Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तू घे भरारी (भाग-१)

Read Later
तू घे भरारी (भाग-१)


तू घे भरारी (भाग-१)


"डॉक्टर, कसा आहे माझा चिनू?" रजनी आय.सी.यु. मधून बाहेर आलेल्या डॉ. नीरजकडे आशेने बघत म्हणाली. सुहास रजनीच्या मागेच उभा होता.


"सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे एवढंच म्हणू शकतो. तुम्ही अर्ध्या तासाने माझ्या चेंबरमध्ये या, मग मी सविस्तर बोलतो. अजून एक इमर्जन्सी केस आहे आणि हो पोलिस येतील. त्यांना सहकार्य करा. आत्महत्येचा प्रयत्न केला आहे सो आम्हाला सगळं कायदेशीररीत्या करावं लागतं." डॉ. नीरज अक्षरशः घाईतच बोलले आणि तिथून दुसऱ्या आय.सी.यु. मध्ये गेले. सुहास आणि रजनी दोघे हतबल होऊन डॉक्टरांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते होते.


"दादा, हे काय ऐकतोय?" सुयोग, सुहासचा लहान भाऊ तिथे पोहोचला. त्याच्या सोबत त्याची बायको अंजलीसुद्धा होती. सुयोगला बघून सुहासने त्याला गच्च मिठी मारली. सुहासचा इतक्यावेळ अडवून ठेवलेला अश्रूंचा बांध मात्र फुटला.


"रजनीताई, रडू नका. असं धीर सोडून चालेल का?" अंजली रजनीला धीर देण्याचा प्रयत्न करत होती. अंजलीने रजनीला बाजूच्या बाकड्यावर बसवलं.


"रजनी…" तेवढ्यात रजनीचा मोठा भाऊ पंकज तिथे पोहोचला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. रजनी अजूनच रडायला लागली होती.


बराच वेळ शांततेत गेला. कोणी काहीच बोलत नव्हतं. रजनीचं मुसमुसणं तेवढं सुरू होतं. आजूबाजूला असेलेले बाकी पेशंटचे नातेवाईक रजनीकडे मात्र सहानुभूतीच्या नजरेने बघत होते.


तेवढ्यात तिथे सुहासची मोठी बहीण जया आली.


"जयाताई, आपला चिनू… बघा ना, हे काय होऊन बसलं." रजनी रडतच जयाच्या गळ्यात पडली.


"सुहासदादा, अरे सकाळी कळवायचं तरी ना. आज जुईने हट्ट केला तिकडे यायचा. रजनी वहिनीला फोन करत होतो त्यासाठीच; पण त्यांनी फोन उचलला नाही म्हणून तुला फोन लावला तर तुझा फोन नेटवर्कमध्ये नाही. ऑफिसला जाता जाता घरी डोकावलो तर शेजारच्या साठे वहिनींनी सांगितलं आणि तडक इकडे आलो." सुयोग सुहासला म्हणाला.


"अरे मग जुई कुठं आहे?" सुहास एकदम भानावर आला.


"येताना तिला परत घरी सोडलं. तिचे आजी आजोबा आहेत घरी." अंजली म्हणाली.


"घ्या! झालं ना जे व्हायचं ते! तुमच्यापेक्षा आमच्यासारख्या नोकरी करणाऱ्या बायका बऱ्या नाही का? तुम्ही, चांगली नोकरी सोडून पोरगं पोरगं करत बसलात अन् पोरगं लटकलं फासावर." पंकजची बायको सुमेधा तिथे आली आणि आल्या आल्या तिने रजनीच्या दुःखावर मीठ चोळलं.


"सुमेधा, रजनी मुलांसाठी काय करते आणि काय नाही हे तू सांगायची गरज नाहीये." जया जरा कडक आवाजात बोलली.


"वेळ कोणती आणि आपण काय बोलतोय याचं थोडं तरी भान ठेव. तुला माझ्यासोबत चल म्हटलं तर आली नाहीस आणि आता इथे येऊन अशी बडबड करतेय." पंकज सुमेधावर चिडला होता.


