

"छान जावई मिळाला हो सुमनताई आणि लग्न ही छानचं झाले रेखाचे, भाग्यवान आहे लेक ! "
बायकांचे हे कौतुकाचे शब्द सुमनताईंना आठवून आनंद होत होता.
खरचं आपल्या रेखाचे किती भाग्य ! किती चांगला जोडीदार मिळाला !
सुमनताईही आपल्या मुलीचे कौतुक करत होत्या.
रेखाचे लग्न छान पार पडले त्यामुळे आजी-आजोबा,
आई-बाबा,भाऊ व बहीण गायत्रीलाही खूप आनंद झाला होता.
एकीकडे आपल्या बहीणीला चांगला जोडीदार मिळाला याचा गायत्रीला आनंद होता; पण दुसरीकडे तिला बहीणीच्या भाग्याचा हेवाही वाटायला लागला.कारण ही तसेच होते म्हणा...
पहिल्या मुलानंतर सुमनताईंना रेखा झाली. आणि तिच्यानंतर मुलगाच व्हावा असे आजीला वाटत होते पण मुलगीच झाली आणि आजी त्या मुलीचा म्हणजे गायत्रीचा द्वेष करू लागली.
एक स्त्रीचं जेव्हा आपल्या एका स्त्रीरूपाचा द्वेष करते , तेव्हा तो स्त्रीत्वाचा अपमानच!
रेखा जन्माला आली तेव्हापासून तब्येतीने नाजूकच होती आणि नेहमी आजारी असायची त्यामुळे आई-बाबा तिची जास्त काळजी घेत होते.
पहिला मुलगा असल्याने त्याचे सर्व लाड व्हायचे आणि रेखा तब्येतीने नाजूक म्हणून आई- बाबा तिची विशेष काळजी घ्यायचे. बिचाऱ्या गायत्रीला दुसरीही मुलगी म्हणून आजी प्रेम करत नव्हती आणि आईबाबांच्या मनात तिच्याबद्दल प्रेम असूनही पाहिजे तेवढा वेळ तिला देऊ शकत नव्हते.
आईबाबांना तर आपली सर्व मुले सारखीच असतात, सर्वांवर सारखेच प्रेम करीत असतात. आपल्यावरही आईबाबा प्रेम करतात पण आपल्यापेक्षा जास्त प्रेम आपल्या भाऊ व बहीणीवर करतात. असे तिच्या मनाला जाणवत होते. प्रसंगी ती मनातले बोलूनही दाखवायची. प्रेमासाठी,आपल्याला आपल्या हक्काचे मिळविण्यासाठी ती भांडायची देखील.
रेखा रूपाने देखणी,बोलणे ही खूप प्रेमळ, कोणाला त्रास होणार नाही असे वागणे यामुळे आणि तब्येतीच्या कारणामुळेही आईची तिच्यावर विशेष माया जडत गेली.
आपल्याबद्दल आजीच्या मनात असलेला तिरस्कार, आपल्या वाटेला येणारे प्रेम रेखाला मिळत असल्याने गायत्री थोडी चिडखोर झाली होती.तिचे बोलणे रेखासारखे प्रेमळ नव्हते, रूपातही रेखाने बाजी मारली होती. गायत्रीच्या बोलण्यात परिस्थितीमुळे म्हणा किंवा तिचा स्वभाव म्हणा स्पष्टपणा होता. कोणाची मनधरणी करणे तिला जमत नव्हते. जे आहे ते समोरासमोर स्पष्ट बोलणे तिला आवडत होते. त्यामुळे अनेकांना तिचे खरे बोलणे,वागणे खटकायचे. गायत्री जरी स्वभावाने अशी वागत होती,तरी तिला सर्वांबद्दल प्रेम होते, तिला सर्वांची काळजी वाटायची.
