तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 90
भाग 90
सकाळी हळदीची पूर्ण तयारी झाली होती. बाहेर लॉन मध्ये केळी च्या पानांचे बॅकग्राऊंड तयार केले होते , त्यावर थोड्या थोड्या अंतराने फुलांच्या माळा सोडल्या होत्या. सगळ्या बाजूंनी पिवळे झिरझिरीत पडदे सोडले होते , आणि मधून मधून फुलांचे बॉल सोडले होते. मधोमध दोन उंच चौरंग मांडले होते . छानसे आल्हाददायक म्युजिक वाजत होतं . वातावरण खूप प्रसन्न वाटत होते . सगळे हळदी च्या कार्यक्रमाच्या अनुरूप तयार झाले होते . अर्जून नेहमी प्रमाणे साधासाच तयार झाला होता. त्याला पारंपरिक वेशभूषा फार आवडत नव्हती , तो साधं राहणं च पसंत करत होता, त्या अनुरूप त्याने व्हाइट लिनेन चा शर्ट , बाह्य वरती फोल्ड केल्या होत्या आणि ट्राउजर घातले होते. साधं असले तरी त्यात सुद्धा त्याचे राजबिंडे रूप खूप उठून दिसत होते. तो एका चौरंगावर येऊन बसला. तो इतक्या लवकर तयार होऊन स्वतःहून तिथे आलेला बघून आशुतोष ने त्याला चिडवायचा एक सुद्धा चांस सोडला नव्हता. सोनिया सोबत लग्न होणार होते तेव्हाचे त्याचे वागणे आठवून आणखीच त्याची खेचत होते . आता तर काही काही या गोष्टी अर्जून सुद्धा एन्जॉय करत होता . माहीच्या नावाने चिडवणे आता त्याला सुद्धा जाम भारी वाटत होते .
" येईल हो येईल , लवकरच येईल !" , अर्जुन सतत माहीच्या येण्याच्या वाटेकडे नजर लावून बसलेला बघून अनन्या म्हणाली.
" सजना है मुझे सजना के लिये ! , असं काहीसं चाललंय तिचं !" , श्रियाने अनन्या सोबत आपला सुर मिळवला.
" तिचं म्हणजे कोण ?" , आशुतोष हसत म्हणाला.
" ती हो तीssssssss , जी ऑलरेडी झालीय पण अजून होणार आहे ...आमची वहिनी " , श्रिया
" भाभी हमारी खुशियो का खजाना , धिक ताना धिक ताना !" …. अनन्या , श्रिया अर्जूनच्या डोळ्यांपुढे येत नाचत होत्या तर , बारीक आवाजात मधूनच आकाश साथ देत होता. त्यांची ती कार्टूनगिरी बघत अर्जून ने डोक्यावर हात मारला. मस्ती सुरू होतीच की माही समोरून येताना दिसली , ती इतकी सुंदर दिसत होती की अर्जून ला तर त्याचं हार्ट बीट स्किप झाल्यासारखे वाटले , तो एकटक तिला बघण्यात मग्न झाला… माही दिसतच इतकी सुंदर होती , तिने नाजूक गोल्डन बॉर्डर सिंपल शिफॉनची साडी , सेम ब्लॉउज , थोडे केस मधोमध भांग पाडून मागे घेऊन पिनप केलेले बाकी सगळे मोकळे सोडले होते , त्यात जाईच्या नाजूक फुलांची बिंदी त्याला पुढे आलेले लाल पिवळ्या शेड चे जरबेरा चे छोटेसे फुल , गळ्यात आणि कानात सुद्धा सेम मॅचींग जाई च्या फुलांची माळ , कपाळावर नाजूक टिकली , डोळ्यात काजळ , ओठांवर पिंक लिपस्टिक , मेहंदीच्या रंगात रंगलेले हात , पायात रुणझुण पैंजण अर्जूनच्या मनाचा ठाव घेत होते. माही चालत येत होती तशी तशी अर्जुन ची मान वळत होती . माही ने त्याच्याकडे हसून बघितले आणि त्याचा बाजूला ठेवलेल्या चौरंगावर बसली. अर्जुन मात्र तिला बघण्यात गुंग झाला होता .
" हो ओ ... एक लड़की को देखा तो ऐसा लगा
जैसे
खिलता गुलाब, जैसे
शायर का ख्वाब, जैसे
उजली किरन, जैसे
चाँदनी रात, जैसे
मन्दिर में हो एक जलता दिया, हो!
