तु असा जवळी रहा...( भाग २५ वा)

Story having shades of purity feelings emotions care responsibility and destiny

# तु असा जवळी रहा..( भाग २५ वा)

©® आर्या पाटील

आज क्रित्येक वर्षांनी मनाला लागलेली आपलेपणाची भूक भागली होती श्रेयशची. मंदार सारखा मित्र मिळाला आणि जगण्याचा नवा मार्ग सापडला. श्रेयाही त्याच्या रंगहीन जीवनात सुखाचे सप्तरंग उधळीत होती. घासागणिक श्रेयाच्या निरागस मनाचा गोडवा त्याच्या हृदयात उतरत होता. आपलं कुटुंबही असच असतं या नुसत्या जाणिवेने मनाला समाधान मिळत होतं. त्या दोघांचा चाललेला भावनिक सोहळा मंदारही कौतुकाने पाहत होता.

आज श्रेयशला त्याच्या आवडीच्या भेंडीच्या भाजीपेक्षा श्रेया आणि मंदारने दाखविलेला आपलेपणा अधिक भावला होता.

आभा पुन्हा मनात डोकावू पाहत होती पण त्याने तिचा विचार प्रकर्षणाने टाळला.तिच्या सुखात आपली द्रुष्ट भावना नको एवढीच प्रामाणिक इच्छा.

मंदारने श्रेयशला त्याच्या दुःखातून दूर काढण्याचा पक्का निर्धार केला. इच्छा एवढीच होती की त्याच्या मनातील सल कळावी. पण ती सल त्याच्या आयुष्यात वादळ घेऊन येणार होती याची पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती. माणुसकी जपणारा सच्चा मित्र बनून त्याला श्रेयशला सावरायचे होते.आयुष्याची लढाई तो ही लढला होता फक्त ढाल बनून आभा त्याच्या सोबत होती हीच जमेची बाजू. त्यामुळे त्याच्याबाबतीत दुःखाच्या जाणिवा तीव्र होत्या. कोणालाही विशेषतः आपल्या जवळच्या माणसांना दुःखात पाहणे त्याला कठिण होई. श्रेयशही आता त्याच आपल्या माणसांच्या यादीत समाविष्ट झाला होता.

श्रेयशला डब्बा देऊन काही वेळातच ते घरी परतले.

" आई, आता माझा फ्रेण्ड बाबाचाही फ्रेण्ड बनला आहे. आपण त्याला दुपारी जेवायला बोलावू या का ? बिच्चारा एकटाच राहतो." आभाच्या गळ्यात पडत श्रेया म्हणाली.

" आभा, आज पहिल्यांदा श्रेयशना मी आनंदात पाहिले. श्रेयाने तर त्यांना हाताने भरवले." मंदारनेही श्रेयाच्या म्हणण्यात होकार भरला.

क्षणभर श्रेयशचा हसरा चेहरा आभाच्याही डोळ्यांसमोर तरळला.

" आपण बोलावू त्यांना जेवायला. आपल्या माणसांत बरं वाटेल." तो अगदिच मोकळेपणाने बोलून गेला.

मंदारचा 'आपल्या माणसांत' हा शब्द काळजाला भिडला फक्त होकारार्थी मान हलवित ती उठली आणि बेडरूममध्ये आली.