वय वाढत गेले तशी रेखाची तब्येत चांगली होत गेली. 12वी कॉलेजपर्यंत शिक्षण झाले आणि लग्नाची मागणी आली. स्थळ घर बसल्या आणि तेही चांगले म्हणून आईबाबांनी रेखाचे लग्न केले.
"आई, ताई खरचं किती नशिबवान ! तिला सर्व काही चांगलेच मिळाले आणि मिळत आहे ना !"
गायत्री आईला म्हणाली.
" हो गं ,मलाही तिची नाजूक तब्येत बघता तिची खूप काळजी होती. पण देवाच्या कृपेने चांगला समजूतदार नवरा मिळाला तिला."
आईच्या या बोलण्याने गायत्रीला काय प्रतिक्रिया द्यावी हे ही समजत नव्हते.
गायत्रीला आपल्या आईचा,आपल्या ताईचा राग नव्हता तर राग येत होता आपल्या नशिबाचा!
गायत्री अभ्यासू होती. घरातल्या कामांची सवय होती. तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचे लग्न झाले आणि तिच्या संसाराला सुरुवात झाली.
तिच्या म्हणण्यानुसार, खरचं तिचे नशीब चांगले नव्हते. लग्नानंतर काही महिने बरे गेले. पण सासूबाईंच्या बोलण्याने,वागण्याने गायत्रीचे मन दुखत होते. तिच्या कोणत्याही गोष्टीत मुद्दाम चुका काढणे, कारण नसतानाही वाद घालणे, नको तिथे जास्तीच्या सूचना देणे, केलेल्या कामाचे कौतुक तर नाही उलट काहीतरी टोमणे मारून अपमान करत राहणे.
गायत्रीच्या जाऊबाई स्वभावाने गरीब म्हणून त्या सासूबाईंचे बोलणे,वागणे सहन करत होत्या. पण गायत्रीला सासूबाईंचे असे वागणे आवडत नव्हते. सासूबाई अशा का वागतात ? हेच तिला कळत नव्हते. आपण तर सून म्हणून कुठे चुकत नाही मग तरीही या आपल्याशी वाईट का वागतात ? असे तिने नवऱ्यालाही विचारून पाहिले. पण नवऱ्यानेही तिलाच समजून घ्यायला सांगितले. गायत्रीला आपली अशी परिस्थिती पाहून खूप वाईट वाटायचे. जाऊबाईंप्रमाणे सर्व सहन करून रडत बसायचे की सासूबाईंना त्यांच्या कडून होणाऱ्या चुका दाखवून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करायचा. तिने हे सर्व खूप सहन केल्यानंतर सासूबाईंना एक दोनदा प्रतिउत्तर दिले तर सासूबाई अजूनच कडक वागू लागल्या. त्यात भर म्हणजे त्यांना पहिला नातू हवा होता पण गायत्रीला मुलगी झाली आणि रागाला अजून एक निमित्त मिळाले.
गायत्री नशीबाला दोष देत सासरी आयुष्य काढत होती. तिला जे सहन होत नव्हते, जिथे ती चुकत नव्हती तिथे ती चुकीचे ऐकून घेत नव्हती. प्रसंगी कठोर शब्दांत प्रतिउत्तर देत होती. त्यामुळे घरात वादविवाद होत होते.
असेच एके दिवशी, छोट्याशा कारणाने सासूबाईंनी तिच्याशी वाद घातला. आणि या वादविवादात सासूबाईंना एवढा राग आला की, त्यांनी गायत्रीच्या मुलीला , आर्याला जोरात ढकलून दिले. आर्याला भिंत लागता लागता राहून गेली . थोडक्यात वाचली ती. हे दृश्य पाहून तर गायत्रीला खूप संताप आला आणि ती आर्याला बरोबर घेऊन घरातून बाहेर पडली. जर नशीबातच सुख नसेल तर कशाला सुखाची अपेक्षा ठेवायची , त्यापेक्षा आर्याचे व आपले जीवन संपून टाकावे. असे तिला वाटले.