"माणूसकी जिवंत आहे म्हटलं हो अजून." सुमेधा रागाने नाक फुगवत बोलली.


"हो? मग याच माणूसकीला जाग थोडी आणि शांत बस." पंकज परत चिडून म्हणाला.


"चिन्मय केजकर पेशंटचे नातेवाईक तुम्हीच का? डॉ. नीरज सरांनी तुम्हाला चेंबरमध्ये बोलवलं आहे." एक वार्डबॉय डॉ. नीरजचा निरोप घेऊन आला. तसे सर्वजण नीरज सरांच्या चेंबरकडे निघाले.


"दादा, वहिनी तुम्ही आत जाऊन बोलून या. आम्ही बाहेर थांबतो." सुयोग म्हणाला. रजनी आणि सुहास दोघे आत गेले.


"तुमचे सगळे नातेवाईक असतील ना सोबत? त्यांनासुद्धा आत बोलवा. चिन्मयबाबत सगळ्यांना सोबतच सांगतो." डॉ. नीरज म्हणाले. सुहासने सगळ्यांना आत बोलावलं. सगळेजण नीरज सरांच्या चेंबरमध्ये उभे राहिले.


"मला सांगा, चिन्मय सध्या कोणत्या परिस्थितीत होता? म्हणजे काही डिप्रेशन वगैरे? बारावीचे पेपर आताच संपले, राईट? त्याचं काही टेंशन वगैरे?" डॉ. नीरज


"टेंशन, डिप्रेशन वगैरे असं काही वाटलं तर नाही. रोजच्या सारखा सकाळी उठला होता. मी देवपूजा करत होते. तिथे आला. माझ्या मांडीवर डोकं ठेवून आज क्लासला जात नाही एवढंच म्हणाला. मी पण म्हटलं की बरं नसेल तर जाऊ नको, थोडा आराम कर. मी पूजा केली आणि त्याचा आणि माझा चहा केला आणि त्याला आवाज द्यायला त्याच्या रुममध्ये गेले तर…" रजनीला पुढे बोलवलं गेलं नाही. रजनीच्या तोंडून घडलेला सगळा प्रसंग ऐकून सर्वांच्या अंगावर मात्र काटा उभा राहिला.


डॉक्टरांनी रजनीला पाण्याचा ग्लास दिला. लॅपटॉप उघडून त्यातल्या चित्राव्दारे चिन्मयच्या तब्येतीबद्दलच्या सर्व शक्यता समजावून सांगितल्या.


"चोवीस तास धोक्याचेच आहेत. या चोवीस तासांत चिन्मय उपचाराला कसा प्रतिसाद देतो त्यावर सगळं अवलंबून आहे. अजून एक, तुम्ही सगळेजण इथे थांबू शकणार नाहीत. फक्त दोन नातेवाईंकांना थांबण्याची परवानगी आहे. त्यामुळे तुमचं सहकार्य अपेक्षित आहे." डॉ. नीरज बोलले.


"हो सर, नक्कीच. आम्ही फक्त एकदाच, दूरूनच आमच्या चिनूला बघतो आणि परत जातो." पंकजचा कंठ दाटून आला होता. डॉ. नीरजने परवानगी दिली आणि सगळेजण परत आय.सी.यु.च्या दिशेने गेले. आय.सी.यु.च्या बाहेर लावलेल्या काचेतून सर्वजण चिन्मयकडे बघत होते. एकीकडे नाकातोंडांत नळ्या टाकलेला चिन्मय बेडवर निपचित पडून होता आणि दुसरीकडे चिन्मयचे आई, बाबा, आत्या, काका, काकू, मामा आणि मामी उभे होते. चिन्मय पटकन बरा व्हावा म्हणून सगळे देवाचा धावा करत होते; पण राहून राहून सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येत होता, "चिन्मयने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला असेल?"


क्रमशः

फोटो- गुगलवरून साभार

© डॉ. किमया मुळावकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//