तु असा जवळी रहा...( भाग ३७ वा)

मंदार आणि श्रेया तिचे विश्व होते. या विश्वावर आपल्या प्रेमाची सावली नको पडायला एवढच तिला वाटत ?

# तु असा जवळी रहा ( भाग ३७ वा)

©® आर्या पाटील

हिरवळ पांघरलेल्या त्या फुलराणीला पाहण्याचा मोह आवरत त्याने स्वतःला सावरले.

" आभा, आय ॲम सॉरी. माझ्या क्लाइंटच्या वतीने मी माफी मागतो. आय ॲम रियली सॉरी.." तो तिच्यासमोर येत म्हणाला.

त्याच्या बोलण्याने तिची तंद्री सुटली. हातातून फुलांची ओंजळ नकळतपणे रिती झाली.मघासचं आठवून तिला घुसमटल्यागत झालं.

" इट्स ओके.." त्याच्याकडे न पाहता ती एवढच काय ते म्हणाली.

" ॲण्ड थँक यू अल्सो.मघाशी पूजेच्या वेळी सावरल्याबद्दल. आईचं स्वप्न पूर्ण झालं पण ते पाहायला तिच नाही ही उणीव डोळयांतून वाहत होती आणि त्यामुळेच.." बोलता बोलता तो पुन्हा गहिवरला.

" आज मॅडम जिथे कुठे असतील तिथे तुझ्यासाठी खूप खुश असतील. तुला सावरतांना पाहून त्यांना नक्कीच आनंद होईल." मघासशी खाली पडलेली प्राजक्ताची फुले पुन्हा ओंजळीत भरत ती म्हणाली.

" तिच्याशिवाय सावरणं शक्य नाही." शुन्यात नजर रोखत त्याने प्रतिउत्तर दिले.

" पण त्यांच्यासाठी सावरणं गरजेचं आहे. मृत्यूपश्चातही त्यांना तुला दुःखात पाहवणार नाही. श्रेयश, घडायचं होतं ते घडून गेलं पण त्याची शिक्षा आयुष्याला देऊन कसे जमेल.वेळेचं मलम लावून भूतकाळाची जखम भरून काढायची असते.आयुष्यात खूप काही गमावलं आहे आपण दोघांनी. पण म्हणून जगणं सोडून द्यायचं का ? मी सावरलं स्वतःला मंदारच्या साथीने.." बोलता बोलता तिचा स्वर जड झाला.

तशी त्यानेही तिच्यावर स्थिरावलेली नजर दुसऱ्या बाजूने वळवली. मनाला अजूनही खूपत असलेली वेदना पुन्हा एकदा ताजी झाली होती.

आवंढा गिळत तिने स्वतःला सावरले.

" श्रेयश, हेच सत्य आहे. जोडीदाराच्या साथीने तुलाही या दुःखातून बाहेर पडावं लागेल. अजून किती वेळ असा एकाकी जगणार आहेस ?" बोलता बोलता तिचा स्वर आर्त झाला.

" जोपर्यंत श्वासात श्वास आहे.." क्षणार्धात तिच्या नजरेत नजर रोखत तो म्हणाला.

त्याच्या नजरेने तिला मात्र घायाळ केले.

" माझं प्रेम अजूनही तेवढच शाश्वत आहे. त्या प्रेमावर दुसरं कोणीही आणि कधाही अधिराज्य गाजवू शकणार नाही." तो आश्वासकपणे म्हणाला.

त्याचे शब्द तिच्या काळजावर घाव घालून गेले. वेदनेची सल डोळ्यांतून रिती झाली.

" श्रेयश, सावर स्वतःला.." ती भरल्या नजरेने म्हणाली.

" जेव्हा तु तुझ्या आयुष्यातून मला कायमचं काढून टाकलस तेव्हाच संपलो गं मी. आता सावरणं आणि नव्याने जगणं कसं शक्य होईल आणि ते ही अमितच्या मृत्यूचं पातक माथी लादून.." बोलता बोलता त्याच्याही डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.

 तिच्या मनात त्या अश्रूंना पाहून कालवाकालव झाली. हात त्याच्या डोळ्यांच्या दिशेने सरसावले पण क्षणार्धात बुद्धीने मनाचा ताबा घेतला. स्वतःला सावरत ती मागे सरकली

" प्लिज.. जुनं नको आठवूस. त्रास होईल त्याचा." ती त्याला समजावत म्हणाली.

" विसरलोच नाही गं आजपर्यंत काही. विसरणार तरी कसं ? माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं त्या घटनेने." म्हणत त्याने डोळ्यांतील पाणी टिपले.

त्याचे शब्द पुन्हा एकदा तिच्या जिव्हारी लागले.

