तू घे भरारी (भाग- ८ अंतिम)

कथा एका कुटुंबाची



तू घे भरारी (भाग-८ अंतिम)


दिवस सरत होते. चिन्मयच्या केसमध्ये पोलिसांना खूप महत्त्वाचे धागेदोरे सापडले होते. पोलिस त्या दृष्टीने त्यांचा तपास वेगाने करत होते. बघता बघता बारावीच्या निकालाचा दिवस उजाडला. दुपारी पंकज पेढ्यांचा बॉक्स घेऊन घरी आला. त्याच्या सोबत सुयोग, अंजली आणि सुमेधा होते.


"चिन्मय, तोंड गोड कर." पंकजने चिन्मयला पेढा भरवला.


"काय मामा, मस्करी करतोय का? अरे, सगळे पेपर कोरे सोडवलेत मी. नापास झाल्यावर कसले रे पेढे." चिन्मय खिन्नपणे म्हणाला.


"अरे बरंय ना… नवीन सुरूवात करायला बरंय की. म्हणजे तुला सायन्स नसेल करायचं तर आर्टस् करू शकतो." सुयोग म्हणाला.


"उगीचच लेकराची खेचू नका. रजनी वन्सं टी.व्ही. सुरू करा आणि कोणतंही न्यूज चॅनल लावा." सुमेधा म्हणाली.

तेव्हढ्यात सुहासही बँकेतून घरी पोहोचला. टी.व्ही. वर न्यूज सुरू होती, किशोरवयीन मुलामुलींची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांच्या चमूने पकडलं होतं. मोठ्या मोठ्या घरातली मुलं त्या टोळीचा हिस्सा होती. चिन्मयसारखे कितीतरी मुलं-मुली यात फसलेले होते. पोलिसांनी सापळा टाकून ह्या टोळीला अटक केली होती. चिन्मयच्या आई बाबाने पोलिसांत तक्रार केल्यावर त्यांच्यावर दुषणं लावलेल्या समाजातूनच असे किती पालक आपल्या मुलांसाठी पुढे धावून आले होते.


"जिंकलास भावा!" सुयोगने सुहासला मिठी मारली. सगळ्यांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू जमा झाले होते. चिन्मय मात्रं शांत होता.


"चिनू…" रजनीने त्याला आवाज दिला.


"चिन्मय, काय झालं? अरे, किती मोठी लढाई जिंकलास तू… मग असा उदास का झालास?" सुहास त्याच्या जवळ गेला.


"पण बारावीत नापास झालो ना." चिन्मय एवढूस तोंड करून म्हणाला.


"आपण परत सुरूवात करू." अंजली त्याला म्हणाली.


"माझी सगळी बॅच, माझे मित्रं मैत्रिणी पुढे निघून गेले. मी एकटाच मागे पडलो." चिन्मय उदासपणे म्हणाला.


"मग काय झालं? नवीन मित्र मैत्रिणी मिळतील." पंकज त्याला म्हणाला.


"पण मी कायम एक अपयशी माणूस म्हणूनच राहील ना." चिन्मय


"कोण म्हणेल? आणि कोणाच्या किती दिवस लक्षात राहणार आहे? तुला माहिती चिनू, मी इंजिनिअरींगला होतो तेव्हा पहिल्या सेमिस्टरला सगळ्या विषयात नापास झालो होतो. तेव्हा मला अभ्यास कसा करायचा तेच कळत नव्हतं. मी आपलं दहावी- बारावी सारखा रट्टा मारायचो. पण विषय समजून घेतला की सोपा जातो हे मला नंतर कळलं. पहिल्या सेमीस्टरची परत परीक्षा दिल्यावरही माझे दोनच विषय निघाले. माझी बॅच एक वर्ष पुढे आणि मी मागे पडलो होतो. मग मात्र मी ठरवलं आणि जिद्दीने अभ्यास केला. पुढे आलो. आज एका चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्यावर काम करतोय. बरं तुला माहीत आहे का, तुझा बाबा सातवीत बोर्डात नापास झाला होता?" सुयोग म्हणाला.


"काय! सातवीत बोर्डात नापास!" चिन्मयने आश्चर्याने सुहासकडे पाहिलं.


"हो तेव्हा सातवीतही बोर्ड परीक्षा होती. आणि मी मराठीत नापास झालो होतो. तुझ्या आजोबांनी एवढं बदडलं होतं ना… आठवतं ना जयाताई?" सुहास म्हणाला.


"हो तर चांगलंच आठवतं. अपयश, संघर्ष प्रत्येकाच्याच वाट्याला येत असतात. तुझी आई, तुझे मामा यांचंच उदाहरण बघ. दोघांचं आईवडिलांच छत्र लहानपणीच हरवलं. दोघे त्यांच्या काका काकूंकडे लहानाचे मोठे झाले. काकू खूप खाष्ट होती. घरातली, बाहेरची सगळी कामं करून दोघे चांगले शिकले. चांगल्या पदावर नोकरीला लागले. तू झाल्यावर मात्र तुझ्या आईने नोकरी सोडली. ती बिचारी आईच्या मायेला पारखी होती म्हणून मग आपल्या मुलाला पूर्ण वेळ देता यावा ह्या कारणाने तिने नोकरी सोडली." जया बोलत होती. तिचं बोलणं ऐकून चिन्मय एकदम रजनीच्या कुशीत शिरला.


"तुला माहितीये चिनू, वाघ नेहमीच झेप घेण्याआधी दोन पावलं मागं येतो. आता आपणही दोन पावलं मागे आलोत ते खचून जाण्यासाठी नाही तर पुढे झेप घेण्यासाठी…" रजनीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.


"हे सगळं आकाश तुझ्यासाठीच आहे बेटा… तू पुन्हा भरारी घे… तुला आवडेल ते काम कर… आम्ही तुझ्या सोबतच आहोत." सुहासनेही चिन्मयला जवळ घेतलं. चिन्मयने पोटभर रडून घेतलं आणि मनाशी एक निश्चय केला.


बारा वर्षानंतर -


चिन्मय भारतीय अणुसंधान केंद्रामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करू लागला होता. त्याने अवकाशयाना संबंधित बराच रिसर्च केला होता. त्यासंदर्भात त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चिन्मय पुरस्कार स्वीकारल्यानंतर स्टेजवर बोलत होता. त्याचा थक्क करणारा प्रवास ऐकून सगळेच भारावून गेले होते.


"बारावीत नापास झालेल्या, भरटकलेल्या एका मुलाने ही भरारी घेतली ती केवळ त्याच्या कुटुंबामुळे… हा अवार्ड माझा नाही तर माझ्या कुटुंबाचा आहे… आई, बाबा, पंकज मामा, सुमेधा मामी, रजनी काकू, सुयोग काका आणि जया आत्या… तुम्ही जे केलंत त्यासाठी थँक्यू हा शब्द खूप छोटा आहे… लव्ह यू ऑल!" चिन्मयच्या या शेवटच्या वाक्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि घरातल्या सर्वांच्या डोळ्यांतून श्रावणधारा मात्र मनसोक्त बरसल्या.



समाप्त.


© डॉ. किमया मुळावकर


🎭 Series Post

View all