तू चाल पुढं…! (भाग-3)

आणि अगं आई चांगली किंवा वाईट कधीच नसते. आई ही आईच असते. प्रत्येक आईला आपल्या मुलाचे सुख आणि त्याचे उज्वल भविष्य हवे असते आणि त्यासाठी रात्रंदिवस कष्ट घ्यायलाही ती तयार असते. तू चांगली आई आहेस लक्षात ठेव.


जलद कथा मालिका लेखन स्पर्धा

तू चाल पुढं…!

(भाग-3)


सोहम आईकडे डोळे भरून पाहत होता. आईच्या हातातील आकाश कंदील पाहून त्याच्या डोळ्यांमधून कितीतरी आनंद ओसंडून वहात होता.
तो आनंदाने येऊन आईला बिलगला. सोहमचा आकाश कंदील निशा मॅडमनी जमा करून घेतला. तास संपल्याची बेल झाली.

निशा श्वेताच्या पाठोपाठ वर्गाच्या बाहेर आली. मैत्रिणीच्या चेहऱ्यावरील भाव निशाने ओळखला. श्वेता कसल्या तरी विचारात अडकलीय हे निशाच्या लक्षात आले आणि न राहून तिने श्वेताला ," काय झाले ?" म्हणून विचारले. श्वेता चक्क रडत होती. तिने आज घडलेला प्रसंग निशाला सांगितला.

ती म्हणाली ,"मी माझी ड्युटी चोख बजावतेय . सगळ्यांसाठी मी आदर्श आहे ; पण माझ्या मुलाचं काय ? त्याला मी हवा तेवढा वेळ नाही देऊ शकत. हीच खंत घेऊन तो मोठा होईल ते मला नाही आवडणार."


"अग लहान आहे अजून तो. त्याला नाही कळणार त्याची आई किती पुण्याचे काम करतेय ते ! आई आणि तिच्या नवजात शिशुला जन्म देणारी ती एक देवीच आहे. तू काही काळजी करू नकोस. मी सोहमला त्याच्या आईचे महत्व अगदी त्याच्या नकळत पटवून देईन." निशा पुढे म्हणाली , "आणि अगं आई चांगली किंवा वाईट कधीच नसते. आई ही आईच असते. प्रत्येक आईला आपल्या मुलाचे सुख आणि त्याचे उज्वल भविष्य हवे असते आणि त्यासाठी रात्रंदिवस कष्ट घ्यायलाही ती तयार असते. तू चांगली आई आहेस लक्षात ठेव. "तू चाल पुढं..!" म्हणून निशाने श्वेताच्या पाठीवरती हात ठेवला.

घरी गेल्यावर निशाने मराठीचे पुस्तक उघडले. योगायोगाने तिला हिरकणीची कविता मुलांना शिकवायची होती. मुलांची काळजी असलेली ही आई आपल्या मुलासाठी गड उतरून जीवाची पर्वा न करता खाली आली होती. गडावर दूध घेऊन गेले तर खाणार काय ? अशी बिकट परिस्थिती असल्यामुळे तिला तिच्या तान्हुल्याला घरी ठेवून जावे लागले होते. कोणतीही आई आपल्या मुलांना तिच्यापासून लांब ठेवताना दुःखी होत असते पण तिच्याही काही जबाबदाऱ्या असतात त्या तिला पार पाडाव्याच लागतात. निशाने तिच्या कल्पकतेने एक सुंदर व्हिडिओ बनवला होता.


ज्या व्हिडिओमध्ये एक डॉक्टर त्यांची झोप , जेवण ,त्यांची मुलं आणि स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून एखाद्या पेशंटला जीवनदान कसे देत असतात ? हे एका प्रसंगातून दाखवले होते.

तो व्हिडिओ पाहताना खरंच डॉक्टर देवच असतो हे प्रत्येक मुलांनी मान्य केले होते.

"आपली आई देव तर आहेच ; पण वेळात वेळ काढणारी हिरकणी सुद्धा आहे." हे शेवटी सोहमने मॅडमनी आपल्या आई विषयी बोलायला सांगितल्यावर मॅडमना सांगितले.

आज सोहमला त्याची आई उमगली होती. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मॅडमना खूप छान वाटले होते. मॅडम मुलांना म्हणाल्या , "नोकरीमुळे बिझी शेड्युल असणाऱ्या पालकांच्या मुलांनी आपल्या आईला काय म्हणायचं आहे ठाऊक आहे ना ? तू चाल पुढं ..! म्हणणार ना तुम्ही आता तुमच्या आई बाबांना ?"

"हो मॅडम." मुले एक सुरात ओरडली."

आज सोहम आनंदाने घरी आला होता. हॉस्पिटलमधून आई येईपर्यंत जागाच होता. आई आल्यावर तिला आनंदाने बिलगला आणि आईला म्हणाला , " मम्मा , तू चाल पुढं!"

"हे काय ?" श्वेता आश्चर्याने म्हणाली.

"तू मॅडमला विचार ? गुड नाईट ! म्हणून सोहम झोपायला गेला.

तेव्हा श्वेताने " गुड नाईट माय लिटल चॅम्प!" म्हणून निशाला फोन केल्यावर निशाने सोहमसोबत सर्वच लहानग्यांच्या बालमनाचे प्रबोधन केले आहे हे‌ श्वेताला समजले.

"थँक्स निशा !" म्हणत श्वेताने गप्पा संपल्यानंतर फोन ठेवला. आज श्वेता मी चांगली आई आहे या विचाराने आनंदाने झोपी गेली होती.

कथा कशी वाटली ? कमेंटमध्ये नक्की सांगा..
सौ. प्राजक्ता पाटील