तू घे भरारी (भाग-२)

कथा एका कुटुंबाची

तू घे भरारी (भाग-२)


आय.सी.यु.च्या बाहेर चिन्मयसाठी प्रार्थना करत सगळे उभे होते. तेवढ्यात पोलिस तिथे आले. त्यांनी सुहास आणि रजनीची चौकशी केली, काही नोंदी घेतल्या आणि ते परत गेले


"चला, पुन्हा कोणी हाकलण्याआधी आपणच निघू." सुमेधा परत तिरसटच बोलली. पंकजने तिच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला.


"बरोबरच बोलताहेत त्या. आपण इथे गर्दी करून काही होणार नाही. रजनी वहिनी तुम्ही अंजलीसोबत घरी जा. मी दादासोबत थांबतो इथे." सुयोग म्हणाला.


"मी चिन्मयला सोडून कुठेच जाणार नाही. चिन्मय बरा होईपर्यंत कोणीही मला घरी जाण्याबद्दल काहीच बोलणार नाही." रजनी म्हणाली.


"ठीक आहे. पंकज तू अंजली, जयाताई आणि सुमेधावहिनींना घरी सोडतो का? मी इथेच थांबतो. खाली पार्किंगमध्ये थांबतो हवं तर. दादाला काही मदत लागली तर… पोलिस त्यांच्या चौकशीसाठी घरीसुद्धा येतील, तेव्हा घरी कोणी असलेलं बरं नाही का?" सुयोग म्हणाला. पंकजने त्यावर होकार भरला. सुहास आणि रजनीचा निरोप घेऊन सगळे खाली आले.


"जयाताई, आपला चिनू असलं काही टोकाचं पाऊल उचलेलं असं वाटलं नव्हतं ना?" अंजली जयाला म्हणाली.


"हो ना. का बरं असं केलं असेल त्याने? जे झालं ते झालं, चिन्मय यातून सुखरुप बाहेर पडाला पाहिजे एवढंच देवाला मागणं आहे." जया म्हणाली.


"मला तर वाटतंय, त्याचे पेपर चांगले गेले नसतील म्हणूनच त्याने असं केलं असेल. त्यात आमच्या वन्स, सारख्या मागे लागत असतील त्याच्या, अभ्यास कर म्हणून." सुमेधा परत आपल्या स्वभावाला साजेसंच बोलली.


"अगं, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? बारावीचे पेपर संपले आता कसला गं अभ्यास?" पंकज तिच्यावर चिडला होता.


"इंजिनिअर साहेब, अहो बारावीचे पेपर झाले की पन्नास वेगवेगळ्या परीक्षा असतात, नाही का? सीईटी, नीट, अजून ती जे डबल ई का ट्रीपल ई काय म्हणतात ते. पोरानं बारावीतच दिवे पाजळले असणार म्हणून मग घाबरला असेल." सुमेधा


"हे बघ, तू तुझे तर्क वितर्क लावणं बंद कर आधी." पंकज


"हो. तसंही माझं बोलणं कोणाला आवडतं? मी आपली घरी जाते. तुमच्या बहिणीला आधाराची गरज आहे तेव्हा तुम्ही राहा तिच्या सेवेत. वाकडं बोलत नाहीये हो, माणूसकी जिवंत आहे अजून म्हणून म्हणतेय." सुमेधा तावाताने बोलली आणि तिथून निघून गेली. पंकजने पार्किंगमधून कार काढली. जया आणि अंजली दोघी कारमध्ये बसल्या.


"ताईच्या घरीच जायचं ना?" पंकजने जयाला विचारलं.


"हो तिकडेच जाऊ. घरात सगळा धिंगाणा पडला असेल. पोलिसही येतील म्हणे ना तिकडे. ते येऊन गेले की त्यांची परमिशन मिळाली तर आवरा आवर करून घेता येईल." जया म्हणाली.


"जयाताई, आपण एका शहरात राहतो, किती चांगलं आहे ना? मला लग्न झाल्यावर आधी खूप वाटायचं, आपण दुसऱ्या शहरात किंवा देशात जावं. तिकडेच आपला आपला संसार थाटावा पण सासूबाईनी तसं करू दिलं नाही. माझ्या हट्टापायी आम्ही दुसरं घर घेतलं. आता वाटतंय उगीचच घेतलं. सगळे सोबत असतो तर कदाचित चिन्मयची मानसिकता कुणाच्या तरी लक्षात आली असती." अंजलीने एक उसासा टाकला.


"चालायचंच… त्या वेळेला तुला ते योग्य वाटलं म्हणून ते तू केलंस असंच म्हणावं लागेल. पण आता सुहासला, रजनीला आणि चिन्मयलाही आपल्या सगळ्यांच्या मदतीची खूप गरज आहे." जया


"जयाताई, बरोबर आहे तुमचं. सुहासभाऊजींना आई वडिलांच्या जागी आता तुम्हीच आहात. आपण आपल्यापरीने सर्व ती मदत नक्कीच करू." पंकज बोलत होता. बोलता बोलता ते तिघे सुहासच्या घरी पोहोचले. पोलिस आधीच तिथे आलेले होते. शेजार्‍यापाजार्‍यांकडे ते चिन्मयबद्‌दल चौकशी करत होते. त्यानंतर त्यांनी घरातही तपासणी केली. चिन्मयच्या रूममध्ये त्यांना काहीच आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या नाहीत. पोलिस आपलं काम करून निघून गेले. जयाने आणि अंजलीने घरातली आवरासावर केली. दिवे लागणीची वेळ झाली होती. जयाने देवासमोर दिवा लावला. अंजली आणि पंकज तिथेच होते. तिघांनीही देवासमोर हात जोडले.


"चिन्मयला लवकर बरं वाटू दे." तिघांनी मनोमन प्रार्थना केली.

क्रमश:

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all