विचार तरी किती करणार त्याचीही परिसीमा झाली होती. श्रेयशभोवती एकवटलेलं वलय अमितच्या जाण्याने तेव्हाच अंर्तधान पावलं होतं. पण मागे राहिलेला संधिप्रकाश आज पुन्हा प्रखर होत होता. आभाला मात्र हा प्रकाश आपल्या संसारावर नव्हता पडू द्यायचा तर दुसऱ्या बाजूला श्रेयशच्या आयुष्याला लागलेलं एकाकीपणाचं ग्रहणही तिला अगतिक करीत होतं. सरतेशेवटी मंदारला आणि श्रेयाला श्रेयशपासून तोडायचे नाही हा निर्णय घेऊन ती रूमबाहेर पडली. मंदारने फोन करून श्रेयशला जेवायला येण्याची विनंती केली.प्रथमतः त्याने ती विनंती जाणीवपूर्वक नाकारली पण छोट्या श्रेयाचा हट्ट मोडवेना.शेवटी तो येण्यासाठी तयार झाला. मंदारने आभाची मदत केली. सोबत बकुळा मावशीही होतीच. श्रेयशची आवड माहित असल्याने तिने त्याच्या आवडीचा स्वयंपाक केला. जेवणासाठी घरी आलेला श्रेयश तिला पाहणे प्रकर्षणाने टाळित होता. खरं प्रेम फक्त ती व्यक्ती मिळविण्यात नसतं तर तिचं सुख जपण्यात असतं हिच काय ती त्याची प्रेमाची परिभाषा. आभालाही मनाला त्या गावाला पाठवायचे नव्हते. जातांना ते जरी खुश असले तरी येतांना त्यातून बाहेर निघता येत नव्हते. पण पुन्हा मनाने खच खाल्ली. सरपोतदार मॅडमची आठवण येताच तिने श्रेयशकडे पाहिले.आरक्त चेहरा त्याच्या हृदयाची अवस्था सांगत होता. खूप वाईट वाटलं तिला त्याला असं सुखापासून अलिप्त झालेलं पाहून. पण क्षणभरच लगेच तिने आपल्या अगतिक मनावर कठोरतेचा शेला पांघरुण घेतला. अमितच्या मृत्युने आंदण मिळालेला शेला.

" श्रेयश, तुम्ही लग्नाचं घ्या मनावर." जेवणं झाल्यावर गप्पा करीत मंदारने विषयाला हात घातला.

मंदारच्या अश्या अनपेक्षित वाक्याने श्रेयश गोंधळला.

फक्त स्मितहास्य करीत त्याने प्रतिउत्तर दिले. तात्काळ तो हरवला.सुखी संसाराचं स्वप्न डोळ्यासमोर तरळू लागलं. आई बाबा, गावाकडचं तेच घर सारं दिसलं त्याला मनचक्षूत. तोच नजर त्या घराला जोडून ठेवणाऱ्या दुव्यावर पडली. हो आभाच होती ती. चौघेही सहवासाचा आनंदी रंग लुटत होते. घरात हसण्या खिदळण्याचा आवाज निनादत होता. सुख जणू पाणी भरत होतं त्या नंदनवनात.

" श्रेयश, पाणी घ्या.." मंदारच्या या वाक्याने तो स्वप्नांतून बाहेर आला. समोर आभा पाण्याचा ग्लास घेऊन उभी होती. नजर तिच्यावर पडताच पुन्हा एकदा भावनांनी कोलाहल माजवला. नजरेत आपसुकच पाणी दाटलं.

" पाणी घ्या.." तिच्या खंबीर आवाजाने मात्र तो भानावर आला.भावनांना एक एक पत्ता नियतीच्या वाऱ्याने उडवून दिला आणि प्रेमाने जपलेला स्वप्नांचा बंगला क्षणात जमिनदोस्त झाला.

' तिला दिला तेवढा त्रास पुरे झाला आता नाही. मला सावरायला हवं स्वतःला.' स्वगत होत त्याने पाण्याचा ग्लास घेऊन तोंडाला लावला.

रिकामा ग्लास घेऊन आभा आत निघून गेली. त्याच्या तब्येतीची चौकशी करावी असे मनात होते पण तिने ते ओठांवर येऊ दिले नाही.

मंदार आणि श्रेयाचा निरोप घेऊन श्रेयश घरी परतला.

आभाचा विचार मात्र मनाला स्वस्थ बसू देत नव्हता. ती सारखी सारखी नजरेसमोर तरळत होती. रात्री मात्र त्याने जेवणासाठी त्यांच्याकडे जाणे टाळले. मंदारने आठवणीने डब्बा पोहचवला.

दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने रोजचं रुटीन सुरू होणार होतं. आभालाही ऑफिसला जाणे गरजेचे होते. श्रेयाला घेऊन जाण्याशिवाय पर्यायही नव्हता. सकाळी नेहमीप्रमाणे मंदार ऑफिसला निघून गेला. सोबत श्रेयालाही स्कूलमध्ये सोडले. तेवढ्या वेळात आभाने घरातली कामे उरकून घेतली. तिला घेऊन ऑफिसमध्ये जायचे म्हणून दुपारचा जेवणाचा डब्बाही सोबत घेतला. श्रेयशसाठीही वेगळा डब्बा भरला.

आवरून घर बंद करून ती निघाली. संध्याकाळी घ्यायला मंदार येत असल्याने गाडी न घेता रिक्षाने श्रेयाच्या शाळेत पोहचली.

पुन्हा ऑफिसमध्ये जायला मिळणार म्हणून श्रेया कमालीची खुश झाली. तिला घेऊन शाळेतून थेट ऑफिस गाठलं.

श्रेयाला मिस पल्लवीकडे सोडत तिने गार्डन एरिया गाठला. गार्डनचं काम बऱ्‍यापैकी झालं होतं. काही महत्त्वाच्या सूचना देत तिने कामाचा आढावा घेतला.

इकडे श्रेया मात्र आत बसून कंटाळली.

" मिस पल्लवी, मी माझ्या फ्रेण्डला भेटून येऊ का ?" कंटाळलेली श्रेया म्हणाली.

पल्लवी आणि श्रेयाची चांगलीच ओळख झाली होती. याआधीही राऊत सर असतांना श्रेया अगदीच मोकळेपणाने वावरायची ऑफिसमध्ये. त्यानंतर जेव्हा श्रेयशने ऑफिस सांभाळायची जबाबदारी घेतली आभाने जाणीवपूर्वक श्रेयाला त्याच्यापासून लांब ठेवलं आणि त्याचीच परिणीती त्या दिवशीच्या प्रसंगात आली. आज मात्र खबरदारी म्हणून तिने श्रेयाला तिथेच थांबवले होते.

इकडे कंटाळलेल्या श्रेयाला पल्लवीने होकार दिला. ऑफिस न्याहाळत छोटी श्रेया श्रेयशच्या केबीनजवळ येऊन पोहचली. आतापर्यंत राऊत सरांच्या केबीनमध्ये ती नेहमीच गेली होती पण श्रेयश त्यावेळेस तिथे नसल्याने त्याच्यासोबत वेळ घालवायचा योग कधीच आला नव्हता. काचेतून श्रेयशला आत बसलेलं पाहून ती खुश झाली.

क्षणाचा अवधी की त्याचीही नजर तिच्यावर स्थिरावली. हातातील काम टाकून तो तसाच बाहेर आला.

" ओहो आमची छोटी मैत्रिण आली आहे तर. ये आत. तुझ्या फ्रेण्डची केबीन नाही पाहणार ?" तो तिच्या जवळ जात म्हणाला.

" नको पण मी आईची परमिशन नाही घेतली. ती रागावेल." श्रेया हळू आवाजात म्हणाली.

" मी समजावेन मिसेस कर्णिकना. तु आत ये." म्हणत त्याने तिला आत बोलावले.

दबक्या पावलांनी श्रेयाही आत आली.

" वॉव ! तुझी केबीन कसली भारी आहे." रुम न्याहाळीत ती म्हणाली.

" आवडली ना तुला ?" पुन्हा एकदा आपला लॅपटॉप उघडित श्रेयश म्हणाला.

तोच तिची नजर त्याच्या टेबलावर ठेवलेल्या आईवडिलांच्या फोटोवर पडली.

" हे कोण आहेत ?" फोटो पाहत तिने प्रश्न केला.

" माझे आईबाबा." स्मितहास्य देत श्रेयशने उत्तर दिले.

" ते पण बाप्पाकडे गेलेत का माझ्या अमित मामासारखे ?" फोटोफ्रेमवरील हार पाहून तिने अंदाज बांधला.

तसा श्रेयश विचलित झाला. अमितचं नाव काढताच मन बैचेन झालं.

" तु काळजी नको करूस. आई म्हणते जी लोकं देवाकडे जातात त्यांना देव स्टार बनवतो. आम्ही रोज पाहतो मामाला." त्याच्या चेहऱ्यावरील चिंता पाहून श्रेया निरागसपणे म्हणाली.

