तु मला मी तुला भाग ४

Mahervashin Ali Ghara Tochi Diwali Dasra

कथेचे नाव : तू मला मी तुला


विषय : सामाजिक कथा

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

भाग : ४

चिमण्यांची चिवचिव, कोकीळेचं मधुर गुंजन मधुनचं दुरवरुन मोर केकावण्याचा आवाज कानी पडत होता. झुळझुळ वाहणा-या वा-याच्या तालावर, उन सावल्यांशी लपवाछपवी करत, दोघींनी मनसोक्त फोटो सेशन करून घेतलं..

कुठे ते कॉक्रिटचं जंगल आणि कुठे हा मनाला भूरळ घालणारा आसमंत... सुख म्हणजे हेच.. अदिती आणि रिया दोघीही, वा-याच्या तालावर गर गर गिरक्या घेत होत्या..

पंछी बनू उडके चलू, मस्त गगन मे आज मै आजाद हू!! दुनिया के चमन मैं.... दोघीही हातात हात घालून, इकडून तिकडे मनसोक्त हुंदडत होत्या.

ये चला गं पोरींनो... बसा बरं उशिर होतोय... रियाच्या आईच्या हाकेवर दोघी ही कारमध्ये बसल्या.

काय नशिबवान यार ही लोक!! एवढ्या छान वातावरणात रहायला मिळतं ह्यांना... कशाच्या मागे धावतोय आपण, सगळंच असूनही काहीच नसल्या सारखं वाटतं राहातं, समाधान नावाला नसतं, हसता हसता बोलताना अदितीचा सुर किंचीत नाराज जाणवला.

तिच्या बदललेला मुडचा अंदाज घेत रिया बोलली, चँलेंजेस तर ह्यांच्याही आयुष्यात असतातच गं, वाटतं तेवढं इथल्या लोकांच ही आयुष्य सोप्प नसतं. चँलेंजेस चं स्वरुप थोड्याअधिक प्रमाणात वेगळं असेल एवढाच काय तो फरक.. रिया..

तुला कशी भुरळ पडली ना ह्या सगळ्या वातावरणाची, तसाच आहे.. माझा वैभव दादा.. उच्चशिक्षित आहे, एका मोठ्या कंपनीत नोकरी चालून आली होती, पण लागलेली नोकरी लाथाडली त्याने, स्वेच्छेने शेतीकडे वळला, ह्याच हिरव्या निसर्गाच्या वेडात आहे तो... रिया तिच्या मामेभावाबद्दल बोलत होती.

कार मोठ्या कमानीच्या आत गावात शिरली आणि घरासमोर येवून थांबली, तशी मामी घरातून तांब्याभर पाणी, लगबगीने घेवून बाहेर आली.

घ्या ताई .. पाय धुवा.. म्हणत मामींनी, अगदी हक्काने, तांब्याभर पाणी, रियाच्या आईच्या पायावर सोडलं, "माहेरवाशिन आली घरा तोची दिवाळी दसरा".. म्हणत पाय हातांनी चोळून, पदराने पुसून नमस्कार ही केला.

"साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा असतं मामी ते"..रिया बोलली... हो बाई रिया.. पण माहेरवाशिण ज्या समाधानाने माहेरी येते, ते समाधान साधु संताच्या चेह-यावरच्या समाधानापेक्षा वेगळं कुठे असतं..

मामीच्या बोलण्यावर रियाने हलकेच मान डोलावली, बघता बघता, मामीने रियाचे ही पाय धुवून दिले. अदितीने हा प्रकार कधिच बघितला नव्हता, ती सगळं आश्चर्यचकित होवून बघत होती....

अगं हे असचं आहे! मामीची भाच्ची ना मी... भाचीची सेवा केली की साताजन्माचं पुण्य लाभतं, म्हणे हिला... मग मी कशाला पुण्याच्या आडे येणार, धुवून घेते मी ही हिच्याकडून पाय आणि मिळू देते हिला हिच्या वाट्याचं पुण्य.. रिया हसत हसत बोलली.

