तू घे भरारी ( भाग-६)

कथा एका कुटुंबाची



तू घे भरारी (भाग-६)


चिन्मयच्या तोंडून घडलेला प्रसंग ऐकून रागाच्या भरात सुहासने त्याच्या कानशिलात लावली होती. घरातले सर्वजण अगदी स्तब्ध झाले होते. या प्रसंगावर काय बोलावं ते कुणालाच कळत नव्हतं. चिन्मय मात्र ढसाढसा रडत होता. रडत रडतच तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. अंजली त्याच्या मागेच धावली. तिच्यापरीने ती चिन्मयला समजवून सांगू लागली.


बाकी घरातली मंडळी बैठकीच्या खोलीत डोक्याला हात लावून बसले होते. सगळ्यांचीच मती गांगारून गेली होती. बराच वेळ शांततेत गेला. कुणी काहीच बोलत नव्हतं. घरातली शांतता एकदम भयानक वाटत होती.


"अनाकलीनय आहे ना सगळं? मला तर नेहमी वाटत आलं की एकतर चिनूचे पेपर खराब गेले असतील किंवा दादा वहिनींनी त्याला करिअरबद्दल जास्त प्रेशर दिलं असेल… पण हे सगळं… माझा विश्वासच बसत नाहीये." सुयोग म्हणाला.


"तसं काही असतं तर किती बरं झालं असतं… एकवेळ चिनूला दारू, सिगरेट असं एखादं व्यसन जडलं असतं तर समजू शकलो असतो की वाईट संगतीमुळे हे घडलं; पण हे कारण! बाहेर कुठे कळलं तर लोक काय म्हणतील? कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नाही. आधीच चिनूच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे समाजाच्या नजरेत आम्ही मायबाप व्हिलन ठरलोय. आता हे सगळं लोकांना कळलं तर आपलेच संस्कार काढतील, तोंडात शेण घालतील. कुठं बोलायची, कुणाला भेटायची जागाच नाही ठेवली ह्या कार्ट्याने.." सुहास खूप चिडला होता.


"चिनूला धमकी मिळाली तसे खरंच त्याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले तर…?" रजनी खूप घाबरली होती.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. सगळेच दचकले. पंकजने दार उघडलं.


"सुमेधा तू?" पंकज


"सकाळपासून, तुमचा कुणाचाच फोन लागत नव्हता. किती घाबरले मी! म्हणून तडक निघून आले इकडे." सुमेधा बोलता बोलता घरात आली. घरातल्या सगळ्यांच्या चेहर्‍यावर चिंता अगदी स्पष्ट दिसत होती.


"काय झालं? सगळं ठीक ना?" सुमेधा


"हो, म्हणजे तसं ठीकच म्हणावं लागेल." जया म्हणाली.


"आता सुमेधा वहिनीला कळलं तर किती काही बोलेले ती. असेच तर नेहमी टोमणे देत राहते." रजनी मनातच पुटपुटली.


"मुद्दामच फोन बंद ठेवले होते." पंकजने घडलेल्या सर्व गोष्टी सुमेधाला सांगितल्या.


"मग, कुणाची वाट बघताय?" सुमेधा.


"म्हणजे?" जयाने आश्चर्याने विचारलं.


"म्हणजे, पोलिसांत तक्रार नोंदवावी लागेल ना. आपल्या चिनूची फसवणूकच झालीये. फसवणूक फक्त मुलींचीच होत असते असं नाही ना. त्याला धमकीचे फोन, मेसेज येत आहेत. त्याच्या फोटोचा गैरवापर केला जातोय. आपल्याला याविरुध्द आवाज उठवावाच लागेल. आज आपल्या चिनूवर ही वेळ आलीये, उद्या एखाद्या मुलीवर, गृहीणीवर, अगदी कोणावरही अशी वेळ येऊ शकते. पंकज तुमचा तो वकील मित्र आहे त्याचा सल्ला घ्या हवं तर." सुमेधा बोलत होती. एरव्ही सतत टोमणे मारत बोलणारी सुमेधा एवढी कामाची गोष्ट अगदी शांतपणे बोलतेय, याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं.


