
तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 71
भाग 71
अर्जुन आणि माही माहीच्या गावाला जायला निघाले होते . ते नाशिक मध्ये पोहोचले होते . नंतर जेवण नीट होणार नाही विचार करूनच अर्जुनने ड्रायव्हरला गाडी त्याच्या हॉटेल मध्ये घ्यायला सांगितले . अर्जुनाची बरीच हॉटेल होते, त्याची एक ब्रांच इथे नाशिकला सुद्धा होती. तसा तो मूळचा नाशिकचा , त्यांचा बराच बिजनेस इथे पण पसरला होता. माही सुद्धा काही वर्ष इथे राहिली होती . त्यामुळे नाशिक त्यांना नवीन नव्हते. त्या दोघांची पहिली भेट सुद्धा इथेच झाली होती . जेवण वगैरे आटोपून पुढच्या प्रवासासाठी निघाले.
त्यांनी नाशिक क्रॉस केले होते . माहीचे सगळे लक्ष खिडकीच्या बाहेर होते. खूप वर्षानंतर ती तिच्या गावाला जात होती . जुन्या लहानपणीच्या आठवणीने तिचे मन भरून येत होते. माही चे सगळे लक्ष खिडकीतून बाहेर होते , अर्जुन लॅपटॉप उघडून बसला होता. अधून मधून माहीकडे बघत तो आपले काही काम करत होता . ड्रायव्हर पण बॉडीगार्ड कम ड्रायव्हर होता , त्यामुळे काही टेन्शन नव्हते . कार पुढे जात होती , आता माहीला तिच्या ओळखीचे रस्ते दिसायला लागले होते, ओळखीची दुकानं, घर , मंदिर ...ते सगळं बघून माहीच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक आली होती. थोड्या पुढे तुला तिची शाळा दिसली . शाळा बघून माही खूप एक्साइट झाली . ती बघत तर बाहेर होती, पण आनंदाच्या भरात तिने अर्जुनचा हात पकडून ठेवला होता …. ती अगदी लहान मुलांप्रमाणे उड्या मारत बोलत होती.
" सर ….सर ….बघा माझी शाळा , आम्ही मैत्रिणी त्या तिथे पटांगणात खेळत होतो आणि ते….. ते झाड आणि त्या भोवती तो चबुतरा दिसतो ना, तिथे आम्ही सगळ्याजणी गोल करून बसत डब्बा खात होतो. आणि ते तिकडे आमची प्रार्थना व्हायची , आणि तो बघा माझा वर्ग , आणि तो बाजूचा माझ्या जिवलग मैत्रिणीचा वर्ग . कधी शाळाला दांडी मारायची असली की ते बघा तिकडे, ते मागच्या साईडला दार आहे ना, त्यामागे शेती आहे, तिथून पळून जायचं आणि दिवसभर मग त्या शेतात , या बांध्यात त्या बांध्यात पळत सुटत होतो, बोरं , चिंचा, कैऱ्या तोडत होतो. तिकडे पलीकडे शिवाचे मंदिर आहे, तिथे बसून मिटक्या मारत बोरं चिंचा खात होतो. बोरं, चिंचाचे नाव काढून आत्तासुद्धा तिच्या तोंडाला पाणी सुटले होते. ती अगदी भान हरपून बोलत होती आणि अर्जुन तर फक्त तिच्याकडे बघत होता.
सगळ्यांना आपले बालपण किती आवडते , किती स्पेशल असते , त्याला ते माहिती कडे बघून कळत होते. त्याला तर त्याचे बालपण कधीच आवडले नव्हते, त्याने त्याच्या आईला सतत रडताना बघितले होते. वडिलांना आई सोबत भांडतांना , आईला घालून पाडून बोलताना बघितले होते.
वडिलांचे असे काही खास प्रेम त्याला मिळाले नव्हते . त्यानंतर त्याचे वडील त्याला आणि आईला सोडून गेले होते . त्याने फक्त जीवनासोबत आईचा संघर्ष बघितला होता , आणि आपण आईसाठी काही करू शकत नाही आहो , याचा राग यायचा . त्याला तर बालपण नकोसे झाले होते कधीकधी मोठे होतो असे त्याला झाले होते. पण माहीला असे आनंदी बघून, आपण आपल्या आयुष्यातले सोनेरी दिवस मिस केले आहे , बालपण जगायचेच राहून गेले आणि ते दिवस आता परतून कधीच येणार नाही, त्याचा डोक्यात विचार सुरू होते.
