तु असा जवळी रहा...(भाग 33 वा)

मैत्रीपासून प्रेमापर्यंतचा प्रवास अगदिच अनाकलनीय होता. पण आजही मी स्वतः ला दोष देते. श्रेयशच्?

# तु असा जवळी रहा..(भाग ३३ वा)

©® आर्या पाटील

आभा घरी पोहचली. मनात आठवणींनी नेहमी सारखाच कल्लोळ घातला होता.श्रेयशचा चेहरा आज नजरेसमोरून सरायला तयार नव्हता. शांत, संयमी आणि नेहमीच प्रसन्न असणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावर फक्त अनाकलनीय भाव होते. त्याला कधीच वाढदिवस साजरा करायला आवडायचं नाही पण आभा मात्र हट्टाने आणि हक्काने नेहमीच तो साजरा करायची. 

त्याच्यामते आईने आणि नंतर आभाने केलेल्या औक्षणातच सारं आलं. केक वेगैरे कापणे त्याला फारसे रुचायचे नाही पण आभासाठी तो सारं आवडीने करायचा. आभा म्हणजे उत्साहाचा खळखळता झरा होती.सणासारखा ती त्याचा वाढदिवस साजरा करायची.

आभाने त्याला नाकारल्यानंतर त्याने कोणताच वाढदिवस साजरा केला नव्हता.

' काही दिवसांत श्रेयश इथून निघून जाईल. आयुष्यात पुन्हा तो भेटेल की नाही माहित नाही. आज आईबाबा पण इथे आहेत मग त्यांचा आशीर्वाद त्याला मिळायलाच हवा. करावा का त्याचा वाढदिवस साजरा ? मंदारशी बोलावं का या बाबतीत ? काहीच कळत नाही.' पाण्याचा ग्लास तोंडाला लावत आभा स्वगत झाली.

तोच तिचा फोन वाजला. मंदारचं नाव पाहून तिची कळी खुलली.

" घरी पोहचलीस का ?" तो काळजीने म्हणाला.

" हम्म.." तिने होकार दिला.

" काय गं ? सगळं ठिक आहे ना ?" तिच्या मनातलं जाणत जणू तो म्हणाला.

" हो... हो सगळं ठिक आहे. ते आज.. जाऊ दे." बोलता बोलता मनाने पुन्हा निर्णय बदलला.

" काय गं काय झालं ? काय जाऊ दे ? काही झालय का ? मी घरी येऊ का ?" म्हणतांना त्याची चलबिचल झाली.

" मंदार, काहीच झालं नाही. तु आधी शांत हो." तिलाही त्याची चलबिचल कळाली असावी त्यामुळे समाजावीत ती म्हणाली.

" मग लवकर सांग काय सांगायचं होतं ते. तुला माझी शपथ." तो स्पष्टपणे म्हणाला.

" तु आधी शपथ मागे घे. हा काय बालिशपणा ?" ती रागात म्हणाली.

" मग तु पटकन सांग तरच मी शपथ मागे घेईन." तो ही त्याच्या शपथेवर अडला.

" काही विशेष नाही. आज तुझ्या मित्राचा श्रेयश सरांचा वाढदिवस आहे. मला ऑफिसमध्ये कळले. आईची अशी इच्छा होती की त्यांचा वाढदिवस साजरा करुया." ती दबक्या आवाजात म्हणाली. परत एकदा खोटेपणाचे ओझे मनावर लादून मोकळी झाली.

" अरे वा ! खूपच आनंदाची बातमी दिलीस तु. आई अगदी योग्य बोलल्या. तसेही ते लवकरच जाणार आहेत. त्याचंही आपलं असं कोणीही नाही. अश्या प्रसंगी घरच्यांची सगळ्यात जास्त आठवण येते. यावेळेस आपणच त्यांचे घरचे बनुया. इफ यू डोन्ट माईन्ड वाढदिवसाची तयारी करशील का ? मी केकचं बघतो." तो उत्साहाने म्हणाला.

" ठिक आहे करते मी तयारी. केक आणि काहीतरी गिफ्टही घेऊन ये.शर्ट बेस्ट होईल." ती जराही आढेवेढे न घेता म्हणाली.

त्याला थोडे आश्चर्य वाटले पण त्यापेक्षा आनंद मोठा होता.

" आभा, खूप बरं वाटलं की तु ही तयारी करणार आहेस. एरवी श्रेयशचं नाव घेतलं तरी तुला राग येतो पण आज.. थँक्स डियर ॲण्ड आय लव्ह यू.." तो लडिवाळपणे म्हणाला.

" आय लव्ह यू टू.." म्हणत तिने फोन ठेवला.

वाढदिवस साजरा करायचं निश्चित झालं खरं पण मंदारला सांगितलेलं खोटं कारण तिला आतून खात होतं.

ती तशीच आईजवळ पोहचली. घडलेला घटनाक्रम आईला सांगत ती त्यांच्या कुशीत शिरली.

" आई मी चुकले का ?" ती अगतिकतेने म्हणाली.

" तु खोटं बोललीस ते चांगल्या कामासाठी मग ते चुकीचं नाही. तुझा हेतू शुद्ध आहे हे महत्त्वाचे. श्रेयशची पुन्हा कधी गाठभेट घडेल की नाही माहित नाही पण आयुष्यात त्याला स्वतःला सावरायला हे क्षण निश्चितच मोलाचे ठरतील. हे सगळं करत असतांना तुझ्या आणि मंदारच्या नात्याला जप एवढाच सल्ला देईन. मंदाररावांनी तुझी ओंजळ सुखाने भरली आहे त्यांच्या वाट्याला तुझ्या भूतकाळाच्या आठवणी नको यायला. श्रेयशला ते खूप चांगला मित्र समजतात. ती मैत्री आणि तुझं श्रेयशसोबत असलेलं नातं पवित्रच राहिलं पाहिजे. प्रवाहासोबत वाहण्याचा मोह तुला होणार नाही याची शाश्वती आहेच पण आईचं काळीज आहे सारखी भीती वाटते." लेकीच्या डोक्यावरून हात फिरवीत त्या म्हणाल्या.

" भावनांच भलं मोठं द्वंद्व जिंकून प्रेमाच्या राज्यातून बाहेर पडली आहे. प्रेम गमावल्या नंतर जिवंत राहिन याची शाश्वती नव्हती. माझ्या प्रत्येक श्वासात श्रेयश होता. त्याच्याशिवाय जग अपूर्ण वाटायचं. लग्नानंतरही वर्ष दिडवर्ष मी अप्रत्यक्षपणे त्याच्यासोबतच जगत होते. रोज मरत होते. पण मंदारने या मरणातून मला सावरले. मी नव्हतं स्विकारलं त्याला. मी नव्हतं स्विकारलं त्याच्या प्रेमाला. पण त्याने मी त्याला स्विकारावं म्हणून कधीच प्रयत्न केले नाहीत. माझ्यावर शारीरिक आणि मानसिक जबरदस्ती केली नाही. त्याने मला जपलं. माझ्या घायाळ हृदयाला सावरलं. त्याच्या मायेच्या पंखाखाली जगण्याची दिशा दिली नव्हे नव्हे जगायला भाग पाडलं. माझा खूप चांगला मित्र झाला तो. श्रेयश मात्र तरीही सोबत होता आठवणींच्या रुपात. कधी कधी मला स्वतःचा राग यायचा. मी मंदारशी मैत्री करून चुकीचं वागते आहे. तो रागही मग मंदारवर काढायचे. त्याला ओरडायचे. माझ्याशी न बोलण्याची ताकिद द्यायचे पण तो मात्र तरीही मला सावरायचा. मग कशी नाकारणार होते त्याची मैत्री. मैत्रीपासून प्रेमापर्यंतचा प्रवास अगदिच अनाकलनीय होता. पण आजही मी स्वतः ला दोष देते. श्रेयशच्या प्रेमाची प्रतारणा करण्याचा दोष. तो जे वागला वा त्याच्या हातून जे घडलं ते चुकीचच होतं पण म्हणून मी जे वागले ते बरोबर होत नाही ना. मंदारच्या प्रेमाला नाकारून आणखी एका पापाचं भागीदार नव्हतं बनायचं मला. आजही श्रेयशचं प्रेम तेवढच शाश्वत आहे हृदयाच्या खोल कप्प्यात. ते कधीच नष्ट होणार नाही. पण त्याच कप्प्यात मंदारच्या प्रेमाला मात्र आदराचं स्थान दिलं आहे मनाने.ज्याचं पावित्र्य जपणे हे माझं कर्तव्य आहे. तु निश्चिंत रहा आई." ती अढळपणे म्हणाली.

" आभा, निदान श्रेयश त्याचं दुःख दाखवू तरी शकतो पण तुझ्या मनाला पोखरत असलेल्या दुःखाचं काय गं बाळा ?" आईच्या मायेने त्या म्हणाल्या.

" आता सवय झाली आहे या सगळ्याची. तु नको काळजी करूस." आईला समजावीत ती म्हणाली.

दोघी मायलेकी एकमेकींच्या दुःखाच्या शाश्वत साक्षीदार होत्या. आयुष्याने जे दुःख आपल्या वाट्याला दिलं आहे ते कोणत्याच आईच्या, प्रेयसीच्या आणि कोण्या प्रियकराच्या वाट्याला नको एवढीच काय ती मनोमन प्रार्थना करून दोघी तयारीला लागल्या.

खूप काही मोठं न करता आभाने अगदीच साध्या पद्धतीने वाढदिवसाची तयारी केली. तिच्या आईने श्रेयशच्या आवडीच्या जेवणाचा घाट घातला. श्रेयाला तिच्या फ्रेण्डच्या वाढदिवसाचं समजताच ती ही उत्साही बनली. संध्याकाळचे पाच वाजले असणार तोच पुन्हा मंदारचा फोन आला.

" आभा, महत्त्वाची मिटिंग आहे. निघायला उशीर होईल. केक आणि गिफ्ट आणायला जमेल का ?" तो निराशेने म्हणाला.

" डोण्ट वरी. तु ये मिटिंग आवरून. मी घेऊन येते केक आणि गिफ्ट." तिने तोडगा काढला.

" मी श्रेयशसोबत फोनवर बोलता बोलता त्याच्या आवडीच्या कलरविषयी आणि केकच्या फ्लेवरविषयी बोलून घेतो." तो म्हणाला.

" त्याची गरज नाही." ती आपसुकपणे बोलून गेली.

" म्हणजे..?" तो आश्चर्याने विचारता झाला.

" आयमिन केक श्रेयाच्या आवडीचा रसमलाई आणूया. आणि शर्ट जो कलर चांगला वाटेल तो आणते. तु विचारलस तर कदाचित ते या सगळ्या कार्यक्रमाला नकार देतील." ती अडखळत म्हणाली.

" ते ही खरं आहे. ठिक आहे तु बघ केकचं नि गिफ्टचं. मी वेळेत पोहचतो." म्हणत त्याने फोन ठेवला.

बाकी तयारी झाली होती. स्वयंपाकघरही आई सांभाळीत होती त्यामुळे ती मार्केटमध्ये गेली. यलो कलरचा शर्ट अगदी त्याला आवडतो त्याच पद्धतीचा घेत तिने गिफ्टचं प्रकरण आटोपलं.श्रेयशला केक फारसा आवडत नसे पण रसमलाई तो आवडीने खाई त्यामुळे रसमलाई केक घेऊन लागलीच ती घरी परतली. एव्हाना सात वाजत आले होते. थोड्याच वेळात मंदारही घरी आला.

आभा बेडरूममधे होती. 

" सो सॉरी आभा, मी काहीच मदत करू शकलो नाही " तिला गाठत तो अपराधीपणाने म्हणाला.

" डोण्ट वरी तुझ्या वाट्याचं काम बाकी आहे मंदार. आधी फ्रेश हो मग कॉल करून श्रेयश सरांना बोलावून घे. दॅट्स द रियल टास्क. नाहीतर सगळच..." ती बोलतच होती की त्याने तिला मधेच अडवलं.

" मिसेस कर्णिक, तुमचा नवरा हुशार आहे याबाबतीत. सेलिब्रेशनचं कळू न देता मी श्रेयशला जेवायला म्हणून घरी बोलावलं आहेच." पाठमोऱ्या वळलेल्या आभाला आपल्या मिठीत घेत तो म्हणाला.

" आणि ते तयार झाले ?" ती आश्चर्याने म्हणाली.

" मी माणूसच तसा आहे. मला कोणी नकार देऊ शकत नाही. तुला तर जास्त अनुभव आहे."लाडात येत तो म्हणाला.

" अच्छा. ?काय गं आई ..?" तिने असे म्हणताच तो पटकन तिच्यापासून बाजूला झाला.

तशी ती त्याला चिडवित हसू लागली.

" आभा, तु..? थांब बघतोच तुला." म्हणत तो तिला पकडणार तोच मॅडम पळतच रूमबाहेर पडली.

आज पहिल्यांदाच तिला असे उत्साही पाहिले होते त्याने.

' आभाला अशीच हसती खेळती राहू दे. तिच्या वाट्याचं सगळं दुःख मला दे बाप्पा पण तिला नेहमी आनंदी ठेव.' तो स्वगत होत म्हणाला आणि फ्रेश व्हायला निघून गेला.

आज सकाळी आभाने शुभेच्छांच्या रुपात दिलेली प्राजक्ताची फुले श्रेयशने आपल्यासोबत घरी आणली. फुले कोमेजली पण त्याचा दरवळ त्याच्या कोमेजलेल्या मनाला नवीन उभारी देऊन गेला. आज त्यालाही उत्साही वाटत होते. एरवी आभाच्या घरी जाण्यासाठी टाळाटाळ करणारा श्रेयश आज मात्र लगेच तयार झाला. लवकरच फ्रेश होऊन तो त्यांच्या घरी जाण्यासाठी बाहेर पडला.

सोबत श्रेयासाठी कॅडबरीज घ्यायला विसरला नाही.

इकडे मंदारकडे पोहचताच आश्चर्याने तो जाग्यावरच खिळला.

' ही तयारी नक्कीच आभाने केली असावी. तिच फक्त हे करू शकते.' तो मनात म्हणाला आणि आत आला.

" हैप्पी बर्थडे फ्रेण्ड.." म्हणत छोटी श्रेया त्याच्या जवळ आली.

" थँक यू सो मच माय प्रिन्सेस." म्हणत त्याने हातातल्या कॅडबरीज तिच्या पुढ्यात धरल्या.

तिने पुन्हा एकदा आभाकडे पाहिले. तशी त्याची नजरही तिच्याकडे वळली.

आभा गालात हसताच तिची खळी त्याच्या नजरेने बरोबर टिपली. तिने मानेने होकार देताच श्रेयाची कळीही खुलली.

तिच्या गालावरही तशीच सुंदर खळी सजली.

तिने त्याच्या हातातल्या सगळ्या कॅडबरीज घेतल्या.

" थँक यू फ्रेण्ड.." म्हणताच तो भानावर आला.

" वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा. खूप प्रगती कर." आभाची आई म्हणाली.

तात्काळ त्याने त्यांना आणि बाबांना नमस्कार केला.

" या सगळ्याची काय गरज होती मंदार ? तुम्ही सगळ्यांनी मला तुमच्या कुटुंबात सामावून घेतलं हेच माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे." तो विनम्रपणे म्हणाला.

" श्रेयश, आईंची इच्छा होती तुमचा वाढदिवस साजरा करण्याची." त्याच्या खांद्यावर हात ठेवत मंदार म्हणाला.

" आणि हे सगळं माझ्या आईने केलं." छोटी श्रेया निरागसपणे म्हणाली.

तशी श्रेयशची नजर आभावर खिळली. पण ती अजूनही त्याला पाहणं टाळीत होती.

" थँक यू आई. थँक यू मिसेस कर्णिक." तो आभार मानत म्हणाला.

" मी केक घेऊन येते." एवढच काय ते म्हणत ती आत निघून गेली.

समोर रसमलाई केक पाहून त्याला जुने दिवस आठवले. अनेक आठवणी डोळ्यांसमोर तरळल्या. त्याच्या आणि त्याच्या लाडक्या आभाच्या.

' श्रेयश तु चुकीचा विचार करतो आहेस. प्लिज निदान मंदारसमोर तरी त्याच्याच पत्नीच्या प्रेमाला नको आळवूस. पाप आहे हे.' श्रेयशने मनाला समजावले.

आभाही त्याच्यापासून, त्याच्या आठवणींपासून अलिप्त राहण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होती.

आभाच्या आईने त्याचे औक्षण केले.

" मी पण फ्रेण्डला ओवाळणार." म्हणत छोटी श्रेयाही पुढे आली.

आभा मात्र या औक्षणापासून अलिप्त राहिली. क्षणभर त्याच्या मनाला तिच्या हातून औक्षण करून घेण्याचा मोह आवरला नाही पण पुढच्याच क्षणी त्याने स्वतःला सावरले.

केक कापला आणि वाढदिवस साजरा झाला पण या सगळ्याची तयारी करणारी आभा आपणहून या सगळ्यापासून दूर राहिली.

जेवणं आटोपल्यावर सगळे शतपावलीसाठी बाहेर पडले. आभाने किचन आवरायचं कारण देत तिथेही जायचं टाळलं.

श्रेयशला जास्त काही अपेक्षा नव्हती तिच्याकडून पण तिने औक्षण करावे ही वेडी इच्छा मात्र होती.

तिच्या ही मनात क्षणभर औक्षणाचा विचार आला पण मनाला आवर घालत तिने तसे करण्याचे टाळले.

" मंदार, एक छोटीसी रिक्वेस्ट होती. हवं तर वाढदिवसाचं गिफ्ट मागतो असं समजा." बाहेर बसलेला श्रेयश विनंती करीत म्हणाला.

" बोला. शक्य असेल तर मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो." मंदार आपुलकीने म्हणाला.

" नव्या कंपनीत सत्यनारायणाची पूजा ठेवायचा विचार होता. म्हणजे तशी माझ्या आईची इच्छा होती. मला वाटतं तुम्ही सपत्नीक या पुजेला बसावं. प्लिज नाही म्हणू नका." तो हात जोडत म्हणाला.

त्याच्या या विनंतीने मंदार उठून उभा राहिला.

" आहो हे काय बोलता श्रेयश ? ही कंपनी तुमची मग पुजेलाही तुम्हीच बसावं. तुमच्या कष्टाचं चीज झालय कंपनीच्या रुपात मग त्याचं फळ परक्याच्या झोळीत का टाकता ?" श्रेयशचे जोडलेले हात पकडत मंदार म्हणाला.

" सत्यनारायणाच्या पुजेला सपत्नीक बसावं. आणि तुम्ही परके आहात का ? माझ्यासारख्या एकाकी माणसाला स्वतःच्या कुटुंबात सामावून घेतलं आणि क्षणात परकं केलं." तो कष्टाने म्हणाला.

" मला तसं नव्हतं म्हणायचं ?" त्याला सावरत मंदारने उत्तर दिले.

" मग ठरलं पुजेला तुम्हीच बसणार. मिसेस कर्णिकांचाही हातभार आहेच या कंपनीच्या उभारणीत. मग तुम्ही दोघं बसले तर काय वावगं ठरेल ? आईबाबा प्लिज तुम्हीच समजून सांगा. आईची तशी इच्छा होती. माझ्या हातून नाही निदान..." बोलता बोलता तो शांत झाला.

आभाच्या आईने त्याला सावरलं.

" मंदार तुम्ही दोघांनी बसावं पुजेला असं मलाही वाटतं." आभाच्या आईनेही होकार भरला.

" पण आई आभाला नाही आवडणार. ती नाही तयार होणार." तो स्पष्टपणे म्हणाला.

" मी बोलेन तिच्यासोबत. फक्त तुम्ही तयार व्हा." आईनेही मार्ग सुचवला.

" आभा तयार असल्यास मलाही प्रॉब्लेम नाही. श्रेयश, तरीही तुम्ही एकदा फेरविचार नक्की करा." तो पुन्हा एकदा त्याला विनंती करीत म्हणाला.

" आता कसलाच विचार नको. मी उद्याच भटजींसोबत बोलून मुहूर्त बघून तयारीला लागतो." तो उत्साहाने म्हणाला.

आभाच्या निर्णयाचा मनात अंदाज बांधत मंदारच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.

क्रमशः

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all