Jan 27, 2022
प्रेम

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 87

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 87

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 87

 

भाग 87 

 

माहीने लग्न साध्या पद्धतीने आणि घरून करायचं अशी अर्जूनकडे इच्छा व्यक्त केली होती आणि अर्जुन ने ते मान्य केले होते . या निर्णयामुळे घरचे थोडे नाराज झाले होते पण अर्जून ने योग्य प्रकारे सगळं समजावून सांगितल्या वर सगळे आनंदाने तयार झाले. तरुण पिढी सहसा दिखाव्याला बळी पडतात , पण अर्जुन माहीचा समजदरपणा बघून घरच्यांना त्यांचा या निर्णयाचा अभिमान वाटला , त्यांचा विचारांचा आदर करत सगळे त्यात सामील झाले. 

 

लग्न अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपले होते . लग्नाची बहुतेक सगळी तयारी झाली होती . अगदी जवळचे नेहमीचे नातेवाईक बोलावले होते. माही च्या परिवाराचे तर कोणी नातेवाईक नव्हतेच , बाकी पटवर्धन परिवाराचे थोडे फार जवळचे लोकं होते . लग्न शांतीसदन मध्ये करायचे ठरले होते आणि माही ला सगळी तयारी तिच्या आवडीने करायची होती , तर तिचे सतत शांतीसदन मध्ये ये , मग रात्री परत घरी जा असे सुरू होते . तिची होणारी ओढतान बघून शेवटी आजी ने माहीच्या परिवाराला इकडेच बोलावून घेतले होते . आत्याबाईंनी आधी नकार दिला होता , पण सगळ्यांची इच्छा बघून शेवटी त्यांनी पण होकार दिला … पण लग्न आधीच कसे तिथे राहायचे असे आत्याबाईंचे म्हणणे होते , म्हणून मग माहीच्या परिवाराची राहण्याची सोय तिथेच शांतीसदन मधील आऊट हाऊस मध्ये केली होती . त्यामुळे आता माही मनसोक्तपणे सगळी हवी तशी तयारी करू शकत होती . माही ने तर ऑफिस मध्ये दोन महिन्यांची सुट्टी टाकली होती , अर्जुन मात्र ऑफिस ला जात होता . पण आता लग्न जवळ आल्यामुळे घरच्यांनी जबरदस्ती त्याला सुट्ट्या घ्यायला भाग पाडले होते , आणि लग्न असलेल्या आठवडाभर अजिबात लॅपटॉप ला हात लावायचा नाही अशी ताकीद सुद्धा दिली. अर्जुन दिवभर घरी आणि काम नाही यात सगळ्यात जास्त खुश मीरा झाली होती … दिवसभर ती त्याचा सोबतच असायची.  

 

*******

 

" ओ दादा , अहो जरा नीट लावा ते , आणि हे काय तुम्ही नीट माळा सुद्धा नाही बनवल्या ".... माही डेकोरेट करणाऱ्या स्टाफ मेंबर ला इंस्ट्रक्शन्स देत होती . 

 

" मॅम , तुम्ही सांगितले ते थोडं ओल्ड फॅशन आहे , आम्ही न्यू लूक द्यायचा प्रयत्न करतोय ".... स्टाफ मेंबर चाचरत बोलला. 

 

" लग्न कोणाचं आहे ? ".... माही 

 

" तुमचं !".... स्टाफ 

 

" मग चॉईस कोणाची असेल ?"... माही 

 

" तुमची , पण mam , ते खरंच खूप ओल्ड फॅशन आणि खूप सिंपल एकदम जुन्या काळात करत होते , तसे दिसत आहे "..... स्टाफ 

 

" जेव्हा अर्जुन पटवर्धन यात काही बोलत नाही आहे , तेव्हा तुम्ही कोण सांगणारे ? "..... माही 

 

" त्याची हिम्मत तरी आहे काय तुझ्या पुढे काही बोलायची ? "..काय हो बायको समोर कोणाची हिम्मत होते बोलायची , मग होणारी असू देत , बायको समोर बोलून कोण आपलं वाटोळं करून घेईल ! ".... आशुतोष माही आणि स्टाफ मध्ये चाललेली गडबड बघून तिथे येत बोलला. ते ऐकून स्टाफ ला पण हसू आले … माही डोळे मोठे करत त्या दोघांना बघत होती , तसे ते दोघे खी खी करायचे शांत झाले . 

