Feb 27, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

तू मला मी तुला

Read Later
तू मला मी तुला
कथेचे नाव : तू मला मी तुला
विषय : सामाजिक कथा
राज्यस्तरीय करंडक कथामालिका
भाग : १

तिथे कशी राहाणार बाळा? सोप्पी आहे का ते? हूशार आहेस, एवढी शिकलीयेस, तिथे राहून तुझ्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही होणार. वरवर सगळ जरी चांगलंचूंगलं दिसत असलं तरी, राहाणीमान, वागण्या बोलण्यावर तुझ्या व्यवहारावर मर्यादा येतील त्याचं काय करणारं आहेस तू?

बाबांच्या बोलण्यावर अदितीने बाबांचा हात हाती घेतला. तुम्हीच आजवर बोलत आलात ना बाबा, सगळचं आपल्या मनासारखं होईलचं असे नाही म्हणून... आई तुच म्हणते ना गं, लग्न म्हणजे तडजोड असते म्हणून.. लग्न जूळवताना किंवा वरसंशोधन करताना थोड्या फार गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतचं म्हणून...

हो बाळा, लग्न म्हणजे कमी जास्ती प्रमाणात केलेली तडजोड असं असल तरी, " स्वत:हून आगीत उडी मारण्यासारखं नाही का होणार ते?" आईने बोलताना डोळ्यांना पदर लावला.

एकदा," दूधाने तोंड पोळले म्हटल्यावर ताक ही फुंकून प्यावे लागणार.. सगळचं, विचारपूर्वक करावं लागणार? तू तुझा निर्णय मागे घे.. बाबांनी सांगितलं.


सभागृहात पहिल्या रांगेत, बाजूच्याच खूर्चीत बसलेल्या आई बाबांना बघून अदितीला पाच वर्षापूर्वी बाबांच्या मनाची हतबल अवस्था आणि त्यांच बोलणं जसच्या तसं आठवलं.

आज, लेकीबद्दल वाटणारा अभिमान, बाबांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. काहीच न बोलता बाबांच्या भावना खूप काही बोलून गेल्या.

मिस्टर अँन्ड मिसेस देवळे... टाळ्यांच्या कडकडाटात, वैभव आणि अदितीला स्टेजवर बोलवण्यात आले. स्टेजवर बसलेल्या अनेक मान्यवर उपस्थितांच्या साक्षीने, दोघांनाही शाल श्रीफळ आणि मानपत्र देवून सन्मानित करण्यात आलं..

गेल्या पाच वर्षात, त्यांनी केलेल्या उल्लेखनी कार्याबद्दल थोडी माहीती देण्यात आली. कृषी क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवाय, आवर्जून सांगण्यात आलं.

वैभव आणि अदितीने केलेल्या, जिवेतोड कष्टाचं चीज झालं होतं.. अदितीच्या तर आनंदाला पारावारचं उरला नव्हता. सगळेच खूप आनंदी होते.

समारंभ छान पार पडला. पुढच्या वाटचालीसाठी सर्वांकडून खूप शुभेच्छा मिळत होत्या. पत्रकार मुलाखती घेत होते.

आत्ता पुन्हा उत्साहाने, ठरवल्याप्रमाणे पुढच्या सगळ्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी, तेवढ्याच ताकदीने, तयारीला लागावं लागणार होतं..

वैभव आणि अदितीच्या कष्टाचं चिज झालं होतं.. आणि तो आनंद दोघांच्याही चेह-यावर ओसंडून वाहत होता.


छान झाला हा कार्यक्रम, सर्वचं कार्यक्रमाचं भरभरुन कौतुक करतं होते.

अगं घरी नाही का चालत, एवढ्या दूर आलीस... घरी चला बरं दोघेही, जेवणखावण करा.. आणि जा आपल्या गावी... अदितीच्या आईने म्हणजे सुमनताईंनी फर्मान सोडलं...

नाही अगं आई, आईदादा डोळयात तेल टाकून वाट बघत असतील आमची. आई तर सारखं आतबाहेर करत असतील, त्यांचे डोळे वाटेकडेच लागून असतील बघ..

दादांना थोडं बरं नव्हतं, त्यामुळे आईला ही कार्क्रमाला येता आलं नाही. पुढच्या आठवड्यात येण होईलचं बहूतेक, तेव्हा येते हं घरी, पुढल्या आठवड्यात दोघांचं ही मेडीकलं चेकअप आहे, लक्षात आहे ना... तेव्हा येते! आईच्या हातात हात देत, अदितीने आईकडे आश्वासक नजरेने बघितलं..

