Feb 06, 2023
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तु माझा सांगाती

Read Later
तु माझा सांगाती

 तु माझा सांगाती

©® आर्या पाटील

          

           वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ!

           निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा !!

वृंदाच्या सुमधूर स्वरांनी देवघर निनादून गेलं.सूर्याची कोवळी किरणे देवघरातील गणरायाच्या मूर्तीला नमन करती झाली.त्या सोनप्रकाशात तिचं देवघर न्हाहून निघालं होतं.आज दिवसही तसा खास होता.माघी महिन्यातील गणेश चतुर्थी म्हणजे तिच्यासाठी आनंदाची पर्वणी असायची.गणपती बाप्पा म्हणजेच तिच्या श्रद्धेचा आणि भावनेचा विषय.श्रद्धेभोवती एकदा भावनेचं वलय निर्माण झालं म्हणजे देवाशी आपण मनाने एकरूप होतो.वृंदाला तर या श्रध्देचा पिढीजात वारसा लाभलेला होता.वृंदाच्या वडिलांची गणेशभक्ती लहानपणापासूनच तिच्यात उतरली.गणपती बाप्पाशी ती भावनिकतेने जोडली गेली.लग्नाआधी आणि आता लग्नानंतरही भक्तीचा वारसा तिने प्राणपणाने जपला.गावात तिच्या घराशेजारीच गणरायाचे प्राचीन मंदिर होते.मनात देवपण जपलं तर देवालाही भक्ताशिवाय करमत नाही असेच म्हणावे लागेल.हे मंदिर तिच्यासाठी माहेरची सावली झाले.सकाळी घरची कामे आवरल्यानंतर मंदिराचा परिसर स्वच्छ करणे,गाभाऱ्यातील फरशी पुसणे,परसातल्या जास्वंदीच्या फुलांची माळ गुंफून बाप्पाला अर्पण करणे हा तिचा नित्यनेम होता.प्रत्येक संकष्टीला एकविस मोदकांचा नैवेदय ठरलेला असायचा. मोदक बनविण्यात तर तिला विशेष रुची होती.मोदकांच्या पाकळ्यांना कुशल कारागिरासारखी आकार द्यायची ती.अन्नपूर्णेचा वास होता जणू तिच्या हातात. लग्नानंतर तिने आपल्या या दिनक्रमात कधी खंड पडू दिला नाही.त्या मंदिरात तिला जगण्याचा नवा उत्साह सापडायचा,कधी मानसिकता डगमगली तर मनाला नवी उभारी मिळायची,दुःखाच्या क्षणी बाप्पा जणू तिचा सखा,बंधू व्हायचा, आई बाबांची आठवण आल्यानंतर भरलेल्या नजरेने जेव्हा ती बाप्पावर कटाक्ष टाकायची तेव्हा मायेच्या चिंब पावसात न्हाहून निघायची.

आज तर तिच्या लाडक्या बाप्पाचा विशेष दिवस त्यामुळे सकाळपासूनच तिची धावपळ सुरु होती. घरातलं आवरून तिला मंदिरातही जायचं होतं. मंदिरात परंपरागत माघी गणेशोत्सव साजरा व्हायचा.सकाळी गणेश जन्माचं किर्तन त्यानंतर देवाला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम असायचा. सारेच गावकरी श्रध्देने या सोहळ्यात सामील व्हायचे.वृंदाचा उत्साह तर आभाळाला भिडलेला असायचा.आजही त्याच उत्साहात तिने घरातील कामे आवरली.

" वृंदा, अजून किती करशील ? जी सेवा करतेस त्याचं फळ दे म्हणावं त्याला.लग्नाला सहा वर्षे झाली देवाला म्हणावं आता तरी कुस उजव." आन्हिके उरकून देवघरात आलेल्या तिच्या सासूबाई खोचकपणे म्हणाल्या.

" तु काहीही न करता तुला सुखात ठेवलय ना देवाने मग माझ्या वृंदाच्या भक्तीरूपी झाडाला वात्सल्याचं फूलही नक्की उमलेल.तु नको काळजी करूस." म्हणत वृंदाच्या आजेसासू तिथे पोहचल्या.नातसुनेची बाजू घेत त्यांनी सुनेला चांगलच सुनावलं.