" आयुष्य तर सगळ्यांच बदललं म्हणून कोणी थांबलं नाही मग तु का नाही हे सत्य स्विकारत ?" तिने उत्तराच्या अपेक्षेने विचारले.

" पुढे जाऊन का सत्य बदलणार आहे ? माझं प्रेम बदलणारं नाही." त्याने प्रतिप्रश्न करीत पुन्हा एकदा प्रेमाची ढाल केली.

" प्रेम तर मी ही केलं होतं..." बोलता बोलता पुन्हा एकदा तिचं काळीज गलबललं. डोळे भरून येताच तिने नजर फिरवली.

" पण... पण मी सावरलं स्वतःला. मंदारच्या सहवासात सगळं मागे पडलं.." डोळे टिपत ती म्हणाली.

" आठवणी कधीच मागे पडत नाहीत मनाच्या गाभाऱ्यात त्या दरवळतच राहतात.." तो आश्वासकपणे म्हणाला.

" मी सोडलं ते आठवणींच गावही मागेच.." ती आणखी कठोर होत म्हणाली.

" तरी अजूनही माझ्या आवडी लक्षात आहेत तुझ्या. डब्ब्यात दिलेली माझ्या आवडीची भाजी, आवडीचा शर्ट किंबहुना मला सावरण्यासाठी वेळोवेळी केलेला प्रयत्न. मग हे सारं काय आहे ? अजूनही आठवणींच्या रूपात नातं जिवंत आहे." म्हणत त्याने तिला पेचात पकडले.

" हो आहेत आठवणी अजून तश्याच नितळ.. हो येतात मनाच्या डोहात कधी आनंद तर कधी वेदना बनून उसळून पण म्हणून सत्य नाकारता येत नाही. मी मंदारची पत्नी आहे हेच सत्य आहे. खूप पुढे गेली आहे मी. तु नको थांबूस त्याच वळणावर. माझ्यावर केलेल्या प्रेमाची शपथ..." ती बोलतच होती की त्याने तिला मधेच अडवले.

" प्लिज आभा,माझ्या शाश्वत प्रेमाची शपथ देऊन मला कोणत्याच बंधनात बांधू नकोस..." तो तिला थांबवत म्हणाला.

त्याच्या बोलण्यात एवढी अगतिकता होती की आभा एक शब्दही बोलू शकली नाही. नजर मात्र आपोआप त्याच्या दिशेने वळली. तोच समोरून मंदार आणि श्रेयाला येतांना पाहून तिने स्वतःला सावरले.

" आई, तुला किती शोधलं आणि तु इथे फ्रेण्डसोबत." म्हणत लांबूनच श्रेया धावत आली आणि आभाला बिलगली.

तसे श्रेयशनेही डोळे पुसले. दोघांच्या नजरेतलं पाणी मात्र मंदारच्या नजरेतून सुटलं नाही.

" आभा, तु इकडे काय करतेस ? आय मिन मघाशी आत होतीस आणि अशी अचानक बाहेर कशी आलीस ?" मंदार थोड्या आश्चर्यानेच म्हणाला.

मंदारच्या प्रश्नाने आभा गोंधळली.

" ते माझ्या क्लाइंटना गार्डनिंग विषयी माहिती हवी होती. तेच दाखवायला मॅडम बाहेर आल्या होत्या." उत्तर देत श्रेयशने प्रसंग सांभाळला.

इकडे मनातच आभाने सुटकेचा नि:श्वास टाकला.

" म्हणून तुम्ही दोघं बाहेर आलात." मंदार म्हणाला.

" हो. अच्छा मी आहे आत.." आभावर ओझरता कटाक्ष टाकीत तो म्हणाला आणि आत निघून गेला.

आभा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली.

" आभा..." मंदारने आवाज दिला पण तो आभाच्या कानावर पडला नाही. अजूनही मनावर श्रेयशचे शब्द रुंजी घालत होते त्या कोलाहलात त्याची साद विरुन गेली.

" आभा, अगं काय झालं ?" तिला स्पर्शत तो म्हणाला. त्याच्या स्पर्शाने तिची तंद्री सुटली.

" काही नाही." स्वतःला सावरत ती एवढच म्हणाली.

" ये आई, तु बरी आहेस ना ?" छोटी श्रेया तिच्या जवळ येत काळजीने विचारती झाली.

" बेटा मी खरच ठिक आहे. तु नको काळजी करुस." म्हणत तिने श्रेयाला जवळ घेतले.

" आभा, काहीही असेल तर निर्धास्तपणे सांग." तो जाणाऱ्या श्रेयशला न्याहाळत म्हणाला.

