तू कृष्णसखा

Meera an ticja pati avak houn doctranche bolne fakt aikat hote.

       
   "तुमच्या सोबत कोण आलंय? बोलवा त्यांना आत."
डॉक्टरांनी असं म्हणताच खरंतर तिच्या काळजात धस्स झालेलं.
तरी तिने सोबत असलेल्या नवऱ्याला आत मध्ये बोलावलं.


आज परत येताना तिचे पाय खरं तर लटपटत होते. नवरा आत आला आणि आता डॉक्टर नेमके काय  सांगतात  ह्यासाठी तिने धीर एकवटला.


"हे बघा, यांना तपासल्यानंतर अजून थोड्या काही तपासण्या करून घ्याव्या असे वाटले. त्यामुळे यांची कन्सेंट घेऊन मी पुढच्या टेस्टसाठी सॅम्पल घेतले आहे. त्याचे रिपोर्ट आले की पुढे काय करायचं ते आपण ठरवूयात."


"नेमकं काय असू शकते डॉक्टर?"तिच्या पतीने विचारलं.

"हे बघा रिपोर्ट आल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही. जे काही रिपोर्ट्स येतील त्याच्यावरून आपल्या पुढच्या उपचारांची दिशा ठरेल."


ती आणि तिचे पती घरी परतण्यासाठी गाडीत बसले पण तिचे चित्त काही थाऱ्यावर नव्हते. कसे येथील रिपोर्ट, कोणत्या मोठ्या आजाराची तर ही नांदी नसेल ना? अशा अनेक शंका कुशंकांनी तिचे मन भरून गेले.

घरी आल्यावर यंत्रबत  ती सारे काम करत  होती.रात्री ती नीट झोपू सुद्धा शकली नाही. रात्रभर तिच्या डोक्यात तेच विचार पिंगा घालत होते. नंतरचे दोन-चार दिवसही तिने त्याच अवस्थेत घालवले. सगळं कसं यंत्रवत सुरू होतं.

नकळत मीरा मागच्या काही दिवसांमध्ये  डोकावली....

अलीकडे तिचा पिरेड फारच इरेगुलर झाला होता. अगदी पंधरा पंधरा दिवसांनी येणाऱ्या पिरेडसनी ती फार हैराण झाली होती. मेनोपॉजल स्टेजला होतं कधी कधी असं. असं बऱ्याच जणिंनी तिला सांगितलं होतं. त्यामुळे तिने आधी त्याकडे दुर्लक्षच केलं.


आजपर्यंत अशा तक्रारी तिला कधीच आल्या नव्हत्या. तिची पाळी अगदी नियमित होती. ना कधी पाळी दरम्यान त्रास व्हायचा की ना कधी त्याच्या आधी किंवा नंतर...! पण अलीकडे मात्र अधून मधून पोटात थोडं दुखून यायचं. क्लॉट्स जायचं प्रमाणही फार वाढलं होतं. कधी कधी इतकं ब्लीडिंग व्हायचं की कुठे बाहेर जायची सुद्धा सोय नसायची. पण तेव्हा पाळी मात्र वेळेतच  यायची.

पण  यावेळी सुरू झालेला पिरेड काही थांबायचं नावच घेईना. आज थांबेल उद्या थांबेल असं करता करता वीस  दिवस होऊन गेले. आता मात्र तिचा धीर खचला आणि  ती  गायनॅकॉलॉजिस्ट कडे आली.


तपासताना मॅडमनी तिला कल्पना देऊन बायोप्सी साठी सॅम्पल घेतलं. अन् आता मात्र ती त्याचे रिपोर्ट काय येणार याच विचारात गढली होती.

"मीरा कशाचा एवढा विचार करतेस? तुझ्या मनाची घालमेल समजू शकतो मी.तू झोप निवांत. मी आहे तुझ्यासोबत."तिच्या केसांवरून हात  फिरवत तो बोलला. अन् ती त्याला अजूनच घट्ट बिलगली.


"मॅडम तुमचे रिपोर्ट आले आहेत. रिपोर्ट घेऊन मॅडमला भेटा."
दुसऱ्या दिवशी पुन्हा हॉस्पिटल मधून फोन आला होता.


पुन्हा रात्री नवऱ्यासोबत तिने हॉस्पिटल चा रस्ता धरला. नेमकं काय सांगणार डॉक्टर? पुन्हा तिचं अंतकरण धडधडलं. तिची अवस्था समजून त्यांनी हलकेच तिच्या हातावर आश्वासकपणे थोपटले.


"मला त्यादिवशीच थोडी शंका आली होती कॅन्सर ची पण रिपोर्ट आल्याशिवाय मी काही सांगू शकत नव्हते. रिपोर्ट म्हणावे तितके चांगले नाहीत. सध्या तर   आजार  आटोक्यात वाटतोय . त्यामुळे ऑपरेशन करून घेणे योग्य राहील. ऑपरेशन जितकं लवकर होईल तितकं यांच्यासाठी चांगलं.


