तू जिथे मी तिथे अखेरचा भाग

Love story

मनोहर जगात आपण सर्व गोष्टी कंट्रोल करू शकतो पण प्रेमाला आपण नाही कधीच कंट्रोल करू शकत .

रेवती मग यावरचा उपाय काय ? तुला जे वाटतंय ते सुचव. मी ते मान्य करेन. अर्थात तुला तुझा संसार आहे. तुला माझ्याहून जास्त जबाबदाऱ्या आहेत सो मी फार फोर्स नाही करणार तुला..

मनोहर माझ्याकडे आत्तातरी एकच ऑप्शन आहे..

रेवती कोणता ?

मनोहर पुन्हा एकमेकांशी मैत्री न करणं..

रेवती अरे पण त्याने माझं काय होईल याचा विचार कर ना !

मनोहर तू आत्ता जस्ट १ सेकंदापूर्वी बोललीस ना की तुला माझं मत मान्य असेल म्हणून.

रेवती - हो‌ . हो. ओके सॉरी.. मी जरा जास्तच हायपर झाल्ये..

मनोहर शांत हो.

रेवती रडणं थांबवत बोलत होती.

रेवती म्हणजे तू माझ्या आयुष्यातून निघून जाणार का ?

मनोहर पूर्णपणे निघून नाही जाणार ..

रेवती म्हणजे ?

मनोहर जशी तुला माझी आठवण येईल तशीच मलाही तुझी आठवण येईल.. तू माझ्या आयुष्यात असशील मी सुद्धा तुझ्या आयुष्यात असेन पण मित्र आपण आता कधीच नसू कारण आपण स्वत:ला कितीही कंट्रोल केलं ना तरी मैत्रीचं रूपांतर प्रेमात होणार हे नक्की... म्हणूनच आत्तापर्यंत इतकी वर्षे जगत होतो एकमेकांची आठवण काढत तसंच यापुढे जगूयात... आणि हो , माझी बायको नाही येणार तुझ्याकडे. सॉरी‌. आणि मी तुझ्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी सुध्दा येणार नाही..

रेवती तू सगळंच संपवून टाकतोय्स .

मनोहर प्रेमात पडण्यापेक्षा हे कधीही चांगलं. आठवणीत नक्कीच जगू एकमेकांच्या. आत्तापर्यंत मला खूप मदत केलीस , ऑपरेशनसाठी एवढी पैशाची मदत केलीस.. सगळं केलंस याबद्दल मी खूप आभारी आहे. तुझे उपकार आहेत माझ्यावर. तरीही मी किंवा माझी बायको कधीही तुझ्याकडे कामासाठी सुध्दा येणार नाहीत..

रेवती ठिक आहे. मी नाही तुला जास्त समजवत बसणार कारण गोष्टी समजण्याच्या आणि समजवण्याच्या पलिकडे गेल्या आहेत.. मी तुला एक शेवटची रिक्वेस्ट करू ?

मनोहर बोल..

रेवती एक शेवटची मिठी मारू का रे तुला ?

मनोहर जरा विचार करतो. होकारार्थी  मान डोलावतो. रेवती त्याला मिठी मारते. तो तिला मिठीत घेतो‌ . ती डोळे बंद करून त्याच्या मिठीत होती. काही क्षणातच त्यानं तिला बाजूला केलं. हातात हात मिळवला. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. एकमेकांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रेवती – मनोहर वेगवेगळ्या वाटांना निघून गेले. मनोहर रोड क्रॉस करत होता.. तिने वळून त्याच्याकडे पाहीलं.. त्यानेही तिच्याकडे वळून पाहिलं. दोघेही हसऱ्या चेहऱ्याने एकमेकांकडे हात हलवून एकमेकांचा निरोप घेत होते तोच एक गाडी सुसाट वेगाने आली आणि काळाने घाला घातला होता. एका चारचाकीने मनोहरला उडवलं.. मनोहर जागच्या जागी मृत पावला . रेवती हा प्रकार पाहून सुन्न झाली... .ती दोन क्षण तशीच थांबली. रस्त्यावरची आजुबाजूला असणारी माणसं त्याच्या मृतदेहाभोवती जमा झाली होती. रेवतीने तिच्या हातातली बॅग खाली टाकली व ती धावत मनोहर जवळ गेली. मनोहर चं शरीर रक्ताळलेलं होतं. ती खाली बसली.‌तिने त्याचा श्र्वास सुरू आहे ना हे पाहीलं पण श्र्वास केव्हाच बंद झाला होता. समोर एका पावलावर हॉस्पिटल होतं पण आता त्याचा काहीच उपयोग नव्हता... तिने ‘ मनोहर ’ अशी जोरात किंकाळी फोडली .. तशीच रडत राहीली...

