Dec 05, 2021
प्रेम

तु असा जवळी रहा...( भाग ६ वा)

Read Later
तु असा जवळी रहा...( भाग ६ वा)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

तु असा जवळी रहा...( भाग ६ वा)

 

©® आर्या पाटील

****************************************

श्रेयश प्राजक्ताच्या झाडापाशी पोहचला. प्राजक्ताची फुले म्हणजे त्याच्या आनंदाचं एकमेव कारण. एक वेगळीच ओढ होती त्याला त्यांची. कितीही स्ट्रेस असू दे वा कामाचं टेन्शन त्याला या झाडाजवळ नेहमीच विसावा मिळायचा. वास्तवाचा अंगरखा काही वेळापुरता गळून पडायचा आणि ती प्राजक्ताची फुले भूतकाळाच्या गोड आठवणी बनून त्याच्या पुढ्यात बरसायची. आजही फुलांचा गच्च पसरलेला सडा पाहून श्रेयशच्या गालावर स्मितहास्याची लकेर उमटली पण दुसऱ्याच क्षणी त्याची नजर श्रेयावर खिळली..

श्रेया खळीदार गालात हसत फुले वेचण्यात गुंग होती. जणू प्राजक्ताचं टपोरं फुलच समोर हसतं आहे असच वाटलं त्याला. आज पहिल्यांदा त्या फुलांपेक्षा ती गोड मुलगी त्याला आकर्षित करून गेली.

तिला असे फुले वेचतांना पाहून हृदयाच्या खोल कोपऱ्यात दडलेली एक गोड आठवण हळूच त्याच्या वर्तमानात डोकावून गेली.भावनांचा हिंदोळा डोळ्यांतून अश्रू काढून गेला. पण पुढच्याच क्षणी त्याने स्वत: ला सावरले.. आताश्या स्वत:ला सावरण्यात तो निष्णात झाला होता. आयुष्याने कमी वयातच त्याला खूप काही शिकवले होते.

 

" हे हाय प्रिन्सेस.. मी मदत करू का फुले वेचायला..?" तिच्या पुढ्यात बसत तो म्हणाला.

 

तशी श्रेया त्याच्याकडे अनोळखी नजरेने पाहू लागली. दुसऱ्याच क्षणी तिने जाग्यावरूनच मंदारचा वेध घेतला.

 

" कॅन आय हेल्प यु..?" हातात फुले वेचत मंदार पुन्हा म्हणाला.

 

" नो. आईने सांगितलय स्ट्रेंजरशी बोलायचं नाही.." मान खाली घालत श्रेया पुन्हा फुले वेचू लागली.

 

तसा श्रेयश गोड हसला. तिची निरागसता त्याला खूप आवडली. तिचे गोड बोल मनाला माधुर्य देऊन गेले.

लागलिच त्याने खिशातून आपला रुमाल बाहेर काढला.

प्राजक्ताची फुले वेचून रुमालात भरली आणि श्रेयासमोर धरली.

 

" प्रिन्सेस यामध्ये फुले वेचू शकतेस. ती खाली पडणार नाहीत." हसत श्रेयश म्हणाला.

 

" वाव..! दॅट्स ग्रेट. आता मी आईसाठी खूप सारी फुले गोळा करू शकते." आनंदी होत छोटी श्रेया म्हणाली आणि आपली फुलांनी भरलेली ओंजळ रुमालात रिती केली.

 

" मग फ्रेन्ड्स..?" दुसरा हात तिच्यासमोर धरत तो म्हणाला.

 

फुलांचा आनंद तिच्या तोंडावर ओसंडून वाहत होता.. त्या आनंदातच तिने आपला हात त्याच्या हातात दिला.

 

" फ्रेन्ड्स." ती आनंदाने म्हणाली.

 

" मी श्रेयश. तुझं नाव काय बाळा..?" तो म्हणाला.

 

" अय्या.. मी श्रेया. किती भारी तु श्रेयश मी श्रेया." फुले वेचण्याचं विसरून ती त्याच्याकडे पाहत राहिली.

 

तिच्या डोळ्यांत त्याला ओळखीची अभिव्यक्ती झाली. तिच्या गालावर पडलेली खळी त्याच्या काळजाला भिडली. श्रेयाला कुठे तर पाहिल्याचा राहून राहून भास होऊ लागली.

 

" फ्रेन्ड, तु पण इथे मिटिंगला आला आहेस का..? माझ्या आईसारखा..?" श्रेयाच्या भाबड्या प्रश्नाने त्याची तंद्री सुटली..