चालता चालता ती दुर्गा देवीच्या मंदीराजवळ येऊन पोहोचली. थोडा वेळ ती तिथे बसली. तिला तिथे खूप शांतता व प्रसन्न वाटत होते.
मनातले वाईट विचार दूर होऊन वेगळेच विचार तिच्या मनात सुरू झाले. आर्याचे व आपले जीवन संपवून काय साध्य होणार ? आणि असे मरण्यापेक्षा काहीतरी चांगले कार्य करून जगावे..असे तिला वाटले. तिच्यात एक वेगळीच शक्ती निर्माण झाली. आपण आपल्या जीवनातील संकटाना हरवू शकतो. त्यासाठी आपल्याला योग्य मार्ग निवडावा लागेल . म्हणून ती आर्याला घेऊन माहेरी आली. माहेरच्यांना तिच्या सासूबाईंचे वागणे, स्वभाव कळले होते. पण त्यांच्या कठोर वागण्याचा राग आला होता. त्यांनी यापूर्वीही अनेकांना मध्यस्थी करून वादविवाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण सासूबाईंमध्ये काही काडीचाही फरक पडत नव्हता आणि गायत्रीचा नवरा तर आईच्याच बाजूने होता त्यामुळे आपल्या मुलीला अशा घरात परत पाठवायचे नाही असे ठरविले.
गायत्रीला लहानपणी तिच्या वाटेचे जे प्रेम मिळाले नाही, ते आता देण्याचा प्रयत्न करू लागले. तिच्या कठीण प्रसंगात तिचा आधार बनले. आपल्याला माहेरचे प्रेम मिळत आहे. हेचं आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला त्यांच्यासाठी अडचण व्हायचे नाही त्यामुळे तिने स्वतः च्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला.
कॉलेज करत असताना शिवणकाम,भरतकाम, विणकाम, मेंदी,रांगोळी इ. अशा अनेक कला तिने अवगत केल्या होत्या. त्यांचा आता तिने उपयोग करण्याचे ठरविले. गावातील मुलींना, स्त्रियांना हे सर्व शिकविण्यासाठी तिने क्लासेस सुरू केले. ज्यांना अभ्यासाची गरज होती अशा विद्यार्थ्यांची शिकवणी घेऊ लागली. तिच्याकडून शक्य होईल ते सर्व काम ती करू लागली.
ती सासर सोडून माहेरी राहायला आल्यामुळे गावात तिच्याविषयी लोक बोलू लागले.
नवरा- बायको, सासू- सून यांच्यात वाद झाले तर , नेहमी बायको व सूनच दोषी ठरते.
स्त्रीचा जन्मच दुःख सहन करण्यासाठी झाला आहे. ती सर्व सहन करते म्हणूनचं सर्वांचे संसार सुरळीत असतात. असे म्हणतात.
मग संसार सुरळीत चालण्यासाठी फक्त स्त्रीनेच सर्व सहन करावे का? तिनेच आपल्या सुखांची आहूती द्यावी का ? तिनेच सहनशीलतेची मूर्ती बनून राहवे का ?
नवरा बायको म्हणजे संसारुपी रथाची दोन चाके . असे म्हटले जाते. मग संसार चालवणे फक्त तिच्याच हातात असते . असे का म्हणतात? संसार तुटायला कधी नवरा तर कधी सासू तर कधी अजून इतर कोणीही कारणीभूत असू शकते.
प्रत्येक स्त्रीला सुखाचा संसार करण्याची इच्छा असते. पण ज्या घरात तिचा पदोपदी अपमान होत असेल,तिच्या भावना दुखावल्या जात असतील, तिला तुच्छ वागणूक मिळत असेल... तर ती त्या घरात मनापासून सुखाचा संसार करेल का ?
जशा तिच्याकडून चांगल्या अपेक्षा असतात तशाच आपणही तिच्या अपेक्षा पूर्ण करतो का ? हे जर सासरच्या लोकांनी समजून घेतले तर ... निश्चितच ती पण सुखात राहील आणि मनापासुन संसारात लक्ष देईल.
