तू चाल पुढं…!(भाग-२)

श्वेताने अगदी अर्ध्या तासात सुंदर असा आकाश कंदील तयार केला.


जलद कथा मालिका लेखन स्पर्धा

तू चाल पुढं…!

(भाग-२)


श्वेता काही क्षणातच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. इमर्जन्सी एक असली तरी पेशंटला दैवत मानणारी श्वेता येणाऱ्या प्रत्येक पेशंटला तपासत बसली. बघता बघता रात्रीचे आठ वाजले होते.

"इमर्जन्सी आली तर कळवा.." म्हणून ती आणि तिचे मिस्टर सौरभ घरी आले. आल्यावर श्वेताने पाहिले तर सोहम गाढ झोपला होता. श्वेताने सौरभला सोहमच्या बाबतीत घडलेला सगळा प्रसंग सांगितला होता.

तिला उदास झालेले पाहून सौरभ म्हणाला , "उद्या संडेच आहे ना ,सोहमसाठी वेळ काढ."

"हो .उद्या मी काहीही झालं तरी सोहमसाठी वेळ काढेल." असं म्हणून डॉक्टर दांपत्य डिनर करुन झोपी गेले.


श्वेता सकाळी लवकर उठली पण ती फ्रेश होऊन किचनमध्ये जाते न जाते तोच तिला एका कॉन्फरन्ससाठी अर्जंट बोलावले होते म्हणून कॉल आला . तिच्या मनात नसतानाही श्वेताला त्या कॉन्फरन्ससाठी हजर राहणे अत्यंत आवश्यक होते.

त्यामुळे तिने नेहाला म्हणजेच सोहमच्या केअरटेकरला फोन केला. जी सोहमची त्याचे आई बाबा येईपर्यंत काळजी घ्यायची. संडेला सोहम त्याच्या आई-बाबांसोबत वेळ घालवायचा त्यामुळे नेहाला सॅटर्डे आणि संडेला सुट्टीच असायची. पण आज मात्र आई-बाबा दोघेही कॉन्फरन्सला जाणार होते‌ म्हणून स्वयंपाकवाल्या मावशी सोहमसोबत थांबणार होत्या. पण त्या थोड्याशा वयस्कर असल्यामुळे त्यांना आकाश कंदील बनवता येणे शक्य नव्हते.

म्हणून मग श्वेताने नेहाला फोन करून आज संडे असला तरी फक्त सोहमला आकाश कंदील बनवून देण्यासाठी घरी यायला सांगितले.

ती "हो" म्हणाली. श्वेता निशिंत झाली होती आणि ती आणि सौरभ कॉन्फरन्सला निघून गेले.

कॉन्फरन्स दुसऱ्या शहरात असल्यामुळे परत यायला रात्र झाली होती. आज परत सोहम झोपी गेला होता , पण नेहाने आकाश कंदील बनवून दिलाय म्हणून श्वेता समाधानी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी परत हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आली म्हणून श्वेता निघून गेली. तिला हॉस्पिटलमध्ये नेहाचा फोन आला.

"सॉरी मॅडम , काल अचानक माझ्या मुलाची तब्येत बिघडली म्हणून मी गावी आले. आजही मी सोहमला सांभाळण्यासाठी नाही येऊ शकत."

आता मात्र कणखर असलेली श्वेता खूपच हळवी झाली होती. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने घरी फोन केला तर स्वयंपाकवाल्या मावशीनी सोहम स्कूलला गेला हे सांगितले. श्वेताने आपल्या केबिनमधले व्हाईट पेपर गोळा केले. नर्सला सांगून कात्री ,दोरी ,लेस आणि रंग असे काही सामान जमा केले. सगळ्यांना मॅडम काय करतायेत ? याचे आश्चर्य वाटत होते. श्वेताने अगदी अर्ध्या तासात सुंदर असा आकाश कंदील तयार केला. त्याला लेस लावून , रंगरंगोटी करून छान सजवले आणि दोरी बांधून "मी आलेच.." म्हणून ती धावत गाडी जाऊन बसली. अवघ्या काही मिनिटातच ती सोहमच्या स्कूलमध्ये पोहोचली.

बाईंनी सगळ्यांचे आकाश कंदील जमा केले होते. सोहम मात्र उदास होऊन बसला होता. खिडकीतून श्वेताने सोहमकडे पाहिले आणि आपले डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसले. "खरंच मी चांगली आई नाहीये." हा विचार तिच्या मनाला चांगलाच बोचला होता.

"निशा.." श्वेता दरवाजाजवळ उभी राहून म्हणाली.

" अगं श्वेता तू ? बापरे ! व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज ! इतक्या बिझी शेड्युलमध्ये वेळ काढून तू इथे आलीस .ग्रेट आहेस!" सोहमच्या निशा मॅडम या श्वेताच्या क्लासमेट होत्या. त्यामुळे
दोघीही एकेरी नावाने बोलत होत्या.


श्वेताला पाहून सोहम खुश होईल का ?
काय असेल सोहम ची प्रतिक्रिया ? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..

पाहूया पुढील भागात क्रमशः

सौ. प्राजक्ता पाटील.

कथा कशी वाटली ? ते कमेंट मध्ये नक्की सांगा.


🎭 Series Post

View all