 

स्मितहास्याची लकेर चेहऱ्यावर उमटली.

 

" अच्छा, म्हणजे तुझी आई मिटिंगसाठी आली आहे..?" तो म्हणाला.

 

" हो. खूप मस्त गार्डन बनवते ती. आमच्या घरचं गार्डन तिनेच बनवलं आहे." आपल्या आईचं कौतुक करित ती म्हणाली.

 

" हो का.. मग माझ्या ऑफिसचं गार्डनही सुंदर बनवायला सांग हा तुझ्या आईला." हसत म्हणत त्याने फुले रुमालात टाकली.

 

" म्हणजे हे ऑफिस तुझं आहे..?" ती आश्चर्याने म्हणाली.

 

" हे ऑफिसही आणि हा प्राजक्तही." फुले वेचता वेचता तिच्याकडे पाहत तो म्हणाला आणि गालात हसला.

 

" सॉरी फ्रेन्ड. मी तुला न विचारता फुले वेचली. आई म्हणते दुसऱ्याची वस्तू घेतांना परमिशन घ्यायची. पण माझ्या आईला खूप आवडतात ही फुले म्हणून घेत होते. ती मिटिंगमध्ये पास झाल्यावर सरप्राइज द्यायचं होतं" उठून उभी राहत हळू आवाजात ती म्हणाली.

 

" इट्स ओके बेटा. तु माझी फ्रेन्ड आहेस सो हे झाड तुझंही आहे. तुला हवी तेवढी फुले घे. आणि आईला दे." तिच्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला.

 

" ये थँक यु फ्रेन्ड.. यु आर बेस्ट." म्हणत ती खळीदार गालात हसली आणि गुडघ्यावर बसत पुन्हा एकदा फुले वेचू लागली .

 

तिची प्रतिक्रिया पाहून त्यालाही हसू आले.

तोच त्याचा फोन वाजला.

 

एका महत्त्वाच्या मिटिंगसाठी त्याला लगेच निघावे लागणार होते. त्यासाठीच फोन आला होता.

 

"येस आय विल रिच देअर सून.." म्हणत त्याने फोन ठेवला.

 

श्रेयाला निरोप देत तिथून काढता पाय घेतला. गाडीजवळ पोहचताच त्याने मिस. पल्लवीला कॉल केला.

" मिस. पल्लवी कर्णिक मॅडमची प्रेझेंटेशन फाइल कलेक्ट करा. मी अर्जन्ट मिटिंगसाठी जातोय सो मिस्टर राऊत ना त्यांच प्रेझेंटेशन अटेन करायला सांगा आणि डिल कन्फर्म करा. मला वाटतय त्या त्यांच बेस्ट देतील." दुरुन पुन्हा एकदा श्रेयाला पाहत तो फोनवर म्हणाला आणि फोन कट केला.

 

त्या रिसेप्शनिस्टलाही आश्चर्य वाटले. काही वेळापुरवी त्या मॅडमच्या कामाविषयी संभ्रमात असलेल्या सरांना अचानक असे काय झाले की प्रेझेंटेशन न पाहता डिल कन्फर्म केली..

 

तेवढ्याच वेळात मंदार गाडीजवळ येऊन पोहचला. फाईल विसरल्यामुळे आभा पॅनिक झाली होती.

 

" मंदार, मला आता खूप भीती वाटतेय. मी एवढी मोठी चुक कशी करू शकते.पहिल्याच मिटिंगला हा असा इम्पॅक्ट..? मला मिळेल ना रे हा प्रोजेक्ट..?" आभा जास्तच गोंधळली होती..

 

मंदारने गाडीतून फाईल काढत तिच्या हातात ठेवली.

" आभा, शांत हो आधी. खूप काही मोठं झालेलं नाही. होतं असं कधीकधी. म्हणून त्याचा इम्पॅक्ट काय होईल याचा विचार नको करुस.. आता तुला तुझा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा पाडता येईल याचा विचार कर. तुझं प्रेझेंटेशन बेस्ट आहे. तुझी ते रिप्रेझेंट करण्याची स्किल बेस्ट आहे.आणि महत्त्वाचं तुझ्यात सगळं बेस्ट करण्याचं कैलिबर आहे. सगळं विसर आणि तुझ्यातल्या बेस्टवर फोकस कर.." म्हणत त्याने तिच्या कपाळावर स्पर्शखूणेच्या रुपात आत्मविश्वास निर्माण केला..