ओ... एक लड़की को देखा तो ऐसा लगा! " , आशुतोष अर्जून च्या कानाजवळ जात मोठ्याने गाणं म्हणायला लागला . ते ऐकून अर्जून ची तंद्री भंग झाली , तो अजब नजरेने आशुतोष कडे बघायला लागला , त्याला बघून बाकीचे सुद्धा गालात हसत होते .
" अर्जुनच्या वतीने म्हणतोय !" , आशुतोष
" हो , अशीच दिसते आहे !" , अर्जुन माही कडे बघत बोलला , ते ऐकून माहीचे गाल आणखीच गुलाबी झाले , हळद न लावताच तेज तिच्या चेहऱ्यावर आले होते . ती लाजत खाली बघत होती. अर्जून ने पण तिच्याकडे बघून गोड स्मायल केले.
" काय तशीच दिसते आहे , तरी बरय रोज बघायला मिळते , तरी अडकलय महाशय ! नाही आम्ही पण आहोत म्हटलं आजूबाजूला , तुमच्यासाठीच आलोय !" , आशुतोष मस्करी करत बोलला. ते ऐकून अर्जुन ला सुद्धा हसायला आले.
हळदी साठी सगळ्या आया बाया तिथे जमल्या . आधी अर्जून ला हळद लावायची , मग त्याची उष्टी हळद माही ला लागणार होती. नलिनी औक्षण चे ताट घेऊन पुढे आली . त्यांनी अर्जूनचे औक्षावण केले. आता हळद लावणारच की तेवढयात मीरा तिथे पळत आली …
" मी , मी , मी ….. " , मीरा आवाज देत पळत तिथे आली .
" दादूचं शेपूट आलं !" , श्रिया हसत म्हणाली.
" मी आधी लावणार ते अर्जुन ला !" , मिरा आपल्या लोभस बोबड्या आवाजात बोलली.
" मी आधी !" , नलिनी
" माझा बाबा आहे तो !" , मीरा
" माझा मुलगा आहे तो ?" , नलिनी
तिथले सगळे या दोघींची सुरू असलेली गोड वादावादी बघत होते .
" आजी , खाली वाक !' , मीरा नलिनी ला हाताने इशारा करत खाली वाकायला सांगत होती . नलिनी तिच्याजवळ खाली झुकली , तसे मिरा ने नलिनी च्या गालावर एक पप्पी केली.
" तो फक्त माझाच आहे ! माझाच बाबा आहे " , मीरा म्हणाली , तिचं ते पप्पी ची रिश्र्वत देत , तिची ती गोड धमकी बघून सगळे हसायला लागले.
" कठीण आहे बाबा अर्जुन तुझं , या प्रिन्सेस साठी दुसरा अर्जुन शोधावा लागणार आहे तुला !" , आशुतोष हसत बोलला.
" खरंय , मुलीसाठी तिचा पहिला आदर्श तिचा बाबाच असतो , तिचं पहिलं प्रेम असतो ! " , आजी
" अर्जून म्हणजे एकुलते एक पिस आहे , फारच कठीण आहे !" , अनन्या हसत होती .
" Don't worry ! मी मीरा ला कुठेच जाऊ देणार नाही आहे !" , अर्जून
" हा हा हा ! पझेसिव्ह फादर !" , आशुतोष … सगळे हसायला लागले . आशुतोष ने अनन्या ला काही सांगितले . अनन्या पुढे आली , तिने नलिनीच्या हातात मीराचा हात घेतला , दोघींचे ही हात एकत्र मनगटाजवळ पकडून खाली झुकत हळदी मध्ये बुडवले , आणि अर्जूनचा दोन्ही गालाला हळद लावली , नलिनी आणि मीरा च्या हळदीच्या हाताचा स्पर्श एकत्र झाला होता , ते बघून अर्जुन आणि माही च्या ओठांवर हसू उमलले . प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा स्त्रिया आई , बहीण , बायको आणि मुलगी … अर्जुनाच्या पुढे हळद लावणाऱ्या आई नलिनी ,मुलगी मीरा आणि त्यांना एकत्र आणणारी बहीण अनन्या , आणि बाजूला त्याची बायको ,कोणालाही हेवा वाटावा असे खूप सुंदर ते दृश्य होते , त्या वेळी अर्जुन जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती वाटत होता . तिथे उपस्थित सगळे कौतुकाने त्यांच्याकडे बघत होते. माहीच्या आईच्या डोळ्यात तर आनंदाश्रू तरळले होते .
नलीनीने हळद लावली , मीरा अर्जुनाच्या मांडीवर जाऊन बसली. आता बाकीच्या बायका सुद्धा त्याला हळद लावत होत्या , मीराला ते बघायला खूप मजा वाटत होती . अर्जुन नंतर सगळे माही कडे वळले . तेवढयात रुही मीरा ला खेळायला बोलवायला आली . तशी तिने अर्जुनाच्या मांडी वरून खाली उडी घेतली .
