तु असा जवळी रहा...( भाग ३६ वा)

हिरव्याकंच साडीत तिला नटलेली पाहून त्याला जुनी आभा आठवली. त्याच्या आयुष्यात नववधू बनून येणार??

#तु असा जवळी रहा..(भाग ३६ वा)

©® आर्या पाटील

उद्याच्या पुजेची तयारी आटोपून श्रेयश बंगल्यावर परतला. पुन्हा एकदा आभाचा चेहरा डोळ्यांसमोर तरळू लागला. तिची ओलेती नजर मनाला बैचेन करून गेली. मंदार सोबत तिला आठवून तेच मन पुन्हा एकदा रडले.

' हे मी काय करतोय ? मी वचन दिलं आहे आभाच्या आईला आणि स्वतःलाही आभाच्या सुखाआड न येण्याचं. ती खूप सुखात आहे.जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर तिच्या सुखी संसारापासून लांब जाणं हेच योग्य आहे तिच्यासाठीही आणि माझ्यासाठीही.' त्याने मनाला समजावले.

दुखऱ्या मनावर निश्चयाचं मलम लावून त्याने स्वतःला सावरले. उद्या पुजेसाठी कोणते कपडे घालायचे हे ठरवत असतांना नजर आभाने दिलेल्या गिफ्टवर स्थिरावली.

ती अजूनही आपली आवड विसरली नाही याची जाणिव होताच त्याचे मन आनंदी झाले. त्या शर्टाला उराशी कवटाळीत त्याने तिच्या प्रेमाला श्वासात भरून घेतलं. उद्या तोच शर्ट घालण्याचे मनाने निश्चीत केले. तिच्यापासून लांब जाणारच आहोत तर तिचा सहवास सकारात्मकतेने जगून घेण्याचा निश्चय करून तो झोपी गेला. आभानेही श्रेयशच्या बाबतीत सकारात्मक बनण्याचा निर्णय घेतला होता. त्याला सावरणं गरजेचं होतं.जे फक्त तिच करू शकत होती आणि म्हणूनच तिने आपल्या निखळ मैत्रीला, आपल्या पहिल्या प्रेमाला सावरण्याचा निर्धार केला होता. त्या दोघांच्या वागण्याने मंदारला मात्र कोड्यात टाकले होते. शांत झोपलेल्या आभाला क्रित्येक वेळ न्याहाळत तो तसाच बसून राहिला पण पडलेल्या कोड्याचं उत्तर काही मिळालं नाही.

' मुळात कोडच काही नाही. मी उगाचच खूप विचार करत आहे. आभाला मी खूप चांगला ओळखतो. अमितच्या विचारात ती होते कधीकधी डिस्टर्ब मग त्याचा संबंध श्रेयशसोबत जोडणे मूर्खपणाचे ठरेल.' तिच्या डोक्यावरून हात फिरवीत त्याने स्वतःला समजावले.

सकाळी लवकर उठायचे असल्याने मनातले विचार बाजूला ठेवून त्यानेही निद्रादेवीला आळवले.

 सकाळ झाली ती चैतन्याचा सळसळता उत्साह घेऊनच. आभाही लवकरच उठली. आन्हिके उरकून तिने स्वयंपाकघर गाठले. एव्हाना तिची आईही उठून स्वयंपाकघरात आली.

" बाळा, तु लवकर तयार हो. पुजेसाठी उशीर नको. दिलेल्या मुहूर्तावर पूजा संपन्न व्हायला हवी. तु जा बरं मी आवरते बाकीचं." म्हणत आभाच्या आईने तिला तयार होण्यासाठी पाठवून दिलं. 