माहीती होतं, लेकीचा काही भरवसा नाही, तुझं काही खरं नाही, घे ओल्या नारळाच्या करंजा आवडतात ना तुला... आनंदाची बातमी ही दिलीस तू, तोंड गोड कर म्हणत, सुमनताईंनी खांद्यावरच्या बँगमधुन ओल्या नारळाच्या करंजीचा डब्बा काढला.

त्यातली एक करंजी काढून अदितीला आणि एक जावयाला स्वत:च्या हाताने भरवली. बाकी उरलेल्या करंज्यांचा डब्बा अदितीच्या हाती देत सुमनताईंनी घरी आई दादांना दे म्हणून आवर्जून सांगितलं

द्या बाबा, तुमच्या गाडीची चाबी, गाडी काढतो, म्हणत वैभवने वसंतरावांची गाडी पार्किंगमधून काढायला मदत केली.


सर्वांचा निरोप घेवून, अदिती आणि वैभवची कार गावाच्या दिशेने निघाली.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या हिरव्या गर्द झाडांमधून, गार हवेच्या हिंदोळ्यावर... खिडकीतून येणा-या थंड हवेच्या झोक्यांना झेलत प्रवास सुरु झाला..

हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफल करा मस्तीने
मन सरगम छेडारे... जीवनाचे गीत गावे!!

कारमध्ये गाणं सुरु होतं.. गेअरवर असलेल्या, वैभवच्या हातावर, बाजूच्या सीटवर बसलेल्या अदितीने, अलगद् हात ठेवला, दोघांची बोट एकमेकांच्या बोटांमध्ये गुंफत गेली...

काय मँडम काय विचार आहे, समोरुन जरासं लक्ष अदितीकडे वळवत, वैभवने विचारलं.. ओठांवर हलकंसं स्माईल देत, तिने त्याच्या हातावर ठेवलेली बोट पुन्हा घट्ट केली..

काही नाही!! म्हणत हलकेच मान डोलावली, दोघांची बोटं आत्ता एकत्र, गेअरवर फिरु लागली.

आयुष्य हे असचं असत... ह्या आडमार्गी रस्त्यासारखं, दूरवरची वळण, वळणावरचे स्पिडब्रेकर, खाच खळगे, पार करत प्रवास करायचा आणि सुनिश्चित जागी पोहचायचं.
प्रसंगी हेच गेअर आयुष्याला मार्गस्थ करतात. अदितीच्या बोलण्यावर वैभवने होकार भरला.

Thanks dear... Thank you soo much म्हणत, गुंफलेल्या हातांची बोटं वैभवने अधिकच घट्ट पकडली. अदितीच्या ओठांवर हलकचं स्मित आलं.

कोण होते रे मी?
एक सर्वसामान्य घरातली, अगदी साधीशी मुलगी... आयुष्याकडून फार काही अपेक्षा नव्हत्याचं कधी.. इमाने इतबारे सरकारी नोकरी करणा-या आईवडिलांची मुलगी...

मन लावून अभ्यास करायचा, शिक्षण संपवायचं, नोकरी आणि आणि लग्न, लग्न करून छान राजाराणीचा संसार थाटायचा, एवढं स्वप्न होतं फक्त माझं... ती गालातल्या गालात हसली.

मी तरी कोण होतो गं.. शेतकरी कुटुंबातला एक साधा मुलगा. ज्याचं लग्नाचं वय उलटून जात होतं तरी, कुणीच मुली द्यायला तयार नव्हतं..
तू आयुष्यात आलीस आणि आयुष्याचं सोन झालं... वैेभव बोलता बोलता हसला.

तु मला मी तुला गुणगुणू लागलो
पांघरु लागलो.. सावरु लागलो
नाही कळले कधी, जीव वेडावला
ओळखू लागले तू मला मी तुला
नाही कळले कधी..
तु मला मी तुला...

वैभवने, गाण्याचा सुर पकडला आणि गाऊ लागला... वैभवचं हे अतिशय आवडतं गाणं... पहिल्या रात्री आपल्या सुरेल आवाजात हेच गाणं गावून, स्वभावात किंचीतही दिखावूपणा नसलेला वैभव स्वभावाने, मनाने अतिशय रोमॅन्टिक असल्याची अनुभूती अदितीला झाली होती.

त्याचं आठवणींत, अदिती पुन्हा एकदा मोहरली... काहीही!! हं.. अदिती गालातल्या गालात हसली, तिच्या गालावरची खळी अधिकच खुलली.

"तुझ्या गालावरच्या, ह्या खळीत डुबायचयं यार मला!" काही ही!! वैभवच्या बोलण्यावर, दोघेही एकमेकांकडे बघून खळखळून हसले...

गावाला पोहचायला पाऊन तास तरी लागणार होता.. आल्हाददायक वातावरणाच्या साक्षीने प्रवास सुरु होता.