रस्त्याने दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टींविषयी माही त्याला तिच्या आठवणी सांगत होती . एक एक ठिकाणा विषयी तिच्या जवळ खूप बोलायला होते. तिच्या गोष्टी संपतच नव्हत्या, कंटीन्यूअसली तिची बडबड सुरू होती.
" I wish , इथून परत जाताना, तू अशीच खुश असुदे" … अर्जुन मनोमन कामना करत होता कारण या गावच्या या गोड आठवणी काही क्षणात बदलणार होत्या, कडू होणार होत्या , अर्जुनला विचार करून खूप वाईट वाटत होते. किती काही दिले होते तिला त्या गावाने , पण एका वाटीत घडलेल्या गोष्टीमुळे तिला तिचे गाव सोडावे लागले होते.
कार आता माहीच्या कॉलेजच्या रस्त्याने निघाली होती . आता हळूहळू माहीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले, जशी कार त्या रस्त्याने लागली, माहीची अर्जुनच्या हातावरची पकड घट्ट घट्ट होऊ लागली, तिच्या कपाळावर घाम जमा व्हायला लागला, ती त्याच्या मागे आपला चेहरा लपवू लागली . जशी ती जागा जवळ आली , तसे तिच्या बोटांची नखे त्याच्या हाताला रुतायला लागली होती. तिच्या वागण्यावरून अर्जुनला कळले होते कि ती जागा आली आहे , आणि त्याने कार साइडला एका झाडाखाली घ्यायला सांगितली . अर्जुनने ड्रायव्हरला इशारा केला तसा तो कारच्या बाहेर पडला . जसा ड्रायव्हर बाहेर गेला, अर्जुनने लगेच माहीला आपल्या कुशीत घेतले, तिच्या हार्ट बिट्स खूप वाढल्या होत्या, त्या नॉर्मल होईपर्यंत तो तिला आपल्या मिठीत घेऊन बसला होता. त्याने खिशातून रुमाल काढला आणि तिचा घामाने ओलेचिंब झालेला चेहरा पुसला.
" माही…"... अर्जुन
त्याने आवाज दिला तशी ती त्याच्या कुशीतून बाहेर आली आणि त्याच्याकडे बघत होती.
" यू आर व्हेरी स्ट्रॉंग स्वीटहार्ट ".....अर्जुन
माहीने फक्त डोळ्यांच्या पापण्या झपकावल्या.
" आय लव यू".... अर्जून
तशी ती गालात हसली. तिला आता थोडं ठीक वाटत होते.
" गुड, चलायचं?".... अर्जुन
माहीने होकारार्थी मान हलवली . अर्जुन कारच्या बाहेर उतरला आणि माहीला हात दिला. माहीने सुद्धा आपला हात त्याच्या हातात दिला आणि ती कारच्या बाहेर आली . सत्या बद्दल माहीने आधीच माहिती आणि त्याचा पत्ता दिला होता. वकिलांच्या टीमने त्यालासुद्धा घटनास्थळी आणले होते.
आधी सत्या खूप घाबरला होता. गरीब आणि प्रापंचिक माणूस तो, त्याला कुठल्याही भानगडीत पडायचे नव्हते. त्याला समजावून आणि लाखांनी पैसे खर्च करून तो यायला तयार झाला होता . सत्या काकाला समोर बघून माहीचे डोळे पाणावले .
" पोरी, कशी आहे?" . सत्त्याला पण इतक्या वर्षानंतर माहीला बघून गलबलून आले होते.
" मी ठीक आहे काका "...माही
" खूप वर्षांनी आली पोरी गावात ?"......सत्या
" काका गाव सोडून जावे लागले होते, नंतर एकटीने हिम्मतच नाही झाली गावात यायची"... माही
" हे कोण?".... सत्या , अर्जुनने कार मधून उतरल्या पासून माहीचा हात पकडून ठेवला होता, ते बघून सत्याने विचारले.