 

" हे बघा दादा , मी जसे सांगितले आहे तेवढे करा , नाहीतर …..".... माही 

 

" कर रे बाबा जे सांगितले आहे , नाहीतर अर्जुन पटवर्धन येतील , मग काय सुधारणार नाही तुम्हाला "..... आशुतोष 

 

" नको नको , मॅडम नी सांगितले तसेच करतो "... स्टाफ बोलून निघून गेला .. 

 

" माही पण तो …..".... आशुतोष बोलतच होता की माही आपल्या दोन्ही कंबरेवर हात ठेवत त्याचाकडे बघत होती …. 

 

" खूप …. खूप सुंदर दिसत आहे , ऑसम , एक नंबर ".... आशुतोष 

 

ये ऐकून माही हसायला लागली , " घाबरलात ?"

 

" बाई तुझ्या नावाच्या मागे ज्याचे नाव लागले आहे ना , त्याला घाबरलेले च बरे , फुसफुसत असतो सदा न कदा ".... आशुतोष माहीला चिडवत बोलला .

 

" असं नाही हा , ते तर ….

 

" फार गोड आहेत ".... माही चं बोलणं पूर्ण व्हायच्या आत आशुतोष बोलला. 

 

" Yess ".... माही 

 

" वाह , छान प्रगती आहे , चालू दे तुझं , तसेही तू कोणाचं चालू द्यायची नाही इथे ".... आशुतोष हसत हसत तिथून निघून आला.

 

माही ने अख्ख्या घराला झेंडू ची फुलं आणि आंब्याच्या हिरव्या पानांच्या माळान्चे डेकोरेशन करायला सांगितले होते , तिने तिच्या पद्धतीने माळांचे डिझाईन सुद्धा त्यांना बनवून दाखवले होते . त्यावरच माही आणि स्टाफ ची तू तू मैं मैं सुरू होती . 

 

झेंडूच्या फुलांची वेगवेगळी शेड्स , आकार , त्यात हिरवीगार आंब्याच्या झाडाची पानं वापरून खूप सुंदर पद्धतीने पूर्ण घर , आऊट हाऊस सजवण्यात आले होते . आंब्याचा पानांचा मोहक सुंगांध घरभर दरवळत होता , त्यामुळे घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवत होती , खूप फ्रेश , प्रसन्न असे वातावरण निर्माण झाले होते . माही सगळ्या कामात जातीने लक्ष घालत घरभर फिरत होती . 

 

बंगल्याच्या मागच्या भागात मोठा मांडव घालण्यात आला होता , तिथेच लाडू चिवडा आणि इतर पक्वान्न बनवणे सुरू होते … घरातील सगळ्या बायका तिथे जमल्या होत्या . लहान मुलं सुद्धा तयार होत असणारे पक्वान्न खाऊन बघण्यासाठी खूप उत्सुक होते . अधून मधून चहाचे घोट घेतल्या जात होते . अधूनमधून जोक्स , खिदळण्याचा , जोरजोराने हसण्याचा आवाज घुमत होता . 

 

" महाराज जी , एकदम खमंग भाजा लाडू , पूर्ण मोहल्ला सुगंधित झाला पाहिजे , सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले पाहिजे . ".... माही पक्वान्न बनत होते तिथे जात बोलली आणि मध्ये मध्ये ती पण लाडू भाजत होती , बाकी पदार्थामध्ये पण तिची लुडबुड सुरू होती … 

 

" नवऱ्या मुलीने स्वतःच्या लग्नाची कामं करू नये म्हणतात , पाऊस येतो लग्नात , चल आता आम्ही बघतो ".... आत्याबाई 

 

" असं बिस काही नसते आत्याबाई , आणि आला तरी बरेच आहे की , आम्हाला निसर्गाचा सुद्धा आशीर्वाद भेटेल ".... माही " आणि तसे पण अर्जुन पटवर्धन चं घर आहे , पाऊस पण परवानगी घेऊनच येतो "... माही 

 

ते ऐकून आजी सुद्धा हसायला लागली  

 

" आगाऊ झाली आहेस "... आत्याबाई 

 

" आत्याबाई , माझं लग्न आहे ना , मग मी नको का बघायला ?".... माही 

 

" हो , तू तुझं इथे नाक खुपसण जरुरी च आहे नाही का , आम्ही तर बुद्धू च आहे ?".... आत्याबाई

 

" आता मी स्वतःच्या तोंडाने तुम्हाला बुद्धू कसे म्हणणार ना ?".... माही 

 

" बदमाश आहे ही पोरगी , सगळ्यांनी तुला फार लाडावून ठेवले आहे "... आत्याबाई तिचा कान ओढत बोलल्या. 