काही वर्षांनंतर ...

      एक शांतता लाभलेली खोली .. साधारण ते वाचनालय होतं.. तेथील एका भिंतीवर मनोहर व मनोहरच्या वडीलांचा हार घातलेला फोटो होता. खिडक्यांचे पांढरेशुभ्र पडदे वाऱ्याने उडत होते. त्या एका खोलीत एका म्हाताऱ्या आज्जीचा आवाज घुमत होता. साधारण १०० हून अधिक श्रोते तेथे खुर्च्यांमध्ये बसले होते . ती म्हातारी त्यांच्यासमोर एकटीच बसली होती पुस्तक वाचत.. त्या पुस्तकात तिच्या आयुष्याची गोष्ट गुंफलेली होती.. सगळे श्रोते ती गोष्ट ऐकून निशब्द झाले होते. काही जणं अश्रु पुसत होते..‌ती गोष्ट वाचतच होती. तिचं लक्ष्य त्या पुस्तकात होतं... तिचं म्हणजे रेवतीचं.‌ तिचं वय ६१.

रेवती  मनोहर गेला.. मनोहरचे वडील त्या समोरच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते . तो गेला हे कळताच त्याच्या वडीलांनी सुध्दा प्राण सोडले. आज मनोहर चा दादा , त्याची बहीण त्यांच्या त्यांच्या संसारात सुखी आहेत.. राहीला प्रश्न तो मनोहरच्या बायकोचा , मनोहरच्या मुलांचा.. त्याची बायको आता माझी कामवाली नाही तर आम्ही एकमेकांच्या खूप जवळच्या मैत्रिणी आहोत. आता तिने नुकतीच साठी ओलांडली. माझ्या कंपनीमध्ये काम करत होती. आता तिची मुलं मोठी झाली.. आता मनोहरची बायको घरीच असते आता मनोहरची मुलं माझ्या कंपनीमध्ये काम करतात. मनोहरच्या मुलाचं पुढच्या वर्षी लग्न आहे... कोणाशी माहीत आहे ? माझ्या मुलीशी. माझी कंपनी आता माझी मुलगीच सांभाळते... माझं आणि मनोहरचं ह्या जन्मात जुळलं नाही पण माझ्या मुलीचं व मनोहरच्या मुलाचं लग्न जुळतंय त्यांच्याच मर्जीने ह्यातच आनंद आहे... मनोहरच्या मुलांची आर्थिक परिस्थिती आता चांगली आहे.. मनोहरच्या मुलाने नुकताच ठाण्यात स्वकमाईने ३ बीएचके फ्लॅट घेतला... जसा काळ बदलला तसंच सगळं बदललं... पण एक गोष्ट नाही बदलता आली ती म्हणजे पहिलं प्रेम.... ह्याच पहिल्या प्रेमाच्या आठवणीत मी हे पुस्तक लिहीत होते.. लिखाणाचा माझा तसा पहिलाच प्रयत्न.मनोहर सोबतच्या आठवणींना मी ह्या पुस्तकातल्या कागदांवर कैद केलंय... आज मी माझ्या आयुष्याच्या

रेवती जोरजोरात माईकवर खोकू लागते.. तिच्यातला अशक्तपणा जाणवत होता.. तेथील आयोजकांनी तिला पाणी दिलं.. ती पाणी प्यायली व पुन्हा वाचू लागली...

रेवती आज मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात असताना एक गोष्ट नाही विसरू शकत ती म्हणजे पहिलं प्रेम मनोहर... आयुष्यात आपण गमावून बसलेली प्रत्येक गोष्ट नव्याने कमावता येईल पण पहिलं प्रेम एकदा गमावलं की ते मिळवता नाही येत... सोबत राहते ती फक्त पहिल्या वहिल्या प्रेमाची आठवण...‌

बाहेर जोरदार पाऊस पडू लागला होता... रेवती पुन्हा जोरात खोकू लागते.. पुन्हा पाणी पिते.