"नाही हो मी ऑपरेशन नाही करणार. मला फार भीती वाटते ऑपरेशनची. साधं इंजेक्शन घ्यायचं म्हटलं तरी माझे हात पाय लटपटतात. ऑपरेशन शिवाय होत असेल तर बघा ना डॉक्टर."

खरंच आजवर प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी सोडता इंजेक्शन कधी तिने घेतलं नव्हतं. दोन्ही डिलिव्हरी अगदी नॉर्मल असल्याने ऑपरेशन करायची वेळच आली नव्हती.


झालेल्या  कॅन्सर सारख्या आजारापेक्षाही होणाऱ्या ऑपरेशनच्या भीतीनेच तिला थरथरायला होत होतं. आणि जितक्या लवकर ऑपरेशन होईल ते तिच्या आजाराच्या दृष्टीने बरं होतं.


तिला ऑपरेशन साठी तयार करणे म्हणजे घरच्यांसाठी एक दिव्य होऊन बसलं होतं. तिला कितीही समजवलं तरी तिच्या मनातली भीती काही केल्या जात नव्हती.

तिच्या मनाची अवस्था फारच बिकट झाली होती. अशा  अवस्थेत  तिने तिच्या मैत्रिणीला फोन लावला "सरला काय करावं ग? डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले मला."

तिचं बोलणं ऐकून मैत्रिणीला हसावं की रडावं ते कळेना. कॅन्सर सारखा आजार झालाय त्याचे टेन्शन घेण्या ऐवजी हिला ऑपरेशनचं टेन्शन आलं आहे.

"मीरा तुझ्या नावातच मीरा वसते बघ. आणि त्या मिरेचा सखा कृष्ण तुझा सुद्धा *कृष्ण सखा* आहे ना. मिरेच्या वाट्याला आलेला हलाहलाचा प्याला त्यानी पिऊन टाकला ना तसंच तुझ्या वाटेला आलेलं हलाहल सुद्धा तोच पचवेल बघ. त्याच्यावर सारं सोपवून तू मोकळी हो बरं.
अग तुला भीती वाटली काय अन् न वाटली काय, ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय शिल्लक आहेच कुठे? त्यामुळे त्याचं नाव घ्यायचं आणि जे आहे त्याला सामोरे जायचं."

ही मात्रा मात्र अगदी लागू पडली अन् मीरा ऑपरेशन साठी कशीबशी तयार झाली. आता पर्यंत तर ऑपरेशन चीच भीती वाटत होती पण तिच्यावर कशीबशी मात करायची हिम्मत आणली तर आपल्याला कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने पोखरून काढलंय  या जाणिवेने मनावर पुन्हा काजळी पसरायला लागली तिच्या. पण लवकरच ऑपरेशन करायचं ठरल्याने  या सगळ्याचा विचार करायला तिच्या जवळ अजिबातच वेळ नव्हता.

 लगेच  ओन्को  सर्जन ची अपॉइंटमेंट घेऊन तारीख निश्चित केली गेली.अगदी एक दिवसानंतर ची तारीख त्यांनी दिली. त्यांनी सुद्धा मीरा ला आश्वस्त केले. वरवर ती आश्वस्त वाटत असली तरी आतून मात्र सर्जरी अन् कॅन्सर सारख्या आजाराचं  भय तिला पोखरत होतं अन् ते अगदी साहजिक होतं. कॅन्सर सारखा आजार  म्हटलं की जिथं भल्या भल्यांच्या तोंडचे पाणी पळते तिथे मीरा सारख्या सामान्य स्त्रीची काय कथा..!


सर्जरी चा दिवस उगवला.  मोठ्या हिमतीने ती तयार झाली. पूर्ण घराचा कोपरा अन् कोपरा मनात साठवून घेतला. पोरांच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांना जवळ घेतले. एकदा नवऱ्याच्या कुशीत शिरून स्वतः ला रितं करून घेतले. त्याचा स्पर्श आश्वासक होता पण तिचं मन मात्र तिचीच ग्वाही देत नव्हतं . डोळ्यात आलेलं पाणी निकराने परतवत  तशीच देव्हाऱ्यासमोर उभी राहिली. गाभाऱ्यातील कृष्ण सख्याकडे क्षणभर पाहिलं अन् आता पर्यंत मनात साचलेले मळभ अचानक सरले. तो नटखट माखनचोर हसून तिला अगदी आश्वस्त करत असल्याचा भास तिला झाला.
" देवा तू ना गूढ,गहन आहेस. तुझ्या मनात  नेमके काय आहे ते ,तुझी लीला तूच जाणे. माझा सारा भार तुझ्या चरणावर टाकून जातेय,तू  तार नाहीतर मार..!" मनातच त्याच्याशी संवाद साधत तिने त्याच्या पायावर डोके ठेवले  अन् ती निघाली. तिच्या चेहऱ्यावर विलसणारा निग्रह पाहून पती अन् लेकरं सुद्धा चकित झाली.