पुजेसाठी लग्नातली हिरवी पैठणी घालण्याचे तिने निश्चित केले होते. मंदारला तिला त्या पैठणीत पाहायला मनापासून आवडे आणि म्हणूनच तिने त्याला आश्चर्याचा सुखद धक्का देण्याचे ठरवले होते. तिच्या गोऱ्या कांतीवर ती हिरवी पैठणी रुबाबात सजली. हातातल्या हिरव्या बांगड्या तिच्या सौंदर्याची शोभा आणखी वाढवित होत्या.सोन्याच्या मोजक्या आभूषणांनी देह खुलून दिसत होता. हलक्याश्या मेकअपनेही तिच्या सौंदर्याला भरती आली होती. आरसपाणि सौंदर्य लेवून ती धरेगत सजली होती. बाथरूममधून बाहेर आलेला मंदार तिला पाहताच जागेवरच थबकला. तिच्या सौंदर्याला डोळ्यांत साठवतांना तो ही श्रावणातला पाऊस झाला. तिला न्याहाळत तो तिच्यापाशी कधी येऊन पोहचला त्यालाही कळलं नाही. आपसूकच हातांनी तिच्याभोवती मिठी घट्ट केली. पावसाच्या वर्षावात ती धरा नव्या नवरीसारखी गोड लाजली.

" आभा, खूप सुंदर दिसत आहेस." आरश्यासमोर तिला बाहुपाश्यात घेऊन उभा असलेला मंदार तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवित म्हणाला.

तशी ती खळीदार गालात गोड हसली.

" ही खळी तर वेडं करते गं मला." म्हणत त्याने मिठी आणखी घट्ट केली.

" मंदार, उशीर होतोय. आपल्याला वेळेत पोहचायला हवं." ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत म्हणाली.

" नाही.." तिच्या मोकळ्या केसांचा सुगंध उरात भरत त्याने नकार दिला.

" मंदार...?" ती आरश्यातून त्याला न्याहाळत प्रश्नार्थक नजरेत म्हणाली.

" श्यु..ss" तिच्या ओठांवर बोट ठेवत त्याने तिला शांत केले.

  तिच्या नितळ कायेच्या स्पर्शात तो पाऊस बनून भिजत होता. आज त्याच्यासाठी ती हिरवी शाल लेवून जी सजली होती. पाठमोऱ्या असलेल्या तिला त्याने आपल्या दिशेने वळवले. तिच्या कपाळावर स्पर्शखूण उमटवित मायेने जवळ घेतले.

" मंदार, आपल्याला पुजेसाठी जायचं आहे." त्याला भानावर आणित ती म्हणाली.

" नाही.." तो पुन्हा एकदा लडिवाळपणे म्हणाला.

" ठिक आहे मग तसं कळव फोन करून आपण येत नसल्याचे म्हणजे श्रेयश सर काहीतरी वेगळी व्यवस्था करतील. ऐनवेळी पंचायत नको." त्याच्या भोवती हात घट्ट करीत ती म्हणाली.

" ये नाही हा. असं आयत्या वेळेला ? काय विचार करतील ते ? तुझं आपलं काहीही.." तो तिच्याभोवतीची मिठी सोडवत म्हणाला.

" अरे... मघापासून तेच तर सांगत होते तेव्हा ऐकायला तयार नव्हतास आणि आता..?" ती लटक्या रागात म्हणाली.

" आपल्या सौंदर्याने भूरळ घातली आणखी काय.." तो ही हसत म्हणाला.

तशी ती पुन्हा गोड लाजली

" आता पुरे झालं सौंदर्यपुराण. आवर लवकर निघावं लागेल." म्हणत पुन्हा आरश्यात स्वतःला न्याहाळू लागली.

मनाला आवर घालित मंदारनेही पुजेसाठी तयार होण्यास प्राधान्य दिले. थोड्याच वेळात तयार होऊन दोघेही रूमबाहेर पडले. एव्हाना छोटी श्रेयाही उठली होती. आईबाबांना असं तयार झालेलं पाहून तिचीही कळी खुलली.

" आई, तुम्ही तयार झाल्यावर फोन करा श्रेयशना ते लागलीच गाडी पाठवतील." श्रेयाला उचलून घेत मंदार म्हणाला.

" प्रिन्सेस, तु आजी आजोबांसोबत निवांत ये तुझ्या फ्रेण्डच्या ऑफिसला. चालेल ना ?" मंदारने लाडक्या लेकीला विचारले.

" तुम्ही जा मी येईन आजीसोबत." तिनेही लगेच होकार भरला.

तोच मंदारचा फोन वाजला. श्रेयशचा कॉल होता.

" गुड मॉर्निंग.. निघाले का ?" पलिकडून श्रेयश म्हणाला.

" गुड मॉर्निंग श्रेयश. हो आता निघतच आहोत.तुम्ही पोहचलात का ?" आभाला बाहेर येण्याची खूण करीत तो म्हणाला आणि घराबाहेर पडला.

" सावकाश या. श्रेया आणि आईबाबांना आणायला मी गाडी पाठवेन हेच सांगायला कॉल केला होता. त्यांना निवांत तयार व्हायला सांगा." श्रेयश म्हणाला.

" हो नक्कीच. त्यांना तसं सांगितलं आहे मी. तयारी झाल्यावर ते तुम्हांला कॉल करतील. थँक यु सो मच." म्हणत त्याने गाडीचा दरवाजा उघडला.

" थँक यु तर मला म्हणायला हवं. तुम्ही खूप केलं आहे माझ्यासाठी." तो म्हणतच होता की मंदारने त्याला मधेच अडवले.

" ओ श्रेयश, प्लिज मैत्रीमध्ये थँक यू आणू नका." गाडी स्टार्ट करीत तो म्हणाला.

" अच्छा नाही म्हणणार थँक यू. तुम्ही या मी वाट पाहतोय." हसत म्हणत त्याने फोन ठेवला.

गाडी स्टार्ट करीत मंदारने आभाला हॉर्न दिला. त्या आवाजाने ती लागलीच बाहेर आली.

" आभा, एक गोष्ट विसरलो बघ." तिला पाहून तो म्हणाला.

" कोणती ? काही राहिलं का ?" गाडीत बसत तिने प्रश्न केला.

" आईंना तुझी द्रिष्ट काढायला सांगायचं विसरलो.." तिला पुन्हा एकदा न्याहाळत तो प्रेमाने म्हणाला.

" हो का ? मग जायचं का घरात ? तुझीही द्रिष्ट काढावी लागेल. हॅन्डसम दिसत आहेस " ती ही प्रेमाने म्हणाली.

तसा तो भलताच खुश झाला. आपल्या केसांवरून फिल्मी अंदाजाने हात फिरवीत त्याने तिच्याकडे पाहिले.

" हो का ? पण आता नको उशीर झाला आहे. पुजेवरून आल्यावर जोडीने काढुया द्रिष्ट.." तो पुन्हा लडिवाळपणे म्हणाला.

तिने खळीदार गालात हसत त्याच्यावर प्रेमळ कटाक्ष टाकला.

"श्रेयशना द्यायचं गिफ्ट ठेवलस ना गाडीत ?" तो विषय बदलत म्हणाला.

तिनेही होकार भरला.

" काय म्हणत होते ते फोनवर ?" आभाने प्रश्न केला.

" सावकाश या असं सांगायला फोन केला होता. आईबाबांना घ्यायला गाडी पाठवेन असेही सांगत होते. ही इज नाइस ह्युमन बींग.." म्हणत त्याने पुन्हा एकदा श्रेयशवर स्तुतीसुमने उधळली.

" हम्म.." म्हणत तिने त्याला प्रतिउत्तर दिले.

" खूप कमी सहवास मिळाला त्यांचा. पुजा झाल्यानंतर कदाचित ते शिफ्ट होतील." नाराजीच्या सुरात तो म्हणाला.

तिने त्याच्याकडे पाहून फक्त स्मितहास्य केले. मनात मात्र काहीतरी सुटत असल्याची बोचरी जाणिव निर्माण झाली. भावनेच्या हिंदोळ्यावर झुलतांना 

श्रेयश सोबत आज त्याच्या भविष्याविषयी बोलायचा तिचा निर्धार आणखी पक्का झाला.

थोड्याच वेळात ते ऑफिसमध्ये येऊन पोहचले. कंपनीतील तुरळक लोकं वगळता फारशी गर्दी नव्हती.

पुजेसाठी काही निवडक क्लाइंट्सना आमंत्रण दिले होते. 

आभाला उतरवून मंदार गाडी पार्क करायला निघून गेला. ती तिथेच त्याची वाट पाहत थांबली. तोच श्रेयश बाहेर आला. आभावर नजर जाताच तो जाग्यावरच खिळला. तिला असं सजलेलं पाहणे त्यालाही भारी प्रिय होते. हिरव्याकंच साडीत तिला नटलेली पाहून त्याला जुनी आभा आठवली. त्याच्या आयुष्यात नववधू बनून येणारी. अशीच हिरवी पैठणी पसंद केली होती त्याने तिच्यासाठी.त्या दिवशी तिच्या लग्नातल्या साड्याच आणायला तर तो गेला होता शहरात. मनाला आनंदाचं उधाण आलं होतं. सबंध प्रवासात तो तिच्या सोबतचं सहजीवनाचं स्वप्नच तर जगत होता पण परतीच्या त्या प्रवासाने त्याच्या या स्वप्नावरच घाला घातला. गावाच्या वेशीजवळच काही कळायच्या आत त्याच्या हातून अमितचा अपघात झाला आणि सगळच संपलं.

त्या आठवणी सरशी पुन्हा एकदा त्याच्या अंगावर काटा उभा राहिला.

" श्रेयश... झाली का तयारी पुजेची .?" मंदार जवळ येत म्हणाला तसा विचारमग्न श्रेयश भानावर आला. सोबत आभाही होती. आभाला मंदारच्या सोबत पाहून मन पुन्हा एकदा हळवे झाले.

" हो... या आत..." त्याने स्वतःला सावरत म्हटले.

आभाने श्रेयशवर कटाक्ष टाकला.बर्थडेला दिलेला शर्ट त्याने घातल्याचे लक्षात येताच चेहऱ्यावर नकळत स्मितहास्य उमटले. मनाने त्याला सुंदर दिसत असल्याची प्रतिक्रिया दिली. तोच त्याची नजरही तिच्यावर स्थिरावली. नजरेनेच त्याने तिच्या सौंदयलाही अभिवादन केले. क्षणाची नजरानजर की दोघांनी स्वतःला सावरले.

पुजेची सगळीच तयारी झाली होती.

सत्यनारायणाच्या पुजेने या ऑफिसचं उद्घाटन व्हावं अशी श्रेयशच्या आईची इच्छा होती आणि आभा या इच्छेचा अविभाज्य भाग होती. दोघांनी जोडीने या पुजेला बसावं हे स्वप्न त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. कधी कधी हातात असलेल्या आपल्या गोष्टी पटकन निसटून जातात तसच काही घडलं आभा आणि श्रेयशच्या संसाराबाबतीत. नशिबात असलेलं नाकारता येत नाही ते स्विकारावच लागतं. आज भलेही ते दोघे जोडीने पुजेला बसणार नव्हते पण ऑफिसचं स्वप्न त्यांनी एकत्र येऊन पूर्ण केल्याचं समाधान होतं. चांगल्या माणसांच्या बाबतीत उशीराने का होईना पण चांगलं घडतं याचीच जणू प्रचिती होती ती.मॅडमचं स्वप्न जगलेल्या आभानेही मनापासून त्या ऑफिससाठी काम केलं होतं. मॅडमच्या बाबतीत जे वाईट घडलं त्याचं प्रायश्चित म्हणून आणि त्यांची इच्छा म्हणूनही तिने त्या ऑफिसला आपलं मानलं होतं. पुजेसाठीही ती त्याच आपलेपणाने तयार झाली होती. मनातील सगळं मळभ दूर सारून. 

कोणत्याही कार्याची नांदी जेव्हा सत्यनारायणाच्या पुजेने होते तेव्हा सकारात्मकता ऊर्जा बनून तेथे वास करते. मनाला नवी उभारी आणि प्रसन्नता मिळते. कार्यात आणि कार्यस्थळी चैतन्य निर्माण होते. थोडक्यात सत्यनारायणाची पुजा ही सगुण पुजा आहे.

आज याच पुजेत श्रेयशच्या आयुष्यातही सकारात्मकता निर्माण करण्याची शक्ती आभा देवाकडून मागणार होती.

श्रेयशची नजर राहून राहून तिच्यावर विसावत होती. कदाचित आता खूप कमी सहवास राहिला होता तिच्यासोबत म्हणून मन तिला नजरेत साठवत होतं. ती मात्र कटाक्षाने त्याला पाहणं टाळित होती. थोड्याच वेळात भटजीही आले आणि पुजेला सुरवात झाली.

पुजेला बसण्याआधी आभाने मंदारसह सरपोतदार सर आणि मॅडमच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. मंदारला पुन्हा एकदा नवल वाटले पण तिच्या हळवेपणाचं कारण देत त्याने मनाला समजावले.श्रेयशचा कंठ दाटून आला. आईबाबांच्या आठवणीने डोळे काठोकाठ भरले. पुढच्याच क्षणी मात्र त्याने स्वतःला सावरले.

त्याची नजर सारखी सारखी त्या दोघांवर स्थिरावत होती. आयुष्य किती पटकन रंग बदलतं याची राहून राहून जाणिव होत होती. हळूहळू काही निवडक लोक पुजेसाठी उपस्थित होऊ लागले. थोड्याच वेळात आभाच्या बाबांनी श्रेयशला कॉल केला.

तात्काळ त्यानेही त्यांच्यासाठी ड्रायव्हरकरवी गाडी पाठवून दिली.पुजेचा विधी यशावकाश पार पडला. भटजींनी सगळ्यांना आरतीसाठी जमायला सांगितले.

" थांबा गुरुजी. एक विनंती होती. श्रेयश सरांनी या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतली आहे त्यामुळे त्यांच्या हातून या वास्तुची पुजा व्हावी अशी इच्छा आहे आमची." भटजींना विनंती करीत ती म्हणाली.

पुन्हा एकदा मंदारला तिच्या वागण्याचे आश्चर्य वाटले.

" मंदार मला वाटतं त्यांनाही पुजेचा मान मिळावा." मंदारकडे पाहत तिने आपले म्हणणे मांडले.

" मिसेस कर्णिक खरच याची काही गरज नाही." श्रेयश पुढे येत म्हणाला.

" गरज कशी नाही ? अथक परिश्रमाने पूर्ण केलेल्या स्वप्नाला जगण्याचा अधिकार तुम्हांलाही आहे. गुरुजी यांच्या हातूनही विधी करून घ्या असे आम्हां सगळ्यांनाच वाटते." आपल्या जागेवरून उठत मंदार म्हणाला. पाठोपाठ आभाही उठली. डोळ्यांनीच तिने श्रेयशला पुजेसाठी बसण्याचे संकेत दिले.मंदारने हात धरून श्रेयशला पाटावर बसवले.

श्रेयश मात्र भावूक होऊन त्यांचा आपलेपणा मनात साठवत होता. भटजींनी मंत्रोच्चाराला सुरवात केली. भरलेल्या डोळ्यांत श्रेयशला देवाची प्रतिमा अंधूक दिसत होती.ओलेत्या नजरेसमोर त्याला आईवडिलांची प्रतिमा दिसत होती.

तोच मंदारला एक महत्त्वाचा फोन आला आणि तो तेथून थोडा बाजूला झाला.एव्हाना श्रेया आणि आभाचे आईबाबाही येऊन पोहचले.

भटजींनी श्रेयशला देवाच्या प्रतिमेची आरती करायला सांगितली. भावनिक झालेल्या त्याने थरथरणाऱ्या हातात आरतीचे ताट उचलले. हाताचं थरथरणं वाढलं आणि ताट पडणार तोच आभाने ताटाला हात लावत आधार दिला. डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्याच्या अतीव दुःखाचे साक्षीदार होते. त्याला असं हळवं झालेलं पाहून ती ही अगतिक झाली. त्यांनी सोबत केलेली देवाची आरती त्यांच्या खऱ्या देवापर्यंत पोहचली असावी. आपल्याच विचारात मग्न असलेल्या श्रेयशला आभाच्या अस्तित्वाची जाणिव झाली नाही अन् तिने मात्र जाणिवेपलिकडे जाऊन त्याला सावरलं. क्षणभर तिला मंदारचाही विसर पडला. तेवढ्यातच श्रेयशच्या कंपनीचे एक नवे क्लाइंटही तिथे येऊन पोहचले. दोघांना एकत्र पाहून त्यांना मात्र ते पती पत्नी असल्याचा गैरसमज झाला. थोड्याच वेळात मंदारही परत आला.आरती पार पडली आणि पुजा संपन्न झाली. पुजेअंती मिळालेलं मानसिक समाधान श्रेयशला जगण्याची नवी दिशा देऊन गेलं. आईवडिलांचा आशिर्वाद घेऊन त्याने नव्या वाटेवर मार्गक्रमण करायला सुरवात केली.

" फ्रेण्ड तुला बरं नाही का ? मघाशी आरती करतांना किती घाबरला होतास. आईने आरतीला हात लावला नसता तर ताट खाली पडलं असतं." छोटी श्रेया त्याला खाली बसवून त्याच्या डोक्याला हात लावीत म्हणाली.

" आईने हात लावला होता ताटाला ?" श्रेयश हळवा होत विचारता झाला.

" हो.." तिने उत्तर दिले.

तिच्या उत्तराने समाधानाची एक स्पष्ट लकेर त्याच्या चेहऱ्यावर उमटली. त्याच्या आईची जोडीने पुजा करण्याची इच्छा जरी तो पूर्ण करू शकला नसला तरी आभाच्या साथीने केलेली आरती त्याने आईच्या चरणी मनोमन अर्पण केली. तोच आभाही तिथे येऊन पोहचली.

" श्रेयश तुम्ही ठिक आहात ना ?" तिने काळजीने विचारले.

तिच्या येण्याने मनाला पुन्हा समाधान मिळाले. तिने केलेली मायेची विचारपूस सुखद धक्क्यापेक्षा कमी नव्हती.

" हो मी ठिक आहे आणि थँक यू सो मच.." तो तिच्या नजरेत हरवत म्हणाला.

तसं तिनेही त्याच्याकडे पाहिले. त्याची नजर हृदयात खोल निशाणी साधती झाली. मनापासून मनापर्यंत जगलेलं नातं होतं त्यांच. प्रेमाचा ओलावा अजूनही जाणीव बनून शिल्लक होता. तिने तात्काळ नजर श्रेयाच्या दिशेने वळवली.

" आज आनंदाचा दिवस आहे. सरपोतदार मॅडमनी बघितलेलं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. हा आनंद मनापासून जगा. " त्याला समजावत ती म्हणाली.

" आई ह्या मॅडम कोण गं..?" श्रेयाने मात्र मधेच प्रश्न केला.

" सरपोतदार मॅडम म्हणजे माझी आई.." श्रेयाला उचलून घेत तो म्हणाला.

" अच्छा.." तशी ती ही गोड हसली.

आभाने मात्र स्वतःला सावरले. तोवर मंदारही तिथे येऊन पोहचला.

" श्रेया, काय मग आवडलं का फ्रेण्डचं ऑफिस ?" श्रेयाकडे पाहत मंदार म्हणाला.

" अरे बाबा, तुला माहित आहे का आरती करतांना.." श्रेया बोलतच होती की आभाने तिला मधेच अडवलं. तसा श्रेयशही सावध झाला.

