Feb 22, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तू घे भरारी (भाग-४)

Read Later
तू घे भरारी (भाग-४)
तू घे भरारी (भाग-४)


"चिनू, बघ तर… सुयोग काका, अंजली काकू, जया आत्या, पंकज मामा सगळेजण तुला भेटायला आलेत. तुला माहिती, दोनचार दिवसानंतर जुईसुद्धा येणार आहे. आपण कुठे बाहेर फिरायला जायचं का?" रजनी चिन्मयला म्हणाली. चिन्मय मात्र एक शब्दही बोलला नाही. रजनीच्या डोळ्यांत पाणी आलं. कामाचं निमित्त करून रजनी स्वयंपाकघरात निघून गेली.


"तुम्ही सगळेजण इथे आलात, खूप आधार वाटतोय. पण तुमचे कामं, जॉब, घरदार…" सुहास बोलत होता.


"भाऊजी, वर्क फ्रॉम होम नावाची गोष्ट आहे की… काही दिवसांच्या सुट्ट्या, काही दिवस घरून काम आणि क्वचित ऑफिसला एखादी चक्कर मारावी लागली तर… माझं आणि सुयोगचं तर ॲडजस्ट होऊन जातं. जयाताईचं बुटीकचं तेवढं बघावं लागेल." पंकज म्हणाला.


"माझं बुटीकचं काय रे, हौस म्हणून चालवते मी ते. माझी लेक, महिनाभर शब्दही बोलणार नाही पण एक तारखेला मात्र खात्यात बरोबर पैसे जमा करते." जया बोलता बोलता उदास झाली.


"सुहास, मी काय म्हणत होते, आता लगेचच नाही पण काही दिवसांनी परत बँकेत जाणं सुरू कर." जया सुहासला म्हणाली.


"जयाताई, खरं सांगू, लोकांच्या नजरेची, प्रश्नांची भिती वाटतेय. कुणी काही विचारलं तर काय बोलणार?" सुहास


"असं करून कसं चालेल? ह्या परिस्थितीला आपल्याला तोंड देणंच आहे. आपणच खचून गेलो तर आपल्या पिल्लाच्या पंखात आपण बळ कसं भरणार? तुला खंबीर बनावचं लागेल." जयाने सुहासला समजावलं.


"मला वाटतं, आपण सर्वांनी घरात खेळीमेळीचं वातावरण ठेवायला हवं. असं की, जणू काही झालंच नाहीये. चिन्मयच्या आवडीच्या गोष्टी करू, त्याचे आवडते खेळ वगैरे खेळू, त्याच्या लहानपणच्या आठवणी, त्याचे आवडते सिनेमे, गाणी… सगळं चिन्मयच्या आवडीचं करू." सुयोगने त्याचं मत मांडलं आणि सगळ्यांना ते पटलं.


एक एक दिवस पुढे सरकत होता. चिन्मयचं कॉन्सेलिंग, औषधी वगैरे नियमित सुरु होतं. घरातही सगळं चिन्मयच्या आवडीने होत होतं. चिन्मयही आता बऱ्यापैकी सगळ्यांसोबत बोलायला लागला होता.


एका रविवारी दुपारची जेवणं आटोपून सगळेजण गप्पा करत बसले होते. चिन्मयही तिथे होता.


"एक गेम खेळायचा का?" सुयोग म्हणाला.


"गेम!" सगळ्यांनी आश्चर्याने विचारलं.


"हो. एकदम सोप्पा आहे. मी प्रत्येकाला काही प्रश्न विचारेन, अगदी पटापट, त्याक्षणाला त्या प्रश्नाबद्दल मनात जे येईल तेच सांगायचं. जसं की अंजली म्हटलं की मला पाणीपुरी आठवते. कारण तिची आणि माझी पहिली भेट पाणीपुरीच्या गाडीवरच झाली होती." सुयोग उत्साहाने सांगत होता.


"मला नाही कळलं काही." जया म्हणाली.


"जयाताई, अगं असेच प्रश्न असतील ज्याचे उत्तरं फक्त एका शब्दात फार फार एका वाक्यात देता येतील. बघ, आपण सुयोगपासून सुरूवात करू." पंकज


"म्हणजे माझाच डाव माझ्यावरच! ठीक आहे विचार प्रश्न." सुयोग उगीचच तोंड पाडून म्हणाला. पंकजने त्याला प्रश्न विचारले. सुयोगने खूपच गमतीशीर उत्तरं दिले. सगळ्यांच्या चेहर्‍यावर हसू खेळत होतं. एक एक करत सगळ्यांची बारी झाली.


"चिन्मय, आता तुझी बारी." अंजली म्हणाली.


"काय काकू, मी काय सांगणार." चिन्मय थोडा चाचरला.


"काय रे चिन्मय, खेळच तर आहे. तुलासुद्धा मजा येईल." रजनी म्हणाली. पंकज आणि सुयोग त्याला अगदी भराभर प्रश्न विचारत होते. चिन्मयही उत्तरं देत होता.


"मोबाईल…" सुयोगने विचारलं आणि चिन्मयच्या तोंडून त्यापुढे शब्दच फुटला नाही. त्याला दरदरून घाम फुटला. त्याचे हात पाय लटलट कापायला लागले होते.


"चिनू, काय झालं बेटा?" सुहास चिन्मयजवळ गेला. चिन्मय अजूनच घाबराघुबरा झाला होता आणि अचानकपणे तो आक्रमक झाला. त्याने सोफ्यावरच्या उशा, आजूबाजूचं सामान फेकायला लागला. रजनीने त्याला जबरदस्तीने डॉक्टरांनी सांगितलेलं औषध दिलं. थोड्याच वेळात चिन्मय शांत झाला आणि झोपला.


"म्हणजे चिनूच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागे मोबाईल हे तर कारण नाही?" सुहास पुरपटला.


"आपला मुलगा या मोठ्या संकटातून वाचला. आता या सगळ्यांतून बाहेर पडतोय एवढं पुरे नाहीये का? झालं ते झालं. ते का झालं, हे शोधत बसायची काही गरज आहे का?" रजनी सुहासवर चिडली होती.


"आपल्या मुलाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं हे आपल्याला कळायलाच हवं. चिनूने एवढं टोकाचं पाऊल उचललं ह्यासाठी कुठेतरी आपणही जबाबदार आहोत. आणि आपल्याकडून काय चूक झाली ते आपल्याला उमगायलाच हवी." सुहास कडक आवाजात बोलला."सुहास, तुझं बरोबर आहे. चुका वेळीच दुरुस्त कराव्यात, नाहीतर त्याची फळं आयुष्यभर भोगावी लागतात." जया खिन्नपणे म्हणाली.


क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//