मामीने, तांब्याभर पाणी समोर धरत, अदितीला ही पाय धुण्याचा आग्रह केला.. नाही नाही म्हटलं तरी मामींनी, पाहुणी आहेस म्हणत, तिचे ही पाय धुवून दिलेच..

खांद्यावरचा पदर, डोक्यावर सरकवत, मामींनी रियाच्या बाबांना, ही पाय धुवायला पाणी दिलं..  


कोप-यात उभी असलेली एक खाट, मामांनी पाडली... मामींनी आतल्या घोडशीवरची गादी, आणि त्यावर झटकून, एक नवी चादर अंथरली आणि निवांत बसायसाठी जागा करुन दिली.


अदिती आणि रिया मोठ्या दिमाखात... खाटेवर बसल्या. ही माझी मैत्रीण.. अदिती... रियाने अदितीची ओळखं करून दिली.


ही आहे होय अदिती, लहानपणी एक दोनदा बघितलं होतं, तुमच्या घरीचं... आमची रिया खूप सांगते बरं का तुह्या बद्दल, मामी अदितीकडे बघत बोलल्या.

आत्ताही सोबतच शिकता का? मामींनी विचारल्यावर अदितीने होकारार्थी हलकेच मान डोलीवली.

मामी मी शिकतेय अजून, मँडमला कंपनीत नोकरी लागलीय... रियाने अदितीबद्दल मामींना सांगितलं..

आलमारीत ठेवणीतले नविन ग्लास आणि ट्रे काढून सर्वांना प्यायला पाणी दिलं लागल्या हाती, मामीने गँसवर चहाचं अंधण ठेवलं...

मामीने लगबगीने कुणाचा तरी टिफीन भरायला घेतला, हा एवढा पाच खणाचा टिफिन गं कुणासाठी? रियाने विचारलं.

दसरथ अन् धुरपदा, वावरात राबणारा गडी माणूस.. पोरीची डिलेवरी झाली, जूळे पोरं झाले, नाजूक हायेत तब्बेतीनं.. दोन्ही नातू दवाखाण्यात भरती हायेत.

धुरपदा, घर पाहिन का दराखाना, बाळंतपणाच्या घरात आला गेला पै पाहूना सुटत नाही.. म्हणलं.. धुरपदे, तू आपल्या बाळ बाळंतीनीकडं पाह्य, मी खाण्यापिण्याच पाह्यतो.

जावई बी आलाय, म्हटलं मीच, धाडत जाईन डब्बा, तू नको घेवू टेंसन... बोलता बोलता मामीने टिफिन भरला आणि लागल्या हाती कुणाच्या तरी हाती देवून पोचता ही केला.


रोजच असे दवाखाण्याचे डब्बे पोहचवणं म्हणजे त्रासच ना गं... रिया, कपाळावर आठ्या उमटवत बोलली.

वेळे वेळेला महत्व असते व बाई. दोन काम जास्ती केल्यानं झिजते का माणूस... रियाच्या बोलण्यावर मामीने उत्तर दिलं.

कोप-याकोप-यातली एक एक गोष्ट, रियाची आई निरखून बघत होती. भिंतीवर टांगलेल्या, आईवडिलांच्या फोटोवर नजर स्थितारावली, तसं त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं.

त्यांनी हळूच पदराने डोळे पुसले... कित्ती वर्ष झाले तरी, माहेरची आसं काही सुटतं नाही. माहेर ते माहेर, त्याची सर कशाला नाही, अदिती आणि रियाकडे बघत त्या पुटपुटल्या.

माहेरपणाचं सुखं ही मिळण नशिबातचं हवं असतं, एकाच शहरात राहून आस्थाताईला लग्नापासुन साध दोनचार दिवस माहेरी रहायला येता ही आलं नाही, आस्थाच्या विचाराने, अदिती क्षणभर अस्वस्थ झाली.


