तु असा जवळी रहा...( भाग ३१ वा)

अमित गाडीसमोर कुठून आला ? कसा आला ? कळलच नाही. किंबहूना जेव्हा गाडीतून बाहेर उतरलो तेव्हा कळलं क??

तु असा जवळी रहा...( भाग ३१ वा)

©® आर्या पाटील

आज एवढ्या वर्षांनी श्रेयश सोबत बोलून आभालाही मोकळं वाटलं. सरपोतदार मॅडमची इच्छा पूर्ण करता आली याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. त्यांनी केलेली मायेची मशागत आज त्या बागेच्या रुपात बहरली होती.श्रेयशच्या केबीनमधून निघत आभा प्राजक्ताच्या झाडाखाली पोहचली.थंडगार वारा चेहऱ्याला स्पर्शून जाताच तिला आत्मिक समाधानाची जाणिव झाली. वाऱ्याच्या हलक्या धक्काने झालेल्या प्राजक्ताच्या फुलांच्या वर्षावात ती न्हाहून निघाली. ती फुलं त्यावेळेस मॅडमचा आशीर्वाद वाटली तिला. त्यांना ओंजळीत घेऊन तिने नाकाजवळ धरली. प्राजक्ताच्या मंद सुगंधाने मन तृप्त झालं. तिने उचललेलं हे पाऊल श्रेयशच्या आयुष्याला नवी उभारी देणार होतं. अपराधीपणाच्या अग्नीत जळत असलेल्या त्याला शीतलता देणार होतं.जरी आयुष्यभरासाठी त्याची सोबत तिने नाकारली होती तरी प्रेमाचा ओलावा अजून तसाच जिवंत होता मनाच्या गाभाऱ्यात म्हणूनच त्याची ही अशी दयनीय अवस्था नसेल पाहवली तिला. अमितचं दुःख ती कधीच विसरू शकत नव्हती पण तिला श्रेयशच्या दुःखाचेही कारण बनायचे नव्हते.मंदारने प्रेमापलिकडे जाऊन तिची आयुष्य ओंजळ सुखाने भरली होती. किंबहूना त्याच्या प्रेमामुळेच ती स्वतःला सावरू शकली होती. तिच्यासाठीही सोपं नव्हतं श्रेयशला आयुष्यातून उणं करणं. क्रित्येक रात्री पुरावा होत्या तिच्या दुःखाच्या. लग्नानंतरही विरहाची वेदना तिला अंर्तबाह्य छळीत होती.मंदारला मनापासून स्विकारायला तिलाही कठिण जात होते. मंदारने मात्र तिच्यावर कधीच हक्क गाजवला नाही. तिला हवा तेवढा वेळ देत मैत्रीने त्यांच्या नात्याची सुरवात केली.त्याचा समजूतदारपणा श्रेष्ठ ठरला. त्याचं प्रेम तिला हळवं करून गेलं. आपल्या भूतकाळाला मागे सोडत तिने त्याच्या प्रेमाचा आदर केला.जवळजवळ वर्षभराने खऱ्या अर्थाने त्यांनी पती पत्नी म्हणून आपल्या संसाराला सुरवात केली.संसाराच्या या प्रवासात श्रेयशच्या प्रेमाशी तिने केलेली प्रतारणा शल्य म्हणून बोचत राहिली. आज मात्र त्या प्रेमाप्रती सकारात्मकता दाखवत तिने स्वतःला सावरण्याचा छोटासा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न तिच्या आत्मिक सुखाचं कारण बनला. 

श्रेयशला आज त्याची आभा नव्याने भेटली.त्याला समजून घेणाऱ्या त्याच्या जुन्या मैत्रीणीच्या रुपात. तिने हक्काने त्याच्या आईच्या इच्छेचा केलेला आदर त्याला हळवं करून गेला. तो पुन्हा रमला तिच्यात.त्याच्या काळजाच्या तुकड्यात. तिच्याशिवाय अशक्य असलेलं जगणं तो केवळ आईच्या शपथेखातर जगला होता पण आज तिच्या आपुलकीच्या शब्दांनी जगण्याचं सोनं झाल्याचं समाधान मनाला लाभलं होतं. अजूनही तेवढच प्रेम होतं त्याचं तिच्यावर.आभाळाएवढं व्यापलेलं, सागरासारखं विस्तारलेलं. ती केबीन बाहेर पडली तरी तिची छबी अजूनही त्याच्या डोळ्यांत जिवंत होती. तिने हक्काने त्याच्या नजरेला दिलेली नजर त्याला जगण्याची उर्मी देऊन गेली. श्रेयशने खिडकीचे पडदे सरकवले तशी नजर प्राजक्ताच्या दिशेने वळली. तिथे आभाला पाहून मनात प्रेमाचा सुगंध दरवळला. तिला आज डोळे भरून पाहतांना अपराधीपणाची भावना मागे पडली. तिच्या गालावर पडलेली खळी त्याचा चेहरा खुलवून गेली. नदीकिनारी त्याला भेटणाऱ्या त्याच्या आभाची आठवण झाली.

' माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आभा.' नकळत ओठांवर शब्दांनी हुकूमत गाजवली. 

तोच 'नाही श्रेयश चुकतो आहेस तु. तुझं प्रेम दुसऱ्या कुणाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. त्याला आपलं म्हणण्याची चूक करू नकोस. परत एकदा अपराधी बनू नकोस.' अंर्तमनाने साद घातली.

तसं त्याने स्वतःला सावरले. मनाला पुन्हा भावनांची भरती आली. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. एका क्षणी वाटलं असच धावत जावं आणि तिला उराशी कवटाळावं. तिच्या कुशीत शिरून ओक्साबोक्सी रडावं. तिच्या मायेच्या स्पर्शात न्हाहून निघावं. जगाचं बंधन विसरून तिच्यात सामावून जावं. पण दुसऱ्या क्षणी त्याला स्वतःचा राग आला. कोणत्या हक्काने तिच्या मायेची आस धरावी हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. त्याने तात्काळ स्वतःला सावरले आणि खिडकीचे पडदे पुन्हा बंद केले पण मनाचं काय त्यावर कोणते पडदे लावणार होता तो ?

            ऑफिस सुटल्यानंतर मंदार नेहमीप्रमाणे आभाला घ्यायला पोहचला.आभाही त्याची वाट पाहत बाहेर येऊन थांबली होती. तिच्या चेहऱ्यावरील समाधानाचा रंग मंदारच्या डोळ्यांतून सुटला नाही. तिचं खुललेलं रुप पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकलं. तिच्या आनंदात आनंदी होणारा आनंदयात्री होता तो. दरवाजा उघडून आभा त्याच्या शेजारी येऊन बसली.

" आभा आय लव्ह यू.." गाडी सुरु करीत मंदार म्हणाला.

" मंदार, ठिक आहेस ना ? असं अचानक आय लव्ह यू वैगेरे." ती त्याच्या डोक्याला हात लावीत म्हणाली.

तसा त्याने तिचा हात पकडला. आपले ओठ तिच्या हातावर टेकवित नजरेने पुन्हा प्रेम व्यक्त केले.

" मंदार, गाडी चालव व्यवस्थित." त्याच्या हातातून आपला हात सोडवित ती म्हणाली.

" आज तुला असं आनंदी पाहून खूप छान वाटतय. काय झालं गं ? म्हणजे तुझ्या आनंदाचं कारण कळलं तर आणखी आनंदी आनंद." तो हसत म्हणाला.

" तु जवळ असल्यावर आणखी वेगळं कारण हवं का माझ्या आनंदाला ?" ती प्रेमाने म्हणाली.

" तुला तुझ्यापेक्षाशी जास्त मी ओळखतो. कारण सांगणं न सांगणं हे तु ठरव. तु आनंदी आहेस माझ्यासाठी यातच सारं आलं. रोज अशीच आनंदात रहा." म्हणतांना त्याने पुन्हा एकदा तिला नजरेत साठवले.

त्याच्या आपल्याप्रती असलेल्या भावना जपत तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं.

" माझ्या जगण्याचं कारण आहेस तु. माझ्या आनंदाचं गमक. तुझ्यापासून काय लपवू ? आज या ऑफिसमधला गार्डनिंगचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला.मनाजोगे काम झाले म्हणून कार्यपूर्तीचा आनंद जाणवत असेल चेहऱ्यावर." ती म्हणाली.

" अच्छा, तर हे कारण आहे.तुझं कामाप्रती असलेलं डेडिकेशन हेच तुझ्या यशाचं खरं कारण. अशीच प्रगती करीत रहा. गॉड ब्लेस यू डियर." म्हणत त्याने तिच्या डोक्यावर ओठ टेकवले.

'कार्यपूर्तीचाच आनंद आहे हा मंदार. मॅडमची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान उघडपणे तुझ्यासोबत शेयर करता आले असते तर किती बरे झाले असते.' ती स्वगत होत म्हणाली.

आज तिच्या आनंदाला आलेलं उधाण त्याच्या सहवासात आणखी बहरलं. इकडे घरी श्रेयाही खूप खूश होती. पूर्ण दिवस आजीआजोबां सोबत घालवता आला म्हणून तिलाही भारी वाटत होतं. दिवसभराच्या कालावधीत आभाच्या आईने मात्र श्रेयाकडून श्रेयशविषयी बरीच माहिती गोळा केली.त्याला भेटण्याची त्यांची इच्छा अनावर होत होती. रात्री स्वयंपाक करतांना त्यांनी आभासमोर आपली इच्छा व्यक्त केली.

" आभा, आज श्रेयशला डब्बा घेऊन मी जाते." त्या हळू आवाजात म्हणाल्या.

" आई, मला वाटतय तु त्याला भेटू नये. दोघांनाही त्रास होईल." श्रेयशची आईला न भेटण्याची विनंती आठवून आभा म्हणाली.

" नाही गं. याउलट दोघांनाही बरं वाटेल. माझा अमित .." बोलता बोलता त्यांना गहिवरून आले.

" आई, तुझं असच होईल तिथे गेल्यावर. तुला सांभाळायला मी नसेन तिथे म्हणूनच सांगते नको जाऊस." आईला शांत करीत तिने समजावले.

" माझं लेकरू तर असेल ना. तो नाही मला खचू देणार. मला जाऊ दे." त्यांनी पुन्हा विनंती केली.

आईच्या मायेपुढे आभाने हात टेकले. लवकरच डब्बा तयार करून आभाची आई तो घेऊन श्रेयशकडे निघाली.

" मंदाररावांना काही चुकीचं वाटणार नाही ना ?" दारापाशी अडखळत त्या म्हणाल्या.

" अजिबात नाही आई. उलट तुमच्या या निर्णयामुळे मी खूप खुश आहे. श्रेयशना खूप बरं वाटेल तुम्हांला भेटून. मी येतो घरापर्यंत सोडायला." मागून येत मंदारने त्यांना प्रोत्साहन दिले.

आभाच्या आईने होकारार्थी मान हलवली. श्रेयशची गाडी बंगल्याबाहेर उभी होती. वॉचमनकडूनही तो घरात असल्याचे कळले फक्त चिंता एवढीच होती की बेल वाजवल्यानंतर त्याने दरवाजा उघडावा.

मंदारने बेलचे बटण दाबले. अगदी काही मिनिटांतच त्याने दरवाजा उघडला. समोर आभाच्या आईला पाहून मात्र अगतिक झाला. नकळत डोळे अश्रूंनी डबडबले. क्षणभर वाटले तिथेच त्यांच्या पायावर डोकं ठेवून आपल्या अपराधाची माफी मागावी पण मंदारचं भान ठेवून त्याने स्वतःला सावरले.

" श्रेयश, या श्रेयाच्या आजी. तुम्हांला भेटायचं म्हणत होत्या." मंदार ओळख करून देत म्हणाला.

श्रेयश मात्र अश्रूने भरलेल्या नजरेत माऊलीला साठवित होता.

" श्रेयश, आम्ही आत येऊ का ?" मंदारने पुन्हा प्रश्न केला.

तसा तो भानावर आला.

" हो या ना." स्वतःला सावरत म्हणाला.

" आई, तुम्ही व्हा पुढे.मला खूप महत्त्वाचं काम आठवलं आहे. मी आलो लगेच. श्रेयश इफ यू डोन्ट माईन्ड देन....." फोन काढीत मंदारने पळवाट शोधली.

" काहीतरीच काय मंदार. त्या मलाही आईसारख्याच आहेत." तो हळवा होत म्हणाला.

" थँक यू." म्हणत मंदार तात्काळ तेथून निघून गेला.

आभाची आई घरात शिरताच श्रेयशचं उरलं सुरलं अवसानही गळून पडलं. त्यांच्या पायावर डोकं ठेवून तो रडू लागला.

