छोटासा विधी आणि नंतर हार घातला गेला.
अंगठी घालायच्या आधी जोरदार टाळ्या, शिट्ट्या घोषणा सुरू होत्या..
"ऐ उखाणा घे ना...मृणा मस्त उखाणा गे..."
"सारंग तू पण उखाणा घे छानसा.."
"उखाणा नाही बर का..आता हे मला नाही जमणार..."
"मला पण नाही जमणार.."
"मग काय आम्हाला जमणार आहे का?"...सारंग ची बहीण त्याला खोटे खोटे झापत म्हणाली..
हो नाही- हो नाही करता करता..शेवटी मृणालिनी ने उखाणा घेतला..
"आप्तस्वकीयांच्या सहवासात मी आज करते आहे साखरपुडा
सारंग बरोबरच्या माझ्या संसाराचा आनंद होऊदेत आभाळा एवढा"
तिच्या उखण्याला जोरदार टाळ्या आल्या...
"आता सारंग तू...सारंग..सारंग..." सारंग च्या नावाने मस्त आवाजात गोंधळ सुरू झाला.
शेवटी सारंग ने सगळ्यांना शांत केले आणि सुरुवात केली...
"तू मुंबई.. मी पुणे..जोडी ही आपली सगळ्यात न्यारी,
एकमेकांच्या साथीने थाटूयात दुनिया जगात भारी"
मुंबई आणि पुण्याचे नाव सारंग ने घेतल्यावर सगळ्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला..
शेवटी अंगठ्या घातल्या गेल्या..दोघांनी अंगठी घातलेला हाताचा फोटो काढून घेतला..तो सगळ्या नातेवाईकांच्या व्हाट्स ऍप ग्रुप वर लगेच पाठवला.
मृणालिनी ने फेसबुकवर सारंग ला टॅग करत स्टेटस अपडेट केला, "एंगेज्ड"
पेढे भरवले आणि वाटले गेले आणि जेवायला निघण्याची वेळ झाली..
"सारंग मला तुला एकहि ठिकाणी घेऊन जायचंय..जिथे मी कायम जाते..पहिल्यांदा तिथे जाऊयात मग आपण जेवायला जाऊ"
सारंग ची आणि मृणालिनी ची फॅमिली पुढे हॉल वर गेली आणि हे दोघे वेगळ्या गाडीतून निघाले..
"कसे वाटतंय सारंग तुला..?"
"पूर्णत्वाचे फिलिंग येतेय"
"मला मोरपिसासारखे हलके वाटतंय.."
"मी मोर नाही ना वाटत आहे तुला..?" तो हसत म्हणाला.
"सारंग...परत चेष्टा"
तेवढ्यात तिने गाडी right इंडिकेटर दाखवुन एके ठिकाणी थांबवली.
ते दोघे उतरले आणि तिच्या मागे तो आत गल्लीत शिरला..
पुढे गेल्यावर त्याने पाटी वाचली..
वझीरा देवस्थान.
आतल्या प्रशस्त आवरातून आत मंदिरात ते शिरले. स्वयंभू गणपती अत्यंत तेजस्वी स्वरूपात त्यांच्याकडे पाहत होता असे सारंग ला भासले.
त्याने हात जोडले..मृणालिनी ला कायम आनंदी ठेवण्याचे वचन त्याने तिथे बाप्पाला दिले.
मृणालिनी तल्लीन होऊन आपल्या अष्टसात्विक भावनेने प्रचंड कृतज्ञतेने देवाकडे पाहत होती. सारंग सारखा जीवनसाथी मिळाल्याबद्दल आभार प्रगट करत होती.
देवाचा चेहरा ही त्यांना प्रसन्न भासत होता जणू त्या प्रसन्नतेमागे देवाचा आशीर्वाद दडला होता...
मंदिरातून बाहेर पडल्यावर सारंग तिला म्हणाला,
"खूप छान जागा आहे मृणाल..जेव्हा कधी बोरिवली ला येऊ तेव्हा इथे नक्की येत जाऊयात"
ती छान हसली.
"चलायचे, सगळे वाट पाहत असतील"
त्याने 'हो' म्हणून तिचा हात भक्कमपणे हातात घेतला..
ती त्याच्याकडे पाहत राहिली..
त्याच्या हात पकडण्यामध्ये तिला आश्वासकता, दृढ निश्चय आणि सुरक्षितता भासली...
आज ...'तिच्या मनातील मुंबई आणि त्याच्या मनातील पुणे' एकत्र निघाले..एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायला..कायमस्वरूपी एकमेकांचे व्हायला...एकमेकांवर निरंतन प्रेम करायला!
समाप्त!
©®अमित मेढेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा