Login

तू माझ्या आईच्या जागी आहेस -भाग ५

तू माझ्या आईच्या जागी आहेस.. कथा एका अनोख्या नात्याची.
तू माझ्या आईच्या जागी आहेस -भाग ५


सुरभी मोहित्यांच्या घरी सुन बनून आली. साक्षी प्रेमाने तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाली,

“वहिनी, आजपासून आपण नणंद भावजयीच्या नात्याने नाही तर बहिणी बहिणी म्हणून राहू. एकमेकांच्या मैत्रिणी बनून राहू. तुला कधीही माझ्याशी बोलावंसं वाटलं. काही सांगावंसं वाटलं तर बिनधास्त फोन करत जा. मी कायम तुझ्यासोबत आहे हे विसरू नको. वहिनी, घर म्हटलं की, भांड्याला भांडं लागणारच. सासू-सुन म्हटलं की, कुरबुरी होणारच. कधी आपली आई चुकेल, कधी तू चुकशील पण एकमेकींना धरून रहा. एकमेकांच्या चुका पोटात घाला. काहीही होऊ दे, मोठी भांडणं होऊ देत पण तुम्ही संवाद थांबवायचा नाही. एकदा का नात्यातला संवाद हरपला तर नातंही संपुष्टात येतं. सो वहिनी आता हे घर, माणसं सर्व काही तुझंच आहे. तुझं घर तुला हवं तसं सजव आपल्या माणसांना जपून ठेव. मला खात्री आहे, तू नक्की हे घर, घरातल्या माणसांना एकसंघ बांधून ठेवशील. ठेवशील ना वहिनी?”

सुरभीने हसून मान डोलावली. दिवस वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकत होते. कुटुंबप्रमुख घरात नसल्याने मुलांना धाक उरला नव्हता आणि त्यामुळे मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत झालेली अवस्था दयनीय होती. उमेशने बारावीतूनच शिक्षण थांबवलं आणि कुठल्यातरी खाजगी कंपनीत नोकरी करू लागला. प्रशांत प्रेमप्रकरणाच्या टेन्शनमुळे त्यावर्षी परीक्षेत नापास झाला. सुरभीचेही शेवटच्या वर्षाचे दोन विषय राहिले. कुटुंबाची झालेली वाताहत पाहून रमाकांतने पुन्हा घरी येण्याचा निर्णय घेतला. स्वेच्छा सेवानिवृत्ती घेऊन तो परत मुंबईला निघून आला. प्रशांत आणि सुरभीचा संसार सुरू झाला. लाडाकोडात वाढलेल्या सुरभीला सुरुवातीला मोहितेंच्या कुटुंबातल्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्रास होत होता पण शेवटी लग्नाचा निर्णय त्यांनी पूर्ण विचारांती घेतला होता आणि सुरभीच्या आईबाबांनी सुद्धा तिच्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे सुरभीला सासरच्या माणसांशी जुळवून घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.

आज इतक्या दिवसांनी सारा भूतकाळ कावेरीच्या डोळ्यासमोर तरळला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आज पुन्हा एकदा साक्षी आपल्या वहिनीला पोटतिडकीने समजावून सांगत होती. सुरभीने सोईस्करपणे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या नवऱ्याला निघण्यासाठी खुणावलं. प्रशांतने साक्षीचा निरोप घेतला आणि दोघे उमेशच्या घरातून बाहेर पडले.

“सुरभी मात्र कधीच या घरात रुळली नाही. आताही लोक लाजेखातर आजारी सासऱ्याला एखाद्या पाहुण्यांसारखं भेटायला आलीय. तिचं एक ठीक आहे पण प्रशांत तू सुद्धा?”

कावेरी मनातल्या मनात पुटपुटली. कावेरीने हताशपणे खिडकीतून बाहेर पाहिलं. डोळ्यातलं आभाळ भरून आलं. आईच्या मनात चाललेली खळबळ साक्षीने अचूक हेरली. साक्षी कावेरीकडे पाहून म्हणाली,

“आई.. नको ना असं डोळ्यातून पाणी काढू. जे आहे ते ठीक आहे. आपणच कमी पडलो असू.”

