तू घे भरारी (भाग-३)

कथा एका कुटुंबाची


तू घे भरारी (भाग-३)


जयाने देवासमोर दिवा लावला. सुहास आणि रजनीसाठी रात्रीच्या जेवणाचा डब्बा घेऊन परत सगळे हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांचा संध्याकाळचा राऊंड नुकताच झाला होता. चिन्मयच्या तब्येतीत सुधारणा नव्हती पण अजून नवीन काही चिंतेचं कारण नव्हतं. रजनी शुन्यात नजर लावून बसली होती. जया तिच्याजवळ जाऊन बसली. व्हिसिटिंग् अवर्स् असल्यामुळे बाकी रुग्णांचे बरेच नातेवाईक तिथे होते.


"सुयोग, तू घरी जा. मी थांबते इथे या दोघांसोबत." जया सुयोगला म्हणाली.


"ताई, अगं मी थांबतो इथे." सुयोग म्हणाला.


"थांबते रे मी. तसंही माझी घरी कोण वाट बघतंय. मी आपला एकटा जीव सदाशिव… म्हणायला लेक आहे मला; पण ती तिकडे सातासमुद्रापार, तिच्याच विश्वात रमलेली. तू घरी जा, जुई वाट बघत असेल आणि अंजलीचे आई बाबा पण आलेले आहेत ना." जयाने सुयोगला समजावून सांगितलं. सुयोग, अंजली आणि पंकज तिथून आपापल्या घरी गेले. जयाने बळजबळीने सुहास आणि रजनीला दोन दोन घास खाऊ घातले. रात्रभर कोणाचाच डोळ्याला डोळा लागला नाही.


सकाळ झाली. डॉक्टरांचा सकाळचा राऊंड झाला पण चिन्मयच्या तब्येतीबाबत काहीच विशेष अशी सुधारणा नव्हती. आता वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय कुणाकडेच नव्हता. दोन दिवस असेच चिंतेत गेले. दोन दिवसांनंतर चिन्मय शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्या आल्या तो अचानक खूप आक्रमक झाला होता. डॉक्टरांनी त्याच्या अजून बऱ्याच काही टेस्ट केल्या. सुदैवाने फास बसल्यामुळे मेंदूला आणि मणक्यांना गंभीर इजा झालेली नव्हती.


काही दिवसांनी चिन्मयला स्पेशल रूममधे शिफ्ट करण्यात आलं. चिन्मय मात्र कोणासोबतच काहीच बोलत नव्हता. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा देत नव्हता. सतत शुन्यात नजर लावून बसायचा. पंकज, जया, अंजली आणि सुयोग रोजच हॉस्पिटलमध्ये चक्कर मारून जात होते. पंकज आणि सुयोगने हॉस्पिटलचं बिल, मेडीकलचं विल सुहासला कळू न देताच परस्पर भरली होती.


"माझ्याकडून आवश्यक ते सगळे उपचार पूर्ण झाले आहेत. आता राहिलेत ते मनाचे उपचार. त्यामुळे आता जी काही ट्रीटमेंट घ्यायची आहे ती मनोविकारतज्ञांकडून घ्यावी लागेल. ते सांगतील त्याप्रमाणे सर्व करावं लागेल. त्यांच्यासोबत एकदा भेटून, पुढची ट्रीटमेंट ठरवून आपण चिन्मयचा डिस्चार्ज प्लॅन करू." डॉक्टर नीरजने चिन्मयबाबत रजनी आणि सुहासला सांगितलं. डॉ. नीरजच्या ओळखीने शहारातील नामवंत मनोविकारतज्ञ डॉ. गावंडे यांनी चिन्मयवर उपचार सुरू केले होते. पुढची सगळी ट्रीटमेंट, चिन्मयचे कॉऊन्सेलिंग सेशन्स डॉ. गावंडे यांच्या किल्निकमध्ये होणार होते. डॉ. नीरजने चिन्मयला डिस्चार्ज दिला. पंकज, जया, अंजली आणि सुयोग परस्पर हॉस्पिटलमधूनच आपापल्या घरी निघून गेले. सुहास आणि रजनी दोघे चिन्मयला घरी घेऊन येत होते.


"घरी गेल्यावर चिनू कसा वागेल? पुन्हा त्याच्या मनात वाईट साईट विचार आले तर? त्याची रूम बघून पुन्हा त्याला त्यादिवशीचा प्रसंग आठवला तर? सुहास काही कामानिमित्त बाहेर गेला तर मी एकटी चिनूला कसं सांभाळणार?" रजनीच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं. त्या विचारातच गाडी कधी घरासमोर येऊन थांबली तिलाही नाही कळलं. साशंक मनाने तिने घराचा दरवाजा उघडला.


"सरऽऽऽ प्राईजऽऽऽ." आतून सर्वजण ओरडले.


"सुयोग भाऊजी, अंजली, जयाताई, पंकजदादा… तुम्ही तर घरी गेला होतात ?" रजनीने आश्चर्याने विचारलं.


"हो, गेलो होतो; पण सामान आणायला. आता चिनू बरा होईपर्यंत आम्ही इथंच राहणार आहोत. अगदी तुम्ही हाकलून दिलं तरी बरं का." सुयोग म्हणाला.


"डॉक्टर काय म्हणाले माहीत आहे ना, चिन्मयला बोलतं करायची खूप गरज आहे. त्याशिवाय तो या फेजमधून बाहेर पडणार नाही आणि त्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. सुहास, रजनी चिन्मयला तर मानसिक आधाराची गरज आहेच पण तुम्हा दोघानांही आमची तेवढीच गरज आहे. हे तुम्ही सांगितलं नाही तरी कळतं आम्हाला म्हणूनच आम्ही इथे आलो." जया बोलत होती. सुहास आणि रजनी दोघे एकदमच तिच्या गळ्यात पडले.


"आई असती तर तिनेही हेच केलं असतं. जयाताई तू आईची उणीव भरून काढलीस." सुहासचा कंठ दाटून आला होता.


या सगळ्या प्रसंगाचा चिन्मयवर मात्र काहीच परिणाम झाला नाही. तो भावनाशून्य नजरेने सगळ्यांकडे बघत होता.


क्रमश:

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all