" हे……."... माही अर्जुनकडे बघत होती.
" मी अर्जुन पटवर्धन, माहीचा हजबंड, I mean माहीचा नवरा "....अर्जुनने उत्तर दिले
" तुम्हीच काल पै….".....
" हो मीच , काळजी करू नका आणखी मिळतील पण खरं काय ते सगळं सांगा ".....अर्जुन
"नाही नाही , नको नको, मी सगळं सांगतो , कोर्टात पण साक्ष देईल साहेब, आमच्या पोरीला सुखी ठेवा साहेब, तिचं काय बी चूक नव्हती बघा , खूप सोन्यासारखी पोरगी आहे आमची. माय बापाची साथ सुटली साहेब , पण तुम्ही नका सोडू तिची साथ . तुम्ही म्हणाल ते सगळं करतो, तेव्हा काय करू शकलो नाही , घाबरलो होतो, पण आता तुम्ही म्हणाल ते सगळं करतो "..... सतया अर्जुन पुढे हात जोडत आर्जवी शब्दात बोलत होता.
" तुम्ही काळजी करू नका , आम्ही दोघं नेहमीच सोबत असणार आहो आणि तुमच्या घराची , नातवाची, काळजी करू नका, त्याला चांगली नोकरी मिळेल , फक्त त्या दिवशी काय झाले? कसे झाले ? ते सगळं तुम्ही आमच्या वकिलांना सांगा ".....अर्जुन
" हो जी साहेब".... सत्या
माहीची बाजू तर आधीच रेकॉर्ड केली होती. आता वकील सत्याला वेगवेगळे प्रश्न विचारत त्या दिवशी काय काय झाले, अगदी कृती सकट विचारत होते . सत्या पण ती लोक विचारतील ते सगळे उत्तर देत होता. माहीच्या आणि सत्याच्या बोलण्यातून त्यादिवशी चा एक्झॅक्ट सीन त्यांना क्रिएट करायला मदत होत होती.
" ते तीन पोरं, बाजूच्या गावात कुठे फिरायला आले होते म्हणे , फिरता फिरता इकडे आले होते, मला इकडे काय काय आहे विचारत होते, ते दारू पिलेले वाटत होते. ते मुलं पुढे गेले , थोड्या वेळाने माही येतांना दिसली . पावसाला सुरुवात झाली होती . ती माझ्याशी बोलून पुढे गेली. पावसाचा जोर वाढला होता , खूप अंदाधुंद पाऊस, विजांचा कडकडाट सुरू होता . मला थोडं अस्वस्थ वाटत होते , राहून राहून माहीचा विचार येत होता. पोरगी घरी बरोबर पोहोचली की नाही वाटत होते. ती म्हणाली होती जाते म्हणून पण मनाला खूप रुखरुख लागून राहिली होती . मी शेवटी गेलो तिच्या मागे, थोडा पुढे गेलो तर रस्त्याने कोणीच नव्हते , मला वाटले माही घरी पोहोचली असेल , म्हणून परत फिरलो तर ह्या इथे या झोपडी जवळ आलो तर मला मुलीच्या ओरडण्यासारखा आवाज आला, मी हळूहळू इथं खिडकी जवळ गेलो, खिडकीच्या फटीतून बघायचा प्रयत्न करत होतो, तर मला तेच भेटलेले दोन मुलं उभे दिसले, एकाच्या हातात मोबाईल आणि चाकू होता, बहुतेक तो फोटो काढत होता आणि त्याच्या सोबत जो होता तो थोडा घाबरलेला वाटत होता . तो चला चला करत होता…. पण त्याचं कोणी ऐकून घेत नव्हते. परत किंचाळण्याचा आवाज आला तर मी थोडं खाली वाकून बघितले आणि माझे पाय थरथरायला लागले तिसरा मुलगा माही सोबत……".. सत्याला आता पुढे बोलल्या जात नव्हते.
ते सगळं तर आता अर्जुनला सुद्धा ऐकवल्या जात नव्हते , त्याचं सगळं लक्ष माहीकडे होतं..