हॉस्पिटल मधे गेल्यावर  नवऱ्याने धीर देण्यासाठी तिच्या हातावर हलकेच थोपटले....
"तुम्ही नका काळजी करू ,मी सगळं माझ्या आराध्या वर सोपवून आलेय पुढे जे होईल ते त्याची मर्जी."
तिचं बोलणं ऐकून खरं तर तो अवाक झाला पण तिचा विश्वास त्यालाही थोडं बळ देऊन गेला. वरवर तिला सावरणारा तो स्वतः सुद्धा आतून डगमगला होता पण उसने अवसान  आणल्याचा मुखवटा धारण करून होता.


ऑपरेशन च्या आधीची पूर्व तयारी सुरू झाली. ओ टी चा गाऊन तिच्या अंगावर चढला अन् वॉर्ड बॉय व्हील चेअर  बसवून तिला आत घेऊन गेला.


आत ओ. टी ची टीम पूर्वतयारी सह सज्ज होती, अनेस्थेटिक  सर तिच्याशी गप्पा मारत तिला रिलॅक्स करायचा प्रयत्न  करत होते.  सर्जन सर अवघ्या काही वेळात तिथे पोचणार होते.


काही वेळात सर्जन पोचले . गप्पा मारत त्यांनी तिला नाव विचारलं .
" मी मीरा ..!" ती म्हणाली

" अरे वा! तुम्ही मीरा आणि मी डॉ. गिरिधर म्हणजे काही चिंताच नको. आता तुमचे पुढचे काही क्षण माझ्या हातात असतील त्यामुळे स्वतः ला माझ्यावर सोपवून तुम्ही अगदी रिलॅक्स व्हा. डॉ. गिरिधारी म्हणताच तिला नवा हुरूप आलेला आणि त्यांचं बोलणं ऐकलं अन् स्वतः ला त्या कृष्ण सख्याच्या स्वाधीन करून ती मोकळी झाली.


एवढी मोठी सर्जरी झाली तरी तिला तो अनाहत वेणूनाद सुरू आहे आणि कुणीतरी अलगद मोरपीस फिरवून आपल्याला बरं करत आहे अशीच जाणीव तिला होत राहिली.

ऑपरेशन अगदी व्यवस्थित पार पडले अन् सगळ्यांच्या मनावरचा ताण अगदी हलका झाला.


दुसऱ्या दिवशी डॉक्टर राऊंड ला आले तेव्हा त्यांचा हात स्लींग मधे अडकलेला बघून ती चकित झाली. 

"डॉक्टर हे कधी अन् कसं काय झालं तुम्हाला??" न राहवून तिने डॉक्टरांना विचारलं.


"अहो  काल सकाळी  तुमच्या ऑपरेशन साठी घरून निघालो तेव्हा वाटेत एका जणा ने गाडी ला एका साईड ने ठोकले. फ्रॅक्चर नाही पण हाताला मार आहे." डॉक्टर बोलले.


"सर, अशा अवस्थेतही तुम्ही माझं ऑपरेशन केलं?" तिने आश्चर्याने विचारले


" नाही मॅडम तुम्ही फार लकी आहात. काल अचानक माझा मित्र जो अमेरिकेत प्रख्यात कॅन्सर सर्जन आहे तो  भेटायला  आला होता. त्याचं येणं अगदी अनपेक्षित होतं माझ्यासाठी. पण तुमच्या सर्जरी ची डेट आधीच ठरलेली अन् निकडीची सर्जरी. त्यामुळे तोच म्हणाला की मी तुझ्यासोबत येतो आपण वेळ मिळेल तशा गप्पा मारू. वाटेत येतांना  एका जणाने गाडीला ठोकलं ते ही माझ्याच बाजूने त्यामुळे  माझा हात जायबंदी झाला. आता काय करावं अशा संभ्रमात मी होतो.पण निकड ओळखून त्याने ऑपरेशन करायची तयारी दाखवली."


"खरं तर तुम्ही फारच लकी आहात तुमचं ऑपरेशन जरा किचकट च होतं पण त्याच्या सरावलेल्या हातांनी इतक्या सराईतपणे ते केलं की मी बघतच राहिलो.  मला सुद्धा नव्याने शिकता आलं त्यातून. डॉ. गिरिधर त्याचे नाव!"

मीरा अन् तिचे पती अवाक होऊन डॉक्टरांचे बोलणे फक्त ऐकत राहिले....

" पुन्हा मीरा च्या डोळ्यासमोर डॉक्टरांचा चेहरा तरळला. आता तर त्या जागी तिला तिचा हसरा, नटखट कृष्णसखाच दिसू लागला. नकळत तिचे हात जोडले गेले. 
"तुझी लीला अगाध परमेश्वरा ,तू कधी कोणत्या रूपात येऊन या मीरेच्या वाट्याला आलेले हलाहलाचे घोट पचवत राहशील ते तुझे तुलाच ठाऊक...!" म्हणत मीरा पुन्हा तिच्या कृष्ण सखा च्या चिंतनात तल्लीन झाली.


© मुक्ता बोरकर - आगाशे
 मुक्तमैफल