तू मला मी तुला भाग ५

Pori T Pori Por Bi Gavat Tikat Nahit
कथेचे नाव : तु मला मी तुला

विषय : सामाजिक कथा

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

भाग : ५
काय करु बाई?? लग्न तर कराचं हाय...

पण पोरी नाही ना भेटतं खेड्यात... नोकरी करणारा मग तो, एखाद्या कंपनीतला गार्ड बी चालते, शेतकरी नवरा नको बोलतात पोरी!मामींनी वास्तूस्थिती बोलून दाखवली...

अगं एवढं सगळं घरी असताना, शेतीवाडी सोडून, कोण कशाला, करेल कुणाची हमाली.. दादा छान शेती व्यवसायात उतरलाय, आम्हाला कित्ती गर्व वाटतो माहितीय दादाचा, रिया बोलली.


कित्ती साधेपणा आहे तुम्हा सर्वांच्या स्वभावात, कुठलेचे आडेवेढे नाही की दिखावूपणा नाही.... हेवेदावे नाही की.. कुणाची कुरघोडी नाही.. निस्वार्थीपणे इतरांना मदतीची भावना, तुमच्या मनात असते, आत्ता तेच बोलत बसलेलो रियाच्या बोलण्यावर अदितीने होकारार्थी मान डोलीवली.


पोरींचं लग्न करताना नाही व बाई तरास झाला काही पण, ह्या पोरा साठी पोरी पाह्यता पाह्यता जीव पार मेटाकुटीले आलाय.

चार वर्स झाले, पोरी पाहून राह्यलो .... कुठं बसलाय देव, डोळे मिटून.. कुणास ठावूक, मामीने बोलता बोलता हळूच वर बघून भगवंताला हात जोडले..

मी बघू का, पोरगी दादासाठी... रियाने विचारलं...

कुठची पाह्यतं.. शहरातली पाह्यत का खेड्यातली.. रियाचं बोलणं मामीने हसण्यावर न्हेल.

खेड्यातल्या पोरी, खेड्यात राहाले तयार होईनात, शहरातला नवरा पाहीजे म्हणत्यात.. आन तू शहरातली पोरगी शोधुन आणणार आहेस व्हय...

शहरातली पोरगी आमच्या खेडेगावात राहाले तयार होईन का ते सांग. रियाच्या प्रश्नावर मामी उत्तरली.

शहरातला आटोरिक्सावाला, दुकानातला पुड्या बांधणारा, कपड्याच्या घड्या करणारा, नोकर बी आजकाल चालते म्हणत्यात पोरी, वडलोपार्जित शेतीवाडी असलेल्या शेतक-यानं सांग कुठं जावं बरं.

हारफुलाचं दुकान टाकून दोपलं दोन टोपले फुल आण हार विकणारे, किती खात असन आन किती शिल्लक ठेवत असन, काय माहीती?

मालमसाला, दाळदाना, अडल्यानडल्याले, लागला पैसा पाणी, मायबापाले खेड्यातूनचं पुरवा लागते, वं बाय कधीकधी.. पण शहरातल्या चकाचॉद दुनियेची भुरळ हाय सगळ्यायलेच.

पोरी त पोरी वं बाई... पोरं बी नाही टिकत ह्या खेड्यात, गावातली कित्तीकचं पोरं, बाहेर जात्यात नशिब आजमावाले, काही पनपत्यात त काही माघारी पळत येत्यात, डिप्रेशन का काय ते ओझं स्वत:च्या अन् मायबापाच्या डोक्यावर ही देत्यात...

बिनभरवशाची शेती कोण करन म्हणून, ओली वलीताची कसलेली कितीकच जमिन गावात अशी पडीक दिसन तुले. ठेक्या बटईनं देत्यात कुणी कुणी ते ही देत न्हाईत.


शेती म्हणजे, मेहनत कष्ट... आन् कष्ट करायचा कंटाळाच येते आजकाल.. दे गा हरी खाटल्यावरी असं म्हणल्यानं होईन का सांग.


गडी माणस कामाले हायेत, लक्ष ठेवल्यीबगर, त्यायच्या भरवशावर नाही होतं शेती... लक्ष ठेवाले घरचा माणुसच लागते.

शेती कराची, मंग गाव नाही सोडता यायचा आमाले.. मामी बोलत होत्या..