"पण, आपण पोलिसांत तक्रार केली ही गोष्ट त्या लोकांना कळलं तर? त्यांनी चिनूच्या जीवाला काही केलं तर?" रजनीच्या डोक्यात एक एक शंका येत होती.


"तसं काही होणार नाही. आणि आपल्याला तसं काही वाटलं तर आपण पोलीस प्रोटेक्शन मागू शकतो." सुमेधा म्हणाली. सुमेधाच्या येण्याने सर्वांना पुढे काय करायचं त्याची दिशा मिळाली.


"आता वेळ दवडू नका. आधीच बराच उशीर झाला आहे. अजून एखादा चिनू फसण्याधी आपल्याला वेगाने काम करावं लागेल." सुमेधा म्हणाली. तेवढ्यात अंजली चिन्मयच्या रूममधून बाहेर आली.


"अंजू, चिनू कसा आहे ग?" जयाने पोटतिडकीने विचारलं.


"डॉक्टरांनी ती गोळी सांगितली होती ना, चिनू एकदम हायपर झाल्यावर द्यायची, ती गोळी दिली. त्यामुळे तो झोपलाय आता." अंजली म्हणाली.


"मला वाटतं चिनूने जे काही सांगितलं ते आपण डॉ. गावंडेंच्या कानावर घालायला हवं. म्हणजे ते चिनूची ट्रीटमेंट करताय म्हणून म्हटलं. त्यांच्या ट्रीटमेंटच्या दृष्टीने ही गोष्ट नक्कीच महत्त्वाची असेल." जया म्हणाली.


"म्हणजे पोलिसांना आपणच कळवा, डॉक्टरांना आपणच सांगा, असं करत सगळ्यांना ही गोष्ट कळेल. म्हणजे हे असं झालं, आपलीच बदनामी आपणच करा." सुहास खूप त्रागा करत होता.


"सुहास, असं त्रागा करून काही होणार आहे का? जे झालं ते झालं… बदनामीच्या भीतीने आपल्या लेकराला असंच भरकटत ठेवायचं का? थोडं शांत डोक्याने विचार कर. अरे वय बघ त्याचं, या वयात अशा गोष्टींचं आकर्षण वाटणं हे साहजिक आहे. त्यात भरीस भर की आता मोबाईलचा अतिवापर आहे. आधी ह्या गोष्टींबद्दल सहज माहिती मिळायची नाही. आता एका क्लिकवर सगळं कळतं. आणि अजून एक गोष्ट, मला खूप दिवसांपासून वाटतेय, आपला ना आपल्या मुलांसोबत संवादच नसतो आजकाल… ते कोणत्या वयात आहेत, त्या वयानुसार त्यांच्या शरीरात होणारे बदल, त्यांची मनस्थिती याबद्दल आपण जाणून घेत नाही. स्वतःच्या अनुभवावरून काही माहीत असलं तरी आपण मुलांसोबत त्या गोष्टी शेअर करत नाहीत. हे सगळे याचेच दुष्पपरिणाम आहेत. आता ही वेळ चिन्मयला रागावण्याची नाहीये. त्याला यातून बाहेर काढण्याची आहे." जया सुहासला समजावत होती.


"ताई, तू याबद्दल काही बोलूच नकोस. मुलांची मानसिकता, त्यांच्या वयानुसार त्यांच्यातले बदल वगैरे हे जे काही तू म्हणतेय ना, हे सांगायला खूप सोपं असतं… तू मला किती सहज बोलतेय ह्या गोष्टी; पण जेव्हा तुझ्यावर वेळ आली होती, तू तुझ्या मुलीसोबत, ईशासोबत काय केलंस? तू किती समजून घेतलं तिला? अग पाषाणहृदयी झालीये तुझी पोर…." सुहास जयावरच चिडला. सुहासचं हे बोलणं ऐकून जया मात्र खूप दुखावली. ती तडक तिथून उठून आतल्या रूममध्ये निघून गेली.


क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all