Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तू घे भरारी (भाग-७)

Read Later
तू घे भरारी (भाग-७)
तू घे भरारी (भाग-७)


सुहास जयावर चिडून नको ते बोलला. जया आतमधल्या रूममध्ये निघून गेली. रजनी आणि अंजली तिच्यामागे आत गेल्या. जयाच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.


"जयाताई, तुम्हाला माहीत आहे ना ह्यांचा स्वभाव, चिडले की काय बोलतोय याचं भान राहत नाही त्यांना." रजनी जयाची समजूत काढत होती.


"रजनी, तू लग्न करून यायचीच होतीस ह्या घरात… तुलाही माहीत नसेल… ईशा चार वर्षांची होती जेव्हा मी राकेशचं घर सोडून आले. आमचा प्रेमविवाह म्हणून माझ्या बाबांनी मला परत घरात प्रवेश दिला नाही, त्यांच्या मर्जीविरुध्द लग्न केलं होतं ना… तुला सांगते रजनी, घरात मी मुलगी म्हणून माझ्यावरच सगळे बंधनं होते. सुहास, सुयोग ह्यांच्यावर कुठलेच बंधन नव्हते. खूप वाटायचं गं, बाहेर हिंडावं, फिरावं, नवनवीन कपडे, दागिने घालून मिरवावं… पण घरात सगळ्याच गोष्टींवर बंधनं होते. बारावीतच होते गं मी जेव्हा राकेशची आणि माझी ओळख झाली. त्याने खूप मोठे मोठे स्वप्नं दाखवले. मी भुलले त्याच्या गप्पांना, स्वप्नांना आणि त्याच्याबरोबर घर सोडून पळून गेले. वर्षभरातच त्याने त्याचे रंग दाखवले. पण ईशा माझ्या पोटात होती तेव्हा. असं वाटलं, बाळ झाल्यावर बदलेल तो; पण तसं काहीच झालं नाही. त्याचं रोज घरी दारु पिऊन येणं, मारझोड करणं, शिवीगाळ करणं ह्याला मी त्रासून गेले होते. एक दिवस ईशाला घेतलं आणि तो नरक सोडून आले. इकडे आले तर बाबांनी माझ्यासाठी घराचे दरवाजे बंद केले. आईने बाबांच्या नकळत तिच्या मैत्रीणीकडे माझ्या राहण्याची सोय केली. आईची मैत्रीण शिवणकाम करायची. तिने मला शिवणकाम शिकवलं. तिच्याच घरी मी भाड्याने राहायचे. तुटपुंज्या शिवणकामाच्या पैशावर कसंबसं सगळं चालायचं. हळूहळू त्यात जम बसत गेला. राकेशने इथेही येऊन काही कमी त्रास दिला नाही. ईशाने लहानपणापासून फक्त आयुष्यातला संघर्ष पाहिला गं. तिच्या हौशीमौजी मला पूर्ण करता आल्या नाही. प्रत्येकवेळेला तिलाही मन मारूनच जगावं लागलं.


मरण डोळ्यांसमोर आल्यावर माझ्या बाबांना झाल्या गोष्टीचा पश्चाताप झाला; पण जेव्हा माझ्या मुलीला, मला आधार हवा होता, तेव्हा तो मिळालाच नाही. त्याचा परिणाम काय, तर आता माझी मुलगी रगड पैसा कमावते, वाटेल ते विकत घेऊ शकते पण तिच्या मनात कोणत्याच नात्यासाठी ओलावा मात्र राहिला नाही… म्हणूनच म्हणत होते, हीच वेळ आहे, चिनूला सावरण्याची." जयाचा कंठ दाटून आला होता. अंजली आणि रजनी मात्र जयाच्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी ऐकून स्तब्धच झाल्या होत्या.


दुसऱ्यादिवशी सुहासचं डोकं जरा शांत झालं होतं. रजनीने सुहासला तो जयाला किती चुकीचा बोलला ह्याची जाणीव करून दिली. सुहासने जयाची माफी मागितली .एकएक दिवस पुढे सरकत होता. बदनामीच्या भीतीने पोलिसांत तक्रार करावी की नाही, याबाबत सुहास साशंक होता. सुयोगने आणि पंकजने त्याची समजूत काढली. डॉ. गावडेंनीं चिन्मयच्या ट्रीटमेंटमध्ये बरेच बदल केले. चिन्मयच्या वागण्या बोलण्यात बरेच बदल झाले होते.


पंकजने चिन्मयवर घडलेल्या प्रसंगाबाबत त्याच्या वकिल मित्रासोबत बोलून त्याचा सल्ला घेतला. सायबर क्राईम विभागात तक्रार नोंदवली गेली. यंत्रणा पुढे कामाला लागली. चिन्मयचा फोन, त्यावर आलेले फोन कॉल्स, मेसेज यांचे सगळे रेकॉर्ड काढण्यात आले. पोलिसांना हळूहळू एकेका गोष्टीचा उलगडा होत होता. पण ही बातमी सगळीकडे पसरली. चिन्मय आणि त्याच्या कुटुंबाबद्दल शेजारीपाजारी, सोसायटीत लोकं कुजबुजायला लागले होते. घरातलं कोणी बाहेर दिसलं की टोमणे मारायला लागले होते, त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघायला लागले होते. सुहास आणि रजनी बरेचदा यामुळे खचून जात.


"तुम्हाला माहिती वन्सं, मी अशी नेहमीच फटकन का बोलते ते… देवानं सगळं सुख दिलं; पण माझ्या पदरात मुल नाही ना घातलं. तुम्ही घरातल्या लोकांनी कधी यावर शब्दही नाही बोलला पण ह्या घराबाहेरचे लोकं मला बोलायची एक संधीही सोडत नव्हते. मग मीच स्वतःहून आधीच फटकन बोलणं सुरू केलं म्हणून आता माझ्या वाट्याला कुणीच जात नाही. मुल नाही म्हणून मी आता त्याचं दुःख करत बसत नाही. अनाथ आश्रमातल्या शाळेत शिकवते. तिथल्या दोन मुलांच्या आयुष्यभराच्या शिक्षणाचा खर्च मी स्वतः करते. मी चांगलं काही करतेय तर लोकं मला तिथेही बोलतात. हे लोकं असेच असतात, घोड्यावरही बसू देत नाहीत आणि घोड्यासोबतही चालू देत नाहीत. म्हणूनच आपला निर्णय आपण घ्यायचा, जो आपल्याला रुचेल, जो आपल्याला समाधान देईल." सुमेधाने रजनी आणि सुहासची समजूत काढली. चिन्मयसाठी रजनी आणि सुहास लढा द्यायला अगदी भक्कमपणे उभे होते आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या मागे अगदी कणखरपणे उभं होतं.


क्रमश:

© डॉ. किमया मुळावकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//