 

तिने डोळ्यांनीच त्या आत्मविश्वासाचा स्विकार केला. त्याचे शब्द नेहमीप्रमाणे तिच्या डळमळीत मन:स्थितीसाठी आशावाद ठरले. फाईल घेवून ती पुन्हा ऑफिसकडे निघाली.. अगदि काही पावल्यांच्या अंतरावर गेल्यानंतर ती पुन्हा मागे वळली. आणि मंदारकडे झेपावली. दुसऱ्याच क्षणी तिने त्याला मिठी मारली.

 

" मंदार तु माझ्या आयुष्यात नसतास तर माझे कसे झाले असते.? आय लव्ह यु. तु असाच जवळी रहा." म्हणत तिने डोळे बंद केले.

 

"ये वेडाबाई तुझं पुन्हा सुरु झालं..आणि बाय द वे आपण घरात नाहीत." म्हणत तिच्या केसांवर ओठ टेकवत त्याने तिला समोर घेतले.

 

तशी ती गोड हसली आणि ऑफिसच्या दिशेने निघून गेली.

ती गेल्यावर त्याने पुन्हा एकदा श्रेयाकडे पाहिले.फुले वेचण्यात गुंग असलेल्या लेकीला पाहून त्याचा जीव भांड्यात पडला.

 

आभाला समजवतांना काही वेळापुरता श्रेयाकडे पाहायला तो विसरला होता. आणि त्याच वेळात श्रेयश श्रेयाला भेटून गेला होता.

 

गाडी बंद करून पुन्हा एकदा मंदारने श्रेयाला गाठले.

तिच्या पुढ्यात फुलांनी भरलेला रुमाल पाहून त्याला आश्चर्य वाटले.

 

" बेटू, कोणाचा रुमाल आहे हा..?" रुमालाकडे पाहत तो म्हणाला.

 

तशी श्रेया भानावर आली.

" बाबा किती वेळ रे. दिलीस का आईला फाईल. खूप घाबरली असेल ना ती..?" आईची नेहमीची सवय माहिती असलेली श्रेया म्हणाली.

 

" हम्म.. घाबरली तर होती. पण नंतर झाली व्यवस्थित. पण हा रुमाल कुठून मिळाला तुला..?" पुन्हा एकदा त्याने तोच प्रश्न केला.

 

" अरे तो माझ्या फ्रेन्डचा आहे. न्यू फ्रेन्ड आताच बनला. बाबा त्याचं नाव श्रेयश आहे.मला मॅचिंग मॅचिंग आहे ना..?ऑफिस आणि हे झाडही त्याचच आहे." भाबडेपणाने ती बोलत होती.

 

तोच गेटमधून एक आलिशान गाडी जातांना पाहिली त्याने.

" म्हणजे श्रेयाला ऑफिसचे एम. डी भेटले असतील का..?आणि त्यांनीच हा रुमाल तिला दिला असेल का.?" गाडीकडे पाहत तो स्वगत झाला.

 

" बाबा, आपण आईसाठी खूप सारी फुले घेवून जाऊया.." श्रेयाच्या बोलण्याने तो भानावर आला.

आणि तिच्या पुढ्यात बसत फुले गोळा करू लागला.

 

इकडे आभा रिसेप्शन एरियात येऊन पोहचली.

 

" मॅडम. सर एका महत्वाच्या मिटिंगसाठी निघून गेले. राऊत सर तुमचं प्रेझेंटेशन पाहतील." म्हणत तिने तिला कॉन्फरन्स रूम दाखवली.

 

पन्नाशीतले मिस्टर राऊत आत बसले होते..

आभाने दिर्घ श्वास घेतला. डोळे मिटताच समोर मंदारचा आश्वासक चेहरा दिसला तसा तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकला. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तिने सर्वोत्तम प्रेझेंटेशन दिले.

मिस्टर राऊत तिच्या सादरीकरणाने चांगलेच प्रभावित झाले.

" मिसेस. कर्णिक तुमची प्रेझेंटेशन फाईल देऊन जा. आमच्या गार्डनचा प्रोजेक्ट तुम्हांला देतांना खूप आनंद होत आहे. आशा आहे की बॉटनिकल गार्डनचा एक मास्टरपिस बघायला मिळेल. बाकी प्रेझेंटेशन पाहून सरांसोबत मिटिंग होईलच. तुम्ही विदिन टु डेज काम सुरु करू शकता. अभिनंदन" आभाला ग्रीट करत मिस्टर राऊत म्हणाले.

 

" थँक यु सो मच सर. आय विल ट्राय माय बेस्ट." म्हणत ती रूमबाहेर पडली.

प्रेझेंटेशन फाईल मिस पल्लवीला देत ती बाहेर पडली.