त्यांना पाहताच वृंदाची रुसलेली कळी खुलली.

" तेच म्हणते तुम्ही अजून आला कश्या नाहीत लाडक्या नातसुनेला डोक्यावर घ्यायला ?" म्हणत त्यांनी देवपूजेला सुरवात केली.

तसा आजेसासूंनी वृंदावर प्रेमळ कटाक्ष टाकला आणि नजरेनेच तिला शाश्वत सोबतीची जाणिव करून दिली.

ती मंद हसली पण या हसण्यामागे लपलेली दुःखाची लकेर त्यांच्या नजरेतून सुटली नाही.

देवघराबाहेर पडत त्यांनी वृंदाला जवळ बोलावले.

" वृंदा, मोदक झाले वाटतं ? सारं घर सुवासाने दरवळलं आहे बघ." विषय बदलत त्या म्हणाल्या.

तिने मानेनेच होकार दिला.

" बाळा, आयुष्य मोदकाप्रमाणेच असतं बघ. आत सुखाचे सारण भरले तरी परिस्थितीचे चटके सहन केल्याशिवाय त्याला चव येत नाही.खरी कसोटी तर इथेच असते. हे चटके सहन करतांना डळमळीत झालो तर आयुष्याचा मोदक फुटून जाईल. तुला तर माहित आहे शिजतांना फुटलेल्या मोदकाला देवाच्या नैवेद्यात स्थान मिळत नाही. खंबीर हो. गणपती बाप्पा आहे आपल्यासोबत."आजीने मायेने तिला जगण्याचे सार सांगितले.त्या मायेच्या शब्दांनी ती हळवी झाली आणि त्यांच्या कुशीत शिरली.

"आज अमित आहे बरं का घरी ?" म्हणत त्यांनी विषय हलका केला.

त्यांच्या बोलण्याचा अर्थ उलगडताच वृंदा गोड लाजली.

"छान तयार हो.जोडीने मंदिरात जा आणि दर्शन घ्या." तिच्या डोक्यावर हात फिरवत त्या मायेने म्हणाल्या.

त्यांचा आशीर्वाद घेऊन वृंदा रुममध्ये आली. समोर

अमितला पाहून पुन्हा हळवी झाली. यावेळेस त्या हळवेपणावर खंबीरपणाचं पांघरुण घालत ती त्याच्यापाशी पोहचली.

" आईने सकाळीच सुरवात केली ना ? मी बोलतो तिच्याशी स्पष्टच." अमित गंभीर होत म्हणाला.

तशी ती त्याच्या पुढ्यात उभी राहिली.

" आईचं हृदय आहे त्यांच.काळजी वाटणारच ना. त्या मनाने वाईट नाहीत.नातवांच सुख त्यांना हतबल करतं." ती समजावत म्हणाली.

" मग त्याचा दोष तुला का ? आईपणाच्या शेला पांघरुण ती तुझं बाईपण पायदळी तुडवत आहे त्याचं काय ? तुझ्यावर अन्याय होत आहे आणि तो आता माझ्याने सहन होत नाही ."म्हणत त्याने तिला मिठी मारली.

" अमित,तो आहे ना सोबत मग सगळं ठिक होईल. तु शांत हो." म्हणत तिने त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.

सुखाचा संसार सुरु होता दोघांचा फक्त कमतरता होती ती त्या संसाराला गोकुळाचं रुप देणाऱ्या बाळाची. लग्नानंतर सहा वर्षे झाली तरी त्यांच्या वात्सल्याची ओंजळ अजूनही रितीच होती. या रित्या ओंजळीपेक्षा लोकांच्या नकोश्या नजरा जास्त छळत होत्या त्यांना.