" खरच काही नाही. मिस्टर श्रेयश म्हणाले त्याप्रमाणे त्यांच्या क्लाइंटना गार्डनिंगविषयी माहिती द्यायला आले होते. त्याच विचारत होते जरा.." ती नजर चोरत म्हणाली.

" मग ठिक आहे. आम्ही दोघं घाबरलो ना. हो की नाही बेटू ?" श्रेयाकडे पाहत तो म्हणाला.

तशी श्रेयाही त्याच्याजवळ आली.

" मग काय बाबा. मघाशी फ्रेण्ड पण असाच. गुरुजींनी आरती करायला सांगितली तर घाबरला. ते बरं आईने मदत केली नाहीतर.." श्रेया बोलतच होती की आभाने तिला मधेच अडवले.

" आभा, काय बोलते श्रेया ? नक्की काय झालं होतं ?" मंदार थोडा गंभीर होत म्हणाला.

आभा थोडी धास्तावली. मघाशी श्रेयशने प्रसंग सावरला होता पण आता तिलाच सांभाळावं लागणार होतं.

" मला वाटतं त्यांना आई वडिलांची आठवण आली असणार. ते थोडे भावूक झाले होते त्यामुळे आरती घेतलेला हात थरथरत होता. मी तिथे जवळच होते त्यामुळे आरती पडू नये म्हणून आधार दिला." तिने आपले म्हणणे मांडले.

" अच्छा." बोलत तो थोडा वेळ शांत झाला. कालपासून काही तरी होतं जे त्याला सारखं खटकत होतं. आताही ती जाणीव मन पोखरून गेली.

' मंदार, तु चुकीचा विचार करतो आहेस.' मनाने त्याला पुन्हा समजावले.

" मी ठिक केलं ना मंदार ?" ती दबकतच म्हणाली.

तिच्या बोलण्याने तो भानावर आला.

" योग्यच केलस. तिथे मी असतो तर हेच केलं असतं." म्हणतांना त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले आणि आभाला हायसे वाटले.

मंदार आणि श्रेया तिचे विश्व होते. या विश्वावर आपल्या प्रेमाची सावली नको पडायला एवढच तिला वाटत होतं. त्यासोबतच तिला तिच्या प्रेमाचं पावित्र्यही जपायचं होतं.

अमितच्या अपघाती मृत्यूनंतर श्रेयशविषयी तिच्या मनात जरी राग निर्माण झाला असला तरी त्याच्या प्रेमाला नव्हती नाकारू शकली ती. त्याच्यासोबत जगलेला प्रत्येक क्षण सहवासाच्या पवित्र गंधाने दरवळलेला होता. या गंधात अनेक स्वप्ने सामावली होती त्यांच्या सहजीवनाची पण डोळ्यांसमोर त्यांची हिच स्वप्ने अमितच्या चितेत जळून गेली. खूप कठिण होतं आभाचं आयुष्यही. तिने श्रेयशचा केलेला तिरस्कार,मोडलेलं लग्न, त्याचं आपल्या आयुष्यातील नाकारलेलं अस्तित्व जगाला दिसलं पण त्यामागचं कारण मात्र कळलं नाही. त्यावेळेसही तिने त्याचाच विचार केला होता. अमितच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांचा रोष प्रमाणाबाहेर वाढला होता. ते आक्रमक बनले होते. श्रेयशच्या जीवाची पर्वा करत तिने त्यांच्या समोरच त्याला आपल्या आयुष्यातून बेदखल केले आणि गाव सोडून कायमचं निघून जाण्यास सांगितलं. कदाचित त्यावेळेस तो तिथून गेला नसता तर खूप मोठा अनर्थ घडला असता.

अनर्थ तर तसाही घडलाच त्याच्या आयुष्यात. जीवाच्या भीतीने तो निघून गेला असे मुळीच नाही पण त्यादिवशी तिने घातलेली शपथ जीवघेणी ठरली. आपल्या जीवाची गळ घालत तिने त्याला तिच्या आयुष्यातून कायमचं निघून जाण्यास सांगितलं. खूपच भयावह होतं सगळं.

आज पुन्हा एकदा राहून राहून तोच दिवस तिच्या मनोपटलावर गिरक्या घालत होता. मन बैचेन होऊ लागलं होतं.

" मंदार आपण निघायचं का ?" तिने मंदारला विचारले. मनाची घालमेल कमी व्हावी एवढीच काय ती तिची इच्छा.

" आपल्या घरचं कार्य आहे. मग लगेच कसे निघणार ?" तो तिला समजावित म्हणाला.

क्षणभर तिला त्याच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले. त्यालाही ते कळले.