 

एव्हाना मंदार श्रेयाला गार्डनचा एरिया फिरवून गाडीजवळ येवून पोहचला होता.

 

समोरून येणाऱ्या आभाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्याला समाधान वाटले. तिच्या गालावर पडलेली खळी त्याला त्या वातावरणातही घायाळ करून गेली.

 

" मंदार, हे प्रोजेक्ट मला मिळालं. आय ॲम सो हॅप्पी." म्हणत तिने त्याला आलिंगन दिले..

" ते तर मिळणारच होतं.." तिच्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला.

 

" पण बाबा हे तुला कसं कळलं..?" श्रेया भाबडेपणाने म्हणाली.

 

" कारण तुझा बाबा माझा बेस्ट फ्रेन्ड आहे. आणि फ्रेन्डला सगळं कळतं.." म्हणत आभाने लेकीकडे मोर्चा वळवला. तिला उचलून घेत गालावर गोड पापा दिला.

 

" ओके म्हणून त्याला कळलं आणि त्याने त्याचा हँकी मला दिला. ही इझ माय गुड फ्रेन्ड." श्रेया आनंदात म्हणाली आणि पुढच्याच क्षणी प्राजक्ताच्या फुलांनी भरलेला रूमाल तिने आभाच्या पुढ्यात धरला.

पांढऱ्याशुभ्र फुलांना पाहताच आभा गंधाळली. क्षणातच तिने अधाश्यासारखा रुमाल आपल्या हातात घेतला आणि नाकाजवळ धरला. एरवी फुलांचा मंद आणि मनमोहक सुगंध तिला गंधाळून जायचा. त्या सुगंधाची लाली स्मितहास्याची लकेर बनून खळीदार गालात सजायची.. पण आज मात्र स्मितहास्याची जागा ओळखीच्या आठवणीने घेतली. त्या फुलांना आज वेगळाच सुगंध आला होता.. भूतकाळाच्या अत्तराची कुपी अचानक उघडावी आणि त्यातून ओळखीच्या आठवणींचा सुगंध दरवळावा असे काहीसे झाले होते..

संभ्रमावस्थेत तिने पुन्हा एकदा रूमालात भरलेली फुले नाकाजवळ नेली. पुन्हा एकदा त्या फुलांना तोच सुगंध आला.

 

" काय गं काय झाले..? आवडलं की नाही श्रेयाचं सरप्राइज..? अशी का गोंधळलेली दिसतेस." गाडीचा दरवाजा उघडत तो म्हणाला.

 

" आज फुलांना वेगळाच सुगंध येतोय." ती पटकन बोलून गेली.

 

" अगं त्या रुमालावर मारलेल्या परफ्यूमचा असेल वास.." मंदार म्हणाला तसा तिने रुमालाला पुन्हा नाकाजवळ धरले.

" मग हा रुमाल कोणाचा आहे..?" ती गोंधळून म्हणाली.

मंदारने श्रेयाच्या बाबतीत घडलेला किस्सा तिला सांगितला.

तशी तिच्या मनाची तगमग थांबली.

'एकाच ब्रॅण्डचा परफ्युम अनेक लोकं वापरू शकतात' मनाला समज देत ती श्रेयाकडे वळली.

 

" श्रेया, मी सांगितलं होतं ना स्ट्रेंजरशी बोलायचं नाही. मग तरीही तु का घेतला त्यांचा रुमाल..?" श्रेयाला जवळ घेत ती म्हणाली.

 

" आई मी आधी फ्रेण्डशीप केली त्याच्यासोबत आणि मगच रुमाल घेतला. फ्रेण्ड कडून मदत तर घेवूच शकतो ना..? आणि तुला माहित आहे त्याच नाव.." ती बोलतच होती की आभाने तिला अडवलं.

 

" बस बस.. तुझ्या फ्रेण्डचं कौतुक पुरे. आता इथून निघूया. तिकडे आत्या वाट पाहत असेल.." म्हणत तिने श्रेयाला मागे गाडीत बसवले.

रुमालातली फुले तशीच हळुवार सांभाळत ती ही गाडीत बसली.

तिने पुन्हा एकदा ती फुले नाकाजवळ धरली.

श्वासांनी पुन्हा एकदा तिच ओळखीची तार छेडली. मनात अजूनही तो सुगंध दरवळत होता का..?

 

नक्की वाचा पुढच्या भागात.

क्रमश:

©® आर्या पाटील

 

 

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Aarya Amol Patil

Teacher

निसर्ग सौंदर्यला लेखणीत उतरवायला आवडतं