'वांझपणाचा' शिक्का अप्रत्यक्षपणे वृंदाच्या नावावर लादून समाज मोकळा झाला होता.तिच्या विश्वाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या सासूबाईंच्या नजरेतही तिचं बाईपण शापीत बनलं होतं.परिस्थितीच्या या वादळात ते दोघे मात्र एकमेकांचा भक्कम आधार बनले.गणरायावर श्रद्धा ठेवत ते या परिस्थितीतही तटस्थ राहिले. 

             आपल्या दुखऱ्या जखमेवर आपुलकीचं मलम लावत ते तयार झाले आणि मंदिरात पोहचले.एव्हाना किर्तनाला सुरवात झाली होती. वृंदाची नजर गणरायाच्या मूर्तीवरून हलत नव्हती. डोळ्यांना भावनेची भरती येत होती.तोच गणरायाला पाळण्यात घालण्याची लगबग सुरु झाली.नविन लग्न झालेल्या नववधूला बाळगणेशाला पाळण्यात घालण्याचा,पाळणा गायचा मान दिला जायचा.गणरायाच्या कृपेने तिच्या घराचं गोकुळ व्हावं हिच काय ती भाबडी आशा या मागे दडली होती मात्र वृंदा याला अपवाद ठरली.अगदी लग्न झाल्याच्या पहिल्या वर्षानंतर ते अजूनही तिच्या वाट्याला बाळगोपाळाचं सुख आलं नव्हतं.

" वृंदाला उठवा नेहमीप्रमाणे. दरवर्षी एका बाजूला तिच असते ना." कोणीतरी एक महिला म्हणाली.

तश्या साऱ्याच बायका कुत्सित नजरेने तिला न्याहाळू लागल्या. तिच्या सासूला तर मेल्याहून मेल्यासारखे झाले. वृंदा मात्र उत्साहाने उठून उभी राहिली. बायकांच्या टोमण्यांपेक्षा गणरायाला पाळण्यात घालायचा,पाळणा गायचा मान तिला अधिक सुखावह वाटत होता. ती आनंदी मनाने उठून पुढे आली.

अगदी आईच्या मायेने तिने बाळगणेशाच्या मूर्तीला स्नान घातले.यथाविधी पाळण्यात घालण्याचा सोहळा पार पडला.आपल्या मधुर आवाजात तिने पाळणा गायला.

" सहा वर्षांत वृंदा पाळणा म्हणायला पारंगत झाली पण घरचा पाळणा काही हलला नाही.अमितचं आयुष्य उद्धवस्त झालं बघ." कोण्या एकीची कुजबुज तिच्या सासूच्या कानांनी बरोबर टिपली.

क्रोधाग्नीने संतप्त होत त्या तश्याच घरी परतल्या.

इकडे जोडीने दर्शन घेत वृंदाही घरी आली.अमित मागून येतच होता.तिला पाहताच सासूबाई बरसल्या.

" बरं वाटलं ना तुला आमची इज्जत वेशीवर टांगून.का जातेस प्रत्येक वेळेस पुढेपुढे करायला ? तुझ्या वांझपणाचा त्रास अजून किती वेळ सहन करायचा आम्ही ? सोडून का देत नाहीस माझ्या लेकाला ?" रागात सासूबाई अगदीच टोकाचं म्हणाल्या. 

तोच अमितही घरी येऊन पोहचला.आईच्या शब्दांनी त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

त्यांच्या त्या शब्दांनिशी वृंदाचं उरलं सुरलं अवसान गळून पडलं. काळीज गलबलून गेलं.डोळ्यांना अश्रूधारा लागल्या.

" आई, तु काय बोलतेस कळतय का तुला ?" म्हणत अमित चिडला.

" काय चुकीचं बोलली मी ? तुझ्या बाबा होण्याच्या हक्कावर हिची काळी सावली पडली आहे.आपली वंशवेल कायमची संपवली हिने." त्या अजून आक्रमक झाल्या.

" आई आपली वंशवेल तिने नाही संपवली. मी संपवली आहे. दोष माझ्यात आहे.माझ्यातील दोषामुळे तिचं आईपण संपलं आणि तु तिलाच अपराधी म्हणतेस. वृंदा तु सोडून दे मला. हेच हवं आहे ना आईला. तु सोड मला. माझ्यातील दोष तु ' वांझ' म्हणून खूप झाकलास पण आता नाही." वृंदाचे डोळे पुसत तो कणखरपणे म्हणाला.

