तू जिथे मी तिथे भाग 10

Love story

मनोहर कसे आहेत बाबा ?

दादा नुकतंच ऑपरेशन झालंय... परिस्थिती इथली गंभीर होती. आप्पा आता डेंजर झोन मधून बाहेर आलेत...

मनोहर बरं...

बहीण तू बस जरा.. आराम कर.. रेवती , तू सुद्धा बस..‌

मनोहर एक मिनिट.. इतक्या वर्षांनी तुला भेटल्यावरही तिला कसं काय ओळखलंस तू ?

बहीण अरे कसं ओळखलंस म्हणजे ?

रेवती मनोहरच्या नकळत बहीणीला नको सांगू असे इशारे करते... बहीण खोटं बोलू लागते.

बहीण अरे , कसं ओळखते म्हणजे... अं.. फेसबुक फ्रेन्ड आहे ना माझी.. मग ओळखणारच.. शेवटी आपल्या गावची ती.. जुन्या मैत्रिणीला ओळखणार नाही का मी ?

मनोहर हां... बरं मी डॉक्टरांना‌ भेटून येतो.. पैशांचं वगैरे..

बहीण अरे.. झाली सगळी व्यवस्था..

मनोहर कशी ?

बहीण मी भरले..

मनोहर कसे ? नाही माहीत आहे मला की तुझ्या नवऱ्याकडे चिकार पैसा आहे पण तरीही ३० लाख रूपये ऑपरेशनचा खर्च आणि त्यात औषध पाण्याचा खर्च इतर खर्च हा सर्व खरंच तू एकटीने केलास ?

बहीण हो यार..‌माझ्या बाबांसाठी इतकं करूच शकते ना मी..

मनोहर बरं.. तरीही मी डॉक्टरांना भेटून येतो..

मनोहर डॉक्टरांना भेटायला जातो...

बहीण रेवती , मन्या ला खरं काय ते कळलं तर ?

रेवती काय माहीत तो काय करेल ते ? मी सुद्धा प्रवासात याच गोष्टीचा विचार करत होते...

बहीण मन्या ला काही समजण्याच्या आत तू निघ... आपण कॉलवर बोलू..

रेवती या. ओके. फाईन.. बाय.. काळजी घ्या...

रेवती तिथून निघू लागते... इकडे मनोहर डॉक्टरांना भेटतो..

मनोहर हॅलो सर ! मी मनोहर.. ते सावंतवाडी वरून पेशंट..

डॉक्टर हा ओके आलं लक्षात..

मनोहर मी त्यांचा मुलगा..

डॉक्टर- बरं...

मनोहर बाबांच्या तब्येतीत सुधारणा कशी आहे ?

डॉक्टर खरं सांगायचं तर ते मृत्युच्या दारात होते... आणि आम्ही ऐनवेळी ऑपरेशनचा डिसिजन घेतला . पैसाही तेवढाच लागणार होता ऑपरेशनसाठी . तुमच्या बहीणीने , भावाने पैशांची जुळवाजुळव केली खरी पण तुमच्या वडीलांच्या ऑपरेशनचा व इतर खर्च हा जवळपास ५०-६० लाखांपर्यंत होता.. मी अगदी दाबून पैसे घेतो पण इलाजही तेवढाच चांगला करतो... आणि तुमच्या वडीलांच्या ऑपरेशनचा सारा खर्च तुमच्या भावंडापेक्षा मोठ्या ‌प्रोड्युसर रेवतीने केला... तुमच्या बहीणीची मैत्रीण....

मनोहर काय ?

डॉक्टर हो...‌देवमाणूस निघाल्या त्या.त्यांनी ऐनवेळी मदत केली .‌चला निघू मी. काळजी करू नका तुमचे वडील अगदी सेफ आहेत.. चला , पेशंटला चेक करायला‌ जायचंय मला...

डॉक्टर तिथून निघून जातात. मनोहर तसाच खुळ्यासारखा उभा होता. बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसे तिने दिले हा त्याच्यासाठी धक्काच होता... त्याच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले.. तो धावत त्याच्या बहीणीपाशी गेला.. इकडे तिकडे रेवतीला पाहीलं. रेवती कुठेच नव्हती..त्याने बहीणीला विचारलं...

मनोहर रेवती कुठाय.. ? रेवती कुठाय ?

दादा आत्ताच बाहेर गेली...

मनोहर पुढचं काहीच न ऐकता रेवतीला भेटण्यासाठी धावत तिथून बाहेर निघून गेला.. त्याची बहीण चिंतेत होती..

बहीण बहुतेक याला सगळं कळालंय...

मनोहर लिफ्टच्या सहाय्याने ग्राऊंड लेव्हलवर आला.. रेवती कुठेच नव्हती... तो धावत तसाच बाहेर आला.. त्यानं पुन्हा सगळीकडे पाहिलं रेवती दिसत नव्हती.. तोच मागून कोणीतरी त्याला हाक मारली...‌

रेवती मनोहर ....‌

त्यानं मागे वळून पाहिलं. मागे रेवती होती... ती त्याच्याजवळ आली. मनोहर तिच्याकडे बघतच बसला होता.