" साहेब , मी खूप घाबरलो होतो , मी म्हातारा , ती तरणीताठी तीन पोरं, वरून त्यांच्याजवळ चाकू वगैरे पण होते. मी कोणाची मदत मिळते का म्हणून आजूबाजूला शोधत होतो, पण दूरदूरपर्यंत कोणी दिसत नव्हते, शेवटी मी निश्चय केला आणि परत आलो तर कानावर परत जीवघेणे शब्द पडले, तो पोरगा तिला मारून टाकायच्या गोष्टी करत होता, पोलीस केस वगैरे होईल तर आपण फसू म्हणून ते तिला मारून टाकू, तिचा चेहरा खराब करू आणि इथून पहाडावरून फेकून देऊ म्हणजे कोणाच्या हाती काही लागणार नाही, असे बोलत होते, एकदम क्रूर राक्षसाला सारखे त्यांचे वागणे होते . मी परत खूप घाबरलो मी जर त्यांना दिसलो असतो तर त्यांनी आम्हा दोघांना मारले असते. काही समजत नव्हते काय करावं, मग मी मोठे दगड उचलले आणि त्या झोपडीच्या आजूबाजूला फेकले असे दर्शवले की इथं तीन चार लोक आले आहेत, त्या आवाजाने त्यातला एक मुलगा बाहेर आला , तो आधीच घाबरला होता, कोणीतरी आहे इथे असे सांगून त्याने सगळ्यांना पळायला सांगितले . बाकीचेही घाबरले , त्यांनी पोरीला होते तसेच सोडले आणि बाहेर पळाले. मी थोडा त्यांच्या पिच्छा पण केला पण मग ते पळाले होते. परत आलो तर माही मला रस्त्याने जाताना दिसली, कोणी बघू नये म्हणून ती स्वतःला झाकझुक करून चेहरा लपवत जात होती . कदाचित तिला कोणाला कळू नाही द्यायचे नव्हते असे काही झाले आहे असे वाटले . म्हणून मग मी तिला काही आवाज दिला नाही , कोणाला माहिती पडले या शरमेने कदाचित तिने चुकीचं काही केले असते. तरी मी तिच्या मागे मागे जात होतो , मला भिती वाटत होती की माही काही स्वतःचं वाईट नको करायला. पण पोरीने सावरली स्वतःला आणि ती तिच्या घरी गेली, मला थोडे हायसे वाटले तिला तिच्या घरी गेलेले बघून मग मी माझ्या घरी निघून आलो. साहेब रात्र रात्र मला झोप नव्हती, पोरगी ठीक आहे का बघायला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी परत यांच्या घराकडे आलो, असे वाटले त्यांच्या घरी जाऊन बोलावे , तिचा बाप थोडा टसनी आहे , स्वभावाने कडक, रागीट आहे , तर पोरीची बाजू मांडायला म्हणून मी गेलो होतो. घरात सगळं नेहमीप्रमाणे ठीक दिसत होते , मग मी काय तिथे बोललो नाही, घराकडे परत येऊन गेलो. गावात गोष्ट पसरू नये असेच वाटत होते, गावकरी मोठे वाईट , पोरीला जगू नसते दिले, कोणास काय सांगू बी नाही शकत होतो . झोपताना रोज डोळ्यासमोर पोरीचा चेहरा येत होता . महिनाभर रोज मी पोरीवर पाळत ठेवली . पोरीने काही चुकीचे करावे नाही असेच वाटत होते . पण मग परत काही दिवसांनी ती कॉलेजला जाताना दिसली, सगळं ठिक झाल्यासारखे वाटले. पण मग चार महिन्याने कळले पोरगी कोणा नातेवाईकाकडे शिकायला गेली . त्यानंतर काही पोरीची भेट नव्हती मी दोन-चार दिवस त्या पोराचा शोध पण घेतला, पण ते काय गावले नाही "... सत्या
जेव्हा सत्या सांगत होता आणि ते मुलं माहीला मारणार होते, ते ऐकले तेव्हा अक्षरश: अर्जुनच्या अंगावर काटा आला होता , काळजात धस्स झाले होते . थोड्यावेळासाठी तो पूर्णपणे घामाघूम झाला होता . आपण माहीला गमावले आहे की काय अश्या भावनेने त्याला त्याला वेडावून सोडले होते.