" अगं , माऊ ला हळद नाही लावायची काय ?" , अर्जून मीरा ला म्हणाला.
" मला खेळायचं आता , माऊ आपल्याच दोघांची आहे , तुला चालते लावायला , तू लाव तिला ! " , मिरा नालिनी कडे बघत " आजी , माऊ माझी आणि अर्जुनची आहे , त्याला लावू दे !" , मीरा बोलून तिथून पळाली.
" धन्य आहे , याची दादागिरी कमी होती की याची मुलगी त्यावर वरचढ निघाली !" , अनन्या , ते ऐकून सगळे खूप हसायला लागले.
आता सगळ्यांनी आळीपाळीने माही ला हळद लावली. आंघोळी ला जायचं म्हणून दोघंही तिथून उठून उभे राहिले , आणि आता जाणारच तेवढयात वरतून एका खूप मोठ्या गोलाकार चाळणी मधून अर्जून माहीच्या पाणी पडू लागले, त्यात सोबत गुलाबाच्या अधून मधून पाकळ्या पडत होत्या. थंड पाणी एकदम अचानक अंगावर पडल्यामुळे माही एकदम दचकली, घाबरतच तिने अर्जुनच्या हाताला पकडत त्याच्या कुशीत शिरली . त्याने सुद्धा तिच्या खांद्यावरून हात घेत तिला आपल्या जवळ घेतले. त्याचसाठी सुद्धा हे अनपेक्षित होते.
" तुम्हाला काय वाटते फुलांचा पाऊस फक्त तुलाच पाडता येतो ? " , आशुतोष ओरडला. ते ऐकून अर्जुन माही ला हसू आले ….
" ये वाजवा रे …. " , आशुतोष ने इशारा केला , तसे धाडधूम गाणे वाजायला लागले. लहान पासून मोठे सगळेच त्या दोघांच्या भोवती नाचत होते , वरतून रिमझिम पाणी पडत होते , त्यामुळे आपोआप अर्जुन माहीची आंघोळ होत होती. दोघंही हसतच त्यांच्या भोवती सुरू असलेली सगळ्यांची मस्ती बघत होते, अगदी मीरा सुद्धा आनंदाने उड्या मारत होती .
" हळद पिवळी पोर कवळी जपुन लावा गाली
सावळ्याच्या चाहुलीनं पार ढवळी झाली
हे गजर झाला दारी
साजनाची स्वारी
साजनाची स्वारी आली लाज गाली आली "
वरतून पडणाऱ्या पाण्यामुळे चेहऱ्यावरून ओघळणाऱ्या पाण्यासोबत हळद सुद्धा मिक्स झाली होती .
" डोळे बंद कर , डोळ्यात हळद जाईल !" ,, अर्जुन आपल्या स्वच्छ हाताने तिचे डोळे पुसत बोलत होता . वरतून पडणारे थंड पाणी , त्यात अर्जुनचा उबदार प्रेमळ स्पर्श आणि सगळीकडे फक्त नी फक्त आनंद , खूप खुशीचे वातावरण , माही डोळे मिटून ते सगळं अनुभवत होती . तिचे डोळे पुसताना सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी आहे हे अर्जुनने अचूक हेरले होते . तिच्या खांद्यावर थोपटत त्याने एका बाजूने तिला आपल्या जवळ घेतले होते.
*********
हळदीचा कार्यक्रम आनंदात पार पडला होता . सगळी तरुण मंडळी , छोटी बच्चा कंपनी भयंकर नाचले होते . आता हिरवा चुडा भरण्याचा कार्यक्रम होता . चुडा भरण्यासाठी बांगड्या घेऊन बांगडी वाल्या मावशी आल्या होत्या . हॉल मध्येच चुडा भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. पुरुष मंडळी तिथेच सोफ्यावर बसली होती . अर्जुन सुद्धा माही कडे बघत होता. हळदीमुळे आधीच तिच्या चेहऱ्यावर खूप तेज पसरले होते , त्यात त्यात हिरव्या कंच बांगड्या बघून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती , अर्जुन अधून मधून कोणाला कळणार नाही असे आपल्या मोबाईल मध्ये तिचे फोटो काढत होता.
" पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची !" , आशुतोष आपलं गुणगुणत बसला होता . आणि आपल्या फोन मध्ये अर्जून चा व्हिडिओ काढत होता.