रेवती मला आयुष्यभर मनोहर सोबत त्याची मैत्रीण म्हणून का होईना रहायचं होतं. तो जिथे असेल तिथे मी असावी असंच मला वाटायचं.. पण हे वाटणं आमच्या मुंबई गोवा या प्रवासातच शक्य झालं काही तासांपुरतं...‌हेच वाटणं मी ह्या पुस्तकात गुंफवलं. मनोहरला त्या दिवशी मी मारलेल्या त्या शेवटच्या मिठीची ऊब सुध्दा या पुस्तकात गोठून राहील्ये..शेवटी एवढंच सांगू इच्छिते की माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो नक्कीच कुठूनतरी मला पाहत माझ्या ह्या आयुष्याच्या प्रवासात माझी साथ देत असेल.. माझ्या नकळत मी जिथे असेन तिथेच तो नक्की असेल...

तिने पुस्तकातून डोकं बाहेर काढलं. श्रोत्यांशी बोलू लागली‌‌

रेवती आज तुम्ही मी लिहिलेल्या पुस्तक प्रदर्शनासाठी आलात .‌ हा वाचन समारंभ तुम्ही आयोजित केलात त्याबद्दल धन्यवाद ! माझ्या आणि मनोहर च्या प्रेमकथेला तुम्ही अनुभवलं याबाबत मी तुमची ऋणी आहे...

रेवती रूमालाने स्वत:चे डोळे पुसते. पुन्हा खोकू लागते. स्वत:ला सावरते. पुस्तक बंद करते. त्या पुस्तकाचं नाव होतं ‘ तू जिथे मी तिथे ’ रेवती त्या पुस्तकावरून हात फिरवते. सगळे श्रोते उभे राहतात.. टाळ्या कुणीच वाजवत नाही.. सगळ्यांचे डोळे पाणावले होते.. सगळेच जणं टाळ्यांनी नव्हे तर ओघळणाऱ्या अश्रुंतून दाद देत होते.. सगळे निशब्द झाले होते. बाहेर वीजा कडाडू लागल्या होत्या. रेवती खोकतच होती. तिचं खोकणं बंद झालं तेव्हा तिची नजर खिकडीकडे गेली. खिडकीतून तिने आभाळात पाहीलं.. आणि ती तशीच आभाळात पाहत बोलू लागली..

रेवती मनोहर , या जन्मात आपण एकमेकांचे फार काळ नाही होऊ शकलो.. पण पुढील जन्मात मात्र आपण फक्त एकमेकांचेच असू . आता माझी या जन्मातली भूमिका संपणारे.. माझा अखेरचा प्रवास सुरू झालाय.. आता नवा परकाया प्रवेश करून तुझ्यापाशी येणारे. तुझ्यासोबतच राहणार हा मी. तुझी मैत्रीण बनून , तुझं पहिलं प्रेम म्हणून. तू कुठे आहेस आत्ता हे माहीत नाही.. पण लवकरच तू जिथे कुठे आहेस तिथेच मी येणारे... भेटू लवकरच..

रेवती थकलेल्या पण हसऱ्या चेहऱ्याने त्या आभाळाकडे पाहत होती. ती तशीच खुर्चीत स्तब्ध झाली... एक मंद वारा तिच्या अंगावरुन वाहू लागला... श्रोते तिच्याकडे बघत राहीले... तेथील आयोजक तिच्याकडे गेले..

आयोजक मॅडम , मॅडम.. निरोपाची वेळ झाल्ये..

आयोजकाने रेवतीला हात लावला . रेवती खुर्चीतून खाली पडली. तिचे डोळे उघडेच होते. डोळ्यातले अश्रू वाहून नष्ट झाले होते...

आयोजक मॅडम.. ऊठा मॅडम..

आयोजकाने तिच्या हाताची नस तपासली , श्र्वास तिचा बंद झाला होता‌.‌ तिनेही या जगाचा निरोप घेतला होता..‌ सर्व श्रोते तिच्यापाशी गेले... आजूबाजूला रडारड सुरू झाली होती.....

 त्या मृत झालेल्या रेवतीचे डोळे भिंतीवर लटकवलेल्या मनोहरच्या फोटोकडे होते... ती आता त्याच्यापाशी गेली होती .. तिच्या पहिल्या प्रेमापाशी ... जिथे तो तिथे ती.. समाप्त

कथा कशी वाटली ते नक्की कळवा... 

®© पूर्णानंद मेहेंदळे

संपर्क - 7507734527 

रा. - जालगाव , दापोली ; जि. रत्नागिरी.