तू माझा सांगाती..

कथा वारीची


"यावेळेस मला काही वारीला येता येईल असे वाटत नाही. माझे ऑफिसचे खूप काम आहे आणि खूप धावपळ आहे. पण मला मनापासून यायचे आहे. दरवर्षीची वारी यावर्षी चुकवायची नाही यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन. पण माझी वाट न पाहता तुम्ही आता निघा. मी त्या दिवशी नक्की येण्याचा प्रयत्न करेन." संजना घरच्यांना सांगत होती.

दरवर्षी एकादशीच्या आधी चार दिवस घरातील सगळेजण वारीला जातात. गाडीनेच जाणार असल्याने ते चार दिवस आधी निघतात. तिथे जाऊन ते त्या वातावरणात राहतात आणि एकादशीला दर्शन घेऊन तिथून निघतात. देवाच्या सान्निध्याच्या राहता यावे यासाठी आणि वारीचा अनुभव घेता यावा या उद्देशाने ते चार दिवस आधीच घरातून निघतात. पण यावेळेस नेमके संजनाच्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचे काम आले असल्यामुळे तिला जाता येणार नाही असे वाटत होते. यावर्षीची तिची वारी चुकेल असे तिला वाटत होते. पण काही केल्या हा नियम तिला चुकवायचा नव्हता. तिच्यामुळे घरच्यांची वारी चुकू नये असे तिला वाटत होते म्हणून ती त्यांना जाण्यास प्रोत्साहन देत होती.

संजनाच्या सांगण्यावरून सगळेच घरातून निघाले आणि संजना तिच्या कामांमध्ये घडून गेली. वारीच्या दिवशी नक्कीच जाता यावे यासाठी ती रात्रंदिवस काम करत होती आणि आदल्या दिवशी तिचे काम पूर्ण झाले. तिला खूप आनंद झाला. कसेही करून निदान एकादशीच्या दिवशी तरी आपण तिथे पोहोचावे असे तिने ठरवले आणि ती अगदी पहाटे घरातून निघाली. फोरविलर घेऊन ती भल्या पहाटे एकटीच निघाली.

संजना घाटातून जात होती इतक्यात समोर तिला काही माणसे दिसली म्हणून तिने गाडी थांबवली. तिथे काहीतरी घटना घडली आहे असे तिला वाटले म्हणून ते पाहण्यासाठी ती गाडीतून उतरली इतक्यात तिच्याभोवती चार-पाच गुंडांनी विळखा घातला. संजना खूप घाबरली आणि मनातच तिने विठ्ठलाचा धावा घेतला, तोच एक व्यक्ती तिथे आली.

"बाळा, पंढरपूरला जात आहेस ना? मग थांबलीस का? बस गाडीत आणि निश्चिंत होऊन जा." असा आवाज तिच्या कानावर पडला नि तिने डोळे उघडले. तोपर्यंत तिला घेरलेली सगळी लोकं निघून गेली. ते पाहून तिला खूप आश्चर्य वाटले.

संजनाने त्या व्यक्तीला नाव विचारले तेव्हा त्यांनी "पांडुरंग विठ्ठले" असे सांगितले. त्या व्यक्तीचे आभार मानून ती गाडीत बसली. गाडी थोडी पुढे गेल्यावर तिने आरशातून पाहिले तर तिला तिथे कोणीच दिसले नाही. ते पाहून तिचे मन गहिवरून आले. तिची श्रध्दा आणखीनच दृढ झाली.