भरपूर दूध टाकून मामींनी छान, वेलची टाकून गाढा गाढा चहा बनवला, भरपूर दुध टाकून केलेल्या, बासुंदी चहाची चवं कित्येक वेळ जिभेवर रेंगाळत होती.

कोण्या गावचं पाव्हणं? दारात मोठी गाडी उभी दिसली, तसं कुणीतरी दारातून डोकावलं.. पाव्हनी नाय माय, घरची पोरगी हाय? मामी बोलली.. मामीने म्हाता-या आजीला ही बशीत सांडेस्तोवर चहा दिला..

मामा आणि रियाचे बाबा, बाहेर कडूलिंबाच्या झाडाखाली छान निवांत गप्पा मारत बसले. गावातला आला गेला, येता जाता नमस्कार करुन अदबिन येवून, ख्यालीखुशाली विचारुन क्षणभरं थांबून इकडली तिकडली चौकशी करुन, जात होता.


नाही नाही म्हणताना, मामीने पाहूण्यांसाठी छान काही तरी स्पेशल बेत केल्याचं, तिच्या लगबगीवरुन दिसतं होतं. एकीकडे गप्पा तर एकीकडे मामी आपल्या चं कामात व्यस्त होती.

पोरी होत्या हाताशी, तोवर बरं होतं..... कष्ट करुन हे शरीर तरी किती साथ देईल... दुख-या गुढघ्यांवर हात फिरवत, मामी बोलली...


सुन घेवून ये मग आता... उरकून टाक ह्यावर्षी लग्न.. वैभवच्या लग्नाचा विषय निघालाच. वैभव दा, दिसत नाही गं, रियाने विचारलं.

बाहेर गेलाय, दुपारपर्यत येतो म्हणे.. वावरात, झाडाले झोपाळा टांगलाय बरं का, तुह्यासाठी... इथलं आवरलं, जेवनखाण आटोपलं का जावू वावरात.. मामी बोलली

ओ, वैभ्याची माय!! पावकभर दूध हाये का.. मोठ्या आशेनं, हाती दुधाचा ग्लास घेवून कुणीतरी मामीच्या दारावर धडकलं होतं.

कडेवरचं पोरगं, तासभरं खाली मातीकुतीत खेळून, कपभरं दुध पिवून, ग्लासभर दुध कुणीतरी माघारी घेवून ही गेलं होतं.

छपरीतल्या पाळण्यावर, हलके हलके, झोके घेत, रिया आणि अदितीच्या छान गप्पा रंगल्या. झोपाळ्यावरच्या अगणित आठवणी सांगण्यात रिया रंगून गेली होती.

मंदार बिचा-याले काहून नाही आणलं, त्याले आवडते म्हणून, पुरण पोळी आणि कटाच्या आमटीचा बेत, आखल्याचं मामी मोठ्या उत्साहात सांगत होती.

मंदिराच्या मागे राहाणा-या, मधुला मामींनी मदतीला म्हणून बोलवून घेतलं होतं. अडल्यानडल्याले हातभार लावाले येते म्हणून मामीने मधुची ओळख करुन दिली.


आता यंदा, दादाच्या लग्नाचा बार, उडवूनच टाक हा मामी!! रियाने वैभवच्या लग्नाचा पुन्हा विषय छेडला.


ह्या हाताचं त्या हाताला कळणार नाही ह्या प्रवृत्तीची, मोठ्या मनाची माणसं, गाव खेड्यात बघायला मिळतात.. गरजूंना अगदी सहज मदत करण्याची त्यांची भावना असते जे शहरात बहुतेकदा बघायला मिळत असं नाही.. काय होणार पुढे, तेव्हा वाचत रहा.. तु मला मी तुला..

टिम : भंडारा
-©®शुभांगी मस्के...

🎭 Series Post

View all