गायत्रीने आयुष्यात खूप काही सहन केले होते . त्यामुळे आपल्याला मिळालेला स्त्रीजन्म तिला शापच वाटत होता.
पण त्या दिवसाच्या प्रसंगाने, तिच्यातील स्त्रीशक्तीची, तिच्यातील दुर्गेची तिला जाणीव झाली आणि ती जीवनातील सर्व संकटरूपी राक्षसांना मारण्यासाठी तयार झाली.
गावात तिच्याप्रमाणे अशा मुली होत्या ज्या सासरच्या जाचाला कंटाळून माहेरी राहत होत्या, त्यांच्यासाठी ती प्रेरणास्थान ठरली . त्या सर्वही तिला मदत करू लागल्या.
गायत्रीने आपले क्लासेस,शिकवणी चालूच ठेवले. पण त्या बरोबर गावातील बायकांच्या मदतीने वाळवणाचे पदार्थ, लोणचे,मसाले,चटण्या असे अनेक पदार्थ बनवून ती शहरातील दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवली. यामुळे गावातील अनेक स्त्रियांना रोजगार मिळाला. आणि गायत्रीला जगण्याचा आधार मिळाला.
गायत्रीला व्यवसायाच्या अनेक कल्पना सूचत गेल्या आणि ती त्यांना प्रत्यक्षात उतरवू लागली.तिथेही तिला अनेक अडचणी येत गेल्या पण तिने त्या पूर्ण शक्तीनिशी दूर केल्या.
तिचे हे वेगळे रूप सर्वांना जाणवायला लागले. घरातील व बाहेरील लोक तिच्या कार्यामुळे तिचा आदर करू लागले.
त्या दिवशी आत्महत्या करून तिने जीवन संपवले असते तर ...तिच्या आयुष्यात हे सुखाचे दिवस आले नसते. पण तिने आपला निर्णय बदलला आणि वाईट विचारांवर मात करून इतरांसाठी एक प्रेरणास्थान, एक आदर्श बनली. आणि तू ही एक दुर्गाच! हे सिद्ध केले.
स्त्री म्हणजे कोमल मनाची, दया,क्षमा,सहनशीलता गुण असलेली , इतरांच्या सुखासाठी आपल्या सुखाचा त्याग करणारी !
पण जर तिच्यातील आत्मसन्मानाला ठेच पोहोचली, तिच्या स्त्रीत्वाचा अपमान झाला तर ती आपल्या रक्षणासाठी दुर्गा ही होऊ शकते.
आईबाबांची लाडकी लेक
नारी तुझी रुपे अनेक
भावंडांची तू बहिण
प्रेमळ,जीवलग मैत्रीण
नवऱ्याची तू अर्धांगिनी
सुखदुःखाची सहचारिणी
सासु सासऱ्यांची आदर्श सून
सर्व जबाबदाऱ्या घेते सांभाळून
दीर नणंद यांची वहिनी
विचारपूस करते मायेनी
मुलांची बनते आई
आयुष्यभर काळजी घेई
सासर माहेर नाते जोडूनि
कर्तव्य पार पाडते बनूनि गृहिणी
जगत असते नात्यांसाठी
झटत असते सर्वांसाठी
सौदर्य अन् गुणांची असते खाण
संस्कृती, संस्कारांची असते जाण
दया,क्षमा आणि सहनशीलता
गुणांची नाही कमतरता
स्वामिनी,गृहिणी,रणरागिणी
तरीही असते तू बंदिनी
लक्ष्मी,सरस्वती तुझ्या त वसते
तरीही अन्याय, अत्याचाराची शिकार होते
तू दुर्गा,तू चं भवानी
साऱ्या विश्वाची तू जननी
नारी,तुझ्या विना जग अधुरे
तुझ्या शिवाय जीवन अपुरे..