त्यावेळेस त्याला आपण किती मोठा अपराध केला आहे याची पुन्हा जाणीव झाली. त्याने श्रेयाच्या डोक्यावरून हात फिरवला.

" बेटा, मामाची आठवण येते का ?" तिच्या पुढ्यात गुडघ्यांवर बसत तो म्हणाला.

" आजी आबा खूप रडतात मामाची आठवण काढून. आईही रडते. मलाही रडायला येतं. बाबा समजावतो सगळ्यांना मग शांत होतात." ती नजर खाली करीत हलक्या आवाजात म्हणाली.

तसं त्याने तिला जवळ घेतलं.

पुन्हा एकदा तिच्या डोक्यावरून हात फिरवितांना डोळ्यांतील पाणी तिच्या केसांवर ओघळले.

" फ्रेण्ड, तुलापण तुझ्या आईबाबांची आठवण येत असेल ना. नको रडूस." म्हणत तिने त्याचे डोळे टिपले.

" आपण रात्री तुझ्या आईबाबांचे स्टारही शोधूया." तिने भाबडेपणाने दिलेल्या उत्तराने श्रेयशच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले.

तोच केबीनचा दरवाजा उघडित आभा आत आली. श्रेयाला त्याच्यासोबत पाहून तिने लागलीच तिला आपल्याजवळ खेचले.

" मला न सांगता का वर आलीस ?" आभा रागाने म्हणाली. 

" मॅडम प्लिज तिला नका ओरडू. लहान आहे ती. एका जागी कंटाळली म्हणून आली असेल." श्रेयाची बाजू सावरीत तो म्हणाला.

आभाने मात्र त्यावर बोलण्याचे टाळले.

" बेटा, उशीर झाला आहे. तुला भूक लागली असेल ना ? तु खाली चल मी आलेच." म्हणत तिने श्रेयाला खाली जायला सांगितले. ती ही शांतपणे बाहेर निघून गेली.

श्रेयशच्या मनात मात्र अनामिक भीती निर्माण झाली. आभाकडे पाहण्याची हिंमत नव्हती.खुर्चीवर बसत त्याने लॅपटॉपवर नजर रोखली.

आभाने डब्ब्याची पिशवी टेबलावर ठेवली.

" डब्बा खाऊन घ्या." ती म्हणतच होती की नजर सरपोतदार सर आणि मॅडमच्या फोटो घातलेल्या प्रतिमेवर पडली. नजरेने पुन्हा अश्रूंचा आधार घेतला. आज क्रित्येक वर्षांनी त्यांना असे पहावे लागेल याची कल्पनाही तिने केली नव्हती.

" काय झालं सर आणि मॅडमना ?" विचारतांना अजूनही तिची नजर फोटोवर स्थिर होती.

" कार अपघातात गेले. माझ्या कर्माची शिक्षा देवाने त्यांना दिली." तो गंभीर होत म्हणाला.

तसे तिने डोळे गच्च मिटले. हृदयात पुन्हा तिच जखम ताजी झाली. तिच्या अगतिक चेहऱ्यावर नजर पडताच त्याला त्याची जुनी आभा भेटली. तिच्या डोळ्यांतून गालांवर ओघळणारे पाणी टिपण्याचा मोह आवरत त्याने स्वतःला सावरले.

" डब्बा खाऊन घ्या आणि शक्य झाल्यास त्या डिप्रेशनच्या गोळ्या खाणं बंद करा.तुम्हांला असे पाहून मॅडम आणि सरांच्या मृत आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही. " त्यांच्या प्रतिमेला हात जोडत ती म्हणाली.

त्याने पुन्हा एकदा तिला न्याहाळलं. तिच्या चेहऱ्यावर आपल्याबद्दलची काळजी स्पष्ट जाणवली त्याला.

" मी प्रयत्न करेन." त्यांच्या प्रतिमेकडे पाहून त्याने शब्द दिला.

पुढच्याच क्षणी ती केबीनबाहेर पडली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत श्रेयशला आज शांत वाटले.

क्रमश:

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all