" हे काय , इथे मध्येच तुला अभंग सुचत आहे ?" , अनन्या आशुतोष ला गुणगुणत असताना बघून म्हणाली.
आशुतोष ने डोळ्यांनीच तिला अर्जून कडे बघ म्हणून खुणावले .
" अर्जून असा पण वागू शकतो , मला विश्वास बसत नाही !" , अनन्या अर्जूनकडे बघत हसत बोलली.
" कसला क्यूट दिसतो ना हा दादू असा !" , श्रिया
" ऑफिस मधलं कोणी बघेल ना भाई ला असे , लिटरली पागल होतील ते !" , आकाश
" " हो ना , माझं छोटुसा गोडुला भाऊ ! नेहमी माझ्यापेक्षा मोठ्या व्यक्तीसारखा वागतो , आज वाटतोय छोटा पिल्लू माझा !" , अनन्या भाऊक होत बोलली.
" परिस्थिती माणसाला लवकर मोठं बनवते , पण you don't worry now , या कार्टून सोबत हा पण कार्टून बनेल !" , आशुतोष
" Yes , Made for each other आहेत ते ! " , अनन्या
इकडे माही ला बांगड्या भरायला पुढे पाटावर बसवले होते.
" एक मिनिट , एक मिनिट .." , अनन्या ने आवाज देत बांगड्या भरणाऱ्या मावशीला थांबवले . सगळे काय झाले म्हणून तिच्याकडे बघत होते . अर्जून ने पण तिला काय झालं म्हणून डोळ्यांनी खुणावत विचारले.
" चल !" , अनन्या अर्जुनचा हात पकडत त्याला ओढत होती .
" कुठे ? " , अर्जून
" तू चल तर !" , अनन्या त्याला माही च्या पुढ्यात घेऊन आली .
" मावशी बाई , वाईट नका मानू , पण ते काय आहे ना आमच्या वहिनी साहेबांचा सगळ्यात आवडता श्रृंगार म्हणजे बांगड्या आहेत , बांगड्या तिच्या खूप प्रिय आहेत , तर ही बांगड्यांची गोड खणखन ची सुरुवात माझ्या भावाच्या हाताने होऊ द्या . सुरुवातीच्या दोन दोन बांगड्या तो भरेल मग बाकी उरलेल्या तुम्ही भरा !" , अनन्या बांगडीवाल्या मावशी बाईंना म्हणाली .
" हो जी बाईसाहेब , हा तर खूप शुभ शकुन आहे , भरा तुम्ही आधी !" , म्हणत मावशी बाई बाजूला झाल्या .
" अर्जून !" , अनन्या त्याला एक डोळा मारत पुढे हो आणि बांगड्या भर म्हणून त्याला खुणावत होती. थोड्या वेळ आधी त्याचा मनात सुद्धा हेच सुरू होते , त्याचा मनातील भाव ओळखल्याचे आणि अनन्याचा असा खट्याळपणा बघून त्याचा ओठांवर हसू उमलले . तो आपल्या एका गुडघ्यांवर माहीच्या पुढ्यात बसला, आणि त्याने तिचा हात मागायला आपला हात पुढे केला. अर्जून बांगड्या भरून देणार , यापेक्षा वेगळा आनंद काय असणार होता , तिने लगेच हसत आपला हात पुढे केला. आशुतोष परत आपला कॅमेरा घेऊन तिथे हजर झाला. सगळे मोबाईल , कॅमेराचा फोकस त्या दोघांवर होता . अर्जुन ने हळूवारपणे दोन दोन बांगड्या माहीच्या हातात भरल्या आणि टाळ्यांचा गजर झाला.
" अरे छोटी माही , आली नाही ! बिग बॉस पेक्षा ही भारी लक्ष असते मॅडम चे " , कोणीतरी मध्येच मस्करी केली . तसे सगळे हसायला लागले.
चुडा भरण्याचा कार्यक्रम सुद्धा थोडक्यात आनंदात आटोपला. जेवणं आटोपून सगळे आराम करायला गेले. माही चा परिवार सुद्धा आऊट हाऊस मध्ये आरमासाठी निघून आले. सगळे पटवर्धन परिवाराचे कौतुक करत होते. त्यात अर्जून बद्दल तर किती बोलू आणि किती नको असे झाले होते . माही सुद्धा अर्जून बद्दल ऐकून सुखावून जात होती.
उद्या लग्न , आज संध्याकाळी प्रोपर संगीतचा कार्यक्रम न ठेवता , काही गेम आणि त्या नुसार जे जे करायला सांगेल ते करायचं असे ठरले होते. सोबतच रिंग सेरेमनी ठेवली होती.
****
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा