Login

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 81

अर्जुन माही

तू ही रे …. कसं जगायचं तुझ्याविना 81

भाग 81

आपल्या आयुष्यात आपल्याला काही हवे असेल तर सतत प्रयत्न तर करावेच लागतील , हा विचार करत आणि मिराचे बोलणे अर्जूनच्या जिव्हारी सुद्धा लागले होते की मी आणि माऊ आजीला आवडत नाही , … त्याच्या माही आणि मीराला कोणीही काहीही बोललेले त्याला आवडत नव्हते… मिराच्या बालमनावर कुठलेच शब्दांचे दुष्परिणाम व्हायला नको असे वाटत होते आणि आता त्याला सुद्धा त्याची मिरा माही … त्याचा नजरे समोर हवी होती , त्याचा जवळ.. त्याचे बनून हवे होते…म्हणून बऱ्याच दिवसानंतर आज अर्जुनने माही बद्दल आईसोबत बोलायचं ठरवले ….

त्याने त्याच्या परीने जमेल तसे आईला समजावून सांगितले आणि बाहेर आपल्या रूम मध्ये निघून आला. 

अर्जुनचा बोललेला एक एक शब्द नलिनीच्या काळजाला भिडला होता …. आणि खरंच तर बोलला होता तो … त्याचे प्रत्येक शब्द तिला विचार करायला भाग पाडत होते …

नलिनी शेवटी आई होती , कितीही नाही म्हटले तरी आपल्या मुलाच्या सुखापुढे , आनंदपुढे तिला दुसरं काय हवे होते …. कधी कधी बघण्याचा दृष्टिकोन बदलून बघायला हवा , पिढ्यांचे अंतर , त्यामुळे विचार करण्याची पद्धत , आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो , पण तो चूकच असेल असे नाही …. अर्जुन बोलल्या प्रमाणे नलीनीने सगळ्या बाजूंनी विचार केला… एक स्त्री म्हणून ती विचार करत होती…. आणि मग माही तिला कुठेच चुकीची दिसत नव्हती ….आणि शेवटी प्रेम हे प्रेम असते , कुठल्याही पिढीतील असू देत … त्या ज्या निर्मळ भावना आहे , त्या तर सारख्याच होत्या तिच्या आणि अर्जुनच्या… नलिनीने सुद्धा प्रेम केले होते …. अर्जुनने सुद्धा प्रेम केले होते …. आणि प्रेम शरीर , पैसे , मालमत्ता , स्टेटस , सामाजिक प्रतिष्ठा या सगळ्यांच्या वरती असते…... हे तिला कळले होते … तिच्या प्रेमात तिला विरह मिळाला होता , ती तडपली होती …. पण आता तिला तिच्या मुलाच्या आयुष्यात हे सगळं नको होते ….. तिने माहीला आपल्या घरात घेऊन यायचा पक्का निर्णय घेतला… तसे तर माही एक मुलगी म्हणून नेहमीच आवडली होती फक्त आपली सून , अर्जूनची बायको म्हणून तिने कधी तिच्याकडे बघितले नव्हते…पण आता ती तयार झाली होती अगदी मनापासून माही आणि मिराला स्वीकारायला… एक बरं झालं की सगळ्यांनीच आणि अर्जुनने सुद्धा नलिनीला विचार करायला वेळ घेऊ दिला… तिच्यावर नातं थोपले नाही …. जर नात्यात जबरदस्ती झाली असती तर कदाचित माही आणि नलिनी मध्ये नेहमी करता एक अढी निर्माण झाली असती… पण आता ती स्वतः तयार झाली होती… मनापासून तिने माही मिराला स्वीकारले होते. 

सगळं कसं पाण्यासारखे पारदर्शक झाले होते , आता आणखी उशीर नको म्हणून नलीनीने लगेच आत्याबाईंना फोन करून थोडीफार माहिती देत घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. 

ठरल्याप्रमाणे आत्याबाई सगळ्यांना घेऊन शांतीसदनला आल्या होत्या. माहीला तर काही कळत नव्हते काय सुरू आहे , पण काही महत्वाचं काम आहे असेच आत्याबाईंनी सगळ्यांना सांगितले होते …. माही घाबरतच तिथे आली होती…. कोणी नाही पण नलिनी ला नाही आवडणार , कदाचित त्या खूप रागावणार याचीच तिला भीती वाटत होती. 

नलिनीने सगळ्यांसमोर माही आणि मीराला स्वीकारले होते … घरात सगळ्यांना खूप आनंद झाला होता …… कितीतरी दिवसांनंतर , महिन्यांनंतर आज घरात सुख , खुशी येऊ बघत होते पण अचानक अर्जुनने लग्नासाठी नकार दिला…. 

" मला नाही करायचं लग्न "..... अर्जुन निर्विकारपणे बोलला आणि आपल्या रूमकडे जायला वळला…

अर्जुनचे हे शब्द ऐकून सगळेच शॉक झाले होते , माहीला तर काहीच कळलं नव्हते, कितीतरी दिवसांनी तिला तिचा अर्जुन मिळाला होता , पण त्यात त्याने नकार दिला… त्याचे ते शब्द तिच्या हृदयाला एखाद्या टोकदार बाणासारखे टोचले होते ….. ते शब्द ऐकले आणि तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहायला लागले. कंठ दाटून आला , ओठातून शब्द सुद्धा निघत नव्हते… ती भरल्या , वाहत्या डोळ्यांनी पाठमोऱ्या अर्जूनकडे बघत होती….. अर्जुनने तिच्या डोळ्यात पाणी बघूनही त्याने ते न बघितल्यासारखे केले होते….हे तिच्या लक्षात आले होते…. नेहमी तिच्या डोळ्यात एकही अश्रूंचा थेंब सहन न होणारा अर्जुन आज तिच्या डोळ्यातील पाण्यांचे कारण बनला होता … 

" अर्जुन ….. "..नलिनी 

नलिनीच्या आवाजाने वरती पायऱ्या चढणारा अर्जुन तिथेच खाली थांबला.. 

"अर्जुन , ही काय मस्करी सुरू आहे ?".... नलिनी 

" मस्करी नाही , मी खरं काय तेच सांगितले आहे "...... पाठमोरा अर्जुन मागे वळत माहीकडे बघत बोलला. 

" आतापर्यंत तर तुला ती तुझ्या सोबत , या घरात हवी होती ?'.... नलिनी

" पण आता नकोय, मी जिथे आहो तिथे खुश आहो…. ती पण आहे तशी खुश आहे , आम्ही दूरच ठीक "..... अर्जुन 

" आता पर्यंत तू मला प्रेमाची व्याख्या समजावून देत होता ….. तुझं तिच्यावर प्रेम आहे सांगत होता ….. आता काय प्रेम संपले काय? जे आता तुला ती नकोय "..... नलिनी 

" माझं तिच्यावर प्रेम आहे आणि नेहमीच राहील …. तिची जी जागा आहे माझ्या लाईफ मध्ये ती दुसरं कोणीच घेऊ शकणार नाही "..... अर्जुन 

" मग ….. काय प्रोब्लेम झाला आहे अर्जुन ? आता तर घरातील सगळ्यांनीच तुमच्या या नात्याला संमती दिली आहे , स्वीकारलंय तुमचं नातं , आता काय झालं?".... नलिनी 

" हाच तर प्रॉब्लेम आहे आई , सगळ्यांनी स्वीकारले आहे म्हणून माही मला स्वीकारायला तयार झाली ….. जर कोणी तयार नसते झाले तर तिने मला स्वीकारलेच नसते. तिने माझा खरंच विचार केला आहे काय ? तिला माहिती होते मी नाही राहू शकत तिच्या आणि मिरच्या दूर , तरी तिने तुम्हा सगळ्यांना निवडले , मला नाही …. ".... अर्जुन 

" हे काय बोलतो आहे तू ?".... नलिनी 

" I love her …. But I can't trust her ….. माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही आहे …. उद्या परत कोणी तिला असेच परिवारासाठी ब्लॅकमेल केले , त्याग करायला सांगितले ,तर परत ती मला सोडायला मागेपुढे बघणार नाही …. खूप त्रास झाला आहे मला , पुरुष असून सुद्धा खूप रडलो आहे, रात्र रात्र जागून काढल्या आहेत मी …. मला आता परत त्या त्रासातून जायचं नाही ….. खूप वेदनादायी असते ते …. परत असे झाले तर मी नाही सहन करू शकणार "..... अर्जुन 

अर्जूनचा एक एक शब्द तिथे उपस्थित प्रत्येकाचे काळीज चिरत होता …. नलिनी आणि माहीला त्यांनी किती मोठी चूक केली आहे ते आता चांगलेच कळले होते…. " प्रेम तर केले पण अर्जुनचा विश्वास मात्र नाही जिंकू शकलो… आणि ज्या नात्यात विश्वासच नाही … ते प्रेम तरी कसे प्रेम ? ".... 

" अर्जुन , हे बघ , आम्ही आपली चूक मानतो रे राजा …. पण तू असा अविश्वास नको दाखऊ …. माझ्यासाठी , एका आईसाठी ती तुझ्या दूर जायला तयार झाली होती …. तिचं खरंच प्रेम आहे रे तुझ्यावर …. "...... नलिनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती… 

" हे प्रेम नाही आवडलं मला …. खूप वेदनादायी असते …. माहीने प्रेम तर माझ्यावर केले पण जेव्हा प्रत्येक्षात काही करायची वेळ आली , मला साथ द्यायची वेळ आली … तिने मला कुठेच जागा दिली नाही …. तिच्यासाठी नेहमीच बाकी सगळा परिवार आधी होता , सगळ्यांचा आनंद , सगळ्यांचं सुख तिच्यासाठी आधी महत्वाचं होतं …. अंजली आकाशच्या लग्नासाठी , तिच्या फॅमिलीच्या आनंदासाठी तिने सोनिया सोबत लग्न करायचे माझ्याकडून प्रॉमिस घेतले, तिनेच ठरवले माझ्यासाठी कोण योग्य कोण अयोग्य , आणि मी प्रेमवेडा तिला शब्द सुद्धा देऊन बसलो…. सोनियाने वेळेवर नकार नसता दिला तर तिच्या सोबत लग्न सुद्धा झालं असते …. त्या वेडीला (सोनिया) सुद्धा कळले होते माझं सुख कशात आहे ते …. मी न बोलता सुद्धा तिने सगळं ऐकले होते …. 

मला माहिती होते असे पारिवारिक काही कारण पुढे आले तर माही परत काही ना काही घोळ घालेल , म्हणून मी तिच्याकडून मॅरेज पेपर तिच्या नकळतपणे साईन करून घेतले होते ….. आमचं लग्न झालं होते तरी तिने ना तर हे लग्न स्वीकारले होते, ना ही मला नवरा म्हणून ….   

माझ्यावरच तिने सगळ्यात जास्त प्रेम केले , आणि मलाच सुखांच्या , आनंदाच्या यादीत सगळ्यात शेवटी ठेवले …. तिची प्रायोरिटी मी कधीच झाली नाही , मी सगळ्यात जवळचा होतो तिच्या , तिने मलाच गृहीत धरले …. हे ऐकायला कडू आहे पण हेच सत्य आहे , अर्जुन काय आहेच सोबत …. असं नाही चालणार आई …

मला कळते फॅमिली खूप महत्वाची आहे , आणि असायला हवी …. पण काय योग्य , अयोग्य हे ठरवता यायला हवे …. योग्य निर्णय घेता यायला हवे … आई तू तर चुकीचे करत होतीच , पण माहीची त्यात जास्त चूक होती ….ठीक आहे ते पण मान्य , पण जेव्हा मी स्वतः पुढे आलो , तिचा साथ द्यायला तयार झालो , हक्काने तिचा हात माझ्या हातात घेतला , तेव्हाच तिने माझा हात झिडकारला… हात सोडला होता तिने माझा ….

 देऊन बघायचा असता एकदा हातात हात , ठेऊन बघायचा असतात एकदा माझ्यावर विश्वास …. केले असते मी सगळं ठीक… वेळ लागला असता पण झाले असते ठीक … 

माही खूप भावनिक आहे , भोळी आहे …. नेहमीच स्वत:पुढे बाकी सगळ्यांचा विचार आधी करते …. हा तिचा स्वभाव आहे …. आणि माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही …. पुढे जाऊन कधी परत नात्यांमध्ये परीक्षा द्यायची वेळ आली तर परत मी या परीक्षांमध्ये नापास होणार …. माही परत मला सोडून जाणार … त्यापेक्षा हे काही नकोच …. प्रेम आहे … प्रेम असू दे ….. सोबत राहण्याचा हट्ट नकोच …. "..... अर्जुन 

" अर्जुन , असा रागावू नको रे बाळा …. "..... आजी 

" आजी खूप थकलोय ग आता ….. अख्ख्या जगाला मुठ्ठीत घेऊ शकतो … पण या आपल्याच नात्यांत , या भावनिक खेळात हरलोय मी ….. आता परत हरणे मला झेपणार नाही …. "..... अर्जुन बोलत तर सगळ्यांना उद्देशून होता पण तो बघत मात्र माहीच्या डोळयात होता …. माहीला आता त्याचे सगळे बोलणे असह्य झाले होते …. तिचं हृदय खूप दुखायला लागले होते …. अश्रू अनावर झाले होते …. त्याला होणाऱ्या वेदना ती स्वतः अनुभवत होती …. कशाचाही विचार न करता पळत जात तिने अर्जुनला मिठी मारली …. त्याला आणखी आणखी घट्ट पकडू लागली … 

नेहमीप्रमाणे नकळतपणे त्याचे हात तिच्या पाठीवर , तिच्या डोक्यावरून फिरत होते … ती त्याचा कुशीत रडत होती…. 

त्या दोघांना बघून बाकी सगळ्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी जमायला लागले होते …. त्या दोघांची हालत, त्यांचं प्रेम बघून श्रियाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले होते …. माहीवर असलेला राग ती कधीच विसरली होती …. 

" Calm down …. I am always with you ….. love you sweetheart ".... अर्जुनने तिच्या डोक्यावर किस केले …. तिला स्वतःच्या कुशीतून दूर केले आणि झपाझप पावले टाकत आपल्या रूम मध्ये निघून गेला…