" आई, मी अपराधी आहे तुमचा.माझ्याहातून पाप घडलं आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे." तो रडत रडतच म्हणाला.

" श्रेयश, बाळा शांत हो आधी." म्हणत त्यांनी त्याला पायावरून उठवले.

त्याच्या डोळ्यांतील पाणी मात्र अजूनही थांबत नव्हते. त्यांचा हात पकडून तो पुन्हा एकदा माफीची याचना करू लागला.

" एका आईपासून तिचं लेकरू हिरावून घेण्याचं पाप केलय मी.मला नरकातही..." तो बोलतच होता की त्यांनी त्याला शांत केले.

" श्रेयश, मी आईपण जगले तुझंही. मला खात्री आहे तुझ्या हातून जे घडलं तो एक अपघात होता. फक्त अपघात. तु जाणिवपूर्वक काहिच केलं नाहीस. कोणी काहीही म्हणो पण माझा माझ्या लेकावर पूर्ण विश्वास आहे.आपला अमित गेला हे दुःख कधीच भरून येणार नाही. या दुःखात तुझं आयुष्यही उद्धवस्त झालं. ज्या गावाच्या उद्धारासाठी मॅडम आणि सरांनी आयुष्य वेचले. त्याच गावाकडून त्यांची मानहाणी झाली. सर आणि मॅडमच्या मृत्यूला आम्हीही तेवढेच कारणीभूत आहोत. मी लेकरू गमावलं तर तुही मायबाप गमावलेस पोरा. तुझ्या माझ्या दुःखाची व्याप्ती तेवढीच खोल आहे.." बोलता बोलता त्या हळव्या झाल्या.

तसा श्रेयश त्या माऊलीच्या कुशीत शिरला आणि ओक्साबोक्सी रडू लागला.

" आई, मी कोणतं मोठं पाप केलं होतं की त्याची ही अशी शिक्षा मिळाली मला. आपलं हसतं खेळतं घरकूल क्षणात बेचिराख झालं. सुखाचा हिंदोळा घेणाऱ्या आपल्या आयुष्याचा झुला एकाएकी तुटला आणि सारच संपलं. चार दिवसांवर लग्न होतं आमचं पण नियतीने साऱ्या स्वप्नांवर घाव घातला.अमित गाडीसमोर कुठून आला ? कसा आला ? कळलच नाही. किंबहूना जेव्हा गाडीतून बाहेर उतरलो तेव्हा कळलं की आपल्या गाडीने अमितचा अपघात झाला आहे. त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहून शरीर कंप पावू लागलं. थरथरत्या हातांनी उचलून त्याला गाडीत ठेवतांना त्याच्याशी शेवटची नजरानजर झाली. आजही त्याची ती नजर मला झोपू देत नाही. माझाही भाऊ होता तो." तो रडत रडत म्हणत होता.

त्याचा प्रत्येक शब्द त्या माऊलीच्या काळजाला हात घालता झाला.

" माझा अमित काही म्हणाला का शेवटचा ?" बोलतांना त्यांचा स्वर जड झाला.

आता मात्र श्रेयशचं उरलं सुरलं अवसानही गळून पडलं.

" नाही आई. माझ्यामुळे त्याला शेवटचं बोलताही आलं नाही. त्याची नजर मात्र खूप काही बोलून गेली. मी अपराधी आहे तुझा आई मला शिक्षा मिळालीच पाहिजे." म्हणत त्याने त्यांचा हात हातात घेऊन आपल्या चेहऱ्यावर उगारायला सुरवात केली.

तश्या त्या सावध झाल्या.

" श्रेयश, मला आई म्हणतोस ना मग माझं एवढंही ऐकणार नाहीस ? माझा अमित तुझ्यात दिसतो मला. त्याची शेवटची नजर सामावली आहे तुझ्या नजरेत." म्हणत त्यांनी त्याचे डोळे टिपले. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवीत द्रिष्ट काढली.

तो मात्र पुन्हा भावनिक झाला. त्यांना सोफ्यावर बसवीत त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून तो पुन्हा गहिवरला.

" आई, देवाने माझ्या दुष्कर्माची शिक्षा माझ्या आईबाबांना दिली. माझ्या जगण्याचा एकमेव उद्देश होते ते. मरणालाही जवळ करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या पापाची शिक्षा भोगल्याखेरीज मरणही जवळ करेना. रोजच मरणयातना भोगतोय मी..." तो गहिवरून म्हणाला.