" पोरी , साहेब , मला माफ करा , मी काहीच करू शकलो नाही".... सत्या हात जोडत माही ला माफी मागत होता.
" तुमच्यामुळे माही सुखरूप आहे , थँक्यू "....अर्जुनने सत्या समोर हात जोडले होते . आज आयुष्यात पहिल्यांदा तो कोणापुढे झुकला होता.
नंतर ते सगळे त्या झोपडीत गेले. ती झोपडी अजूनही तशीच होती, फार काही तिथे बद्दल झाले नव्हते. माही आणि सत्याने वकिलांनी विचारले ते सगळे सांगितले.
" मिस्टर पटवर्धन, आम्हाला पाहिजे तशी सगळी माहिती आम्हाला मिळाली आहे. बाकी थोडे जे काही गरजे नुसार राहिले आहे , आम्ही त्यांच्याकडून विचारून घेऊ आम्ही . आमची प्रोसिजर करून घेतो. तुम्ही गेलात तरी चालेल "......वकील
" Okay "..... अर्जुन
" माही, पोरी, वाईट गोष्टी लक्षात ठेवल्या तर खूप वेदना होतात , जे झाले ते विसरून जा . मला माहिती आहे हे सोपी नाही , पण तरीही पुढल्या सुखी आयुष्यासाठी हे विसरणे जरुरी आहे . देवाच्या कृपेने सोन्यासारखा नवरा मिळाला आहे , तुझ्यासोबत साथीने तुझ्या सुखदुःखात उभा आहे, नाही तर आपलेच लोक साथ सोडतात. नशिबाने खूप चांगला साथीदार भेटला आहे, जप त्यास, खुश ठेव , सुखी रावा "......सत्या माहीच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद देत होता.
" हो काका , तुम्ही पण तुमची काळजी घ्या "....सत्या काकाचा निरोप घेऊन माही आणि अर्जुन कार पार्क केली होती तिथे आले, माही कारचे दार उघडून आत मध्ये जाऊन बसली. कारमध्ये आल्या आल्या अर्जुनने माहीला टाईट हग केले. त्याच्या मनात खूप वादळ उठले होते. माहीला गमावले असते या भीतीने त्याचा थरकाप उडाला होता. पण बाहेर सगळे होते म्हणून त्याने स्वतःला सावरून धरले होते. ती लोकं माहीला मारायचा प्लान करत होते , हे त्याच्या सहनशक्तीच्या पलिकडे गेले होते . आणि एवढं सगळं झाल्यावर जर माहीने वाकडं काही पाऊल उचलले असते तर , स्वतःच्या जीवाला काही केले असते तर, तो खूप घाबरला होता.
त्याने तिच्या चेहऱ्यावर पटापट किस करायला सुरु केले, तो वारंवार तेच करत होता. त्याच्या वागण्यावरून माहीला थोडा अंदाज येत होता की त्याच्या मनात, डोक्यात काय सुरू असेल . माहीने त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातात पकडत वरती केला , त्याच्या डोळ्यात भीती दाटून आली होती, इतका स्ट्रॉंग पुरुष पण असा घाबरू शकतो, माहीला त्याच्याकडे बघून खूप वाईट वाटत होते . त्याच्याकडे बघून कुठेतरी तिला तिच्या दुखाचा विसर पडला होता.
" सर, मी ठीक आहे, बघा माझ्याकडे, मी तुमच्यासोबत आहे" .,.. म्हणत तिने एका हाताने अर्जुनची मान पकडली आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. ती जवळ आली आणि त्याचे मन खूप भरून आले. त्याने परत तिला आपल्या मिठीत घट्ट पकडून घेतले आणि मनाशी काहीतरी निर्धार केला.
*******
क्रमशः
*******
किती गंमत असते प्रेमाच्या नात्यांची , आपल्या जोडीदाराला दुःखाची , त्रासाची झळ पोहचू नये म्हणून दुसरा आपल्या वेदना, दुःख विसरून जातो. आपल्या व्यक्तीपुढे त्याच्याशिवाय दुसरे काहीच महत्वाचे नसते . एकाने खचले तर दुसऱ्याने सावरायचे असते , एकमेकांच्या सुख दुःखाचे साथीदार व्हायचे असते.
******