 

" आत्याबाई सगळ्यांनी कुठे , पटवर्धन साहेबांनी म्हणा ".... अनन्या हसत श्रियाला टाळी देत बोलली . 

 

" पटवर्धन साहेब म्हणजेच सगळे ".... आत्याबाई पण हसत माही ला चिडवत बोलल्या … तसे सगळे हसायला लागले…

 

 

" अँटीक कार्टून आहे हे ध्यान !".... अर्जुन वरतून हे सगळं बघत होता … माहीचा उत्साह बघून त्याला खूप गम्मत वाटत होती. तिची स्टाफ सोबत होणारी छोटी छोटी भांडण , इकडे बायकांमध्ये सुरू असणारी तिची मस्ती , तिचं ते अधून मधून पदार्थ टेस्ट करून बघणं , मध्येच लहान मुलांसोबत उड्या मारणं , त्याला खूप आनंद देऊन जात होते . तो तिची प्रत्येक हालचाल टिपत होता , अविस्मणीय अश्या या गोष्टी होत्या , ज्या आयुष्यात नेहमी नेहमी घडणार नव्हत्या , खूप गोड अश्या त्या हव्या हव्याशा गोष्टी तो आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. 

 

" हा डेकोरेशन वाला ना ऐकणार नाही , थांबा आलेच ".... म्हणत माही तिथून पुढे आली .. 

 

" सो चिप , काही आपल्या स्टेटस चा विचार करायला नको का? हे काय सगळं मिडल क्लास अरेंजमेंट्स आहेत . लोकं काय म्हणतील ? आणि किती गावठी आहे ही माही , अर्जुन ला तर हाई क्लास मुलगी भेटली असती .".... एक पाहुणी बाई बोलल्या. ते शब्द अर्जुनच्या डोक्यात गेले . तो उत्तर द्यायला येणार तेवढयात नलिनी बोलायला लागली . नलीनीला बोलतांना बघून अर्जुन जागीच चूप उभा राहिला. 

 

" आपल्या विचारांचे स्टेटस वाढवले तर उत्तम राहील , नाही का ! आणि हाई क्लास म्हणजे काय हो , हायफाय पार्टीज , तोकडे कपडे , दारूच्या बाटल्या आणि गॉसिप्स . प्रेम , परिवार , नातं कशाला म्हणतात माहिती तरी असते काय? त्यापेक्षा आमची मिडल माहीच छान आहे , लहान लहान गोष्टी तिला आनंद शोधता येतो , दुःखात ही हसता येते , हसवता येते , आपल्या लोकांसाठी स्वतःच्या जिवाचं रान करू शकते . कोणाची बायको होते आहे ती , माहिती आहे ना? कशाची कमी होणार होती तिला , तोंडातून शब्द बाहेर पडायची देर होती , सगळं समोर हजर राहिले असते , बोटांवर सगळं मिळवू शकते . पण नाही ना आमची माही तशी , तिला माहिती सुख घरात कसे टिकवले जाते , प्रत्येक क्षण आनंदात बदलता येतो …तिचे विचार मोठे आहे . अर्जुनची होणारी बायको आहे पण पाय जमिनीवरच आहेत . गर्व आहे मला माझ्या अर्जुनच्या चॉईस वर ".... नलिनी त्या बाईंना म्हणाली. 

 

" अगदी बरोबर बोलली नलिनी , "... आजीने दुजोरा दिला . छाया आणि आत्याबाईंना खूप गरे वाटला ते ऐकून .  

 

" पागल आहे आमची मुलगी , काही चुकलं तर सांभाळून घ्या "....छाया नलिनी पुढे हात जोडत बोलली .

 

" समजदार पण तेवढीच आहे , काळजी नका करू ".... आजी 

 

" सगळं दुःख एकटीने सहन करेल पण कोणाला थोडासा पण त्रास होऊ देणार नाही , बघा घर कसे खिदळत राहते ते ".... आत्याबाई बोलत होत्या आणि दोन अश्रू त्यांच्या डोळ्यात दाटलेच " आमचं आंगण मात्र आता सुनंसुण होणार ! पण काय करणार , जगाची रीत पाळावीच लागते , मुलीची पाठवणी करावीच लागते ! "

 

 ******** 

 

माहीची सगळीकडे धावपळ सुरू होती , एक क्षण ती शांत बसली नव्हती. 