" पुरे झालं श्रेया,आधी देवाला नमस्कार करून घे पाहू.." तिला अडवित आभा म्हणाली.

" मी बाबासोबत जाणार.." म्हणत ती श्रेयशकडून मंदारकडे झेपावली.

" आईला सोबत घेऊया ना ?" तिला कडेवर घेत तो म्हणाला.

श्रेयाने मानेनेच नकार दिला.

" सॉरी आभा, आम्ही आलोच श्रेयश." म्हणत तो तिला घेऊन तेथून निघाला.

" श्रेयाचा खूप जीव आहे मंदारवर."त्यांच्याकडे पाहत ती समाधानाने म्हणाली.

" लेकीचा सर्वात जास्त जीव आपल्या बाबावरच असतो. मंदार नशिबवान आहेत." श्रेयशनेही मन मोकळं केलं.

त्यालाही अशीच गोड लेक हवी होती. त्या दोघांच्या प्रेमाच्या राज्यात तिचंही स्वप्न पडायचं. आज पुन्हा ती आठवण जागृत झाली.

बोलता बोलता पुन्हा एकदा तो तिच्यात रमला. खूप काही बोलावसं वाटत होतं. तिला डोळ्यांत साठवावसं वाटत होतं पण त्याने मनावर अंकुश लावला.

तोच ते नवे क्लाइंट त्याच्यापाशी येऊन पोहचले.

" मिस्टर श्रेयश, खूप कलात्मकतेने उभारलं आहे ऑफिस. स्पेशली गार्डन एरिया खूपच सुंदर आहे.." कौतुक करीत ते म्हणाले.

" क्रेडिट गोज टू हर.. सगळी कन्सेप्ट यांची आहे." आभाकडे हात दाखवीत तो म्हणाला.

" ओ... इट्स ब्रिलियंट. मिसेस श्रेयश यु डन फॅब्युलस जॉब. आणि हो तुम्ही दोघेही खूप छान दिसत आहात मिस्टर ॲण्ड मिसेस सरपोतदार.." ते श्रेयशचा हात हातात घेत म्हणाले.

तशी आभा गोंधळली. क्षणभर काय बोलावं हे कळेनासं झालं.

"एक्सक्युज मी.. आलेच मी.." म्हणत तिने तेथून काढता पाय घेतला. ऐकतांना जरी सुखद वाटत असलं तरी ते सत्य नाही याची जाणिव होताच श्रेयशही बैचेन झाला.

" सॉरी सर. पण त्या माझ्या पत्नी नाहीत. माझ्या ऑफिसचं गार्डनिंग त्यांनी केलं आहे.." म्हणत त्याने त्यांचा गैरसमज दूर केला.

" ओह.. आय ॲम सो सॉरी. मघाशी तुम्हांला एकत्रित पुजा करतांना पाहिलं म्हणून गोंधळ झाला असावा बहुतेक. बट आय ॲम एक्स्ट्रीमली सॉरी.." म्हणत त्यांनी आपली चुक कबुल केली.

इकडे आभाला मात्र मेल्याहून मेल्यासारखं झालं. तिथे न थांबता ती ऑफिसबाहेर पडली. प्राजक्ताच्या झाडाखाली पोहचताच तिला मॅडम आठवल्या. फुलांना ओंजळीत घेत तिने ती नाकाजवळ धरली. डोळे बंद करून कितीतरी वेळ तो गंध श्वासांत उतरवून घेतला.

श्रेयशने आभाची माफी मागायचे ठरवले. क्लाइंटसोबत बोलून तो ही ऑफिसबाहेर पडला.

प्राजक्ताच्या झाडाखाली तिला पाहून जीव भांड्यात पडला. त्याक्षणी त्याला त्याची फुलराणी नव्याने सापडली. स्वतःला सावरता सावरता तो पुन्हा एकदा तिच्यात हरवू पाहत होता. 

क्रमशः

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all