तू जिथे मी तिथे भाग 11

Love story

मनोहरच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं....

रेवती आणि राहीली गोष्ट ती ह्या प्रवासाची.. मुळात म्हणजे जर माझं शूटींगचं वगैरे काम इथे गोव्यात असतं तर मी फ्लाईटने येऊच शकले असते की... ट्रेन मधून आलेच नसते...

मनोहर मग ट्रेनमधून कशाला आलीस ?

रेवती तुझ्या बायकोच्या कृपेमुळे...

मनोहर म्हणजे ?

रेवती -५ दिवसांपूर्वीच तुझी बायको म्हणाली की तू गोव्याला तुझ्या वडीलांना भेटायला जाणार आहेस ते.. आणि त्यासाठी तिने ऑनलाईन रिझर्व्हवेशन करण्यासाठी रिक्वेस्ट केली होती. मी लॅपटॉप ऑन केला . नंतर तुझं रिझर्व्हवेशन केलं पण नंतर मनात विचार आला की मनोहरला भेटण्यासाठी ही संधी सोडायची नाही.. तुला सरप्राइज द्यायचं... मग मी निशाच्या नकळत माझी सीट सुध्दा रिझर्व्ह केली‌...‌निशाला तुझं तिकीट प्रिंट काढून दिलं आणि माझं तिकीट मी माझ्यापाशी ठेवलं.. मग काय आज दुपारी मी रेल्वेस्टेशन वर ट्रेनची वाट पाहत बसले.. ट्रेन आली . मी माझ्या रिझर्व्ह सीटवर बसले ... माझ्या मुलीला कॉल केला तोच तू मला हवा तसा माझ्या समोरच्या सीटवर दिसलास.. हा. तुझा बदललेला अवतार शॉकींग होता..आणि स्वभाव सुध्दा...

मनोहर म्हणजे ..

रेवती म्हणजे आजची आपली भेट हा योगायोग नव्हता.. आणि तू जेव्हा तिकीट नसल्याचं नाटक करून ट्रेन सोडलीस तेव्हा मीही ट्रेन सोडली याचं कारण तू माझ्यासोबत पुढचे १०-१२ तास का होईना हवा होतास.. हा ते टेकडीवर जाणं वगैरे ते काही ठरवून नव्हतं मी केलं.. पण तुझ्यासोबत घालवलेले आजचे हे क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होते.. आता तुझ्यापासुन सगळं लपवून मी पळूनही गेले असते पण मन खात राहीलं असतं..आणि अजून एक ..

मनोहर आता काय ?

रेवती तू म्हणालास ना की पुढच्या आठवड्यात तुला एका इंटरव्ह्यू साठी बोलावलं आहे... तर ती कंपनी माझीच आहे.. मीच तुला इंटरव्ह्यू साठी बोलावलंय . Ultra industries.. त्याची मी मालकीण.. फिल्म मेकिंग वगैरे मी हौस म्हणून करते.

मनोहर मी काय बोलू तुझ्यासमोर तेच कळत नाहीये..

रेवती मला कोणतीही गोष्ट तुझ्यापासून लपवायची नव्हती.. योग्य संधी मिळाली की सगळं सांगणार होते.

मनोहर पण ही अशी लपवाछपवी का ? कशाला‌ ?

रेवती पहिलं प्रेम...‌

मनोहर बास हा आता . कंटाळा आलाय मला..‌सारखं पहिलं प्रेम .. पहिलं प्रेम.. आय नो की नाही विसरू शकत पहिलं प्रेम .‌पण यासाठी हा बावळटपणा ?

रेवती पहिलं प्रेम माणसाला काहीही करायला भाग पाडतो.. बावळटपणा काय चीज आहे ?

मनोहर हो का ? मग काय केलंस गं मला भेटून ?

रेवती हे १० तास का होईना तुला अनुभवलं ना ! आपल्या या अनोख्या अविस्मरणीय प्रवासाची आठवण हृदयाच्या कप्प्यात दडवता आली.. आणि इतक्या वर्षांनी अश्या रितीने पहिलं प्रेम आणि पहिला मित्र आपल्या आयुष्यात येणं यापेक्षा दुसरं सुख काय मनोहर ? आणि मला आता तुझ्याकडून मला हवा असलेला सर्वात मोठा हक्क हवाय ...

मनोहर हक्क ? कसला हक्क ?

रेवती – offcource तू माझा नवरा नक्कीच नाही बनू शकत पण एक जवळचा मित्र नक्कीच बनू शकतोस ना ? एवढी वर्ष एकटी राहते होते.. मला माझा आधार म्हणून माझी मुलगी होतीच पण मी माझ्या वारलेल्या नवऱ्यापेक्षा पहिल्या प्रेमाला म्हणजे तुला मिस करतो होते. सतत तुला शोधत होते. कधीतरी , कुठेतरी भेटशील या आशेवर मी राहत होते. एके दिवशी मी आपल्या गावी जाऊन , तुझ्या घरात जाऊन तुझी चौकशी केली तेव्हा कळालं की तू मुंबईत आहेस..‌तुझं लग्न झालं हे सुद्धा कळलं.. तुझं लग्न झालं हा माझ्यासाठी धक्काच होता कारण माझा नवरा मेल्यावर तुझ्याच सोबत संसाराचा गाडा ओढण्याची स्वप्न पाहत होते. कोणत्याही मुलाकडे बघितलं सुध्दा नाही. तुझ्या घरच्यांना एवढंच माहीत होतं की मुंबईत तू एका चाळीत राहतोस.. व्यवस्थित पत्ता सुध्दा मिळाला नाही. मी सगळीकडे शोधलं तुला . फेसबुक , इन्स्टा सगळे सोशल मीडिया साईट वर तुला शोधलं पण तू कुठेच नव्हतास.. होत्या त्या फक्त तुझ्या आठवणी. एकत्र समुद्रकिनारी वाळूत किल्ला बनवणं , लगोरी खेळणं , एकत्र कैऱ्या खाणं , खेळताना भांडणं , मी खेळताना पडल्यावर तू मला सावरणं , मी रडताना तू हळूच तू माझे डोळे पुसणं , तू मला शिकवलेली सायकल , सायकल शिकवता शिकवता तुझा मला होणारा अलगद नाजूक स्पर्श , शाळेतून घरी येताना चिंब पडणारा तो पाऊस , त्या चिंब पावसात एकमेकांना भिजलेलं पाहणं , त्या एका छोट्याशा छत्रीतून एकत्र जाणं , मी तुला चिडवल्यावर माझ्यावर रागावणारा तू , मी तुझ्या घराच्या समोरून जाताना मला दाराच्या आड लपून पाहणारा तू , तू हसताना तुझ्या गालावर उमटलेली आपल्या मैत्रीची एक गोड खळी.

मनोहरच्या डोळ्यांसमोरून या सर्व आठवणी एका क्षणात निघून जातात. मनोहर हळवा होतो.

रेवती काय झालं ? तुलाही आठवलं ना हे सगळं ?

मनोहर हं.

रेवती या सर्व आठवणींना उराशी बाळगून जगत्ये मी . उणीव आहे तुझी. मला माझ्या आयुष्यात तुझी एक चांगला मित्र म्हणून गरज आहे रे . तुला भेटून हे सांगण्यासाठी हा असा विलक्षण प्रवास.. मला वाटलं की कदाचित तू माझ्या आयुष्यात येणार नाहीस म्हणूनच हे १०-१२ तुझ्या सोबत राहीले हेच समाधान ! तुला प्रत्यक्ष पाहिलं , प्रत्यक्ष भेटले.. मी फक्त तुला इतकीच रिक्वेस्ट करते की , प्लीज माझ्या आयुष्यात माझा एक हक्काचा जिवलग मित्र म्हणून पुन्हा परत ये.. मान्य आहे मला की आपण आता एकमेकांच्या प्रेमात नक्कीच नाही पडू शकत.. पण एकमेकांचे चांगले मित्र नक्कीच होऊ शकतो ना ? आर्थिक परिस्थिती माझी चांगली आहे रे पण मानसिक परिस्थितीचं काय ? मला मानसिक आधाराची खूप गरज आहे.. तूच हे करू शकतोस.. आपण पुन्हा  एकदा काळानुरूप बदल करून एकमेकांचे चांगले मित्र नक्कीच बनूयात ना ?

मनोहर तिच्या डोळ्यात पाहत उभाच होता..

रेवती असा का पाहतोस ? मला मान्य आहे की मी तुझ्यापासून गोष्टी लपवल्या याचा तुला राग आला असेल ना ? सॉरी. खरंच सॉरी. याबद्दल जमल्यास माफ कर हा प्लीज.. तुला भेटण्यासाठीचा माझा मार्ग चुकीचा असेल पण स्वच्छ , निर्मळ भावनेने तुला भेटले , माझ्या मनातलं सांगितलं. तू माझ्या या मैत्रीच्या ऑफरवर तुला हवा तेवढा विचार कर .. जर तू हो बोललास तर आपण नव्या प्रवासाची सुरुवात नक्कीच करू शकतो..

मनोहर आपण एकमेकांचं पहिलं प्रेम आहोत  जर काही काळ उलटून गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो तर ? एकमेकांना फक्त मैत्रीच्या नात्यात अडकवून घेऊ शकतो ? नव्याने प्रवास करणं हे बोलणं सोपं आहे पण प्रवासाची सुरुवात प्रत्यक्ष करणं हे कठीण आहे..

रेवती तुला काय म्हणायचंय ते कळतंय मला . आपण एकमेकांसाठी दोघंही पहीलं प्रेम आहोत त्यामुळे प्रेमात पुन्हा पडण्याची शक्यता जास्त आहे .. आपण ही गोष्ट कंट्रोल करूच शकतो ना ?

मनोहर जगात आपण सर्व गोष्टी कंट्रोल करू शकतो पण प्रेमाला आपण नाही कधीच कंट्रोल करू शकत .

रेवती मग यावरचा उपाय काय ? तुला जे वाटतंय ते सुचव. मी ते मान्य करेन. अर्थात तुला तुझा संसार आहे. तुला माझ्याहून जास्त जबाबदाऱ्या आहेत सो मी फार फोर्स नाही करणार तुला..

मनोहर माझ्याकडे आत्तातरी एकच ऑप्शन आहे..

रेवती कोणता ?

क्रमशः 

रेवती मनोहर शिवाय राहू शकेल का ? वाचा अखेरच्या भागात... 

®© पूर्णानंद मेहेंदळे