 

" पिंकी , पायन्याप्पल ज्यूस "... अर्जून 

 

माही बाहेर उभी स्टाफ ला जे जे राहिले ते सांगत होती. तिने बंगल्याचा प्रत्येक कानाकोपरा सुंदरपणे डेकोरेट करून घेतला होता . आधी जरी ते ओल्ड फॅशन दिसत होते , पण आता ते खूप सुंदर , वेगळं आणि एकदम युनिक दिसत होते. जुन्या काळात एखाद्या सजलेला राजवाडा दिसावा तसे ते शांतीसदन दिसत होते , अगदी रुबाबात उभे होते . बाहेरून जाणारा येणारा थोडा वेळ तिथे थांबून त्याला बघितल्या शिवाय पुढे जात नसत . आता तर तो डेकोरेशन चा स्टाफ सुद्धा ते सगळं बघून हैराण झाले होते , डोळे दिपवून टाकणारे असे ते सौंदर्य होते , ते पण आता माहीचे भरभरून कौतुक करत होते , एखाद्या इव्हेंट प्लॅनर ला पण मागे सोडेल इतका सगळं काम छान सुरू होते . 

 

अर्जुन ज्यूस चा ग्लास घेऊन माही होती तिथे आला , तर माहीचे त्याचाकडे अजिबात लक्ष नव्हते , ती अजूनही हातवारे करत स्टाफ ला काही सांगत होती . 

 

" माही !'... अर्जुन ने आवाज दिला . 

 

" हा , एक मिनिट sir , हा तर दादा तिकडे मेन गेट ला हे लावा "... माही 

 

माही ऐकत नाहीये बघून अर्जून ने इशाऱ्याने तिथे असणाऱ्या स्टाफ ला जायला सांगितले . तसे ती लोकं तिथून जायला लागली . 

 

" ओ दादा , चालले कुठे , हे बाकी आहे ".... माही त्यांना बोलली. 

 

" माही मला काम आहे ".... अर्जून 

 

" हा तर जा , करा तुमचं काम ".... माही 

 

" माझं तुझ्याकडे काम आहे , आणि तुम्ही, जा तिकडले बघा ".... अर्जून

 

तशी तिथली सगळी मंडळी एका मिनिटात गायब झाली . 

 

" काय काम आहे, बोला पटापट … माझी खूप कामं खोळंबली आहे . ".... माही 

 

" हे काय चालले आहे ?"... अर्जून 

 

" लग्नाची तयारी !.... माही खूप एक्साईट होत म्हणाली . 

 

" हो , पण इथे सगळे आहे हे सगळं करायला , ही लोकं का हायर केली आहेत आपण ?".... अर्जून 

 

" अरे लग्न माझं आहे ना …. माझं पर्सनल लग्न ".... माही 

 

" पर्सनल लग्न ?"..'.... अर्जून 

 

" हो ! आणि सर मला तर काय करू अन् काय नको असे झाले आहे , पण वेळ खूप कमी आहे … तुमचं काय काम आहे बोला पटकन , माझ्या जवळ वेळ खूप कमी आहे "..... माही इकडेतिकडे बघत बोलत होती , आणि तिला काहीतरी दिसले आणि ती पुढे जायला निघाली . 

 

" Wait !"..... म्हणत अर्जून ने तिचा हात पकडत तिला स्वतःकडे ओढले .. तरी तिचे तिकडे बघून हातवारे करणे सुरू होते . 

 

" Stop !".... ती त्याच्याकडे लक्ष देत नाहीये बघून त्याने तिचे हातवारे चाललेले दोन्ही हात तिच्या मागे घेत आपल्या एका हातात घट्ट पकडले आणि दुसऱ्या हाताने तिच्या चेहऱ्याला पकडत आपल्याकडे वळवले . 

 

" Look at me !".... अर्जून 

 

" हा , खूप हँडसम दिसत आहात , जाऊ आता? ".... माही 

 

" माही , अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही, फक्त माझ्याकडे बघायचं !'..... अर्जून थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला. 

 

" Sir , तुम्हाला वेगळं काय बघायच ? माझ्या डोक्यात , डोळ्यात , हृदयात सगळीकडे तुम्हीच आहात …. दिल चिर के देख तेरा ही नाम लिखा है … पण आता तिकडे बघू द्या , थोडंस काम राहिले आहे ".... माही हसतच मस्करी करत बोलली. 