रेवती मला माहीत आहे तुला जाब विचारायचा आहे ना मला ? तुझ्यापासून मी एकच गोष्ट नाही लपवली मी.. अजून बऱ्याच गोष्टी मी लपवल्या आहेत...

मनोहर . .. कोणत्या ?

रेवती इथे नाही सांगत.. समोर गार्डन आहे .. तिथे चल..

दोघे समोरच्या गार्डनमध्ये आले...

मनोहर बोल..

रेवती खरंतर आपली ही अनेक वर्षांनी झालेली भेट योगायोग वगैरे काहीच नव्हतं.. किंवा फिल्मी भेट वगैरे नव्हती.. हा प्रवास मीच आखला होता . माझं गोव्यात काहीही काम नाहीये ‌‌. मी फक्त तुझ्यासाठी इथे आले होते.... ही भेट मी स्वत:घडवून आणलेली होती ..‌

मनोहर म्ह...म्हणजे ?

रेवती म्हणजे काही महीन्यांपूर्वी तुझी बायको निशा काम मागायला माझ्याकडे आली. हातापाया पडली. मला तिची दया आली आणि मी तिला घरकामाला ठेवलं तेव्हा मला हे माहीत नव्हतं की निशाचा नवरा तू आहेस म्हणजे माझं पहिलं प्रेम. निशा रोज कामावर येऊ लागली. घरातली सगळी कामं करू लागली. खूपच प्रामाणिक . हळूहळू माझी एक चांगली मैत्रीण झाली. माझ्या मुलीची अगदी दुसरी आई झाली. अगदी आत्ता या क्षणाला माझ्या मुलीला निशाच सांभाळत असेल...‌ती जशी माझी मैत्रीण झाली ना तेव्हापासून मी तिच्याशी गप्पा मारायचे... एकत्र नाश्ता करणं , एकत्र चहा पिणं... सगळं आमचं रोजचंच आहे. ती तिची कामं करता करता मनसोक्त गप्पा मारते. एके दिवशी मी तिला विचारलं की नवरा काय करतो ? ती म्हणाली की लेखक आहे.. कामाच्या शोधात असतो. मग मी तिला नाव विचारलं..‌तेव्हा तिने तुझं‌ नाव घेतलं... मग हळूहळू तुझ्याविषयी माहीती मला तिच्याकडून कळू लागली. तू कुठे असतोस ? काय करतोस ? कसा राहतोस ? काय खातोस ? सगळं काही तिच्याकडून कळायचं... आणि तुझे बाबा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत हे सुद्धा तिनेच सांगितलं.. पण मी तिला अजूनही कळू दिलेलं नाही की तूच माझं पहिलं प्रेम आहेस... कारण माला तुमचा सुखाचा संसार मोडायचा नाहीये... मी तुम्हा दोघांच्या आयुष्यात तुझं पहिलं प्रेम या हक्काने आले तर खूप प्रॉब्लेम होतील माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात...

मनोहर मग आत्ता कोणत्या हक्काने आल्येस ?

रेवती अजूनतरी कुठल्याच हक्काने आले नाहीये.. आणि हो , तुझ्या वडिलांना बरं नाहीये हे कळताच मी पैशांची केली ते सुद्धा तुझ्या बहीणीच्या म्हणजे नेहाच्या मदतीने... खरंतर मी पैसे निशालाच देणार होते पण तिने स्वीकारलेच नाहीत. मी आणि नेहा फेसबुक फ्रेन्ड होतो. तिचा कॉन्टॅक्ट नंबर मी मिळवला आणि मी नेहाला पैसे दिले... नेहा सहजपणे हॉस्पिटलचा , ऑपरेशनचा खर्च करू शकलीच असती हे मलाही मान्य आहे पण लहानपणी मला शाळेची फी भरायला सुध्दा पैसे माझ्याकडे नव्हते तेव्हा तुझ्याच बाबांनी माझी फि भरली होती. माझ्या बाबांपेक्षा मला जास्त तुझे बाबा आपलेसे ‌वाटतात म्हणून मी ऑपरेशनचा अर्धा खर्च केला..आणि मला या पैशाची परतफेड नकोय...

मनोहरच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं....

रेवती आणि राहीली गोष्ट ती ह्या प्रवासाची.. मुळात म्हणजे जर माझं शूटींगचं वगैरे काम इथे गोव्यात असतं तर मी फ्लाईटने येऊच शकले असते की... ट्रेन मधून आलेच नसते...

मनोहर मग ट्रेनमधून कशाला आलीस ?

रेवती तुझ्या बायकोच्या कृपेमुळे...

मनोहर म्हणजे ?

क्रमशः 

अखेरच्या भागाकडे वाटचाल... 

®© पूर्णानंद मेहेंदळे