“आपण काय कमी पडलो गं? सांगशील जरा?”

कावेरी चिडून म्हणाली.

“आजवर तिला काय कमी केलं गं? पोटच्या लेकीला जितका जीव लावला नाही तो तिला लावला मी. कायम तिच्या आनंदासाठी धडपडत राहिले. तुझ्या बाबांनी नोकरी सोडली. तुझा दादा अजून नोकरीला लागला नव्हता तरी मी कशीबशी घर चालवत होते. त्यावेळीस उमेशच्या नोकरीचा आधार मिळाला. नाहीतर किती कठीण होतं माहितीये तुला? किती काटकसर करावी लागत होती तरी तिला जे हवं ते देत गेले. तिला घरातल्या कुठल्याच कामांची सवय नव्हती तरीही माझे गुडघे दुखत असतानाही मी घरातली सर्व कामे करत होतेच ना? ”

कावेरीचा संताप अंगार बनून अश्रूवाटे वाहू लागला. साक्षीच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या होत्या. कावेरी बोलू लागली.

“साक्षी, तिच्यात मायेचा ओलावा कसा नाही गं? तिला माझी माया कशी येत नाही? सासू म्हणून नाही निदान एक स्त्री म्हणून तरी ओलावा असायला हवा ना? इतकं स्वार्थी कसं असावं माणसानं? साक्षी, तुझ्या दादाने प्रेमविवाह केला म्हणून सासू सुनेचा छळ करते असं कोणी बोलू नये म्हणून घाबरून मी तिला कधीच काही बोलले नाही. तिला हवं तसं वागू दिलं. मला वाटलं, पोरीचं माहेर तुटलं तर आपणच तिची आई व्हायला हवं. लेकीसारखं सांभाळायला हवं. म्हणून तिच्या प्रत्येक चुकांवर मी पांघरून टाकत आले. तिला पाठीशी घालत आले. माझं चुकलं का गं?”

“आई प्लिज ना.. नको गं इतकं मनाला लावून घेऊ. तुझी तब्येतही आता नाजूक असते. या सर्व टेन्शनने तूच अंथरुणाला खिळून राहिलीस तर? आई, तू जर आजारी पडलीस तर घर कोलमडून जाईल गं. तुला खंबीर व्हावं लागेल आई..”

आईचा हात हातात घेत साक्षी म्हणाली. मनातली तडफड तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. कावेरी पुढे बोलू लागली.

“साक्षी, तुझ्या पप्पांनी या घराला जोडून ठेवलं होतं. तुम्हा तिघा भावंडाना एकत्र बांधून ठेवलं होतं. तुम्ही भावंडे एकमेकांवर कितीही रागावलात, चिडलात, भांडलात तरी काही दिवसांनी मागचं सारं विसरून पुन्हा एकत्र यायचात. आपण इतक्या हालाखीत दिवस काढले पण कधी इतकं वाईट वाटलं नव्हतं गं. पण आता दोन्ही मुलं मोठी झाली, कमावती झाली. घरात सुबत्ता आली. पैसा आला आणि नाती दुरावली. पैशाची धुंदी इतकी डोळ्यावर चढली की माणसांची काही किंमतच उरली नाही. आता माणसं दुरावली. दोन भाऊ वेगळे झाले. तिला धाकट्या दिराच्या व्यसनांचा त्रास होऊ लागला. घरात तिची धुसफूस सुरू झाली म्हणून मग उमेशने त्यांचं घर सोडलं आणि तो भाड्याच्या घरात राहू लागला. तुझ्या दादा वहिनीची मुलं लहान होती तोपर्यंत माझी गरज होती आता ती गरजही संपली. आता आमचं ओझं होऊ लागलंय म्हटल्यावर लगेच इथे उमेशकडे आणून सोडलंय. कुठं चुकलं सांगशील?”

आज कावेरीच्या मनातली खदखद बाहेर पडत होती. मनातल्या दुःखाचा निचरा होत होता.


पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..