 

 " माही , लग्न माझं पण आहे , पण मी तुझ्यासारखा असा नाही वागत आहो ".... अर्जून

 

" अरे हो की , लग्न तुमचं पण आहे ….पण तुम्ही तर कुठे दिसतच नाही , नुसते त्या लॅपटॉप ला च चीपकले आहात … मग तुमची पण कमतरता मलाच भरून काढावी लागेल ना , अर्धांगिनी आहे तुमची , येवढं तर मी नक्कीच करू शकते "... माही आपली बत्तीसी दाखवत बोलली . 

 

" Shut up !! दोन दिवसापासून बघतोय , नीट जेवण नाही की झोप नाही , सतत इकडे फिरत असते "..... अर्जून 

 

" माझं लग्न आहे …. तुमच्यासोबत ".... माही परत आपली बत्तीसी दाखवत होती. एकतर ती ऐकत नव्हती , त्यात तिचं असं हे वागणं , अर्जुन आणखीच इरिटेट होत होता . 

 

" पागल ! "... अर्जून बाजूला टेबल वर ठेवलेलं

 

" हे सांगायला तुम्ही इकडे आले होते ? मग झालं ना सांगून , आता माझे हात सोडा , मला कामं करायची आहेत "..... माही चे दोन्ही हात अर्जुनने तिचा पाठीमागे करत पकडून ठेवले होते , ते सोडवण्याचा ती प्रयत्न करत होती , अर्जुनने परत आपल्या आताची पकड घट्ट केली आणि तिला जवळ जवळ आपल्या मिठीतच ओढले होते . 

 

" आधी हे पिऊन घे , मग कर जे उपद्व्याप करायचे आहेत ते ".... अर्जुन त्याच्या मागच्या साइडला टेबल वर ठेवलेला ज्यूसचा ग्लास घ्यायला वळत बोलला. 

 

" चहा … आलं घातलेला …. वाह ! कित्ती गोड आहात ना तुम्ही , मला याचीच गरज होती , आता बघा मस्त तरतरी येईल "..... माही 

 

" चहा नाही , ज्यूस ".... अर्जून ने ज्यूस चा ग्लास तिच्या ओठांजवळ पकडला. 

 

" ह्या ! हे काय , मला नको , मी चहा पिऊन येते "... माही 

 

" तू ऑलरेडी खूप चहा पिला आहेस , अँसिडीटी वाढेल आहे , चुपचाप ज्यूस प्यायचा ".... अर्जुन जबरदस्ती तिला आपल्या हाताने ज्यूस पियु घालत होता. त्याने एका हाताने आपल्या मिठीत तिला घट्ट पकडून ठेवले होते आणि दुसऱ्या हाताने ज्यूस चा ग्लास पकडला होता , आणि तिच्याकडे बघत होता . माही ज्यूस पिता पिता त्याचाकडे बघत होती , खूप गर्मी मध्ये अशी थंडगार पावसाची सर यावी आणि सगळं शांत व्हावे असे तिला त्याच्या मिठीत त्याच्या हाताने ज्यूस पितांना वाटत होते. तिचा थकवा एकदमच कुठल्या कुठे पळाला होता , ती त्याच्या डोळ्यात हरवली होती . 

 

तुझमें रब दिखता है, यारा मैं क्या करूँ 

तुझमें रब दिखता है, यारा मैं क्या करूँ

 

गाण्याचा आवाज आला तसे अर्जुन माही भानावर आले , बघतात तर काय आजूबाजूला आकाश , आशुतोष , श्रिया आणि अनन्या तोंड दाबून हसत होते. माही सगळ्यांना अशी जवळ बघून एकदम गोंधळली होती. 

 

" माही , ऑरेंज ज्यूस खूप गोड होता ना ?".... आशुतोष 

 

" हां ".... माही , ते ऐकून अर्जुनने डोक्यावर हात मारून घेतला. 

 

" अर्जून च्या हातून पिल्यामुळे तो खूप गोड झाला , हो ना माही ?"... अनन्या 

 

" हां !"... माही 

 

" ऑरेंज ज्यूस मध्ये व्हिटॅमिन c भरपूर असते , इन्स्टंट एनर्जी मिळते ".... आकाश 

 

ते सगळं ऐकून आणि माही आपल्याच तालात बघून अर्जून ला सुद्धा हसू येत होते … 

 

" हां !".... माही 

 

" आणि अर्जूनचा मिठीत तर एनर्जी दुप्पटीने वाढते , हो ना माही ?".... आशुतोष 

 

" हां ! मिठीत ? ".... माही 

 

" हो , तू … अर्जुनच्या मिठीत ".... अनन्या 

 

" हां ? ".... माही ते ऐकून एकदम भानावर आली , बघते तर ती अर्जुनला पकडून त्याच्या मिठीत उभी होती … तिने लगेच हात काढले आणि त्याचा दूर झाली . 

 

" ते …. ते …. म्हणजे …."..... माही अडखळत बोलत होती. 

 

" चालू दे, चालू दे तुमचं , आमचं काम झालं ".... अनन्या 

 

" हां ?".... माही 

 

" तू ज्यूस पी ".... अनन्या

 

" Orange juice is very healthy ".... श्रिया 

 

" Very …. Very healthy ".... आशुतोष 

 

" काय ऑरेंज ज्यूस ? इ sss , मला नाही आवडत तो , Sir तुम्ही मला ऑरेंज ज्यूस कसा काय देऊ शकता? तुम्हाला मला काय आवडते हे सुद्धा माहिती नाही ?".... माही 

 

" हो ना बघ , तुला तरी माहिती त्याला कारले आवडतात , पण बघ हा कसा ?".... अनन्या 

 

" माही , आताच त्याला थोडा दम द्यायला शिक , नाहीतर हाताबाहेर जाईल हा तो !'... आशुतोष 

 

" Sir , तुम्ही असे कसे वागू शकता ".... झालं माहीची बडबड बडबड सुरू झाली …. बाकीचे ओठ दाबून हसत होते … 

 

" माही !".... अर्जुन तिला ज्यूस चा ग्लास दाखवत बोलला. 

 

" हा तर अननस चा ज्यू……..स ".... माही

 

" Yess !".... अर्जुन होकारार्थी मान हलवत बोलला. ते बघून आता तिला तिचा वेंधळेपणा कळला होता …. आता तर तिला पार मेल्याहून मेल्यासारखे झाले होते …. अन् बाकीचे गाणं आणखी जोरजोरात तालासुरात म्हणत होते …. माही तर लाजून तिथून पळत गायबच झाली …. 

 

तू ही तो जन्नत मेरी, तू ही मेरा जूनून 

तू ही तो मन्नत मेरी, तू ही रूह का सुकून

तू ही अंखियों की ठंडक,तू ही दिल की है दस्तक 

और कुछ ना जानूं मैं, बस इतना ही जानूं 

तुझमें रब दिखता है, यारा मैं क्या करूँ 

तुझमें रब दिखता है, यारा मैं क्या करूँ

 

*******

 

धमाल मस्ती , चिडवाचिडवी , एकमेकांची खेचाई , फोटो , व्हिडिओ , सेल्फिज काढणे सुरू होते . गाण्यांचे तर विचारायलाच नको , कोणते गाणे कुठल्या वेळेला सुरू होईल काहीच सांगता येत नव्हते …. प्रत्येक situations वर सगळ्यांना भारी भारी गाणे सुचत होते . घरातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षण एन्जॉय करत होता . 

 

 

 

 

" आई , बाबा "..... माही डोळे विस्फारून पुढे बघत होती . माही दारात उभी काही करत होती की अचानक तिचं लक्ष पुढे गेले , आणि तिला तिचे आई, बाबा , मंजू , मनीष आतमध्ये येताना दिसले. तिला तर काहीच कळत नव्हते , हे लोकं इथे कसे काय ? आयुष्यातल्या सगळ्या सुंदर आणि महत्वाच्या कार्याच्या वेळेस त्यांना इथे बघून आनंदी व्हावे , की त्यांनी जे केले ते आठवून दुख्खी व्हावे , बऱ्याच अश्या समिश्र भावनांची तिच्या मनात गर्दी झाली होती. इतक्या दिवसांनी बघून तिच्या डोळ्यात अश्रूही आले होते … हातात असलेल्या फुलांच्या माळा आपोआप गळून खाली पडल्या होत्या . काय करावे तिला कळत नव्हते… शेवटी तिने आपल्या मनाचा कौल घेतला आणि आई बाबांच्या दिशेने जाऊ लागली, ती जशी पुढे जाणार तेवढयात अर्जून ने तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडून घेतला आणि तिला पुढे जाण्यासाठी रोखले. तिने अश्रूपूर्ण आर्जवी डोळ्यांनी अर्जूनकडे बघितले , त्याचा डोळ्यात प्रचंड राग दिसत होता … नकारार्थी डोकं हलवत त्याने तिला त्यांच्याकडे जायचं नाही म्हणून खुणावले. 

 

*******

 

क्रमशः 

 

 

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️