सत्यपरिस्थीती खरचं खूपच मन विदिर्ण करणारी होती. मामींच बोलणं, सगळेच मन लावून ऐकत होते...

आमची व-राडी खेड्यातली बोलीभाषा... समजत नसन बाई तुले, अशीचं आहे आमची गावरान भाषा, अगदी साधेपणाने अदितीकडे बघत मामी बोलली.

समजतेय ना, उलट ऐकायला छान वाटतेयं आणि म्हणतात, कोसाकोसावर भाषा बदलतेचं. ग्रामीण असो की शहरी भाषा ती भाषाच.. अदितीने उत्तर दिल.

मामींच्या भेगाळलेल्या पायांकडे, दोघींचं एकाच वेळी लक्ष गेलं, तशा साडीने पाय झाकत मामी बोलल्या, तुमच्या शहरातल्या लोकांयच्या पायाले कशी म्हणून मातीकुती लागतं नाही आणि आमच्या गावात मातीच माती..

माळराणावर हुंदडताना, हिरव्या कंच गवतावर, चालताना अँक्युप्रेशरच्या नावे, अनवाणी पायाने दगड-मातीवर चालण्याचा सराव करणारी, अदिती क्षणभर विचारात पडली..

कडूनिंबाच्या झाडाखाली, आल्या गेल्या सोबत बोलण्यात, मामा, रियाच्या आईबाबांच्या मस्तच मनसोक्त गप्पा रंगल्या होत्या.

घ्या हात धुवा, भुखा लागल्या आसन, हातात तांब्याभर पाणी घेवून आलेल्या मामींनी, सर्वांना हात धुण्यासाठी तांब्या हाती दिला.

रिया आणि अदिती मदत करत होत्या. मामींनी सर्वांची जेवनाची ताट वाढली. खाली चटई टाकून, एक छोटीशी पंगतचं बसली होती.

मामी गरमागरम पुरणाच्या पोळ्या आणि कटाची आमटी आग्रहाने वाढत होती. शहरातल्या लोकांना चूलीवरच्या स्वयंपाकाचं अप्रुप म्हणून, मुद्दाम अर्धा पर्धा स्वयंपाक मामीने, चुलीवर केला होता.

मामीच्या हातच्या स्वयंपाकाचं आणि मधुने भरून दिलेल्या पुरणपोळ्यांच कौतुक करत, सर्वांचं जेवण आटोपलं. मामीने पटापटं सगळं आवरुन घेतलं.

पाम सुपारी खावून, दुपारच्या जराशा वामकुक्षीने सर्वांनाच तरतरी आली, सगळेच शेतावर जाण्यासाठी तयार झाले.

गावातून सगळेच शेताकडे निघाले..

कोण्या गावची पाव्हनी वं...

कवि/ कविती कधी आली म्हणून, गावातले दिसतील ते सगळे रियाच्या आईची, कविताची चौकशी करत होते.

कवि/ कवितीची पोरगी का?

जगात, एकमेव अशी एक जागा जिथे, आईच्या नावाने आपण ओळखल्या जात असतो.. जाताना अनेकांनी, आईच्या नावाने रियाला ओळखलं होतं.


ही पोरगी कोण?

डोळ्यावरच्या चष्म्यातून, मिचमिच डोळे करत, एका म्हाता-या आजीने विचारलं..

माझी मैत्रीण... रियाने सांगितलं

अग्गो बाई.. मैत्रीण व्हयं..

मी म्हटलं!! वैभ्यासाठी..

वैभ्याले शोभणं... जोडा साजरा दिसन! कुठलाचं आढावेढा न घेता, आजी अदितीकडे बघून स्पष्टपणेच बोलली.

काय मँडम.. यायचं का इथे.. होणार का वहिणी माझी...

आजीच्या बोलण्यावरुन, रियाने अदितीकडे बघून डोळे मिचकवले.

रियाला चिडवायला आयतं कारणचं मिळालं होतं..

सांग मग येणार का? होणार का, सुनबाई ह्या गावाची?... रियाने चांगलच डिवचून घेतलं, आणि खो खो करत हसत सुटली...

काहीही काय? आण् हे कुठून नविनचं... एक संधी सोडत जावू नकेस तू मला चिडवायची... एकमेकींना चिडवत, चिडत.. दोघी ही उड्या मारत शेताच्या दिशेने धावत सुटल्या.


ओSS होSS!!
ओSS होSS!! हवेच्या तालावर, हुंदडत पाय वाटेवरुन , हातात हात देत धावत उड्या मारत दोघीही शेताच्या दिशेने निघाल्या.

एका पायाने, लंगडी घालत, उड्या मारत, बालपणातल्या सुखावह आठवणींबरोबर, आत्ता ह्या पायवाटेवरचा प्रवास, सख्ख्या सखीबरोबरच्या गोड स्मृतींचा साक्षीदारच होणार होता जणू.


शेतातल्या कोपरान् कोप-याने, हिरवा शालू ओढला होता.. पांढ-या पिवळ्या फुलांनी झाडावेलीवरची पिक छान डवरली होती तर फुलातून उमलू बघणा-या फळांचं अस्तित्व, डोकं वर काढत डोकावून बघत असल्याचं भासतं होतं...

इवली इवली पिक, हवेच्या तालावर नाचत होती.


सगळेच, रमत गमत.. शेतात येवून पोहचले. मोलमजूरी करणारी बायका माणसं, आपआपल्या कामात व्यस्त होती.

सुट्टीचा दिवस असल्याने, त्यांची लेकरं ही.. त्यांच्या अवतीभोवती, मातीकुतीत तिथेच मनसोक्त खेळत बागडतं होती.

फक्तच म्हातारी कोतारी आणि छोटी लेकरं गावात होती, गाव असं शांत शांत, का होत? त्याचं कारण इथे आल्यावर कळलं.

डवरणारी पिक असो की,आकाशात स्वच्छंदी उडणारे पक्षी, की दूर आपल्याचं कामात मग्न असलेले, शेतावर काम करणारी गडी बाया माणसं असोत की त्यांची कळकटली मळकटली काळीसावळी आडदांड लेकरं असोत,हे सुंदर क्षण कँमे-यात कैद करण्याचा दोघींही आटोकाट प्रयत्न करत होत्या.


वैभव दा कधी येईल गं, रियाने मामींना विचारलं..

का करतं बाई, तुह्या दादाले, खूप काम राह्यत्यात, पिकापाणी, बी बीयापाण्याचं, किटकनाशक, फवारणी. सगळं त्याले एकट्यालेच पाहावं लागते.

शेन माती आणि ओल्या कच-यापासुन, कंप्मोस्ट तयार करतो, गांढुळ खताची निर्मीती करतो गावातचं.. त्याच्या भरवशावर शेती करतोय, पिकपाण्याव किड किटकं, होवू नये म्हणून, विषारी औषधाची फवारणी करत नाही आम्ही....

पाणी देण्यासाठी ठिंबक सिंचन पद्धती, आपल्या चं नाय तर सा-यांयच्या शेतात बसवून घेतली त्यानं.

सरकारी सबसिड्या मिळतात हल्ली, सरकार ही शेतक-याला असं वा-यावर सोडत नाही. करण्याची तयारी पाहीजे फक्त..

वैभवला कृषीविषयक सल्लागार म्हणून, मिळालेलं सर्टिफिकेट आणि मेडल, शेतावरच्या घरात लवलेलं मामींनी अभिमानाने दाखवलं.

फार्म हाऊसचं तयार झालयं की तुमचं शेतावर.. कित्ती छान वाटतयं... आत्ता गाव सोडून इथेच राहायला येणारं की काय? त्यावर मामा बोलले...

आमचा जास्तीत जास्त वेळ तर इथेच जातो, आम्ही जातो गावात, मात्र वैभ्या काही गावात रमतं नाही.. ते आपला हिथचं राह्यतो...

उन्हाळ्यात मचान वर गादी टाकून, बाहेरचं झोपतो.. दूरच्या मचानाकडे हात दाखवत, मामा बोलले.

बाकी, छान झालयं घर, नुकतचं बांधुन पूर्ण झालेल्या घरावरुन सर्वांनीचं, एक नजर फिरवली.

स्वयंपाक घरापासून सगळ्या सुखसुविधा, घरात तयार केल्याचं मामी अभिमानाने सांगत होत्या.

हातचं सोडून पळत्याच्या मागं धावायचा स्वभाव नाही वैभवचा, मामींच्या शब्दाशब्दात पोराबद्दल अभिमान व्यक्त होत होता.

टिम -भंडारा

-©®शुभांगी मस्के...



🎭 Series Post

View all