" अगं म्हणजे श्रेयश आपल्या घरच्यासारखेच आहेत ना मग असं लगेच कसं निघायचं. थोडा वेळ थांब मग निघूया." त्याने पुन्हा एकदा तिला समज दिली.

काय ऋणानुबंध होते मंदारचे श्रेयशसोबत माहित नाही पण त्याची श्रेयशविषयची आपुलकी आभाला भावनिक करून जायची. आताही तेच झाले.

' मंदारला, आमच्या नात्याविषयी कळलं तर तो तेवढ्याच सकारात्मकतेने स्विकारेल का सारं ? की...' स्वगत झालेल्या आभाला पुढची कल्पनाही नकोशी वाटली.

" नाही.. मी आमचा संसार नाही पणाला लावू शकत. श्रेयशसोबतची त्याची मैत्री नेहमीच निखळ राहिली पाहिजे. मंदारला कधीच माझ्या भूतकाळाविषयी काही कळता कामा नये.' तिने मनाला सक्त ताकिद दिली.

आभाच्या आईवडिलांच जेवण आटोपल्यानंतर त्यांनी श्रेयशची भेट घेतली. त्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आशीर्वाद दिला. त्यांच्या आशीर्वादाने तो मात्र भावनिक झाला. हात जोडत त्याने मात्र त्याच्या हातून घडलेल्या चुकीची पुन्हा एकदा क्षमा मागितली. त्याचे भरुन आलेले डोळे त्या दोघांनाही रडवून गेले.

" आमचा अमित तुझ्यात नेहमी भेटेल आम्हांला. सदैव सुखी रहा. कधीही गरज लागली तर तुझ्या आईवडिलांकडे हक्काने ये.." आईबाबांनी त्याला मायेने समजावले.

त्यानेही होकारार्थी मान हलवित त्यांच्या प्रेमाचा स्विकार केला. सरपोतदार सर आणि मॅडमच्या फोटोला पाहून दोघांनाही गहिवरून आले.

 मंदारने मित्राच्या नात्याने पुजेच्या ठिकाणी देखरेख पाहिली होती. त्याची आपुलकी पाहून श्रेयशला पुन्हा एकदा तो मनापासून भावला.हळू हळू गर्दी कमी होऊ लागली. ऑफिसमधील मोजका स्टाफ वगळता सगळेच गेले.

" श्रेयश, आम्हीही निघतो. श्रेयाही कंटाळली आहे आणि तिची आईही." श्रेयशची रजा मंदार हसत म्हणाला.

" ओ आय ॲम सो सॉरी. माझ्यामुळे त्यांचा खोळंबा." आभाचा उल्लेख होताच तो म्हणाला.

" छे हो त्यात काय खोळंबा? बाकी पुजेचा कार्यक्रम उत्तम पार पडला." त्याचा हात हातात घेत मंदार म्हणाला.

" क्रेडिट गोज टु यु बोथ अल्सो. तुम्ही पुजेला बसायची तयारी दाखवली म्हणून खरच थँक यू." श्रेयश ने मनापासून त्याचे आभार मानले.

" थँक यू तर आम्हांला मनायला हवं. तुम्ही आपलं समजून आम्हांला या पूजेत बसण्याचा मान दिला. खूप खूप धन्यवाद.." म्हणत मंदारने श्रेयशला आलिंगन दिले.

आभाची नजर त्या दोघांवर स्थिरावली आणि मनाला समाधानाची भरती आली. ती तशीच तेथून बाहेर पडली आणि त्यांची वाट पाहू लागली.

इकडे तिच्या आईबाबांनीही श्रेयशची रजा घेतली आणि श्रेयाला घेऊन ऑफिसबाहेर पडले. मागोमाग मंदारही निघाला.

" तुम्ही थांबा मी आलोच गाडी घेऊन.." म्हणत तो पार्किंग एरियाकडे निघून गेला. इकडे आभाच्या मनाची चलबिचल काही थांबत नव्हती.श्रेयशला भेटावं असे राहून राहून वाटत होते. त्याला नेहमीच टाळणारी ती आज त्याला भेटण्यासाठी एवढी अगतिक का झाली असेल ? कदाचित मघाशी दोघांमध्ये अपूर्ण राहिलेलं संभाषण सकारात्मकतेने संपवावं अशी इच्छा असावी तिची. शेवटी खूप विचार करून तिने निर्णय घेतला.

" आई, थोडावेळ थांबायला सांग मंदारला. एक महत्त्वाचं काम राहिलय तेवढं उरकून आले.." म्हणत ती तशीच ऑफिसकडे वळली.आई काही विचारेपर्यंत ती निघूनही गेली.

क्रमश:

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all