त्याचा प्रत्येक शब्द त्याच्या आईचे डोळे उघडून गेला. तो क्षण त्यांना भयानक स्वप्नाप्रमाणे वाटत होता. तोल जाऊन त्या पडणार तोच वृंदाने त्यांना आधार दिला. खुर्चीत बसवत पाणी आणून दिले.आपल्या मुलात दोष आहे या जाणिवेने त्या पुरत्या तुटल्या.

" आई, काळजी करू नका. गणपती बाप्पा आपल्या सोबत आहे. तो नक्की मार्ग दाखवेल." त्यांना धीर देत ती म्हणाली.

वृंदाच्या त्या शब्दांनी त्यांना मेल्याहून मेल्यासारखे झाले.

तिला लावलेले बोल त्यांच्या डोळ्यांतून पश्चातापाचे पाणी बनून ओघळले.

त्यांनी हात जोडत मूकपणेच तिची माफी मागितली.

तोच अमितचा फोन वाजला. ते ज्या फर्टिलिटी सेंटरमध्ये उपचार घेत होते तिथल्या डॉक्टरांचा कॉल होता. फोनवर बोलतांना थोडा वेळ धीरगंभीर झालेला अमित 

" खरच, हे शक्य आहे ?" म्हणत आनंदाने ओरडला. चेहऱ्यावरचे भाव अचानक बोलके झाले. फोन ठेवत तो वृंदाकडे वळला.

" वृंदा, बाप्पाने ऐकलं आपलं गाऱ्हाणं. आज या शुभदिनी पालकत्वाची मुहूर्तमेढ झाली आपल्या आयुष्यात.आयव्हीएफद्वारा आपण आईवडिल होऊ शकतो. डॉक्टरांनी उद्याच पुढच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये बोलावले आहे. मी खूप खुश आहे आज. माझ्यामुळे तुझ्यावर लागलेला वांझपणाचा डाग आता कायमचा मिटणार." म्हणत त्याने तिला जवळ घेतले.

वृंदाला आनंदाश्रू अनावर झाले. त्याच्या कुशीत शिरून ती लहान बाळागत रडली. आईपणाची जाणिव भावनांच्या आभाळाला भिडली आणि नयनांतून रिती झाली.आज खऱ्या अर्थाने बाळगोपाळाची चाहूल घेऊन जणू नवा प्रहर आला होता.त्यांच्या संसाराच्या गुलमोहराला पालकत्वाचा बहर आला होता.

सासूबाई उठून उभ्या राहिला.दोघांवरून मायेने हात फिरवीत त्यांनी हात जोडले.स्वतःला सावरत वृंदा अमितपासून दूर झाली.

" माफ कर वृंदा मला.नातवाच्या ओढीने मी स्वार्थी झाले.आईपणाचं महाभारत रचत तुझ्या बाईपणावर अन्याय केला." हात जोडत त्या रडू लागल्या.

" आई सावरा स्वतःला.आता नको त्या कटू आठवणी. दुःखाच्या क्षितिजावर गणरायाच्या कृपेने सुखाचा सूर्य उगवत आहे. आपण एकत्र येऊन त्याचं स्वागत करुया." म्हणत तिने अमितचा हात धरला आणि देवघरात आली. गणरायाच्या मूर्तीवर आज वेगळच तेज झळकत होतं. सुखकर्ता विघ्नहर्ता गणरायाच्या कृपेने त्यांच्या जीवनात नव्या पर्वाला सुरवात होणार होती.परिस्थितीच्या वाफेवर त्यांचा आयुष्यरूपी मोदक चांगलाच तयार झाला होता आणि आज देवानेच त्या नैवेद्याच्या बदल्यात त्यांची ओंजळ सुखाने ओतप्रोत भरली होती.

 

©® आर्या पाटील

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Aarya Amol Patil

Teacher

निसर्ग सौंदर्याला लेखणीत उतरवायला आवडतं