" बस बाळा. खूप शिक्षा भोगलीस तु. अपघाताला अपराध मानून आयुष्याभराचं दुःख भोगलस. आभा म्हणजे तुझं जगणं होती. तिच्याशिवाय तु कसा जगला असशील याची कल्पनाही करवत नाही. तिनेही आमच्या जबरदस्तीमुळे संसाराचा मार्ग निवडला नाहीतर ती तरी कुठे जगत होती तुझ्याशिवाय. तुझ्याशी साताजन्माचं नातं नाकारून तिने फक्त तुला शिक्षा दिली नव्हती तर स्वतःसाठीही मरणयातना मागून घेतल्या होत्या. मंदारराव तिच्या आयुष्यात संजिवनी बनून आले आणि तिचं आयुष्य सावरलं. पण तु मात्र तिथेच थांबलास. अगदी तसाच. त्या दिवशी तिने नकार दिल्यानंतर अगतिक झालेला तु अजूनही जसाच्या तसा आठवतो आहेस. तेव्हाही तिच्या मताचा आदर करून तू तिच्या आयुष्यातून कायमचा निघून गेलास. तेव्हाही नियतीने तुझ्या सहनशक्तीचा अंत बघितला आणि आताही... जिच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं तिचा संसार परक्याच्या अंगणात बहरतांना पाहणं कठिण असतं. तु रोजच हे दुखणं जगतो आहेस. माझ्या लेकराला किती यातना होत असतील याची कल्पनाही करवत नाही.." म्हणत त्यांनी भरल्या नजरेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

" आई, आभाच्या संसाराला पाहून काळीज रडतं पण दुसऱ्या क्षणी तिला आनंदात पाहून समाधानीही होतं. मंदार खूप काळजी घेतात तिची. माझ्यापेक्षाही जास्त. तिच्या नशिबात हे जास्तीचं सुख होतं म्हणून कदाचित ती माझी झाली नसेल. मी स्विकारलं आहे सत्य. प्रेम म्हणजे फक्त मिळवणे नव्हे ना ? मी तिच्यासोबत जगलो आहे त्या आठवणी पुरेश्या आहेत मला जिवंत रहायला. फक्त तिने मला माफ करावं एवढच वाटतं. त्या माफीचा हक्कदार मी नाही पण तरीही मरण जवळ करतांना या अपराधाचं ओझं तिच्या माफीने रितं व्हावं एवढीच इच्छा.." तो निरवानिरवीच्या शब्दांत म्हणाला.

" खबरदार श्रेयश यापुढे मरणाची भाषा बोललीस तर. एका मुलाला गमावलं आहे दुसऱ्याला नाही गमावायचं. आभा आणि अमित नंतर तुझी आई झाले आणि आज त्याच नात्याने तुझं आईपण स्विकारायचं आहे. आम्हांला काही झालं असतं तर सर आणि मॅडमने आभाला आमची उणीव जाणवू दिली असती का ? नाही ना.." त्याची समजूत काढीत त्या म्हणाल्या.

"हे सगळं बदलता आलं असतं तर ? आपलं आयुष्य पूर्वीसारखं करता आलं असतं तर ?" तो हळवा होत म्हणाला.

" ते जरी अशक्य असलं तरी तुला बदलावं लागेल. फार सहन केलास कोंडमारा आता जगावं लागेल. मनावरील मळभ बाजूला सारून जगण्याची नवी सुरवात करावीस एवढीच या आईची इच्छा." त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत त्या म्हणाल्या.

" आई ते नाही शक्य होणार माझ्याने. माझी नदी केव्हाच मला सोडून दूर गेली आहे. साचलेलं डबकं कधीच प्रवाही होत नाही." त्यांच्या मांडीवरून डोकं उचलत तो आश्वासकपणे म्हणाला.

" सकारात्मकतेचा पाऊस त्या डबक्यालाही प्रवाही बनवतं." त्यांनी पुन्हा त्याची समजूत काढली.

" पण आभाशिवाय..." तो बोलतच होता की नजर दरवाज्याकडे गेली. दारातून मंदार आत आला.

" आभाशिवाय काय ?" मंदार प्रश्नार्थक नजरेने विचारता झाला.

क्रमश:

©® आर्या पाटील

        

🎭 Series Post

View all