Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तू घे भरारी (भाग-५)

Read Later
तू घे भरारी (भाग-५)
तू घे भरारी (भाग-५)


सुहासने घडलेला प्रसंग डॉ. गावंडेंना सांगितला. त्यांनी अजून अशाच प्रकारे चिन्मयला बोलतं करण्याचा प्रयत्न सुरु ठेवायला लावला. तरी मधले एक दोन दिवस घरातलं कोणीही या विषयावर काही बोललं नाही.


"दादा, तुझा फोन दे बरं. माझ्या फोनची बॅटरी डाऊन झालीये." सुयोग सुहासला म्हणाला.


"नेटवर्क नाहीये सकाळपासून. तुझ्या वहिनीचा फोन घे." सुहास फोनमध्ये बघत म्हणाला.


"रिचार्ज केला का माझा फोन? दोन दिवस झाले सांगतेय, रिचार्ज करा म्हणून." रजनी सुहासवरच चिडली.


"बायको, देतेस का फोन? एक कॉल करायचा आहे अर्जंट." सुयोग अंजलीला म्हणाला. अंजलीने त्याला फोन दिला. तिच्या फोनमध्ये नेटवर्क नव्हतं.


"अरे, फोनला काय झालंय सकाळपासून? नेटवर्क आहे का कुणाच्या फोनमध्ये?" पंकज फोन सुरू बंद करत तिथे आला.


"माझ्या फोनमध्येसुद्धा नेटवर्क नाहीये." जयासुद्धा आपला फोन बघत म्हणाली.


"चिन्मय, तुझा फोन दे लवकर." सुयोग चिन्मयला म्हणाला तसा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.


"अरे दे ना फोन." सुयोग परत म्हणाला.


"माझा फोन… नको… तो खराब झालाय." चिन्मय अडखळत बोलला. घरातल्या सर्वजणांनी मुद्दामच आपापले फोन फ्लाईट मोडवर लावले होते.


"अरे मग सांगायचं ना, आण इकडे. बँकेत जाताना मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात देतो." सुहास म्हणाला. चिन्मयने फोन द्यायला नकार दिला. सुहास फोनसाठी त्याच्या मागेच लागला. नाईलाजाने चिन्मय फोन द्यायला तयार झाला. मोबाईल आणाण्यासाठी तो त्याच्या रूममध्ये गेला. सगळेजण हळूच त्याच्या मागे गेले. चिन्मयने पलंगाच्या खाली एका जुन्या बॅगमध्ये त्याचा फोन लपवला होता. सगळ्यांच्या मनातली शंका खरी ठरत होती. चिन्मयकडून मोबाईलबद्दल जाणून घ्यायचा प्लॅन काम करत होता. चिन्मयने फोन काढून सुहासला दिला.


"चार्चिंगला लावून बघतो. फोन सुरु झाला तर कळेल तरी प्रॉब्लेम काय आहे ते." सुहास फोन चार्चिंगला लावत म्हणाला.


"बाबा, नको ना… राहू द्या." चिन्मय रडकुंडीला आला होता.


"अरे बघू तर दे ना नेमकं काय झालंय ते म्हणजे त्या दुकानदाराला नेमका प्रॉब्लेम सांगता येईल." सुहास म्हणाला तसा चिन्मय रडायला लागला.


"चिनू, काय झालं? सांगतोस का?" चिन्मयला असं रडताना बघून रजनी रडवेली झाली होती. चिन्मय मात्र काहीच बोलत नव्हता, हमसून हमसून रडत होता.


"चिनू बाळा काय झालं? आम्हाला सांग. हे बघ… तुला कोणीच रागावणार नाही… सांग बरं." जया म्हणाली.


"आत्या, मला माहितीये, फोन सुरू झाला की परत तोच त्रास आणि सगळे मला खूप बोलतील ते वेगळंच…" चिन्मयचं रडणं सुरूच होतं. सगळ्यांनी चिन्मयला आश्वस्त केलं. चिन्मय रजनीच्या मांडीवर डोकं ठेवून बोलू लागला.


"तुला आठवतं आई, माझी दहावी सुरू झाली आणि लॉकडाऊन लागलं. शाळा, अभ्यास सगळं मोबाईलवरचं होतं. तेव्हा मी तुझा फोन वापरायचो. पुढे मी दहावी पास झाल्यावर तुम्ही मला नवीन फोन घेऊन दिला. किती विश्वासाने तुम्ही फोन घेऊन दिला होता. मी मात्र तुमचा विश्वासघात केला. आधी मी फक्त अभ्यासच करायचो गं फोनवर… असंच एकदा मी काहीतरी सर्च करत होतो आणि त्या वेबसाईटवर ना तसल्या व्हिडीओची ॲड आली. मी ती क्लोज केली पण ती ॲड परत आली. मी उघडून पाहिली. मला नेमकं काय वाटलं ते कळलं नाही पण डोकं गांगरून गेलं होतं. नंतर मी तशा ॲड आल्या की बघू लागलो. हळूहळू मला तशा वेबसाईट असतात हे कळलं. मला ना सवयच लागली त्याची…" चिन्मय सांगत होता. त्याचं बोलणं ऐकून सगळे जणू शॉक लागल्यासारखे अक्षरश: एकाच जागी थिजले होते.


"मी तसले व्हिडिओ अगदी रोजच बघायला लागलो. काही ॲप असतात, ज्यावर अशा गोष्टी सहजच मिळतात. त्या ॲपची माहिती मला ऑनलाईनच मिळाली. मी ते ॲप डाऊनलोड केलं. तिथे खूप मुलं मुली होते. ते एकमेकांसोबत खूपच मोकळे बोलायचे. कसले कसले फोटो एकमेकांना पाठवायचे. तिथे एका एली नावाच्या मुलीसोबत माझी ओळख झाली. ती मला तिचे तसले अगदी घाणेरडे फोटो, व्हिडिओ पाठवायची. आम्ही चॅटिंग करायचो. पण तिने तिचा चेहरा कधीच दाखवला नाही. मला बरेचदा वाटायचं, की माझं चुकतंय पण लत लागल्यासारखा मी परत तेच करायचो. एक दिवस त्या मुलीने मला तिचे आणि माझे नको त्या अवस्थेतले फोटो आणि व्हिडिओ पाठवले आणि मला पैशाची मागणी करून ते फोटो व्हिडिओ व्हायरल करायची धमकी दिली. मी खूप घाबरलो होतो. मी मुलीला कधीच भेटलो नव्हतं. मग आमचे फोटो कसे काय आले मला माहीत नाही… काय करावं मला काहीच कळत नव्हतं. मी बारावीचे सगळे पेपर अक्षरशः कोरे सोडून आलो. मोबाईल सुरू केला की त्या मुलीचे धमकीचे मेसेजेस येऊन पडलेले असायचे. मला काय करावं काहीच कळलं नाही. असं वाटलं तुम्हाला सांगावं पण वाटायचं तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवला तर…? तरी त्यादिवशी सकाळी उठून आईजवळ गेलो, आईने इतक्या प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला ना की पुढे मी काहीच बोलू शकलो नाही. मी सगळ्यांचा विश्वासघात केला… मला वाटलं मी मेल्यावर हे सगळे प्रश्न सुटतील म्हणून त्यादिवशी मी…" चिन्मय पुढे काही बोलणार इतक्यात सुहासने त्याच्या कानाखाली जोरदार वाजवली…


सगळीकडे एक भयाण शांतता पसरली होती.क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//