वसंतराव आणि सुमन ह्यांना दोन मुलीच... आस्था आणि अदिती. मुलगा नाही, म्हणून.. नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा दोन मुलींनाच चांगल शिकवून सवरुन मोठ करायचं, हाच ध्यास वसंतराव आणि सुमनताईंनी बाळगला होता.

पांघरुन पाहून पाय पसरावे, ह्या विचारांचा प्रभाव असल्याने.. मनसोक्त स्वच्छंदी असं बालपण आणि सुख संपन्न असं तारुण्य, दोघींना ही लाभलं होतं. घरातलं शेंडेफळ म्हणून अदिती जरा जास्तीच लाडात वाढलेली होती.


वसंतराव आणि सुमनताईंची मोठी मुलगी, आस्था अभ्यासात खूप हूशार, एकपाठी होती.. इंजिनिअरिंग आणि त्यानंतर एम. टेक करुन ती एका कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून रूजू ही झाली. आस्था आपल्या पायावर उभी झाली आणि तिच्यासाठी वर संशोधनाला सुरवात करण्यात आली.

रंग गोरा, नाकीडोळी दिसायला खूप सुंदर, तिचे पाणीदार डोळे आणि त्यावर काजळ, लांब सडक केसांची तिची वेणी, रोजच्या साध्या तयारीत ही आस्था खूप सुंदर दिसायची.

लेक्चरर असल्याने, कॉलेजमध्ये रोज साड्या नेसाव्या लागत होत्या. शिफॉन साडीत सडसडीत बांधा तिच्या सौदर्यात अजूनचं भर घालत होता. कडक कॉटनच्या साड्या नेसायला तिला खूप आवडतं होतं..

मुलगा बघायला येणारं म्हणून... आज घरी सगळेच उत्साहात होते, पहिल्यांदाच आस्थाला, बघायला पाहूणे येणार होते. सुमनताईंनी कपाटातली सुरेख, इरकल बॉर्डरची साडी आस्थाला नेसवली होती..

लांब सडक केसांवर छोटासा अबोलीचा गजरा ही आस्थाने माळला.. गळ्यात सुंदर मोत्याची माळ आणि कानात मोत्यांचे स्टट्स, हातात मँचींग बांगड्या घातल्या, साध्याशा तयारीत आस्था महालक्ष्मीसारखी दिसत होती.


चहापोह्यांचा कार्यक्रम झाला आणि आस्थाला प्रश्न विचारण्यासाठी पाहूण्यांनी समोर बसवलं.

घरात बसलेल्या बायका, घरातली एक एक वस्तू, घरात रचून ठेवलेली मांडणी तिक्ष्ण नजरेने न्याहाळात होत्या.

मुलाकडच्या मानवाईक नातेवाईकांपैकी... सुटाबुटातला एक जण मधूनचं बोलला "भाऊ नाही तुम्हाला.... दोघी बहिणीच तुम्ही".

हो, आस्थाने हलकेच होकारार्थी मान डोलावली...

दोघी बहिणींच्या लग्नानंतर, समजून घे.... तुझ्या आईवडिलांच्या स्वास्थ्यासंबंधी तक्रारी वाढल्या आणि तुझी इकडे ही गरज आहे आणि तिकडे सासरी ही तुझ्यावर सासूसास-यांची, संपूर्ण घराची जबाबदारी आहे.. कुणाला प्राधाण्य देशिल?

अशा अनपेक्षित प्रश्नाचं उत्तर देताना... आस्था भांबांवली... किंचित विचार करुन म्हणाली... मला दोन्हीकडच्या जबाबादा-या सांभाळाव्या लागतील.. घरातल्या सर्वांची साथ मात्र महत्वाची असेल.. सासरची जबाबादारी सांभाळताना, आईवडिलांचा सांभाळ हे सुद्धा माझं कर्तव्यच आहे..

माझ्या सासरच्यांची काळजी जशी माझी जबाबदारी त्याप्रमाणे माझ्या आईवडिलांची काळजी ही जावयाची ही जबाबदारी असावी, असं मला वाटतं, आस्थाने उत्तर दिलं..

काय होईल पुढच्या भागात..
येईल का, बघायला आलेल्या पाहुण्या मंडळीकडून होकार की येईल नकार.. वाचत रहा.. तू मला मी तुला...

तू मला मी तुला!! कथेतून सामाजिक विषय हाताळण्याचा छोटासा प्रयत्न केलाय... कसा वाटतोय ते नक्की लाईक आणि कमेंट करुन सांगा.. तुम्हाला आलेले अनुभव ही वाचायला आवडतील.
कथामालिका लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे चूका पोटात घ्या. वाचक मित्र मैत्रिणींनो तुम्ही दिलेल्या सुचनांचे स्वागतच असेल.

क्रमश:
टिम : भंडारा
-©®शुभांगी मस्के...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//