तू जाताना..

त्या दोघांची कथा


तू जाताना..


" निघायचे का?" असिमने निलिमाला विचारले.

" आत्ता? एवढ्या चांदण्यात?"

" कारने तर जायचे आहे?"

" पण असे अचानक?"

" मला वाटते म्हणून. येतेस का? तुला नाही म्हणायचा अधिकार आहे." असिम हसत म्हणाला.

" ओके.. पण तो अधिकार मी आता बजावायच्या मूडमध्ये नाही. आलेच आवरून."

" तुझा तो निळा ड्रेस घालशील?" असिमने विचारले. त्याच्या स्वरातली कळकळ तिला जाणवली. होकार देऊन ती आत जायला वळली. असिमने फोन उचलून काही नंबर डायल करायला सुरुवात केली.


" कशी दिसते आहे मी?" निलिमाने विचारले. फोनवर बोलत असलेल्या असिमने वळून बघितले. आज खूप दिवसांनी ती खास त्याला आवडते तशी तयार झाली होती. त्याचा आवडता ड्रेस, नाजूकसे दागिने, हलकासा मेकअप. फक्त तिचे आधी लांबसडक असणारे केस आता खांद्यापर्यंत आले होते. काहीच न बोलता तो तिच्याजवळ गेला. तिला मिठीत घेऊन त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.

" चल निघूया.." तो तिचा हात घट्ट पकडत म्हणाला. तिनेही मग काहिही विचारणे टाळले. दोघे गाडीत बसले. त्याने "ऋणानुबंधाच्या " गाणे सुरू केले. तिला आश्चर्य वाटले. गाडीत बसल्यावर तो नेहमीच "अजूनी रुसून आहे" लावायचा. बरोबर आहे, आता निदान आपल्यासमोर तरी तो हे गाणे ऐकणार नाही. नकोच ते विचार. तिने निग्रहाने विचारांना दूर सारले. गाडी चालवणाऱ्या असिमकडे वळली.

" आता तरी सांग काय प्लॅन आहे ते."

" सरप्राईज.." असिमने थोड्याच वेळात गाडी नाट्यमंदिराबाहेर उभी केली. समोर सही रे सही चा हाऊसफुल्ल असे लिहिलेला बोर्ड होता. "आता परत घरी?" अशा अर्थाने तिने त्याच्याकडे बघितले. त्यावर त्याने हातातला मोबाईल दाखवत कॉलर टाईट केली. त्याने कुठूनतरी पहिल्या रांगेतली तिकीटे मिळवली होती. नाटक बघताना ती खूप दिवसांनी मनसोक्त हसत होती. आणि तो ते हसू आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत होता. नाटक संपले. बाहेर पडल्यावर निलिमाने विचारले, " आता?"

" भटकू असंच.. चालेल ना?" निलिमाचा होकार लक्षात घेऊन त्याने गाडी समुद्रकिनाऱ्यावर आणली. दोघेजण तिथे बसून सूर्यास्त बघत बसले. तिने शांतपणे त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. कितीतरी वेळ तो सूर्यास्त ते जगत होते.

" निघायचे?" त्याने हळूच विचारले.

"आता घरीच जायचे ना?"

" पेटपूजा करून लगेच.." तिला अपेक्षित होते त्याप्रमाणेच त्याने तिला तिच्या आवडीच्या हॉटेलमध्ये नेले. तिच्या आवडीचे पदार्थ मागवले.

" मी काही लगेच जाणार नाही." तिने जोक करायचा अयशस्वी प्रयत्न केला. तो फक्त दुखावलेल्या नजरेने तिच्याकडे बघत राहिला. जेवणं मग शांततेतच झाली. घरी जाताना त्याने नेहमीच्या कुल्फी शॉपच्या इथे गाडी थांबवली. कुल्फी खाताना तिने विचारले,

"मुलांना आणि आईबाबांना कधी बोलवायचे?"

" अजून काही दिवसांनी."

" मुलांच्या शाळा बुडत आहेत."

" असू दे.." त्याने बोलणे थांबवले. दोघे घरी आले. कपडे बदलून तो बेडवर पहुडला होता. ती ही आवरून त्याच्याजवळ आली.

" एवढा सुंदर दिवस घालवण्यासाठी थँक यू." ती त्याच्या गालावर ओठ ठेवत पुटपुटली.

" मग रात्रही सुंदर जाऊ दे." त्याने आवेगाने तिला जवळ घेतले. तिच्या अंगाअंगावरून त्याचा हात फिरू लागला. तो अधिर झाला होता. अचानक हळूवार आवाजात तिचे विव्हळणं त्याला ऐकू आले. तो भानावर आला. त्याने तिचे आणि स्वतःचे कपडे ठिक केले. तो बाहेर जायला उठला. तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला. ती त्याच्या कुशीत शिरून रडू लागली.जणू तिच्या आसवांनी त्याचे तापलेले शरीर ती थंड करत होती. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत शून्यात बघत होता. तिचे मुसमुसणे थांबले. श्वास संथ झाला. असिमने हळूच तिला बाजूला केले. तिच्या अंगावर पांघरुण घातले. बाल्कनीत येऊन त्याने सिगारेट शिलगावली. विचार करू लागला.

" निलिमा खरंच निघून गेली तर काय होणार होते, त्याचे त्याच्या संसाराचे?"



पुढील भागात बघू निलिमा कुठे आणि का जाणार होती. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all